scorecardresearch

‘भुलविलेस साजणी, तू विलोल लोचनी..’

भावगीतांच्या दुनियेत कवी सुधांशु यांचे योगदान मोलाचे आहे.

‘भुलविलेस साजणी, तू विलोल लोचनी..’

भावगीतांच्या दुनियेत कवी सुधांशु यांचे योगदान मोलाचे आहे. औदुंबर या दत्तक्षेत्री त्यांचे वास्तव्य होते. त्यांनी लिहिलेल्या गीतांना डोंबिवलीचे गायक- संगीतकार वसंत आजगांवकर यांचा स्वर मिळाला आणि संगीतप्रेमींना उत्तमोत्तम भावगीते मिळाली. ‘सुधांशु’ या टोपणनावाला साजेशी त्यांची कविता आणि सुरांचा बारमाही वसंत.. वसंत आजगांवकर हे भावगीतासाठी एकत्र आले अन् श्रोत्यांची अवस्था ‘जे होते हवे ते मिळाले’ अशी झाली. त्यांची गीते ध्वनिमुद्रिकेत आणण्यासाठी एच. एम. व्ही. कंपनीचे काम लक्षवेधी ठरले. सुधांशु यांचे एक प्रीतीगीत आणि एक दत्तगीत या गीतकार-संगीतकार जोडीने दिले. त्यातील अमाप लोकप्रियता मिळालेले प्रीतीगीत म्हणजे- ‘भुलविलेस साजणी..’

‘भुलविलेस साजणी तू विलोल लोचनी

फुलविलेस मन्मनी, स्वप्न एक कांचनी।

तू न रूपगर्विता, तू न धुंद चारुता

सांजसावळीच तूं, सांडिलीस मोहिनी।

तू न गायिका कुणी, गायलीस रागिणी

बोल लाजरे तुझे, गीत फुलविती मनी।

तु सुशील राधिका स्नेहशील दीपिका

प्रेमभाव उधळूनी, जाहलीस स्वामिनी।’

गायक-संगीतकार वसंत आजगांवकर यांच्या बोलण्यातून या गीताच्या आठवणींना उजाळा मिळाला. १९६२-६३ मधील ही गोष्ट. हे गीत कवी सुधांशुच्या काव्यसंग्रहात मिळाले. ते वसंतरावांनी प्रथम आकाशवाणीसाठी गायले. १९६६ साली कंपनीने ते रेकॉर्ड केले. वसंतरावांच्या पहिल्या रेकॉर्डमधील हे गीत आहे. सध्या जिथे वरळीला (मुंबई) दूरदर्शन केंद्र आहे त्या जागी मुंबई आकाशवाणीचे रेकॉर्डिग सेंटर होते. १९६१ ते १९७० पर्यंत तो आकाशवाणीचा स्टुडिओ होता. आकाशवाणीसाठी जेव्हा हे गीत रेकॉर्ड झाले तेव्हा  माणिक पोपटकर (तबला), जे. वाय. पंडित (व्हायोलिन), चंद्रशेखर नारिंग्रेकर (सतार) अशी साथसंगत होती. चक्रवर्ती व दत्ताराम गाडेकर हे मुंबई आकाशवाणीत रेकॉर्डिस्ट होते. त्यावेळी आकाशवाणीमध्ये एका कलाकाराच्या तीन गीतांचे ध्वनिमुद्रण होत असे. एच. एम. व्ही. कंपनीसाठी जेव्हा ‘भुलविलेस साजणी..’ हे गीत ध्वनिमुद्रित झाले तेव्हा या गीताचे वाद्यमेळ संचालन प्रख्यात अरेंजर अनिल मोहिले यांनी केले. व्हायोलिन साथ अलिन मोहिले, तबला साथ अण्णा जोशी, बासरी साथीसाठी केंकरे अशी कंपनीकडील साथसंगत होती. गाण्याच्या अंतऱ्यामधील म्युझिक वसंतराव आजगांवकर आणि अनिल मोहिले असे दोघांनी मिळून कंपोज केले. तो म्युझिक पीस प्रत्येक वाद्यासाठी कसा वेगवेगळा द्यायचा याची अनिलजींना उत्तम जाण होती. त्यामुळे वाद्यमेळासह हे गीत सजण्यासाठी अनिल मोहिले यांचे उत्तम साहाय्य मिळाले, असे आजगांवकर सांगतात. या गीतामध्ये पहिल्या ओळीतच ‘विलोल’ हा वेगळा शब्द दिसतो. मूलत: हा संस्कृत शब्द आहे. त्या शब्दाचा अर्थ ‘चंचल’ असा मिळतो. गीतातल्या ‘विलोल’ या शब्दामध्ये व अर्थामध्ये वेगळी छटा आहे. चंचल या शब्दात अवखळपणा असतो आणि निरागसता नसते. विलोल या शब्दात उत्सुकता आहे व निरागसता आहे. आता ‘तू विलोल लोचनी’ हे शब्द एकत्र म्हणून पाहा. पहिल्या अंतऱ्यामधील ‘रूपगर्विता’ या शब्दानंतर गायकाने घेतलेला ‘आ’कारातील आलाप अतिशय सुश्राव्य व मोहक वाटतो. हा अंतरा संपताना ‘सांडिलीस मोहिनी’ या शब्दांमध्ये ‘सहजपणे  मोहिनी पडली’ हा आशय आहे. ही एक नाजूक भावना असून त्यात कुठेही बटबटीतपणा नाही. दुसऱ्या अंतऱ्यामध्ये ‘गायलीस रागिणी’ या ‘ई’कारावर संपणाऱ्या शब्दाला जोडून ‘आ’कारातील दीर्घ आलाप आहे. आजगांवकरांचे मत असे की, ‘हा आलाप ‘ई’कारामध्ये चांगला वाटला नसता. ‘ई’कार हा जास्त लांबवता येत नाही, ‘आ’कार हा अगदी पूर्ण आवर्तन होईपर्यंत लांबवला तरी चालतो; आणि सामान्यपणे संगीतरचना करताना आलाप हा ‘आ’कारातच असावा.’ सर्व गायकांसाठी व नवोदित संगीतरचनाकारांसाठी हा मोलाचा सल्ला आहे. आजगांवकरांनी ‘मिश्र पिलू’ या रागात बांधलेली ही रचना सुरेल व मधुर झाली.

