मराठी समाजाच्या श्रद्धाविष्काराचं सम्यक आणि समकालीन आकलन मांडण्याचा प्रयत्न ‘देवाच्या नावानं..’ या पुस्तकात झाला आहे. श्रद्धा हे मानवी समाजाचं आदिमूळ असलं तरी त्याची धार्मिक आणि सांस्कृतिक अभिव्यक्ती कालपरत्वे बदलत आलेली आहे. अलीकडच्या काळात हा बदल तीव्रतर झाला आहे. तंत्रवैज्ञानिक प्रगती, बाजारपेठीय सूत्रसंचालन आणि मूल्यव्यवस्थेतील नवे प्राधान्यक्रम यामुळे मानवी व्यवहारांवर होणाऱ्या र्सवकष आघातांपासून धर्मश्रद्धांना सुरक्षाकवच पुरवता येणार नाही. नव्या जगात मानवातील परस्परसंबंधांची आणि संवादाची संरचना बदलत असताना देव आणि भक्त यांच्यातील नातंही आमूलाग्र बदलत आहे.
उद्योग आणि व्यवसायाची मक्तेदारी असलेल्या ‘ब्रँड’ आणि ‘इमेज’ या संकल्पना आता देवाच्या दारीही सेवेकरी म्हणून द्वारपालासारख्या उभ्या राहिल्या आहेत. ग्राहकांच्या मनात कृत्रिम गरजा निर्माण करून आपापला माल खपवण्याची धंदेवाईक क्लृप्ती आता देवस्थान चालविणाऱ्या नवउद्योजकांनीही आत्मसात केली आहे. खप वाढवण्याचं ‘टाग्रेट’ जसं ठरवून दिलं जातं, तसं भक्त वाढवण्याचं उद्दिष्ट समोर न ठेवलेली देवस्थानं अव्यावसायिक म्हणून गणली जातात. ‘स्टँडर्ड आणि पुअर’च्या दृष्टीने त्यांचं रेटिंग ‘पुअर’ ठरतं आणि मार्केटमधली पत कमी होते. कमी पत असलेली देवस्थानं मग ‘स्टेटस कन्झम्प्शन’साठी नादार ठरतात. देवस्थान जेवढे श्रीमंत, तेवढे त्याचे भक्त श्रीमंत. श्रीमंतीनं श्रीमंती वाढत जाते.
धर्मश्रद्धांचं रूपांतर धर्मभोळेपणात होत जाणाऱ्या या प्रक्रियेत देवस्थानं गोल्डस्टार होत असली तरी आध्यात्मिक क्षेत्रात मात्र बकाली वाढते आहे. धार्मिक जीवनातून अध्यात्म परागंदा होत चालले आहे. पारमाíथकतेची जागा ऐहिकतेने घेतली आहे. चित्तशुद्धी, सदाचरण, विवेकशीलता, नतिकता या ईश्वरभक्तीच्या पायऱ्या चढून व्यक्तिगत आणि एकूणच मानवी व्यवहार उच्चतम पातळीवर नेणारा दीर्घ पल्ल्याचा प्रवास टाळून ऐहिक जीवनातील सुखसमृद्धीसाठी देवाला प्रसन्न करणाऱ्या हमखास यशाच्या ‘इन्स्टंट’ उपायांवर भक्तांनी आपलं लक्ष केंद्रित केलं आहे.
अध्यात्माला, भक्तीला झाकोळून टाकणारी विवेकहीन समाजाची देवताशरण वृत्ती हे परागतीचं लक्षण आहे, हे ज्ञानोबा-तुकोबांच्या महाराष्ट्राला कळू नये, एवढं गारूड देवाच्या नावाने लोकांच्या मनावर केलं जात आहे. देववादी आणि दैववादी यांतील सीमारेषा पुसल्या गेल्या आहेत. देव आणि भक्त यांच्यातील नातं सुंदर व अर्थपूर्ण करण्याच्या विविध शक्यता विरळ होत चालल्या आहेत. सत्यम् शिवम् सुंदरम्मधील सत्य, पावित्र्य आणि सौंदर्य हरवलेल्या एका बकाल श्रीमंतीकडे आपली घोडदौड सुरू आहे. हे सगळं ‘देवाच्या नावानं’ होत असून त्यातला विरोधाभास अचंबित करणारा आहे.
