या मातीतील सूर : बंदिशकार..

सिनेमांमध्ये जास्त विस्तृतपणे काम न करूनही, फक्त प्रायव्हेट अल्बम्स आणि आकाशवाणीसारख्या माध्यमामध्ये मुशाफिरी करून प्रचंड लोकप्रियता मिळवलेले एक अत्यंत उत्तुंग व्यक्तिमत्त्व म्हणजे संगीतकार श्रीनिवास खळे!

श्रीनिवास खळे

नरेंद्र भिडे – narendra@narendrabhide.com

सिनेसंगीताबरोबरच मराठी मनांवर ज्याला आपण गैरफिल्मी गाणी म्हणतो अशा गाण्यांचा खूप मोठा पगडा आहे. प्रामुख्याने त्यात नाटय़संगीत आणि आकाशवाणीद्वारे प्रसिद्ध झालेली भावगीते, भक्तिगीते, लावण्या व लोकगीते यांचा समावेश आहे. बहुतेक संगीतकारांनी सिनेमातल्या संगीताबरोबरच या सर्व माध्यमांचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करून त्या सर्व प्रकारची गाणी देण्याचा प्रयत्न केला आणि थोडय़ाफार फरकाने सर्वानी त्यात यशही मिळवले. पण सिनेमांमध्ये जास्त विस्तृतपणे काम न करूनही, फक्त प्रायव्हेट अल्बम्स आणि आकाशवाणीसारख्या माध्यमामध्ये मुशाफिरी करून प्रचंड लोकप्रियता मिळवलेले एक अत्यंत उत्तुंग व्यक्तिमत्त्व म्हणजे संगीतकार श्रीनिवास खळे!

चित्रपटांशी जास्त संबंध न ठेवल्याने खळेकाकांच्या एकूणच सांगीतिक प्रतिभेला कुठल्याही प्रकारचा अटकाव नव्हता. नव्हता म्हणजे त्यामानाने खूप कमी होता. जेव्हा तुम्ही एखाद्या चित्रपटाला संगीत देता तेव्हा तुम्हाला आवडलेली चाल कितीही चांगली असली तरी चित्रपटाच्या दिग्दर्शकाला ती आवडेलच असं नाही. शिवाय निर्मात्याचंही त्याबाबतीत स्वतंत्र मत असतंच. आणि अर्थातच त्याला तेवढा मानही असतो. खळेकाकांची गाणी या चौकटीत फारशी बसणारी नव्हती असं म्हणायला लागेल. त्यांच्या गाण्यांतील सांगीतिक मूल्यांनी त्यांतल्या दृश्यात्मक मूल्यांवर कुरघोडी केली होती असं निदान मला तरी वाटतं. त्यामुळे खळेकाका चित्रपटांत जास्त रमले नाहीत. त्यांनी चित्रपट केलेच नाहीत असं नाही, पण त्यांच्या बाकी गाण्यांच्या तुलनेत चित्रपटांतील गाण्यांची संख्या खूपच कमी आहे. त्यामुळेच असेल, त्यांनी गदिमा आणि शांताबाई शेळके यांच्यासारख्या चित्रपटांमध्ये व्यग्र असलेल्या कवींबरोबर फार काम केल्याचं आढळत नाही. मात्र ही उणीव पूर्णपणे भरून काढतात कविवर्य मंगेश पाडगांवकर, कविवर्य राजा बढे आणि काही प्रमाणात योगेश्वर अभ्यंकर.

