|| अंजली चिपलकट्टी
‘मॅट्रिक्स’ सिनेमात एक प्रसंग आहे- मॉर्फिअसशी फितुरी करताना रेगन म्हणतो, ‘मला माहीत आहे, की हे अन्न खरं नसून आभासी आहे. पण हे ‘मॅट्रिक्सचं जाळं’ मला असं भासवतंय, की ते खरं आहे, चविष्ट आहे. अज्ञानात खरंच सुख असतं!’

हा सिनेमा असा प्रश्न उभा करतो की, प्रत्यक्ष स्वातंत्र्याऐवजी ‘सर्व सुखं मला मिळताहेत’ असा फक्त आभास माणसाच्या मनात तयार झाला तर चालेल का? स्वातंत्र्याचा कोणता अर्थ तुमच्या मनात कोरला गेलाय यावर ते अवलंबून आहे. सांस्कृतिक कल्पितांच्या आपण इतके कचाट्यात सापडलोय, की ‘जे काही पदरात पडतंय’ तेच स्वातंत्र्य आणि ‘लोकशाही = निव्वळ मतदान’ असे अर्थ मनात तयार झालेत. ‘देशाची सुरक्षितता’ हे शब्द ऐकल्यावर डोळ्यासमोर ‘सैन्य, शत्रुदेश, तालिबान’ अशा प्रतिमा येतात, की देशांतर्गत नागरिकांची सुरक्षा, स्त्रियांची सुरक्षा असं डोळ्यासमोर येतं? असं का? या प्रतिमा घडवल्या गेल्यात भाषेमार्फत. भाषा ही संस्कृतीचं वाहन, आरसा, अवजार असते; आणि हत्यारही!

GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!
loksatta editorial international labour organisation report youth unemployment In india
अग्रलेख: लाभांश लटकला!

माणसात भाषेची उत्क्रांती कशी झाली असावी यावर अजूनही अभ्यास चालू आहे. यासाठी अनेक वैज्ञानिक थिअरीज् मांडल्या जातात. माणसाच्या स्वरयंत्राची रचना घशात इतर प्राण्यांच्या मानाने अधिक खोल गेल्यामुळे तो अनेक वेगवेगळे आवाज काढू लागला; त्याचबरोबर हातवाऱ्यांमार्फत खाणाखुणा करू लागला आणि हळूहळू भाषेची उत्पत्ती झाली आणि ते फायद्याचं ठरलं म्हणून भाषा अधिक प्रगत होत गेली अशी एक थिअरी आहे. पण अशा क्षमता असलेल्या इतर प्राण्यांमध्ये माणसाइतकी प्रगत भाषा तयार झालेली नाही. पक्षी नवीन गाणी तयार करू शकतात, गाण्यात एकमेकांना संदेश देतात. वव्र्हेट जातीचे प्रायमेट्स सर्वात जास्त म्हणजे ३० प्रकारचे इशारे देणारे आवाज काढू शकतात. पण तो माणसाइतका प्रगत संवाद नव्हे. त्यांच्या आणि माणसाच्या भाषेच्या बुद्धिमत्तेत बरीच मोठी दरी आहे.

माणूस भाषा कशी शिकतो? अगदी बाळ असल्यापासून तो आजूबाजूच्या आवाजांचं निरीक्षण, अनुकरण करत शिकतो असं अनेक संशोधकांचं म्हणणं होतं; जे काही प्रमाणात खरंही आहे. असंख्य अशा उच्चारांतून नेमके कोणते आवाज उचलायचे, टोन कसा हवा, इंग्लिश/ मराठी/ जापनीज की अजून कोणती भाषा, हे मुलं पर्यावरणातून शिकतात, हे ठीक. परंतु नोम चोम्स्की या भाषा-वैज्ञानिकानं एक अद्भुत सिद्धांत मांडला : भाषा शिकण्याची बुद्धिमत्ता माणसाला जन्मजातच असते. म्हणजे शब्द एकमेकांत गुंफण्यासाठी लागणारे नियम (व्याकरण), शब्द-अर्थ साठवण्याच्या रचना त्याच्या मेंदूत आधीच हार्ड-वायर्ड असतात. यासाठी अनेक पुरावे मिळतात. अगदी लहान बाळंसुद्धा कधी न ऐकलेल्या वाक्यरचना सहजासहजी करतात. बहुतांश भाषांमध्ये कर्ता-कर्म-क्रियापद-विशेषण हे शब्द आणि त्यांची मिळून होणारी वाक्यरचना यांच्या मूलभूत व्याकरणाच्या नियमांत बरंच साम्य असतं! शब्द-अर्थ साठवण्याच्या जैविक रचना मेंदूत तयार असतात. माणसाच्या मेंदूच्या डाव्या भागात हे भाषेचं केंद्र असतं. त्याचे दोन भाग म्हणजे ब्रोका केंद्र हे वाणी आणि उच्चारण (output) यासाठी लागणारी हालचाल नियंत्रित करतं, तर वर्निकी केंद्र भाषेच्या आकलनाचं (input) काम करतं. हे दोन्ही भाग न्यूरल रस्त्यानं जोडलेले असतात. ही केंद्रं माणसात एखाद्या अवयवासारखी जन्मत: तयार असतात आणि नंतर ती विकसित होत राहतात.