अगदी हेच उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून नव्हे, पण एक अंतर राखून, तटस्थतेनं, काहीशा मूल्यनिरपेक्षभावानं, न्यायाधीशाची  किंवा वकिलाचीही भूमिका न घेता मराठी समाजाचा हा श्रद्धाव्यापार तपासण्याचा प्रयत्न ‘देवाच्या नावानं..’मध्ये करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील शिर्डी, अक्कलकोट, शेगाव, पंढरपूर, तुळजापूर, त्र्यंबकेश्वर, शनििशगणापूर, सिद्धिविनायक आणि प्रति-तिरुपती व प्रति-शिर्डी ही नव्याने निर्माण झालेली देवस्थानं या अभ्यासासाठी निवडण्यात आली. विविध गटांत बसणारी, प्रादेशिक अनुशेषाला संधी न देणारी, प्रातिनिधिक म्हणता येतील अशी ही देवस्थानं आहेत. गरिबांच्या विठोबापासून गरीब साईबाबांना सुवर्णसिंहासनावर अधिष्ठित करणाऱ्या शिर्डीपर्यंत सर्व रंगछटांचा समावेश असणारी. हा अभ्यास महाराष्ट्रातील देवस्थानांपुरता मर्यादित असला तरी त्यातील अनुमानं देशव्यापी आहेत असं समजायला हरकत नाही. महाराष्ट्राने नाही तरी स्वत:ची स्वतंत्र, वेगळी ओळख आपल्या अकर्तृत्वानं पुसून टाकली आहे. आणि श्रद्धेच्या प्रांतात भौगोलिक सीमा नेहमीच हद्दपार होत असल्याने वरीलपकी काही देवस्थानांवर इतर प्रांतांतील धनिकांचाही मोठा अदृष्ट वरदहस्त आहेच. भारतीय समाजाच्या श्रद्धेचा आलेख कसा वधारतोय किंवा घसरतोय, याची कल्पना येण्यासाठी दहा देवस्थानांची निवड म्हणजे पुरेसं मोठं ‘सॅम्पल’ आहे असं म्हणायला हरकत नाही.
या पुस्तकाचे संपादक सुहास कुलकर्णी यांनी त्यांच्या विवेचक प्रास्ताविकात या लेखनउद्योगामागील भूमिका स्वच्छपणे मांडली आहे. सनसनाटी टाळून एका व्यापक प्रक्रियेतील सत्याचा शोध घेणं हे उद्दिष्ट त्यांनी स्वीकारलं आहे. केवळ गरव्यवहारांवर प्रकाशझोत टाकणं एवढय़ापुरतंच हे लेखन मर्यादित नाही. समाजातील एका विशिष्ट अवस्थेचा समाजशास्त्रीय अंगाने निरपेक्षपणे केलेला हा अभ्यास आहे. लोकांच्या श्रद्धेला त्यांनी हात लावलेला नाही. त्यासंबंधी प्रश्नचिन्ह उभं केलेलं नाही. ‘आहे हे असं आहे’ एवढंच सांगण्याचा त्यांचा उद्देश आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाची अ‍ॅडव्होकसी त्यात नाही. परंतु अप्रत्यक्षरीत्या त्यांना जे म्हणायचं आहे, तेही त्यांनी म्हटलं आहे. ते म्हणतात, ‘देवस्थानाच्या अनुषंगाने ज्या न पटणाऱ्या श्रद्धा-अंधश्रद्धा, अपश्रद्धा आहेत, त्याबाबत कुणी ‘ब्र’ काढताना दिसत नाही. कालबाह्य़ परंपरांना झुगारून देण्याची मानसिकता समाजामध्ये नाही. अशा गोष्टींना विरोध केला तर देवस्थानचा ‘यूएसपी’ बाद होण्याची भीती लोकांच्या मनात असणार. लोकांच्या श्रद्धेची गाठ अर्थकारणाशी बसलेली असल्याने श्रद्धा टिकवून ठेवल्या तरच हे रहाटगाडगं चालू राहणार आहे, याची सुप्त जाणीव गावकऱ्यांमध्ये आणि देवस्थानच्या संचालकांमध्येही असणार. त्यामुळे प्रथा, परंपरा आहेत तशा सुरू ठेवण्याचा फंडा चालू दिसतो. ‘देवाच्या नावानं’ जे होईल ते पाहत राहावं, असा सर्वाचा दृष्टिकोन आहे. महाराष्ट्रातील व अनुमानाने भारतातीलही काही देवस्थानांच्या ‘ग्रोथ स्टोरी’तील मार्केटिंग स्ट्रॅटेजीच त्यांनी इथं अधोरेखित केली आहे. अंतिम निर्णय मात्र वाचकांवर सोपवला आहे.
