अंजली चिपलकट्टी – anjalichip@gmail.com

सांस्कृतिक पर्यावरणाचा मानवी वर्तनावर कसा परिणाम होतो, या चर्चेची सुरुवात आपण मागच्या लेखात केली. संस्कृतीचा मानवी वर्तनावर परिणाम होणारच. यात नवीन काय सांगताय, असं वाटू शकतं. तर सांगण्यासारखं बरंच काही आहे. ‘आमची संस्कृती थोर!’ असं जगातल्या प्रत्येकाला वाटू शकतं. पण एखाद्या परग्रहवासीयाच्या ‘अलिप्त’ नजरेनं पृथ्वीवरच्या वेगवेगळ्या संस्कृती कशा तयार झाल्या, काळाच्या ओघात कशा बदलल्या याची निरीक्षणं केली तर बरंच काही हाती लागतं. त्यासाठी संस्कृती आणि सांस्कृतिक उत्क्रांती या दोन गोष्टींची छोटी ओळख (!) आवश्यक आहे.

The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
family members
मनातलं कागदावर: साधू या सूरतालाशी लय!
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!

माणूस एका पिढीतून पुढच्या पिढीत दोन प्रकारे आपला वारसा पुढे नेतो. १. जैविक- जो जनुकांच्या रूपाने पुढे जातो. पिढय़ानुपिढय़ा जनुकांमध्ये नैसर्गिकपणे सतत छोटे बदल होत असतात. त्यातले जे बदल पर्यावरणाशी सुसंगत असतात ते टिकतात आणि त्यातून जैविक उत्क्रांती होते. २. सांस्कृतिक-अनुभवातून गोळा केलेली माहिती, कौशल्यं आणि कल्पनांचा वारसा- जो संस्कृतीच्या रूपाने पुढे जातो. आधीच्या माहिती/ कल्पनांच्या खांद्यावर उभं राहून हा सांस्कृतिक वारसा पर्यावरणानुसार बदलत जाण्याचा जो सिलसिला असतो त्याला ढोबळपणे ‘सांस्कृतिक उत्क्रांती’ असं म्हणतात- जी फक्त माणसाबाबतच घडते. याचं मुख्य कारण आहे माणसात झालेली बोधात्मक क्रांती (cognitive revolution). म्हणजे काय? तर- माणसाचा आदी ७ आदी पूर्वज तयार झाला अंदाजे चोवीस लाख वर्षांपूर्वी. त्यात बदल होत आता आधुनिक माणसासारखा मोठा मेंदू आणि ताठ शरीररचना असलेला माणूस घडला अंदाजे दीड-दोन लाख वर्षांपूर्वी. या काळातले मानवप्राणी अन्न गोळा करत, शिकार करत भटकं जीवन जगत होते. अंदाजे ७० हजार वर्षांपूर्वी मेंदूत असे काही मोठे बदल झाले (बोधात्मक क्रांती)- ज्यामुळे मेंदूची शिकण्याची क्षमता अचाट प्रमाणात वाढली. मेंदू (स्रउ)अधिक लवचीक झाला. म्हणजे इतर प्राण्यांत बहुतेक क्षमता जन्मजात (हार्ड-वायर्ड) असतात. याउलट, माणसात बहुतांश क्षमता जन्मानंतर अनुभवांतून, निरीक्षणातून विकसित होतात. जन्माला आल्यापासून माणसाची पिल्लं भवतालात वावरणाऱ्या माणसांच्या अनुकरणातून सतत शिकत आपल्या वृत्ती, कौशल्यं विकसित करतात.

जैविक उत्क्रांती होण्याची प्रक्रिया माणसात इतर प्राण्यांसारखीच आहे. ती बरीच संथ असते. सांस्कृतिक उत्क्रांती मात्र तुलनेनं वेगाने होते. त्यामुळे माणसाच्या वर्तनावर आपला ठसा उमटवण्यात तिनं जैविक उत्क्रांतीला कधीच मागे टाकलंय. म्हणूनच आपली शरीरं आपल्या वर्तनाशी सुसंगत नाहीत आणि आपण मान/पाठदुखी, ताण, मेंदूचे आजार वगैरेंमुळे हैराण असतो. एखाद्या जुनाट हार्डवेअरच्या संगणकावर नवीन ‘जड’ सॉफ्टवेअर टाकलं तर काय होईल? तसं! जैविक उत्क्रांतीवर माणसाचं नियंत्रण नसतं. पण सांस्कृतिक उत्क्रांतीत मात्र माणूस सक्रिय भूमिका बजावतो. ती समजून घेणं म्हणूनच महत्त्वाचं.