आजगांवकर हे मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील शिरोडा गावाजवळील आजगांवचे. परंतु त्यांचा जन्म मुंबईतील गिरगाव येथे झाला. वसंतरावांच्या बालपणातच आजगांवकर कुटुंब डोंबिवली मुक्कामी आले. लहानपणापासून त्यांना आकाशवाणीवरील भावगीते ऐकण्याची आवड होती. डोंबिवलीतील ग्वाल्हेर घराण्याचे गायक पं. एस. के. अभ्यंकर यांच्याकडे त्यांना जवळपास सात-आठ वर्षे शास्त्रीय गायनाची तालीम मिळाली. गायन तालमीच्या दोन-तीन वर्षांतच पंडित अभ्यंकर यांनी सुचविल्यानुसार आजगांवकरांनी आकाशवाणीची ऑडिशन दिली अन् ते पास झाले. त्यामुळे त्यांना आकाशवाणीवर गायनाची संधी मिळू लागली. पुढील काळात इतर ठिकाणच्या गायन कार्यक्रमांचीही आमंत्रणे येऊ लागली. आजगांवकर सांगतात, ‘मी भावगीत प्रांतामध्ये ओढला गेलो, गाणे पुढे पुढे जात राहिले व कार्यक्रमसुद्धा वाढले.’ कार्यक्रमांमध्ये ते इतर गायकांची गाणीसुद्धा गायचे. सुधीर फडके, दशरथ पुजारी आणि श्रीनिवास खळे यांची गाणी ते त्यावेळी आवडीने गात. डोंबिवलीतील लोकल बोर्डाची मराठी शाळा व स. वा. जोशी विद्यालयाचे ते माजी विद्यार्थी आहेत. मुंबईच्या रुईया महाविद्यालयातून त्यांनी रसायनशास्त्र या विषयात पदवी घेतली. पुढे मुंबई कस्टम कार्यालयात तीन-चार वर्षे व नंतर शहाड येथील ‘सेंच्युरी रेयॉन’ कंपनीमध्ये तेहतीस वर्षे नोकरी करून ते सेवानिवृत्त झाले. गायनाच्या कार्यक्रमांमध्ये स्वत: संगीतबद्ध केलेली भावगीते व सुधीर फडके यांच्या ‘गीतरामायण’मधील काही गीते ते सादर करत. बाबूजींनी स्वरबद्ध केलेले ‘गीतरामायण’ पुढील काळात आजगांवकर यांच्या स्वरातसुद्धा प्रचंड लोकप्रिय झाले. स्वत: बाबूजी जिथे ‘गीतरामायण’ गाण्यासाठी उपलब्ध नसत तिथे ते आवर्जून आजगांवकरांचे नाव सुचवायचे. एका महान युगप्रवर्तक गायकाने दुसऱ्या गायकाला दिलेली ही मोठी दाद आहे. पुण्याचे डॉ. देशपांडे यांनी लिहिलेले ‘गीत महाभारत’ आजगांवकरांनी स्वरबद्ध केले व त्या कार्यक्रमाचे संपूर्ण भारतात प्रयोग झाले. रुद्रदत्ता मिश्र यांचे हिंदी गीतरामायणही त्यांनी गायले. मीराबाई कागदे यांनी लिहिलेली ‘गजानन महाराज गीतमाला’ त्यांनी गायली. आजगांवकरांनी कवी बा. सी. मर्ढेकरांच्या निवडक कविता, विंदा करंदीकर यांची प्रेमगीते, ‘झेंडुची फुले’ या कार्यक्रमासाठी आचार्य अत्रेंची विडंबन गीते स्वरबद्ध करून कार्यक्रमात गायली. वामनराव देशपांडे यांनी नामदेवांचे ‘ज्ञानेश्वर समाधी’ या संकल्पनेतील अभंग निवडून दिले, तेही त्यांनी स्वरबद्ध केले.