देवस्थानांच्या या ‘शायिनग’ उत्कर्षांचा अर्थ आधुनिक, व्यापारकेंद्री भांडवलशाही अर्थव्यवस्थेच्या चौकटीतील परिमाणांच्या साहाय्याने लावण्याचा प्रयत्न राज्यशास्त्राच्या अभ्यासक राजेश्वरी देशपांडे यांनी फार नेमकेपणाने त्यांच्या प्रस्तावनेत केला आहे. या दहा लेखांतील सुटय़ा ऐवजाला एकत्रित बांधून वाचकांना पुस्तक वाचण्यासाठी त्यांनी दिशादर्शन केलं आहे. श्रद्धावान भाविक आणि देवस्थानांचं व्यवस्थापन यांच्यातील अंतर्वरिोध त्यामुळे ठळक होतो. सांस्कृतिक आणि धार्मिक व्यापारीकरणाचा हा नवा ‘फिनॉमिनन’ स्पष्ट करताना त्या म्हणतात, ‘वर्तमान धर्मकारण हे प्राधान्याने भांडवलशाहीच्या चौकटीत सूक्ष्म आणि ढोबळपणे वावरणारे धर्मकारण बनल्याने धर्माच्या माध्यमातून लोक घेत असलेला मन:शांतीचा शोधदेखील फसवा ठरतो आणि भक्तांच्या धार्मिक अनुभवांचेदेखील वस्तुकरण घडते.’
त्यांचा हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. अतिवेगाने बदलणाऱ्या या अस्थिर व्यापारकेंद्री जगात माणसाचे एकेक मानसिक व भावनिक आधार तुटत असताना, कर्णबधिर करणाऱ्या उच्चरवातील सामाजिक संवादप्रक्रियेत स्वत्व हरवून बसलेल्या, प्रतिसाद आणि प्रतिक्रियेच्या चक्रात सुरक्षितता हरवून बसलेल्या, रोजच्या जगण्यात परात्मभाव अनुभवणाऱ्या माणसाचा शेवटचा आधार ठरावा अशा देवाचंही मार्केटने अपहरण केलं आहे. ऐहिक शोषणाबरोबर भावशोषणाच्या संकटाशीही त्याला सामना करावा लागतो आहे. आणि हे सगळे विकासाच्या, प्रगतीच्या आणि देवाच्याही नावानं चाललं आहे.
