व्यक्तिमत्त्व जितकं अधिक मोठं, तितकं हे काम अधिक कठीण. ते उभं करताना पटकथाकार आणि दिग्दर्शक चरित्रनायकाच्या परिचित बाजूंचा उपयोग कायम करून घेताना दिसतात. त्याच्या रूपाचे बारकावे, सवयी, आयुष्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी यांसारख्या ठळक गोष्टी त्या व्यक्तीचा वरवर आभास तयार करण्यासाठी पुरेशा असतात. पण व्यक्तिरेखेचा प्राण या साऱ्यापलीकडे कुठेतरी, उघड न कळण्याजोग्या जागी दडलेला असतो. आणि हा अदृश्य प्राण पकडू पाहणं, हे या चित्रपटांपुढलं खरं आव्हान असतं.
राष्ट्रपुरुषांच्या चित्रणाबाबत तर अधिकच गहिरे प्रश्न उभे राहतात. त्यांचा तत्कालीन आणि आजवर टिकून असलेला जनमानसावरचा प्रभाव, लोकांच्या डोळ्यांसमोर असणारी त्यांची प्रतिमा, त्यांच्या विचारांचं काळाच्या ओघात टिकून राहणं वा न राहणं, जात- वर्ण- धर्म अशा विचारांपासून दूर; पण भावनेच्या जवळ येणाऱ्या मुद्दय़ांवरून या व्यक्तिमत्त्वांना असणारा पािठबा किंवा विरोध, त्यांनी आपल्या काळात करून दाखविलेली कामगिरी आणि तिचे क्षणिक वा दूरगामी परिणाम या साऱ्यांचा काहीएक प्रमाणात विचार या चरित्रपटांमधून होणं आवश्यक असतं. मात्र तो करताना सावधगिरी बाळगणं गरजेचं असतं. चित्रपटाने जराही वेगळा, टोकाचा, आक्षेपार्ह सूर काढणं- हे वाद निर्माण करणारं ठरू शकतं.
गेल्या वर्षी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष अब्राहम िलकन यांच्या व्यक्तिरेखेला केंद्रस्थानी ठेवून हॉलिवुडने केलेले (आणि कालांतराने आपल्याकडेही प्रदíशत झालेले) दोन चित्रपट पाहिले तर अशा व्यक्तिमत्त्वाच्या चित्रणांत किती टोकाचा वेगळेपणा असू शकतो, हे पाहता येईल. यातला पहिला होता तो नाव, व्यक्तिरेखेची बाह्य़ प्रतिमा, लोकप्रियता आणि आयुष्यातला काही तपशील घेऊन रचलेला; पण अर्थातच संपूर्ण काल्पनिक.. ‘अब्राहम िलकन : व्हॅम्पायर हंटर.’  तर दुसरा- नुकताच आपल्याकडे प्रदíशत झालेला आणि ऑस्कर स्पध्रेत पुढे असणारा, िलकनच्या चरित्रातला अखेरचा काही काळ घडला तसा उभारणारा स्पीलबर्गचा ‘िलकन’!
स्पीलबर्गचा चित्रपट हा प्रत्यक्ष घटनांशी प्रामाणिक असणारा आणि अमेरिकन समाजासमोर िलकनची जी प्रतिमा आहे, तिच्याशी सुसंगत असाच आहे. याउलट, बेकमाम्बेटोव दिग्दíशत ‘व्हॅम्पायर हंटर’ हा केवळ त्या विशिष्ट काळात घडणारा भय-साहसपट आहे. प्रत्यक्ष िलकनच्या व्यक्तिमत्त्वाशी त्याचा इथे तसा संबंध नाही. मात्र, तो केवळ त्याचं नाव वापरतो असं नाही; तर ट्वेनच्या शब्दांत तो िलकनच्या ‘क्लोद्स अ‍ॅण्ड बटन्स’चाही पुरेपूर वापर करतो. त्याच्या दिसण्या-बोलण्यापासून यादवी युद्धासारख्या संदर्भापर्यंत अनेक गोष्टी तो आपल्या कथानकात गुंफतो आणि विडंबनाचा आधार न घेता सरळ गोष्ट सांगतो. हा चित्रपट जिच्यावर बेतला आहे ती सेथ ग्रॅहम-स्मिथची कादंबरी आणि प्रत्यक्ष चित्रपटदेखील अमेरिकेत कोणत्याही वादविवादाशिवाय प्रदíशत होऊ शकला यावरून अमेरिकन लोकांचा चित्रपटाकडे, साहित्याकडे किंवा एकूणच कलेकडे पाहण्याचा दृष्टिकोन किती मोकळा आहे याची कल्पना येऊ शकते. आपल्याकडे असा गमतीदार, खेळकर दृष्टिकोन मान्य होईल अशी साधी कल्पनाही करता येत नाही.
