रघुनंदन गोखले

वॅसिली इवानचुक त्याच्या प्रतिभावान खेळासाठी तर प्रसिद्ध आहेच, पण त्याच्या विक्षिप्त वागण्यासाठी खूपच चर्चेत असतो. असे म्हटले जाते की, जगज्जेतेपदाच्या कारकीर्दीच्या ऐन भरात असताना गॅरी कास्पारोव्ह कोणाला घाबरत असेल तर तो फक्त इवानचुकला. डाव हरल्यावर बाजूच्या भिंतीवर डोके आपटणे, जिंकत असलेल्या डावात केवळ कंटाळा आला म्हणून बरोबरी मान्य करून फिरायला जाणे, असे विक्षिप्त प्रकार त्याने केले आहेत..

A chance for historic success for Indian chess players sport news
भारतीय बुद्धिबळपटूंना ऐतिहासिक यशाची संधी!
GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
Golden Jubilee of Mumbai grahak Panchayat fighting for consumer rights
ग्राहकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या जागल्याचा सुवर्णमहोत्सव…
MP Supriya Sule criticized the leaders who left NCP
“रिश्ता तोडना आसान है, निभाना मुश्किल है…” राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांवर खासदार सुप्रिया सुळेंची घणाघाती टीका

ज्युडिथ पोलगार या बुद्धिबळसम्राज्ञीला कोणी तरी विचारलं की, तुझ्या मते आतापर्यंतच्या बुद्धिबळ खेळाडूंमध्ये सर्वात प्रज्ञावान तीन खेळाडू कोणते? तिनं अपेक्षेप्रमाणे कार्लसन आणि आनंद ही दोन नावं घेतली. ज्युडिथ तिसरं नाव बॉबी फिशर, आलेखाईन अथवा कॅपाब्लांका या जगज्जेत्यांपैकी कोणाचे तरी घेईल, अशी अनेकांना आशा होती; परंतु तिनं वॅसिली इवानचुक यांचा उल्लेख करून सर्वांना धक्का दिला. एकदाही जगज्जेतेपद न मिळवणारा इवानचुक हा ज्युडिथच नव्हे, तर विश्वनाथन आनंदसारख्या प्रतिभावान खेळाडूच्या आदराचा विषय होतो, याचा अर्थ या खेळाडूकडे नक्की असं काही तरी खास असणारच. ब्रिटिश ग्रँडमास्टर गॅविन जोन्स तर म्हणतो की, ‘‘इवानचुक आतापर्यंतच्या बुद्धिबळ इतिहासातील सर्वात प्रतिभावान खेळाडू असेल.’’

असा हा वॅसिली इवानचुक सोव्हिएत संघराज्याच्या त्या वेळच्या युक्रेन प्रांतातील एका खेडय़ातून पुढे आला. तो अतिशय प्रतिभासंपन्न असल्याचं त्याच्या प्रशिक्षकांनी ओळखलं आणि त्याला रशियातील एका महत्त्वाच्या स्पर्धेत उतरवलं. इवानचुकची इतक्या मोठय़ा स्पर्धेत भाग घेण्याची पहिलीच वेळ असल्यानं तो बावरलेला  होता. त्याच्या प्रशिक्षकांनी इवानचुकची ओळख ग्रँडमास्टर अलेक्सी सुटीन यांच्याशी ‘युक्रेनचा उगवता तारा’ अशी करून दिली आणि तो इतरांना भेटण्यासाठी निघून गेला. सोव्हिएत संघराज्यात रशिया वर्चस्व गाजवत असे आणि बाकी सगळे प्रांत मागासलेले होते. आपल्याकडे शहरात पहिल्यांदा आलेल्या खेडवळाकडे जसं बघितलं जाईल, तसं ग्रँडमास्टर सुटीन या मुलाकडे बघत होते. त्यांनी बाजूचा पट ओढला आणि एक ओपिनगचा प्रकार इवानचुकला दाखवण्यास सुरुवात केली. आपलं बोलणं संपल्यावर त्यांनी एक मोठी चूक केली. इवानचुकला ते म्हणाले, ‘‘आता आपण विद्युतगती डाव खेळू, म्हणजे मी तुला कसा हरवतो, यावरून तुला हे ‘ओपिनग’ सखोल कळेल.’’ डाव सुरू झाले. थोडय़ा वेळानं इवानचुकचे प्रशिक्षक तेथे आले आणि त्यांनी ग्रँडमास्टर सुटीनना विचारलं, ‘‘किती डावांत इवानचुकला बरोबरी तरी साधता आली?’’ सुटीन खेळता खेळता म्हणाले, ‘‘आम्ही १० डाव खेळलो.’’ तरी प्रशिक्षक साहेबांनी खोदून विचारलं, ‘‘इवानचुक किती जिंकला?’’ आता मात्र सुटीन यांचा संयम सुटला आणि ते ओरडून म्हणाले, ‘‘आम्ही १० डाव खेळलो. आता जा तू इथून.’’ ग्रँडमास्टर महोदयांना या खेडवळाशी एकपण डाव जिंकता आला नव्हता, हे ओळखून प्रशिक्षक महाशयांनी तिथून काढता पाय घेतला.

