|| जयदेव डोळे
पत्रकारितेत अलीकडे जन्माला महत्त्व येत चालले आहे. गरीब, ग्रामीण, वंचित, पीडित समाजातून आलेल्या पत्रकारांचे खूप कौतुक होते. ते झालेही पाहिजे. लोकशाहीच्या जाणिवा समाजाच्या तळापर्यंत पोहोचल्याचे ते चिन्ह. अन्यथा साहित्य असो की पत्रकारिता, अध्यापन असो की संशोधन; सर्वत्र उच्चवर्णीय-उच्चवर्गीय यांचाच पगडा असे. इंग्रजी भाषेतील पत्रकारिता आजही अभिजनांची हक्काची जागा आहे. त्यामुळे हे अभिजन सत्तास्थानांवरील नातलगांची काळजी करणारच. वर्गीय हितसंबंधांचा दाखलाच तो. पण हा समज करण थापर या इंग्रजी-भाषक पत्रकाराने आपल्यापुरता संपवून टाकला. तसे त्याच्या ‘डेव्हिल्स अॅडव्होकेट’ या आत्मकथनामधून समजते. पत्रकारिता प्रश्न विचारण्याचा आणि उत्तरे काढून घेऊन नागरिकाला लोकशाही कारभाराची नीट जाण करवून देणारा एक जबाबदार व्यवसाय आहे. त्याचे प्रत्यंतर करण थापर आपल्याला आणून देतात. भीडभाड न ठेवता. अगदी त्यांच्या टोकदार, तीक्ष्ण फैरींसारखेच!
भारतीय लष्करातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या पोटी थापर जन्मले. त्यांचे घर, शाळा सारे उच्चभ्रू होते. वडील काही काळ भारताचे राजदूत म्हणून अफगाणिस्तानात असताना थापर काबूल येथे अमेरिकन स्कूलमध्येही शिकले. पुढे केंब्रिज विद्यापीठात शिक्षण आणि इंग्लंडमध्येच नोकऱ्या यांमुळे थापर पुरते इंग्लीशही बनले. बेनझिर भुत्तो त्यांची सहाध्यायी व मैत्रीण. ऑक्सफर्ड येथेही थापर शिकायला होते. तिथेच संशोधनात प्रगती करण्याऐवजी पत्रकार व्हावे असे त्यांनी ठरवले. मग लंडनच्या ‘द टाइम्स’ या मातब्बर पत्रातच त्यांना पत्रकारितेचे धडे गिरवायला मिळाले. नंतर ‘लंडन वीकेण्ड टेलिव्हिजन’ या माध्यमात ते गेले. निर्माता, पत्रकार, मुलाखतकार असा आकार त्यांच्या आयुष्याला येथे प्राप्त झाला. दरम्यान, नीशा मेनेसेस यांच्याशी थापर विवाहबद्ध झाले. मात्र सहा वर्षांच्या संसारानंतर नीशा कर्करोगाने निधन पावल्या. त्या वित्तविषयक जाणकार होत्या. आपली पत्नी जिवंत राहील, मात्र प्रेतासारखे तिचे आयुष्य असेल असे कळल्यावर पती म्हणून थापर यांनी महत्प्रयासाने नीशांवरील सर्व उपचार थांबविण्यास संमती दिली होती.
थापर नेमके, मर्मभेदी प्रश्न विचारून मुलाखत रंगतदार करतात. मुलाखत कशी घ्यायची, तिचे प्रकार कोणते, तीतून कोणाचे काय हीत होते आदी माहिती त्यांनी जॉन बर्ट या बीबीसीच्या माजी प्रमुखाच्या हवाल्याने दिली आहे. झिया उल हक, परवेझ मुशर्रफ, पी. व्ही. नरसिंह राव, राजीव गांधी यांच्या मुलाखतींच्या आठवणी थापर यांनी लिहिल्या आहेत. पण त्यापेक्षा वाचनीय प्रकरणे काही नामवंतांच्या मुलाखतींवरच आधारलेली आहेत. क्रिकेटपटू कपिलदेव एका प्रश्नामुळे कसा विव्हळ होऊन रडू लागला, याचे बरेच वर्णन थापर करतात. अमिताभ बच्चन यांना विवाहबाह्य़ संबंधांबद्दल जया बच्चन यांच्या समक्ष प्रश्न विचारल्यावर अमिताभ नकारार्थी उत्तरे देतात. वरकरणी शांत आणि संयत वागतात. जेवायला बसल्यावर मात्र भात वाढू का, या प्रश्नावर ते जयावर सर्वादेखत असे उखडतात की ते जेवण कोणालाच करवत नाही. अडवाणींचेही असेच. ते संतापून खोलीबाहेर जाऊन परततात व क्षमा मागून पुढच्या प्रश्नाशी भिडतात. हे सारे प्रसंग थापर यासाठी सांगतात, की या सुप्रसिद्ध व्यक्ती कधी कधी गांगरून जातात आणि अहंकारामुळे एक तर थयथयाट करतात किंवा एकदम विकल होतात. पाकिस्तानी राजदूत अश्रफ जहांगीर काझी यांच्याशी मैत्री असल्याने एक-दोन आंतरराष्ट्रीय पेचप्रसंग थापर यांनी कसे हाताळले व सरकारला दिलासा दिला, हेही या आत्मकथनात आडपडदा न ठेवता सांगितले आहे.
बराक ओबामा यांनी आपले प्रश्न कसे टोलवले, हेही थापर मोकळेपणाने सांगतात. एकंदर पुस्तकाच्या शीर्षकाप्रमाणे पत्रकार सैतानाचा वकील असतो आणि तो जवळपास उलट तपासणीच करीत असतो. गोडगोड, गुळमुळीत अन् आंबा कसा खाता, व्यायाम काय करता, इतके कमी का झोपता, असे निरूपद्रवी प्रश्न पत्रकार करीत नसतो याचा वस्तुपाठ म्हणजे हे पुस्तक! नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्या मिनिटाला मुलाखत कशी थांबवली अन् परत भेटीत एकत्र जेवू असे सांगितल्यावर ते जेवण अद्याप कसे मिळालेले नाही, याचाही तपशील थापर यांनी दिला आहे. मोदी एक आत्मलुब्ध, अहंकारी व अनभ्यस्त नेते आहेत, हे या मुलाखतीतून स्पष्ट होते. मोदीच काय, कोणाही स्वयंभू नेत्याला टोचणारे वा लागट प्रश्न विचारले की त्याची काय तडफड होते, हे या पुस्तकातून समजते. बोचरे प्रश्न अर्थातच असभ्य, असंस्कृत भाषेत विचारायचे नसतात आणि त्यासाठी काही ठोस आधार लागतो. याचेही प्रशिक्षण थापर देत राहतात.
- ‘डेव्हिल्स अॅडव्होकेट’ – करण थापर,
- अनुवाद – सचिन जहागिरदार,
- मंजुल पब्लिशिंग हाऊस, पुणे</li>
- पृष्ठे- २१३, मूल्य- ३५० रुपये.