पुस्तकातील दहा लेखांतील आराध्यदैवतं वेगवेगळी असली तरी पंढरपूरसारख्या काही देवस्थानांचा अपवाद वगळता इतरत्र व्यवस्थापनाचं प्रारूप सर्वसाधारणपणे सारखंच आहे. गेल्या काही वर्षांत ते पद्धतशीरपणे विकसित झालं आहे. तिरुपतीच्या बालाजी मंदिरानं व्यावसायिक व्यवस्थापनाचं काटेकोर म्हणता येईल असं उच्च प्रतीचं नमुनेदार आणि अनुकरणीय असं मार्गदर्शक ‘रोल मॉडेल’ उभं केलं आहे. पशाची आवक लक्षात घेऊन त्यातील काही धडे महाराष्ट्रातील देवस्थानांनी गिरवले आहेत. परंतु प्रत्येक देवस्थानी येणाऱ्या भाविकांच्या मनोरथांप्रमाणे त्यातलं वेगळेपण दिसू शकतं. उदाहरणार्थ, शिर्डीला येणारा भाविक व्यक्तिगत समस्यांच्या सोडवणुकीसाठी साईबाबांच्या चरणी माथा टेकत असतो. अनेकांना धंद्यात, व्यवसायात आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात असं वाटत असतं. काहीजणांना सुखाची अभिलाषा असते, तर काही मन:शांतीच्या शोधात असतात. श्रद्धा आणि संयम हा साईबाबांच्या जीवनाचा संदेश आहे, अर्क आहे. प्रत्येकजण आपल्या मगदुराप्रमाणे त्याचा अर्थ स्वत:च्या जगण्याच्या संदर्भात शोधत असतो. प्रत्येक देवस्थानामध्ये येणारा भाविक स्वाभाविकपणेच श्रद्धेचा ‘स्व’केंद्रित विचार करीत असतो. या ‘स्व’चा समाज होतो तेव्हा देवस्थानाचं सार्वजनिक रूप प्रकट होतं. देवस्थान म्हणजे सेवाउद्योग करणारी एक यंत्रणा असते आणि आíथक हितसंबंध, राजकीय समीकरणं, सत्ताकारण, जातीय वर्चस्व, व्यक्तिगत हेवेदावे या सर्वाचा कमी-अधिक आढळ तिथे हमखास असतोच.
श्रीमंत झालेल्या देवस्थानांच्या आसपासचा परिसर आणि गावातील लोक यांच्यात मिळणाऱ्या लाभाच्या वाटपावरून मतभेद आणि असंतोषाच्या ठिणग्या वारंवार पडत असतात. आसपासची बकाली, दारिदर्््य आणि देवस्थानांची श्रीमंती भारतीय समाजाच्या पारंपरिक रचनेची आठवण करून देते. देवस्थान हे व्यापक विकासाचं संप्रेरक ठरावं अशी अपेक्षा रास्तपणे बाळगली तरी त्याची प्रचीती अभावानेच येते. काही देवस्थानं फक्त भक्तांना ‘सेवा’ पुरवण्याच्या पलीकडे जाऊन व्यापक मानवतावादी समाजसेवेचा विचार करताना दिसतात. त्यातून शैक्षणिक आणि आरोग्याच्या सोयी निर्माण होतात, ही जमेची बाजू आहे. पण त्यांचं सुनियोजन नसल्याने किंवा विकासाची दूरदृष्टी नसल्याने अ‍ॅडहॉक म्हणता येईल अशा कामांवरच मोठय़ा रकमा खर्च होतात. तिथे मूलभूत सोयीसुविधांऐवजी भपकेबाज, दिखाऊ आणि भक्तांच्या वा  पर्यटकांच्या नजरेत भरतील अशीच कामं काढण्याची प्रवृत्ती प्रबळ दिसते. देवस्थानांमुळे स्थानिक पातळीवर काही रोजगार जरूर निर्माण झाले आहेत; परंतु रोजगारनिर्मिती हे देवस्थानांचं अंगीकृत कार्य मानायचं का, आणि त्यावरून त्यांचं सामाजिक मूल्यमापन करायचं का, असा प्रश्नही उपस्थित होऊ शकतो.
या पुस्तकातील आणि त्यानिमित्ताने इतर देवस्थानांच्या संदर्भातही सर्वाना सारखीच गरज असलेल्या विकास आराखडय़ाचा प्रश्न इथे वारंवार उपस्थित करण्यात आला आहे. भाविक आणि पर्यटकांच्या वाढत्या संख्येला आणि गरजांना सामोरं जाण्याची क्षमता ना संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आहे, ना देवस्थानांमध्ये. शासनाने त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करून एक पाऊल उचललं आहे. परंतु हितसंबंध, गटातटाचं राजकारण, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, संकल्पनांमधील त्रुटी अशा अनेक कारणांनी कुठल्याही देवस्थानाचा एकात्मिक विकास होताना दिसत नाही. त्या स्थळाचं पावित्र्य, मांगल्य, सौंदर्य, उपयुक्तता या गोष्टींना क्रमवारीत फार खालचं स्थान आहे.