या चित्रपटाप्रमाणेच राष्ट्रीय व्यक्तिमत्त्वाच्या प्रतिमेचा आधार घेऊन काल्पनिक कथानक मांडणारं आणि केवळ कलेकडे पाहण्याच्या मुक्त दृष्टिकोनाने प्रेक्षकांपर्यंत पोचू शकणारं आणखी एक उदाहरण चटकन् आठवण्यासारखं आहे आणि ते म्हणजे गॅब्रिएल रेंजची ब्रिटिश मॉक्युमेन्टरी (मॉक डॉक्युमेन्टरी) ‘डेथ ऑफ अ प्रेसिडेन्ट’(२००६).
‘डेथ ऑफ अ प्रेसिडेन्ट’मध्ये राष्ट्राध्यक्षाच्या हत्येच्या घटनेवर आधारित चांगल्या माहितीपटाचे सर्व गुणधर्म आहेत. हत्येच्या दिवसाचं उपलब्ध अर्कायव्हल फुटेज, त्या दिवसाच्या घटनांचा लावलेला ताळमेळ, संबंधितांच्या मुलाखती, तपास असं सारं काही त्यात आहे. फरक एवढाच की, इथे दाखवलेली हत्या ही जॉर्ज डब्ल्यू. बुश यांची आहे; जे चित्रपटनिर्मिती आणि प्रदर्शनादरम्यान सत्तेवर होते आणि आजही हयात आहेत. गमतीची गोष्ट अशी की, हत्येसारखी धक्कादायक गोष्ट दाखवूनही यातलं बुश यांचं चित्रण सहानुभूतीनं केलेलं आहे. त्यांची टिंगल करायचा वा त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न इथे कुठेच दिसत नाही; जो मायकेल मूरने आपल्या ‘फॅरेनाईट ९११’ (२००४) या बुशविरोधी माहितीपटात सपाटून केला आणि पुढे ऑलिव्हर स्टोनसारख्या विख्यात दिग्दर्शकानेही आपल्या ‘६.’ (२००८) या जॉर्ज डब्ल्यू. बुश यांच्यावरील चरित्रपटात केला. सर्वोच्च स्थानावर असणाऱ्या हयात व्यक्तीवरचे याप्रकारचे या ना त्या मार्गाने वादग्रस्त प्रयत्नही अमेरिकेत प्रदíशत झाले. यातही त्यांच्या धोरणाचा मोकळेपणाच दिसून येतो.
चरित्रपटांच्या निर्मितीमागची एक प्रमुख अडचण असते ती त्यात दाखवण्याजोग्या घटनांची लांबी आणि त्या दाखवण्याकरिता उपलब्ध कालावधी यांचं व्यस्त प्रमाण! राजकीय व्यक्तिमत्त्वांच्या कार्याचा आढावा तर बहुधा काही दशकांच्या कालावधीवर पसरलेला असतो आणि त्यातले महत्त्वाचे प्रसंग प्रेक्षकांसमोर येणं हे चित्रकर्त्यांना गरजेचं वाटतं. त्याशिवाय मुख्य कारकीर्द सुरू होण्याआधीचा जडणघडणीचा काळही असतोच. अशा परिस्थितीत मग सगळ्या घटना ठरावीक वेळात बसवणं ही एक मुश्कील कामगिरी होऊन बसते. सर्व घटनांचं त्रोटक चित्रण करणं किंवा मोजक्याच कालावधीवर लक्ष केंद्रित करून बाकी गोष्टींचे केवळ उल्लेख करणं- असे दोनच पर्याय यावर चित्रकर्त्यांसमोर उरतात. यातला दुसरा मार्ग अनेक महत्त्वाच्या चरित्रपटांत वापरलेला दिसतो. गुलामी रद्द करणारा कायदा लागू करून घेण्यासाठी िलकनने अखेरच्या काही दिवसांत केलेले यशस्वी प्रयत्न मांडणारा ‘िलकन’ (२०१२), प्रिन्सेस डायनाच्या मृत्यूनंतरच्या काळातली दुसऱ्या एलिझाबेथ राणीची उलघाल दाखवणारा ‘द क्वीन’ (२००६), ब्रिटिश टॉक शो होस्टने घेतलेल्या निक्सनच्या पर्दाफाश मुलाखतींना केंद्रस्थानी ठेवणारा ‘फ्रॉस्ट/निक्सन’ (२००८) आणि हिटलरचे अखेरचे दहा दिवस दाखविण्यासाठी आपल्याला थेट बंकरमध्ये घेऊन जाणारा ‘डाऊनफॉल’ (२००४) ही सारी याच प्रकारच्या चित्रपटांची गाजलेली उदाहरणं मानता येतील.
मात्र, याचा अर्थ असाही नव्हे की, या प्रकारचा मर्यादित अवकाश हा प्रत्येक चरित्रपटाची गरज असते. चरित्रनायकाच्या प्रचंड कारकीर्दीचं सखोल दर्शन घडवणारे चित्रपटही अनेक आहेत. आयरिश नेत्याच्या लढाऊ आयुष्याचा आढावा घेणारा ‘मायकेल कॉलिन्स’, मार्टिन लूथर किंगला समकालीन असणाऱ्या बंडखोर कृष्णवर्णीय नेत्याचं आयुष्य दाखवणारा ‘माल्कम एक्स’ आणि इतरही काही. या ढाच्यातलं माझं सर्वात आवडतं उदाहरण म्हणजे रिचर्ड अ‍ॅटेनबरो दिग्दíशत ‘गांधी’ (१९८२).