बोधात्मक क्रांतीनंतर माणसात अजून एक कौशल्य विकसित झालं, ते म्हणजे कल्पित गोष्टी रचण्याची आणि त्या भाषेद्वारे एकमेकांना खुलवून सांगण्याची क्षमता. एखादा छोटा अनुभव मीठमसाला लावून मोठा करून अद्भुत कथा, दंतकथा रचल्या जायच्या. त्या टोळ्यांमध्ये कानगोष्टींसारख्या पसरायच्या. त्यावर गप्पागोष्टी करत ज्या टोळ्यांत सलोखा तयार झाला त्या मोठय़ा होऊन तगून राहिल्या असाव्यात असं मानववंशशास्त्रज्ञ म्हणातात. ‘जैत रे जैत’ सिनेमा  आठवतो का? यात एका आदिवासी जमातीची गोष्ट दाखवलीय. ते सर्व उंच सुळक्यासारख्या डोंगराला ‘लिंगोबाचा डोंगूर’ म्हणत त्याला देव मानत असतात. आणि त्याच्या टोकाला असलेल्या अनेक मधमाश्यांची पोळी म्हणजे त्या देवाची माळ आहे असं समजत असतात. ही दोन्ही कल्पितं असली तरी त्यांच्यासाठी ती इतकी खरी होती, की त्या श्रद्धेच्या आधारानं ते एकमेकांशी बांधले जाऊन एकोप्यानं नांदत होते. ही श्रद्धा त्यांच्यात इतकी भिनली होती की त्या कल्पितांना आव्हान देणाऱ्या भगताला गावकऱ्यांनी साथ दिली नाही.

तर अशा कल्पित गोष्टी रचण्याच्या सवयीचा तगून राहण्यासाठी उपयोग झाल्यानं त्या क्षमतेचा विकास झाला असणार असा अंदाज आहे. ही कल्पितं त्या, त्या काळाला समर्पक अशी तयार होतात. म्हणजे नैसर्गिक शक्तींच्या देवता, कर्मकांडे, भुताखेताच्या चुरचुरीत गोष्टी इथपासून ते धर्म, देश, कंपन्या, फॅशन, कायदे, राज्यघटना, बिटकॉइन अशा कल्पनांपर्यंतचा माणसाचा प्रवास थक्क करणारा आहे. कल्पिताचं अगदी ताजं उदाहरण म्हणजे ‘करोनाचा देव’!  तर अशा या असंख्य गुंतागुंतीच्या कल्पितांवर संस्कृती पोसल्या जातात.