‘वारकऱ्यांच्या मनात चंद्रभागेविषयी कितीही ममत्व आणि जिव्हाळा असला तरी डोळ्यांनी दिसणारं चंद्रभागेचं दर्शन मात्र विषण्ण करणारं आहे,’ हे या पुस्तकातील पंढरपूरवरील लेखातील विधान खूप संयमित आणि खालच्या पट्टीतील असलं तरी सर्वच देवस्थानांच्या सद्य:स्थितीबाबत ते प्रातिनिधिक म्हणता येईल असं आहे. अशा विषण्ण करणाऱ्या देवस्थानी श्रद्धा व भक्तीला पूर आला तरी भाविकांना अशांत आणि अस्वस्थ चित्तानेच त्यांचा निरोप घ्यावा लागतो. आधुनिक सुविधांनी (म्हणजे पंचतारांकित नव्हे!) युक्त, पर्यावरणानुकूल, स्वयंपूर्ण, विकसनशील शहरांची आखणी प्राधान्याने व्हायला हवी. टपऱ्यांच्या गराडय़ात अडकलेल्या देवाला जरा मोकळा श्वास घेता यावा.
‘देवाच्या नावानं..’ या पुस्तकात तातडीचे अनेक प्रश्न पृष्ठभागावर आले आहेत. आणि अगदी सश्रद्ध वाचकांच्या मनातही काही प्रश्न उपस्थित होण्याच्या शक्यताही त्यात आहेत. ‘देव आहे की नाही?’ या वादात न शिरताही, देव असेलच तर देवाच्या आणि माणसाच्या नातेबंधाचं स्वरूप काय आहे, परमेश्वरावरील श्रद्धेचा आविष्कार करण्याचे विवेकशील मार्ग कोणते आहेत, भक्तीचं स्वरूप काय आहे, असे अनेक प्रश्न निर्माण होतात. परंपराधिष्ठित श्रद्धाभावाच्या पलीकडे जाऊन विवेकनिष्ठेने रूढ कर्मकांड आणि सांप्रदायिक आचारांचा पुनर्विचार करण्याची क्षमता आपल्या समाजाने गमावली आहे की काय, असं प्रकर्षांने जाणवत राहतं. मानवी व्यवहारांनी देवाचं रूप काळवंडलं आहे. श्रद्धा-व्यवहाराचं उन्नयन झालं नाही तर माणसांच्या बंदिवासातून देव स्वत:लाच मुक्त करून घेतील. मार्केटशिवाय मग दुसरा देव उरणार नाही. देव चालले हो, एवढंच तथ्य मागे उरेल.
‘देवाच्या नावानं’ : संपादक – सुहास कुलकर्णी, मनोहर सोनवणे, समकालीन प्रकाशन, पुणे,  पृष्ठे- १८८, मूल्य- १८० रु.