अर्थात त्यांच्या मोजक्याच चित्रपटांमध्ये एक अत्यंत महत्त्वाचा चित्रपट आहे ‘जिव्हाळा’! या चित्रपटात त्यांनी संगीतबद्ध केलेलं ‘या चिमण्यांनो परत फिरा रे’ हे गाणं सर्वार्थाने मराठी चित्रपट संगीतातील अत्यंत मानाचं स्थान मिळवलेलं गाणं आहे यात कुणाचंही दुमत असू शकत नाही. पुरियासारख्या रागामध्ये अत्यंत सुंदर पद्धतीने येणारा मारवा आणि त्याहीपेक्षा अंतऱ्यामध्ये येणारा शुद्ध रिषभ हा खळेकाकांच्या प्रतिभेचा उत्तुंग आविष्कारच! अप्रतिम आणि अवर्णनीय गायन, अत्यंत प्रतिभावंत अशा अनिल मोहिले यांनी केलेलं संगीत संयोजन आणि एकूणच या सर्वाचा मेळ यामुळे या गाण्याला रसिकांच्या आणि संगीत अभ्यासकांच्याही हृदयात जे स्थान मिळाले ते अढळ आहे. आणि ते कायम तसंच राहील. याच चित्रपटात ‘लळा, जिव्हाळा शब्दच खोटे’ हेपण गाणं आहे; जे बाबूजींनी गायलं आहे- तेही अतिशय परिणामकारक आहे. बाबूजी आणि श्रीनिवास खळे या Combination मधलं हे एकमेव गाणं असावं याची रुखरुख मात्र कायम मनाला लागून राहते.

पुरुष गायकांमध्ये खळेकाकांनी ज्यांच्या आवाजाचा सर्वाधिक वापर केला ते म्हणजे अरुण दाते आणि सुरेश वाडकर. अरुण दाते यांच्याबरोबर ‘शुक्र तारा मंद वारा’ आणि ‘पहिलीच भेट झाली’सारखी अजरामर भावगीते खळेकाकांनी निर्माण केली; जी आजही आपण विसरू शकत नाही. तसेच सुरेश वाडकर यांच्याबरोबरही त्यांचे सूर जुळले. सुरेश वाडकर हे अप्रतिम तालीम लाभलेले संवेदनशील गायक तर होतेच, पण त्याचबरोबर ते उत्तम तबलावादकही होते. आणि एकूणच तालाची प्रचंड आवड असलेला आणि त्यात रमणारा हा सुरेल माणूस!  सुरेशजींबरोबरची खळेकाकांची ‘काळ देहासी आला’ किंवा ‘धरिला वृथा छंद’ किंवा ‘जेव्हा तुझ्या बटांना’सारखी गाणी म्हणजे लय-तालाशी खेळत खेळत आणि सुरांना कुरवाळत गाणं कसं म्हणावं याचा एक वस्तुपाठच आहे. तसेच पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्याबरोबर त्यांनी ‘गेले ते दिन गेले’ आणि ‘लाजून हासणे’सारखी भन्नाट गाणी दिली. वर उल्लेख केलेलं ‘लळा, जिव्हाळा..’ हे गीत पं. हृदयनाथ मंगेशकरांनी कसं गायलं असतं असं कुतूहल मला तरी सारखं वाटत आलेलं आहे.

स्त्री-गायकांचा जेव्हा विषय येतो तेव्हा लक्षात येतं की त्यांतही विविध आवाजांचा वापर खळेकाकांनी केला आहे. त्यात कृष्णा कल्ले या गायिकेचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. या गायिकेला जेवढा न्याय मिळायला हवा होता तेवढा मिळाला नाही असं दुर्दैवाने म्हणावं लागेल. ‘रामप्रहरी रामगाथा’सारखं भक्तिगीत किंवा ‘अशी नजर घातकी’सारखी लावणी ऐकल्यावर याचा प्रत्यय येतो. बाकी उषाताई मंगेशकर, सुमन कल्याणपूर आणि सुलोचना चव्हाण यांच्या आवाजाचा खळेकाकांनी चपखलपणे केलेला वापर आपल्याला आढळतो. पण खऱ्या अर्थाने खळेकाकांचं टय़ुनिंग जमतं ते लताजी आणि आशाजींशी. आणि त्यात अर्थातच नवल नाही! खळेकाकांच्या चालींच्या मागण्या जरा जास्तच होत्या. आपण ज्याला ‘आखूडशिंगी, बहुदुधी’ म्हणतो तशाच काहीशा. तुमचा सूर, ताल, लयीची समज, आवाजाची जात, दमसास आणि frequency range हे सगळं अफाटच हवं. या सगळ्या मागण्या पूर्ण करू शकणाऱ्या त्याकाळी ज्ञात अशा या दोनच गायिका होत्या असं ठामपणे म्हणता येईल.