या पार्श्वभूमीनंतर आता काही कळीचे मुद्दे. शिकण्याची अफाट क्षमता तयार झालेला मेंदू जन्मत:च भुकेल्या जीवासारखा पर्यावरणातील गोष्टींचं अनुकरण करत सुटतो. ते पर्यावरण घडवलेलं असतं माणसाच्या आधीच्या पिढय़ांनी. शिकताना, अनुकरण करताना आपलं चुकतंय की बरोबर चाललंय याचा अदमास आजूबाजूच्या लोकांनी शाबासकी दिली की नाकं मुरडली याच्या निरीक्षणातून घेण्याची सवय लहानपणापासूनच अंगवळणी पडते. लहान मुलं अनुकरण कसं आणि कोणाचं करतात याविषयीच्या अनेक प्रयोगांपैकी दोन प्रयोग पाहू. काही बाळांना एक माणूस चार-पाच वेळा काही कृती करताना दाखवला. त्याच काळात काही वेगळ्या कृती चार-पाच माणसं करतात असं दाखवलं. ही बाळं एका माणसापेक्षा चार-पाच जण जी कृती करताना दिसले ती लवकर आत्मसात करतात असं लक्षात आलं. याचा अर्थ ‘समाजा’ला जास्त महत्त्व देण्याची वृत्ती माणसाच्या मेंदूत कोरली गेली आहे. दुसऱ्या प्रयोगात तीन-चार वर्षांची मुलं दोन व्यक्तींची निरीक्षणं करतील अशी रचना केली. या दोन व्यक्ती वस्तू वापरणं, खेळणी खेळणं, बिस्कीट खाणं, शीतपेय पिणं अशा काही कृती करताहेत आणि त्यांच्या आजूबाजूला काही माणसं ते बघताहेत असं मुलांना दाखवण्यात आलं. पण बहुतांश लोक त्यातल्या एकाच व्यक्तीकडे जास्त लक्ष देताहेत आणि दुसऱ्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करताहेत असं मुद्दाम घडवलं गेलं. मग नंतर मुलांना त्याच वस्तू, खेळणी, बिस्किटं, शीतपेय वापरायची/ निवडण्याची सोय दुसऱ्या खोलीत केली गेली. बहुतेक मुलांनी ज्या व्यक्तीकडे इतर लोक लक्ष देत होते त्याच कृती आणि वस्तू/ पदार्थ निवडले! याचा अर्थ समाजात ज्याला ‘प्रतिष्ठा’ आहे अशा गोष्टींचं अनुकरण करणं चांगलं असं या चिमुरडय़ांना वाटत होतं.

आजूबाजूच्या माणसांत, समाजात ज्याला मान्यता आहे त्या गोष्टी स्वीकारल्या/त्यांचं अनुसरण केलं तर डोपामाईन स्रवतं. याउलट, इतरांना वावगं वाटेल अशी कृती केली तर अमिग्डला- भावनात्मक फ्रँको (vmPFC) ही जोडगोळी सक्रिय होऊन भीतीची भावना तयार होते असे पुरावे मेंदूविज्ञानातही मिळाले आहेत. याचा अनुभव आपणही घेतलेला असतोच. समाजमान्य गोष्टी, रूढी, परंपरा, सामाजिक संकेत यांना विरोध करणं म्हणूनच इतकं अवघड जातं. मनाला पटत नसतानाही ‘कशाला उगीच वाद?’ अशी भूमिका आपण घेतो. (खरं तर घेत नाही!) आपली ‘सामाजिक ओळख’ अशी ‘वैयक्तिक’ शिकण्यातून, भावनांमधून तयार होत असते.  ज्याला आपण अनुसरण/ अनुपालन (conformity & compliance) म्हणतो, त्याची मुळं ही अशी खोल सांस्कृतिक शिकवणीत असतात. अनुपालन करणारे असतील तर आज्ञा देणारेही तयार होतात.

याविषयी सॉलोमन अ‍ॅश आणि मिलग्राम यांनी केलेलं संशोधन खूप महत्त्वाचं आहे. अ‍ॅशनं केलेल्या प्रयोगात सहभागींना एका खोलीत एकत्र बोलावून दोन करड दिली. एका कार्डवर एक रेघ होती आणि दुसऱ्यावर तीन वेगवेगळ्या लांबीच्या रेघा होत्या. त्यातली एकच पहिल्या कार्डवरच्या रेघेएवढी होती. सहा सहभागींना एकच प्रश्न विचारला : ‘कार्ड २ वरची कोणती रेघ कार्ड १ वरच्या रेघेइतकी आहे?’ सहभागींनी एकेक करून मोठय़ांदा उत्तर द्यायचं. ६ पैकी ५ सहभागी अ‍ॅशने आधीच ‘ट्रेन’ केलेले ‘स्वयंसेवक’ होते, जे अर्थातच सहाव्या सहभागीला माहीत नव्हतं. त्या पाच जणांनी ‘ठरवून’ चुकीचं, पण एकच उत्तर दिलं. याचा दबाव येऊन सहाव्या सहभागी (४०%) व्यक्तीने चुकीच्या उत्तराला सहमती दाखवली. जेव्हा त्या व्यक्तीला एकटं असताना उत्तर द्यायची संधी होती तेव्हा त्याने अचूक उत्तर दिलं. सामूहिक दबावाला बळी पडल्यानं अनुपालनाची वृत्ती कशी जोपासली जाते हे यातून लक्षात येतं.

