लहान मूल असलेल्या पालकांसमोर संगोपनाच्या संदर्भात नित्य नवे प्रश्न उभे राहत असतात. पालकत्व निभावताना मुलांची वर्तणूक, शिस्त, आहार, झोप, सवयी, शिक्षण, खेळ अशा अनेक बाबतींत नेमकी कुठली भूमिका घ्यायची, याबाबत ते काहीसे संभ्रमावस्थेत असतात. रोज उभ्या राहणाऱ्या नवनव्या अडचणींच्या वेळी अनुभवाचे बोल सांगणारी मोठी माणसं आजूबाजूला असतातच असेही नाही. अशा वेळेस बालसंगोपनाबाबत हसतखेळत सल्ले देणारे पुस्तक पालकांना मदतीला येऊ शकते. डॉ. ख्रिस्तोफर ग्रीनलिखित ‘हसतखेळत बालसंगोपन’ हे मंजूषा आमडेकर यांनी अनुवादित केलेले असेच एक पुस्तक आहे. यात चार वर्षांपर्यंतच्या अपत्याचे संगोपन कसे करायचे, हे सोप्या पद्धतीने सांगितले आहे.
यात मुलांच्या वाढीदरम्यान पावलोपावली उद्भवणाऱ्या समस्यांमुळे (ज्या नंतर आपल्याला तितक्याशा महत्त्वाच्या वाटत नसतीलही!) पालक काळजीने त्रस्त होतात. मुलांचा व्रात्यपणा, चंचलपणा, स्वच्छतेच्या सवयी, त्यांच्या मनातील भीती, सुरक्षितता अशा अनेक बाबतीत असंख्य प्रश्न उभे राहतात. यासंबंधातील सविस्तर मार्गदर्शन या पुस्तकात करण्यात आले आहे. नोकरी करणारे पालक, एकेरी पालकत्व निभावणारे पालक यांना भेडसावणाऱ्या समस्यांवरही एक स्वतंत्र प्रकरण बेतले आहे. त्याखेरीज पूर्वप्राथमिक शिक्षण, भावंडांशी संबंध, अपंग मुलांचं वर्तन आणि शिस्त तसेच मुलांचे आजार याबाबतही साकल्याने मार्गदर्शन केलेले आहे.
मुलांच्या वाढीतील महत्त्वाचे टप्पे, लसीकरणाचे वेळापत्रक, घरात लहान मूल असेल तर कशाकशाची खबरदारी घ्यावी, यासंबंधातही सविस्तर माहिती या पुस्तकात दिलेली आहे. थोडक्यात- लहान मुलांना केवळ वळण लावण्याच्या पलीकडे जात मुलांची निकोप वाढ व्हावी आणि त्यांना हसतखेळत वाढविण्याची वा सांभाळण्याची कला पालकांना साध्य व्हावी, यासाठी हे पुस्तक पालकांना उपयुक्त ठरेल.
‘हसतखेळत बालसंगोपन’ – डॉ. ख्रिस्तोफर ग्रीन,
अनुवाद – मंजूषा आमडेकर,
मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे, पृष्ठे- ४३०, मूल्य- ३४० रुपये.
खाकी वर्दीतल्या गुलाबी कविताखाकी वर्दी आणि गुलाब या दोन्ही गोष्टी हल्लीच्या काळात एकत्र पाहायला मिळणं दुरापास्त मानलं जातं. यात बऱ्याच अंशी तथ्य आहे. पोलीस दलातील व्यक्ती नागरिकांशी ज्या पद्धतीने वर्तन करतात, त्यांची ज्या पद्धतीने दखल घेतात, त्यावरून ही प्रतिमा तयार झाली आहे. पण याला काही अपवादही आहेत. संजीव कोकीळ हे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी अशांपैकीच एक. शिवाय ते कवीही आहेत. संवेदनशीलता आणि प्रामाणिकपणा या दोन्ही गोष्टी त्यांच्या ‘खाकी गुलाब’ या काव्यसंग्रहात अनुभवायला मिळतात. कविवर्य मंगेश पाडगांवकर यांची या काव्यसंग्रहाला छोटाशी प्रस्तावना लाभली आहे. त्यांनी त्यात लिहिले आहे- ‘जीवनातल्या विविध अनुभवांना स्पर्श करीत संजीव कोकीळ यांची कविता निर्मितीच्या प्रवासाला निघाली आहे.’ पाडगांवकरांच्या या अभिप्रायातून या काव्यसंग्रहाचे यथार्थ वर्णन आले आहे.
‘खाकी गुलाब’ – संजीव कोकीळ, उदवेली बुक्स, ठाणे (प.), पृष्ठे -१२८, मूल्य – १५० रुपये.