आपले आत्ताचे सर्व सामाजिक व्यवहार भाषेशिवाय अशक्य आहेत. एकमेकांशी संवाद साधण्यासाठी आपण भाषेचा उपयोग करतो हे खरं; पण मुळात भाषा ही इतरांशी संवाद साधण्यासाठी उत्क्रांत झालीच नाही असं चोम्स्की म्हणतो.

आपण जो विचार करतो त्यातलं फार कमी- म्हणजे अगदी १०% आपण दुसऱ्यांशी संवादासाठी वापरतो आणि ९०% स्वगतासाठी! बाहेरच्या जगात दिसणाऱ्या गोष्टींचं, अनुभवांचं आकलन मेंदू अमूर्तपणे साठवत असतो आणि त्यातून आपल्या मनात अनेक विचार उत्पन्न होतात. ते बहुतांश वेळी संवाद करण्यासाठी नसून, आपल्या स्वत:च्या अर्थबोधनासाठी, कल्पनाविस्तारासाठी असतात. अशा रीतीनं तयार झालेल्या ‘भाषे’चा उपयोग नंतर जेव्हा माणसात काही जैविक बदल होऊन त्याला आवाज ‘फुटला’ तेव्हा संवादासाठी झाला असावा. म्हणजे काही विशिष्ट शब्द-अर्थरचना (nverted tree nodal structure) असलेलं भाषेचं वर्निकी केंद्र होतंच; ते शब्द उच्चारण्यासाठीच्या ब्रोका केंद्राशी (आणि हालचाल केंद्राशी) जोडलं गेलं. ते कशामुळे? ते माहीत नाही बुवा! पण बोधात्मक क्रांतीच्या काळात मेंदूत जे अनेक बदल झाले तसाच हाही बदल झाला असावा.

एरवी आपण असं म्हणतो की, ज्या वृत्ती/ गुणधर्म फायदेशीर ठरले, ते निवडले गेले (निसर्ग-निवड). परंतु भाषेच्या उत्क्रांतीचा तगून राहण्याशी फारसा काही संबंध नसावा. एखाद्या अपघातासारखी उत्क्रांतीच्या अगदी अलीकडच्या टप्प्यावर ती आपल्याला गवसली असावी असा काही वैज्ञानिकांचा युक्तिवाद आहे. जे संदेशवहन आवाज, खाणाखुणा यामार्फत प्रायमेट्समध्ये होत असतं, ते तगून राहण्यासाठी पुरेसं होतं. निअँडरथल नावाचा दुसऱ्या प्रकारचा माणूसही- जो अगदी ३० हजार वर्षांपूर्वी होता- त्यालाही माणसासारखे आवाज काढता येत नव्हते तरी टिकलाच होता. त्यामुळं माणसाची संवाद करण्याची क्षमता विस्तारली त्याचं मुख्य कारण नुसते वेगळे आवाज काढणं हे नव्हतं, तर आंतरिक भाषेतल्या विविध शब्दांना वेगळे आवाज काढू शकण्याची क्षमता जोडली गेली, हे असावं.