मिलग्रामने केलेला प्रयोग तर मानसशास्त्रातला माईलस्टोन समजला जातो. त्यानं सहभागींच्या शिक्षक-विद्यार्थी अशा जोडय़ा केल्या. शिक्षकांना असं सांगण्यात आलं की, शिक्षेचा विद्यार्थ्यांच्या शिकण्यावर कसा परिणाम होतो हे बघण्यासाठी हा प्रयोग आहे. शिक्षकानं विद्यार्थ्यांला शब्दांच्या जोडय़ा शिकवायच्या व मग त्याची परीक्षा घ्यायची. उत्तर चुकलं की विजेचा २५ वोल्टचा शॉक द्यायचा. जसजसं पुन्हा पुन्हा उत्तर चुकेल तसं शॉकची तीव्रता वाढवत न्यायची. विद्यार्थी दुसऱ्या खोलीत बसला असला तरी त्याचा शॉकच्या वेदनेने ओरडण्याचा आवाज शिक्षकांना ऐकू येईल अशी सोय होती. जे शिक्षक शॉक द्यायला नकार देत त्यांना ‘विद्यार्थ्यांच्या भल्या’साठी हे करणं किती आवश्यक आहे, ‘प्रयोगात तुम्ही स्वत:हून सहभागी झालात, आता करावेच लागेल’ असे भावनिक आवाहन करत समजावले. आश्चर्य म्हणजे अनेक शिक्षकांनी (६५%) हे पटवून घेत शॉक देणं चालू ठेवलं! काही शिक्षक नकार लावून धरत प्रयोगातून बाहेर पडले. अर्थातच विद्यार्थी आणि शॉक देणं दोन्ही ‘रचलेलं’ नाटय़ होतं; पण ते त्या शिक्षकांना माहीत नव्हतं! या प्रयोगातून अजून दोन धक्कादायक वृत्ती समोर आल्या. १. ‘आम्ही काय, प्रयोगाचे दिलेले नियम पाळले!’ असं म्हणत आपण केलेल्या क्रूर कृतीची जबाबदारी आपली नाहीच अशी ‘हुकमाचे ताबेदार’ असण्याची खूप जणांची धारणा होती. २. दिलेले नियम, आज्ञा आपल्या विवेकबुद्धीला पटत नसेल तर जोरकस विरोध करण्याची क्षमता असूनही अनेकांनी ती इच्छाशक्ती दाखवली नाही.

आता काही ठळक बातम्या : अ‍ॅशनं प्रयोगात एक छोटा बदल केला. पाच स्वयंसेवकांपैकी एकानं रेघेच्या लांबीबाबत खरं उत्तर देऊन त्याचा सहाव्या सहभागीवर कसा परिणाम होतो हे बघितलं. आपल्याबरोबर खरं बोलणारा एक तरी सहभागी आहे असं लक्षात आल्यावर ९०% पेक्षा जास्त सहाव्यांनी दबावाला न जुमानता खरं उत्तर द्यायला सुरुवात केली! याचा अर्थ आपण एकटे नाही हे लक्षात आलं तर अनेक जण सत्याला उचलून धरतात.

अनुसरण-अनुपालनाची वृत्ती ही सांस्कृतिक उत्क्रांतीची देन आहे; ज्यामुळे माणसं शिकतात, समाजाचे नीतिनियम पाळतात. त्यातून समाजात सुरक्षित वाटण्याची त्यांची गरज भागते आणि स्थैर्य मिळतं. पण स्थैर्याबरोबरच समाजाच्या धारणा प्रवाही असणं हा तर सांस्कृतिक उत्क्रांतीचा गाभा आहे. त्यामुळं संस्कृतीच्या अविवेकी, मानुषताविरोधी नीतिनियमांना आणि ज्ञानाला आव्हान देत त्या बदलत नेणारे व्हिसल-ब्लोअर्स (whistle-blowers) हे सांस्कृतिक उत्क्रांतीचे कर्तेच आहेत.

स्थैर्य आणि आव्हान या वृत्तींना वेगवेगळ्या संस्कृतींत वेगवेगळा वाव कसा मिळतो, हे पुढच्या लेखात पाहू.