संक्षेपात.. :
माणूस नावाचं रसायन
राजन खान हे आजचे आघाडीचे कथा-कादंबरीकार आहेत. त्यांनी बहुतांश लेखन याच प्रकारात केलेलं असलं तरी ‘पिढी’, ‘इह’, ‘अजब गजब जगणं वागणं’, ‘आडवं आणि तिडवं’, ‘मानसमंत्रणा’, ‘तंतोतंत’ असं काही गद्यलेखनही केलं आहे. ‘इह’मध्ये तर त्यांनी थेट धर्मप्रश्नालाच हात घातला आहे.  प्रस्तुत पुस्तकात त्यांनी माणूस नावाचं रसायन समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. पण राजन हे मुख्यत: कथा-कादंबरीकार आहेत. त्यामुळे त्यांच्या सुखाच्या सर्व कल्पना जरा जास्तच रोमँटिक स्वरूपाच्या वाटतात. मलपृष्ठावर ते म्हणतात, ‘‘मला नेहमी वाटतं, माणसं जन्मापासून मरणापर्यंत शांत आणि सुखी जगली पाहिजेत. तसं जगणं अवघडही नाही न् अशक्यही नाही. सुख आणि शांतता या मेंदूच्या भावना आहेत. त्या भावनांपर्यंत जाण्यासाठी माणसांना ‘माणूस असण्याचं’ ज्ञान झालं पाहिजे.’’ असा रोमँटिकपणा लोभावणारा असतो. या संग्रहातील दहाही लेख तसेच आहेत. शिवाय हे लेख असले तरी त्यांचं स्वरूप गद्यात्म गोष्ट सांगावी तसंच आहे. थोडक्यात त्या त्या विषयाच्या निमित्ताने लेखकाने आपल्याला सुचलेले, भावलेले आणि सांगावेसे वाटलेले, काहीशा विस्तृतपणे मांडलेले आहे. माणूस ही मुळातच सहजासहजी थांगपत्ता न लागणारी वल्ली, त्यामुळे त्याच्याबाबत कितीतरी मते, विचार, कथा, दंतकथा, उदाहरणे आणि अनुभव संभवतात. या संग्रहातून या माणसाची कोणती रूपं लेखकाला अनुभवायला मिळाली, भेटली, याचं चित्रण आहे. माणूस नावाचं रसायन किती अजब असू शकतं, याची थोडीशी कल्पना या संग्रहातून येऊ शकते.
संगत-विसंगत – राजन खान, अक्षर मानव प्रकाशन, पुणे, पृष्ठे – १५२, मूल्य – १५० रुपये.

संत कवयित्रींचे अंतर्मन
लोकसाहित्याच्या अभ्यासक   डॉ. तारा भवाळकर यांनी मराठी संत कवयित्रींची मुक्तिसंकल्पना आणि स्त्रीमुक्ती या मध्यवर्ती संकल्पनेविषयीचे सहा लेख या संग्रहात एकत्रित केले आहेत. संशोधकाचा पिंड असल्याने या पुस्तकामागची भूमिका आणि समारोप-संदर्भसूची-परिशिष्टे यांचीही जोड दिलेली आहे. १९९४ साली प्रकाशित झालेल्या संग्रहाची ही दुसरी आवृत्ती आहे. भारतातील संत चळवळ ही सामाजिक मुक्तीची चळवळ होती. परंपरेच्या शृंखला पायात अडकवून चार भिंतीच्या आतच ठेवलेल्या स्त्रियांना आत्मस्वर देण्याचा प्रयत्न या चळवळीतील संत कवयित्रींनी केला. तो करताना त्यांनी सामाजिक शोषणाच्या आणि स्त्री शोषणाच्या विरोधात कुठल्या प्रकारे बंडखोरी केली, त्याची चर्चा या पुस्तकामध्ये भवाळकर यांनी केली आहे. त्या वेळची परिस्थिती आजच्यापेक्षा खूप वेगळी आणि कर्मठ होती, त्यामुळे त्याविरोधातल्या बंडखोरीची हत्यारेही वेगळी होती. एका स्वतंत्र प्रकरणात भवाळकर यांनी आजच्या स्त्रीचळवळीचा या संत कवयित्रींच्या चळवळीशी काय अनुबंध आहे, याचाही ऊहापोह केला आहे. त्यामुळे स्त्री चळवळीच्या अभ्यासकांपासून सर्वसामान्य महिलांपर्यंत ते सुशिक्षित महिलांपासून अशिक्षित महिलांपर्यंत- ज्यांना या विषयात रस आहे, त्यांना हे पुस्तक स्वारस्यपूर्ण वाटू शकेल.
स्त्रीमुक्तीचा आत्मस्वर-
तारा भवाळकर, लोकवाङ्मय गृह, पृष्ठे – १६८, मूल्य १९० रुपये.