याचंच अजून एक उदाहरण म्हणजे माणसाला जी गणिती बुद्धिमत्ता आहे, ती काही उत्क्रांतीत फायदा मिळाला म्हणून निवडली गेली, विकसित झाली असं झालं नाही. (तसे पुरावे नाहीत.) तर मेंदूत काही जैविक न्युरॉन्सच्या जोडण्या कधीकाळी तयार होत गेल्या (एखाद्याला सहा बोटं असतात तसं!) आणि तशाच राहिल्या. त्याला काही खास ‘काम’ (फंक्शन) मिळालं नाही. पण नंतर तर्क लढवण्याचं, मोजण्याचं एक्सपोजर मिळताक्षणी माणसं गणितं सोडवू लागली. इतकंच नाही, तर गणितातल्या अमूर्त, काल्पनिक जगातल्या गोष्टींबरोबर खेळत त्यांची सिद्धताही मांडू लागली. असंच काहीसं भाषेचं झालं असावं असा अंदाज आहे.

याचा अजून एक सज्जड पुरावा म्हणजे जी माणसं जन्मत: बहिरी असतात आणि जी ‘साईन लँग्वेज’मधून एकमेकांशी संवाद करतात, त्यांच्या बाबतीतही भाषेची हीच दोन केंद्रं काम करतात! खरं तर खाणाखुणा ‘बघायच्या’ म्हणजे मेंदूचं दृष्टीचं केंद्र जास्त सक्रिय असायला हवं. खाणाखुणांच्या भाषेमध्ये कुठेही बोलायचं किंवा ऐकायचं नसतं. पण जे हातवारे करावे आणि समजावे लागतात त्याचं ‘प्रोसेसिंग’ याच दोन केंद्रांत होतं; दृष्टी-केंद्रात नव्हे! यावरून असं लक्षात येतं की, शब्दार्थ साठवण्याची, ते नियमांत गुंफण्याची आणि हालचाल-केंद्राला जोडण्याची रचना इथेही तशीच उपयोगी पडते. गंमत म्हणजे भाषेची केंद्रं चिंपांझींसारख्या जवळच्या नातलगामध्येही असतात. त्यांच्या स्वरयंत्रामुळे त्यांना माणसासारखे अनेक आवाज करणं शक्य नाही म्हणून त्यांना कर्णबधिरांची ‘साईन’ भाषा शिकवायचा कसून प्रयत्न झाला. ते शिकलेही; पण एका मर्यादेनंतर ते माणसाच्या भाषिक बुद्धिमत्तेच्या जवळही येऊ शकले नाहीत. यावरून माणसाच्या भाषा-केंद्रात जे म्युटेशन्स झाले ते त्यांच्यात झाले नसावेत असा निष्कर्ष निघाला.

भाषेची ही केंद्रं नंतर का, कशी प्रगत झाली असावीत याबाबत डनबार या वैज्ञानिकाची थिअरी आता बरेच जण मान्य करतात. आवाजाला अर्थ जोडण्याची क्षमता मिळाल्यावर मात्र त्याची निसर्ग-निवड जोरदारपणे झाली! ते का? वेगवेगळ्या आवाजांमार्फत माणसानं मनातल्या कल्पना, विचार, गोष्टी, एकमेकांच्या चुगल्या, गॉसिप सांगायला सुरुवात केली असावी. अशा कल्पना करणं, कार्यकारणभाव समजणं, अवजारं बनवणं, शिकवणं या बोधन-क्रांतीनंतर साधारण एकाच काळात (५० ते ३० हजार वर्षांपूर्वी) उद्भवलेल्या बुद्धीमुळे बोलीभाषेचा उपयोग फायदेशीर ठरला असावा आणि भाषेची क्षमता वाढत गेली. कल्पितं रचणं, गॉसिप करत आजूबाजूला टोळकी जमवून गोष्टी सांगणं याचा एक ‘विश्वासू’ कंपू बनवायला कसा उपयोग होतो, हे तर आपण आजही अनुभवतोच. आणि ते आपल्याला खूप आवडतंही!