एखादं गाणं सुरात आणि तालात ‘बरोबर’ असणं आणि ‘सुंदर’असणं, यांत नक्की काय फरक आहे हे खळेकाकांची गाणी ऐकल्यावर नीट कळतं. हाच प्रकार आपल्याला ‘अभंग तुकयाचे’ या अल्बममध्ये आढळतो. यातलं प्रत्येक गाणं हा एक स्वतंत्र प्रबंधाचा विषय आहे. जो अभंगाचा मूळचा छंद आहे, तो पूर्णपणे बदलून त्यावर स्वत:ची अशी एक तालमुद्रा ठसवणं हा प्रकार खळेकाकांनी अनेक ठिकाणी केलेला दिसतो. उदाहरणच द्यायचं झालं तर ‘कमोदिनी काय जाणे’ हे गाणं बघा! ते खरं तर ओवी स्वरूपातलं काव्य आहे. ६+६+६+४ अक्षरांचे शब्द या पद्धतीने त्याची रचना आहे. पण इथे खळेकाका ध्रुवपदामध्ये ‘कमोदिनी काय जाणे’ यानंतर ‘तो’ हा शब्द मधे घालतात (जो मूळ अभंगात नसणार!) आणि ‘परिमळ’ हा शब्द वेगळा पाडून एक फार सुंदर तालाकृतीचा आनंद देतात.

तोच प्रकार रागांच्या बाबतीतही आहे! खळेकाकांच्या बहुतेक गाण्यांमध्ये केंद्रस्थानी एक मूळ राग असतो, पण त्या मूळ रागावर प्रचंड प्रमाणावर बाहेरील सुरांचा संगम आपल्याला झालेला दिसतो. भैरवी थाटात अनेक गाणी खळेकाकांनी केली, पण त्यांत मधेच येणारा तीव्र मध्यम, शुद्ध गंधार, शुद्ध निषाद हे खळेकाकांच्या गाण्यांचं एक व्यवच्छेदक लक्षण आहे. हे असे प्रकार अनेक संगीतकारांनी केले, पण खळेकाकांच्या गाण्यांमध्ये हे प्रकार त्यांच्या एकूण सांगीतिक प्रवासाशी सुसंगत किंवा  consistent वाटतात. अर्थात बऱ्याच ठिकाणी त्यामुळे गाणी फारच क्लिष्ट झाल्याचं जाणवतं, पण ती खोटी आणि बनावट वाटत नाहीत. खळेकाकांच्या सांगीतिक व्यक्तिमत्त्वाचाच तो एक परिपाक वाटतो. मालकंस, चंद्रकंस, मधुकंससारख्या या रागांच्या रुळांवरून कायम सांधे बदलणारी त्यांच्या गाण्यांची गाडी आपल्याला नेहमी दिसते.. पण ती कुठल्याही खडखडाटाशिवाय! मध्यसप्तकात शुद्ध रिषभ, पण तारसप्तकात मात्र कोमल रिषभ असे signature प्रयोग अनेक ठिकाणी त्यांनी केलेले दिसतात. कुठल्याही एका रागात राहून गाणं पूर्ण करणं हे खळेकाकांच्या गाण्यांत खूप अभावाने दिसतं. पण असं असूनसुद्धा खळेकाकांच्या गाण्यांत चंचलता नाही. त्यांच्यात एक ठहराव आहे.. एक सुकून आहे. ही किमया त्यांनी कशी साधली हा अभ्यासाचाच विषय आहे.

मात्र, हेच खळेकाका आपल्याला ‘गोरी गोरी पान’, ‘किलबिल किलबिल’, ‘कोणास ठाऊक कसा’, ‘आई आणि बाबा यातील’ इत्यादींसारखी बालगीते देतात, किंवा ‘गर्जा महाराष्ट्र माझा’सारखं शाहीर साबळ्यांनी गायलेलं स्फूर्तिगीत देतात तेव्हा एकदम वेगळेच भासतात. त्यांच्यातला तो थोडासा अवघडपणा आणि तालासुरांशी खेळण्याची खोडकर वृत्ती इथे मात्र अजिबात दिसत नाही. ते एकदम सोपे आणि निरागस होऊन जातात. जेव्हा खळेकाका एखादी ‘कळीदार कपूरी पान’सारखी किंवा‘अशी नजर घातकी’सारखी लावणी करतात तेव्हासुद्धा त्यांचं एक वेगळंच रूप आपल्यासमोर येतं.