हेही वाचा >>> चौसष्ट घरांच्या गोष्टी : युवा बुद्धिबळपटूंचा दबदबा

इवानचुक त्याच्या प्रतिभावान खेळासाठी तर प्रसिद्ध आहेच; पण त्याच्या विक्षिप्त वागण्यासाठीही खूपच चर्चेत असतो. घोडचूक करून डाव हरल्यावर बाजूच्या भिंतीवर डोकं आपटणं, जिंकत असलेल्या डावात केवळ कंटाळा आला म्हणून बरोबरी मान्य करून फिरायला जाणं, अशा अनेक गोष्टींमुळे वॅसिली सतत प्रकाशझोतात असतो. असं म्हटलं जातं की, जगज्जेतेपदाच्या कारकीर्दीच्या ऐन भरात असताना गॅरी कास्पारोव्ह कोणाला घाबरत असेल तर तो फक्त वॅसिली इवानचुकला. जागतिक विजेतेपदानं त्याला सतत हुलकावणी दिलेली असली तरीही इवानचुकनं २००७ साली जागतिक विद्युतगती आणि २०१६ साली जागतिक जलदगती स्पर्धाचं अजिंक्यपद मिळवलेलं होतं. अनेक वेळा जागतिक संघटनेच्या रेटिंगमध्ये तो दुसऱ्या क्रमांकावर राहिलेला आहे. एवढंच नव्हे तर जगातील प्रतिष्ठेच्या मानल्या गेलेल्या लिनारेस, वाईक आन झी, ताल स्मृती या स्पर्धा तर जिंकल्या आहेतच; पण जगातील सर्वात भव्य स्पर्धा जिब्राल्टर ओपनमध्येदेखील पहिला क्रमांक मिळवलेला आहे.

१९८७ सालची युरोपियन ज्युनिअर अजिंक्यपद स्पर्धा जिंकून वॅसिली इवानचुकनं आपल्या देदीप्यमान कारकीर्दीला सुरुवात केली. स्वत: ग्रँडमास्टर नसताना त्यानं न्यूयॉर्क येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकली- ती अनेक आघाडीच्या ग्रॅण्डमास्टर्सना मात देऊन. १९८७ साली फिलिपाइन्समध्ये जागतिक ज्युनिअर स्पर्धेचं अजिंक्यपद इवानचुक जिंकेल अशी हवा असताना अचानक विश्वनाथन आनंदनं पहिलं येऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. पुढच्याच वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या जागतिक ज्युनिअर स्पर्धेत पुन्हा एकदा इवानचुकला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. त्या वेळी मला इवानचुकच्या विक्षिप्त स्वभावाचा प्रत्यक्ष अनुभव आला.