लिखित लिपी असलेल्या भाषांचा वापर तर अगदीच अलीकडे- ५००० वर्षांपूर्वी सुरू झाला. पण त्याआधी मौखिक परंपरेतून माहिती, कौशल्यं, मूल्यं (संस्कृती!) हे ज्ञान पुढच्या पिढीकडे सोपवण्यात भाषा उपयोगाला आली.  भाषेची उत्क्रांती संवादासाठी झालेली नसली तरी गेल्या दोन-तीन शतकांत विस्फोट व्हावा इतका तिचा वापर ज्ञानाच्या प्रसारासाठी होतोय. बोली/ लिखित भाषा वापरण्याचा हा बदल इतका ताजा आहे की अजूनही आपण या ‘खेळण्या’च्या प्रभावकाळातच आहोत. यावरून एक लक्षात घ्यायला हरकत नाही की, ज्या भाषेत नवीन ज्ञान निर्माण होतं, रचलं जातं, जनसामान्यांपर्यंत संक्रमित होतं, त्या भाषा विस्तार पावतात.

जॉर्ज लॅकॉफ या भाषा-बोधन (कॉग्निटिव्ह लिंग्विस्ट) वैज्ञानिकानं भाषेचा हत्यार म्हणून कसा वापर होतो याचा सखोल अभ्यास केलाय. तो म्हणतो, ‘शब्द ही आपल्या मनातल्या अर्थांची चिन्हकं असतात. शब्द एकेकटे साठवले जात नाहीत. त्याच्याशी संबंधित प्रतिमांची पूर्ण ‘फ्रेम’ मेंदूत तयार होते. त्या फ्रेममध्ये कोणता अर्थ भरला जातो हे आपल्याला पुन्हा पुन्हा काय दिसते, ऐकू येते यावर अवलंबून असते. एखादी वास्तवातली फ्रेम आपल्याला खटकते की नाही, हे आपल्या मनातल्या फ्रेमपेक्षा ती किती निराळी असते यावर अवलंबून असतं.’ या मनातल्या फ्रेमच हळूहळू बदलत नेल्या तर…? इराक युद्धाच्या काळात जॉर्ज बुशनं केलेल्या २२ मिनिटांच्या भाषणात त्यानं ‘फ्रीडम’ हा शब्द ४७ वेळा वापरला!  इराक युद्ध अमेरिकेनं तेलासाठी अक्षरश: लादलं होतं. तेव्हा अमेरिकी माध्यमं त्याचा उल्लेख ‘इराक युद्ध’ असं न करता ‘वॉर ऑन टेरर’ असं करीत होती. यासाठी बुशनं अमेरिकी जनतेवर पाळत ठेवण्याचे, कोणालाही संशयावरून तुरुंगात टाकण्याचे अनिर्बंध अधिकार स्वत:कडे घेतले. ‘दहशतवाद’ हा शब्द प्रमाणाबाहेर लोकांच्या मनावर इतका बिंबवला गेला, की एरवी सजग असणाऱ्या अमेरिकी जनतेला ते निर्बंध योग्यच वाटू लागले. इराकी सामान्य जनता युद्धात चिरडली गेली याकडेही त्यांचं दुर्लक्ष झालं.

‘पोस्ट-ट्रुथ’ हा सत्याचा आभास तयार होण्याचं ‘न्यू नॉर्मल’ भाषेमार्फतच पसरवलं जातंय. गोष्टी ऐकण्याच्या, कल्पना करण्याच्या आणि गॉसिप करण्याच्या प्रेरणेमुळे माणसाला सत्यापेक्षा चुरचुरीत गप्पा महत्त्वाच्या वाटतात आणि त्याचा यथायोग्य उपयोग राजकारणी करून घेतात.

एका बाजूला भाषेमुळे संचित ज्ञानाचा विस्फोट होत असताना दुसऱ्या बाजूला रोजच्या व्यवहारात मात्र स्वातंत्र्य, समता, संस्कृती यांच्या अर्थाचा आपल्या मनात संकोच होताना दिसतो. ‘देशप्रेम = राष्ट्रवाद, स्वातंत्र्य = पाळत, प्रश्न = उद्धट, सरकार = देश, मतभेद = देशद्रोह, संस्कृती = परंपरांचं पुनरुज्जीवन’ असे अर्थ आपण लावतो आहोत.

माणूसपणाची खूण असलेल्या भाषेतील शब्दांचे अर्थ असे पोकळ होत जाणं आपण स्वीकारतो की त्यातील माणुसकीचा गाभा घट्ट धरून ठेवतो यावर आपली पुढची वाटचाल अवलंबून आहे.

anjalichip@gmail.com