आपल्या एक गोष्ट सहज लक्षात येईल की, उत्तम शास्त्रीय गायकांनासुद्धा खळेकाकांच्या गाण्यांची भुरळ पडलेली आहे. पंडित भीमसेन जोशी यांच्याकरवी खळेकाकांनी अजरामर अभंग आपल्याला दिले. ‘पंढरीचा वास’, ‘राजस सुकुमार’ यांसारखे अभंग किंवा ‘राम शाम गुनगान’सारखा हिंदी भजनांचा अल्बम आपल्याला ठळकपणे आठवतो. पं. वसंतराव देशपांडेंच्या आवाजात ‘बगळ्यांची माळ फुले’ आणि ‘राहिले ओठातल्या ओठात’सारखी अद्वितीय गाणी त्यांनी दिली. पं. उल्हास कशाळकर आणि विदुषी वीणा सहस्रबुद्धे यांच्याबरोबर त्यांनी काही भक्तिगीते व भावगीते केली. शास्त्रीय गायकांमध्ये खळेकाका इतके प्रसिद्ध असायला तितकेच कारणही होते. खळेकाकांना आग्रा घराण्याची उत्तम तालीम लाभली होती. रचनेवर त्यांची एवढी हुकमत होती, की ते सुगम संगीतातले एक बंदिशकारच होते असं सहजी म्हणता येईल. ‘काल पाहिले मी स्वप्न गडे’, ‘आज अंतर्यामी भेटे’, ‘नीज माझ्या नंदलाला’, ‘ज्योत दिव्याची मंद तेवते’ आणि ‘अजि म्या ब्रह्म पाहिले’सारखी गाणी या खरं तर अभिजात बंदिशीच आहेत. भले रागाचे नियम त्यात पाळले गेले नसतील, पण त्यातील घट्टपणा, एकसंधपणा आणि लय-ताल-सुरांशी केलेली क्रीडा अत्यंत विलोभनीय अशीच आहे.

त्यांची गाणी ऐकताना बऱ्याचदा वाटल्याशिवाय राहत नाही, की काही गाणी खूप अकारण मोठी आहेत. काही गाणी अजून थोडी गतिमान असती तर चाललं असतं असंही वाटून जातं. ‘श्रावणात घन निळा’ ‘लाजून हासणे’, ‘एकतारी गाते’ या गाण्यांचे शब्द बघितले तर असं वाटतं की ही थोडी उडत्या चालीची होऊ शकली असती. पण नंतर विचार करताना हे जाणवतं की, या सर्व आविष्कारांतून खळेकाकांना होणारा आनंद हा फिल्मी पद्धतीचा खचितच नव्हे. त्या आनंदात तृप्ती आणि शांतता जास्त आहे. तो आनंद ‘साजरा’ करण्याचा आनंद नाही, तर एका जागी बसून शांतचित्ताने आपल्यात झिरपणारा तो आनंद आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आणि एकूणच जडणघडणीला साजेसा असा तो आत्मिक आनंद आहे. सिनेसंगीतात खळेकाकांना असा आनंद, असे समाधान मिळाले असते का, याविषयी शंकेला वाव आहे. किंबहुना, ते तसे नसतेच झाले! आणि पर्यायाने तो आनंद आमच्यापर्यंतही पोहोचला नसता. खळेकाकांनी त्यांच्या समकालीन संगीतकार आणि अभ्यासकांबरोबरच आमच्या पिढीतल्या संगीतकार आणि गायकांच्या हृदयात जे देवतुल्य स्थान मिळवलेलं आहे ते याच गाण्यांच्या जोरावर. कुठलाही आनंदाचा प्रसंग हा फक्त नाचत आणि भडकपणेच साजरा करता येऊ शकतो असा समज जेव्हा पसरत जातो, तेव्हा अंतर्बा आनंद देणारी आणि भवताल विसरायला लावणारी खळेकाकांची गाणी आमच्या मदतीला धावून येतात.. आम्हाला सावरतात आणि चांगलं संगीत करण्याची प्रेरणा व धैर्य देतात.. कायम देत राहतील.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Shrinivas khale ya metitil sur dd70