दक्षिण आफ्रिकेत ट्रेनमध्ये मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीपासून गांधीजींच्या आयुष्यातला एकही महत्त्वाचा प्रसंग हा चित्रपट सोडत नाही. अगदी ते हजर नसणारे, पण त्यांच्या लढय़ाशी संबंधित जालियनवाला बागेसारखे महत्त्वाचे प्रसंगही तो दाखवतो. मात्र, निव्वळ या प्रसंगांची स्पष्ट मांडणी हा त्याचा हेतू नाही. तो गांधींचं जीवनविषयक तत्त्वज्ञान मांडतो आणि त्याही पलीकडे जाऊन तो- ते माणूस म्हणून कसे होते, हे सांगतो. केवळ मिठाच्या सत्याग्रहासारखे हायलाइट्स दाखवून तो थांबत नाही, तर त्यांचं कस्तुरबाबरोबरचं, अनुयायांबरोबरचं, काँग्रेसच्या इतर नेत्यांबरोबरचं वागणं कसं होतं, हेही मांडतो. हा चित्रपट आठवला की आठवतात ते गांधींना माणूस म्हणून दाखवणारे छोटे छोटे प्रसंग- जे चित्रपटाचा प्राण आहेत. त्यातल्या प्रमुख भूमिकेतला बेन किंग्जलेदेखील गांधींच्या लकबी उचलण्याचा प्रयत्न करतोय असं वाटत नाही, तर त्याची प्रत्येक हालचाल स्वाभाविक वाटते. जणू तो गांधीच बनून जातो. चरित्रनायकाच्या बाह्य़रूपाबरोबरच त्याचा आत्मा पकडणारे जे मोजके चरित्रपट आहेत, त्यातला हा एक मानावा लागेल.
आपल्याकडेही या वळणावर राजकीय चरित्रपट बनवण्याचे अनेक प्रयत्न झाले. त्यातले काही- केतन मेहताचा ‘सरदार’ (१९९३) किंवा डॉ. जब्बार पटेलांचा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ (२०००) यांसारखे प्रशंसनीय, तर श्याम बेनेगलांच्या ‘नेताजी सुभाषचंद्र बोस : द फरगॉटन हीरो’ (२००५) सारखे हास्यास्पद! मात्र, यापैकी ‘गांधी’च्या दर्जाला कोणताच येऊ शकला नाही तो घटनांमध्ये गुरफटून जाऊन नायकाचा आत्मा उभा करण्यात आलेल्या अपयशामुळे!
अशा राजकीय व्यक्तिरेखांचं दर्शन चित्रपट प्रेक्षकांना आणखी एका पद्धतीने करून देऊ शकतात, ते म्हणजे त्या व्यक्तिमत्त्वाचे पलू, त्यांचा जनसामान्यांवरचा प्रभाव, त्यांची दृष्टी याची झलक आपल्यापुढे आणत, त्यांच्या संपूर्ण कर्तृत्वाचा विचार एक तर बाजूला ठेवत किंवा त्याची थोडक्यात ओळख करून देत! जॉन फोर्डने हेन्री फोन्डाला प्रमुख भूमिकेत ठेवून राजकारणात जाण्याआधी वकिली करणाऱ्या अब्राहम िलकनची गोष्ट आपल्या ‘यंग मिस्टर िलकन’ (१९३९) या चित्रपटामध्ये सांगितली ती त्यातल्या रहस्याकरता नाही, तर भावी राष्ट्राध्यक्षाच्या व्यक्तिमत्त्वाचा एक अभ्यास म्हणून! ऑलिव्हर स्टोनच्या ‘जेएफके’ (१९९१) मध्ये केनेडीहत्येचा पुन्हा तपास झाला. पण आपल्याला दिसली ती या हत्येने तयार झालेली पोकळी- जी आज इतक्या वर्षांनंतरही कायम आहे.
आज हे चरित्रपट महत्त्वाचे ठरतात ते केवळ इतिहासातली एक नोंद म्हणून नाही, तर या व्यक्तिरेखांच्या अस्तित्वाकडे, त्यांच्या समाजातल्या स्थानाकडे, त्यांच्या कार्याकडे त्या- त्या काळात टाकलेला एक दृष्टिक्षेप म्हणून! हा दृष्टिक्षेप कायम त्रयस्थ असतो किंवा या चरित्रांकडे सकारात्मक पद्धतीनेच पाहणारा असतो असं नाही. मात्र, तो आपल्याला हे चेहरे विसरू देत नाही.. आपल्यासाठी तो इतिहास जिवंत ठेवतो.. पुस्तकाच्या पानांवरच्या छापील सत्यापलीकडे नेऊ पाहतो.. काळाच्या पडद्याआड गेलेल्या या नायकांशी आपली ओळख ताजी ठेवतो.