कवी सुधांशु यांचे एक दत्तगीत वसंतरावांनी स्वरबद्ध केले व गायले. ते गीतही अफाट लोकप्रिय झाले. ते गीत म्हणजे-

‘स्मरा स्मरा हो दत्तगुरु,

दत्तगुरु भवतांप हरुं ।

दत्तगुरुंचे नाम मधुर हो,

गुरुपदपावन स्मरा चतुर हो

दत्तकृपे भवसिंधू तरुं।

भस्मांकित तनु कटी पितांबर,

जटामुकुट शिरी त्रिशुळ डमरुधर

ध्यान गुरुंचे शुभंकरु।

दत्तगुरु स्मरताच धावतो,

दत्तगुरु भक्तांस पावतो

दत्तगुरुंचे चरण धरुं।’

हे गीत वसंतरावांनी ‘मिश्र खमाज’ या रागात स्वरबद्ध केले. दुसऱ्या अंतऱ्याची सुरुवात (‘भस्मांकित तनु’) ही त्या वर्णनाला गांभीर्य येण्यासाठी ‘शुद्ध सारंग’ या रागामध्ये बांधली.

कऱ्हाड येथे वास्तव्य असलेले लेखक श्रीनिवास विनायक कुलर्णी यांनी कवी सुधांशु यांच्या भरभरून आठवणी सांगितल्या. सुधांशु यांच्या कुटुंबाशी त्यांचा घरोबा होता. ६ एप्रिल १९१७ या दिवशी सांगलीमधील दत्तक्षेत्र औदुंबर येथे सुधांशु यांचा जन्म झाला. हनमंत नरहर जोशी हे त्यांचे पूर्ण नाव. सुधांशु हे दत्तभक्तीने भारलेले व्यक्तिमत्त्व होते. चंद्रकिरणांची शीतलता ज्यांच्या काव्यात आढळते अशा या कवीला त्यांच्या कविमित्रांनी ‘सुधांशु’ हे नाव दिले. यात कवी काव्यविहारी यांचा पुढाकार होता. औदुंबर येथील सदानंद विश्वनाथ सामंत यांनी सुधांशु यांना लेखनासाठी उत्तेजन दिले. सुधांशु हे ‘बालशारदा’ हे हस्तलिखित मासिक चालवत. ‘कौमुदी’ हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. लेखक सदानंद सामंत यांचे १९३८ साली निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ सुधांशु व म. वा. भोसले यांनी मिळून औदुंबरला सदानंद साहित्य समंलेन सुरू केले. सामंतांची परंपरा पुढे कवी सुधांशु यांनी जपली. अगदी ‘नवहिंद राष्ट्रझेंडा’ हे गीत म्हणण्यापासून हातात खराटा घेऊन गाव स्वच्छ करण्यापर्यंत. वाचता न येणाऱ्यांना सुधांशु हे ‘ज्ञानप्रकाश’ व ‘केसरी’ वाचून दाखवायचे. कविता लिहून झाली, की सुधांशु ती सर्वाना दाखवीत. ती गावातील बातमी होई. दत्तभक्ती, जन्मदात्री माऊलीची शिकवण आणि कृष्णा नदीचा पवित्र परिसर ही सुधांशु यांची प्रेरणास्थाने ठरली. पुढील काळात ते औदुंबरवाडी मौजे अंकलकोपचे सरपंच झाले. पुण्यात त्यांनी पाक्षिक चालवले. ‘दीनबंधू’मध्ये संपादक विभागात काम केले. लोककला प्रसारासाठी काम केले. सात काव्यसंग्रह, सात गीतसंग्रह, संगीतिका, कन्नड व संस्कृतमधून गीत दत्तायन, काही कथा, ओवीबद्ध चैत्रामृत, विसेक ध्वनिमुद्रित गीते हे सारे सुधांशु यांचे काम. दरवर्षी संक्रांतीला होणाऱ्या औदुंबर संमेलनाचा संपूर्ण व्याप सुधांशु व कुटुंबीय सांभाळीत. आता संमेलनाची ही जबाबदारी सुधांशु यांचे चिरंजीव पुरुषोत्तम जोशी व त्यांचे सहकारी यशस्वीरीत्या सांभाळतात. १९७४ मध्ये सुधांशु यांना ‘पद्मश्री’ हा सन्मान मिळाला.

– विनायक जोशी

vinayakpjoshi@yahoo.com

मराठीतील सर्व स्वरभावयात्रा ( Swarbhaoyatra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-10-2017 at 02:47 IST