१९८८ ची जागतिक ज्युनिअर स्पर्धा अ‍ॅडलेड येथे एका निसर्गरम्य शाळेत होती.  मी भारतीय संघाचा प्रशिक्षक होतो. शाळेच्या कार्यालयाच्या बाहेर एका बाकडय़ावर बसून मी बुद्धिबळाचं एखादं पुस्तक वाचत बसायचो. तेथे जवळच शाळेचा तास संपला किंवा सुटी झाली असं दर्शवणारी घंटा टांगलेली होती. प्रतिभावान इवानचुक स्वत:ची खेळी झाली की चक्कर मारायला बाहेर पडत असे. एकदा  त्याची नजर त्या घंटेवर पडली आणि अचानक  येऊन त्यानं ती घंटा वाजवली आणि धावत निघून गेला. सगळीकडे एकच गोंधळ उडाला. मुख्याध्यापक बाई बाहेर आल्या आणि त्या घंटेच्या सगळय़ात जवळ मीच होतो. माझ्याकडे त्या रागाने बघत होत्या. तेवढय़ात एका शिक्षकाने त्यांना सांगितल, त्यानं स्वत: बघितलं की एका मुलानं हा चावटपणा केला आहे. त्यामुळे मला अंगठे धरून उभं करायचं की उठाबशा काढायला लावायच्या, या शिक्षांचा विचार करणाऱ्या मुख्याध्यापिका आत गेल्या. 

भले जागतिक ज्युनिअर अजिंक्यपदानं त्याला १९८८ साली  हुलकावणी दिली असली, तरी वॅसिली इवानचुकला जागतिक संघटनेनं त्याच वर्षी ग्रँडमास्टर किताब बहाल केला.  सर्वात मोठी गोष्ट म्हणजे, इवानचुकनं आपल्या एकापेक्षा एक विजयामुळे त्याच वर्षी जगातील पहिल्या १० जणांत स्थान मिळवलं. हा एक प्रकारे विक्रमच होता. साधारणपणे ग्रँडमास्टर झाल्यावर हळूहळू आपलं रेटिंग उंचावत जायचं आणि मग यथावकाश कमीत कमी ४-५ वर्षांनी पहिल्या दहामध्ये स्थान मिळवायचं, असं घडत असतं. इवानचुकनं सगळीकडे एकच खळबळ उडवून दिली होती.

१९९१ साली आणि इवानचुकला लीनारेस येथील सुपर ग्रँडमास्टर स्पर्धेचं आमंत्रण मिळालं. खेळणाऱ्या १४ खेळाडूंपैकी ८ जण पहिल्या दहांत होते आणि अग्रस्थानी होता साक्षात जगज्जेता गॅरी कास्पारोव्ह. बुद्धिबळप्रेमी कोटय़धीश लुई रेंटेरो आपल्या हॉटेल आनिबाल येथे ही स्पर्धा घेत असे. बुद्धिबळाचं विम्बल्डन मानली गेलेली लीनारेस स्पर्धा रेंटेरोच्या अपघाती मृत्यूपर्यंत सुरू होती. हॉटेल आनिबालचं वैशिष्टय़ म्हणजे हॉटेलमध्ये सर्वत्र जगज्जेत्या बुद्धिबळपटूंचे फोटो लावलेले असत. हॉटेलच्या मेनू कार्डमध्ये बुद्धिबळ ओपिनगच्या नावाचे पदार्थदेखील असत. अशा बुद्धिबळानं भारलेल्या वातावरणात इवानचुकचा खेळ बहरला आणि त्यानं कास्पारोव्हला आसमान दाखवून पहिलं बक्षीस मिळवलं. विश्वविजेता असताना कास्पारोव्ह प्रत्येक स्पर्धेत नेहमीच पहिला येत असे. त्याचा पहिला क्रमांक हुकला असं हाताच्या बोटावर मोजता येईल इतक्या कमी वेळा घडलं होतं. या मोजक्या  स्पर्धामध्ये १९९१ च्या लिनारेसचा समावेश होतो. 

हेही वाचा >>> चौसष्ट घरांच्या गोष्टी: पदकांची चेन्नई एक्स्प्रेस..

वॅसिली इवानचुक स्पर्धेत भाग घेईल त्या वेळी तो कसा खेळेल याची कल्पना करता येत नसे. ‘असेल तर सूत, नाही तर भूत’ या म्हणीप्रमाणे त्याचा खेळ असे. तरीही त्यानं १९८८ ते २००२ या कालखंडात कधीही जागतिक क्रमवारीतील आपला पहिल्या दहांतला क्रमांक सोडला नाही. त्याला नेमकं जगज्जेतेपदाच्या स्पर्धेत काय होत असे, ते कळत नसे. विश्वनाथन आनंदला उपांत्य फेरीत हरवून जगज्जेतेपदाच्या स्पर्धेत त्यानं अंतिम फेरी गाठली त्या वेळी त्याचा प्रतिस्पर्धी होता त्याचाच देशबंधू रुसलान पोनोमोरीएव! इवानचुकचा विजय होणार असं सगळे गृहीत धरून चालले होते; पण इवानचुकला एकाही डावात सूर लागला नाही आणि रुसलाननं त्याला सहजी पराभूत केलं. हाच इवानचुक जर फॉर्मात असला तर भल्याभल्यांची सुट्टी करतो, याचा अनुभव त्याचे कास्पारोव्ह, आनंद यांच्यावरचे विजय दर्शवतात. पण २०१९ साली स्पेनमधील सिटजेस गावच्या प्रख्यात सनवे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्याचा झंझावात बघायचा अनुभव मी विसरणार नाही. त्याचा प्रतिस्पर्धी होता भारताचा प्रज्ञानंद! इवानचुकनं आधीच्या डावात भारताचाच युवा ग्रँडमास्टर रौनक साधवानीचा सहजी पराभव केलेला होता; पण प्रज्ञानंदची हवा होती त्या वेळी आणि दोन पिढय़ांमधील प्रज्ञावंतांची लढत बघण्याची उत्सुकता सर्वांनाच होती. डाव सुरू झाला आणि बघता बघता इवानचुकनं एवढा प्रखर हल्ला चढवला की प्रज्ञानंदला काही कळायच्या आत त्याच्या राजावर मात केली. शरणागती पत्करून प्रज्ञानंद बाहेर आला तो खेदानं मान हलवत. त्याचा अजूनही विश्वास बसत नव्हता की आपल्याला कोणी इतक्या सहजी हरवू शकेल.

इवानचुकच्या फॉर्मवर युक्रेन संघाचं ऑलिम्पियाडमधील यश अवलंबून असतं. दर वेळी इवानचुकला वैयक्तिक पदक मिळालं की युक्रेन संघाला ऑलिम्पियाडमध्ये पदक नक्की असतं. आतापर्यंत इवानचुकला ऑलिम्पियाडमध्ये सांघिक स्पर्धेत ४ सुवर्ण, एक रौप्य आणि ३ कांस्य पदकं आणि ४ वैयक्तिक पदकं मिळाली आहेत. हाच वॅसिली इवानचुक २००९ साली विश्वचषक स्पर्धेत दुसऱ्याच फेरीत १६ वर्षांच्या वेस्ली सो या फिलिपाइन्सच्या खेळाडूविरुद्ध हरल्यावर प्रक्षुब्ध झाला होता आणि त्यानं तडकाफडकी आपली बुद्धिबळातून निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर जे झालं ते अभूतपूर्व होतं. जगभरातून त्याला विविध स्तरांवरून आवाहन केलं गेलं आणि अखेर इवानचुकनं रसिकांची माफी मागून आपली निवृत्ती मागे घेतली. पुढे २०१६ साली तो  जागतिक जलदगती विश्वविजेता बनला.

२०११ साली युक्रेन सरकारनं इवानचूकला आपला सर्वांत महत्त्वाचा नागरिक सन्मान बहाल करून त्याच्या बुद्धिबळ सेवेचा गौरव केला. हल्ली युक्रेन सरकारनं रशियाविरुद्धच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर ज्या स्पर्धेत रशियन खेळाडू खेळतील त्या सर्व स्पर्धामध्ये खेळायला आपल्या खेळाडूंना बंदी घातली आहे. त्यामुळे या वर्षी अझरबैजानमध्ये झालेल्या (आणि प्रज्ञानंदने गाजवलेल्या) विश्वचषकात इवानचुकचा सहभाग अनिश्चित होता. विविध संघटना आणि अनेक महत्त्वाच्या व्यक्तींनी युक्रेन सरकारला इवानचुकसाठी आवाहन केलं. अखेर जागतिक दडपणाखाली नमून युक्रेन सरकारनं वॅसिली इवानचुकला विश्वचषकात भाग घेण्याची सवलत दिली. 

अफाट स्मरणशक्ती आणि अचाट कल्पनाभरारी यांच्या जोरावर इवानचुक  अजूनही रसिकांच्या मनावर राज्य करत आहे. त्याचे डाव अजूनही नवख्या आणि अनुभवी खेळाडूंचं सारखंच मनोरंजन करत आहेत.

gokhale.chess@gmail.com