खेल खेल में..

दूरचित्रवाणीवर सध्या दिसणाऱ्या एका नव्या जाहिरातीने माझ्या मनात विचारमंथन सुरू झाले. बाबा ऑफिसच्या टूरवरून घरी आला आहे.

दूरचित्रवाणीवर सध्या दिसणाऱ्या एका नव्या जाहिरातीने माझ्या मनात विचारमंथन सुरू झाले. बाबा ऑफिसच्या टूरवरून घरी आला आहे. चिरंजीवांनी रिमोटवर उडणाऱ्या तबकडीची फर्माईश केलेली आहे. गडबडीने ते बाबाची बॅग उघडतात. पण वरती फक्त घडी केलेले पांघरूण दिसते.  चिरंजीवांचा हिरमुसलेला चेहरा आणि ते पांघरूण अलगद दूर करून हवेत झेप घेणारी त्याच्या खाली ठेवलेली ती तबकडी.. बाबाने हळूच बॅगेआडून अ‍ॅक्टिव्हेट केलेला तो रिमोट आणि इकडे चिरंजीवांच्या चेहऱ्यावर फुललेले हास्य.. लकाकलेले डोळे. आपल्यापकी प्रत्येक आई-वडिलांनी थोडय़ाफार फरकाने हा अनुभव घेतलेला आहे. रिमोटची जागा कधी मोटारीने, कधी एखाद्या क्रेझी बॉलने घेतली आहे, तर कधी विटी-दांडूने. चारुदत्ताच्या रोहसेनाला ‘मृच्छकटिक’मध्ये आपल्या सोन्याच्या दागिन्यांनी मढवून देणाऱ्या वसंतसेनेचा वारसा आपण सारेजण आजही पुढे चालवीत आहोत. लहान मुलांच्या विश्वात अनन्यसाधारण महत्त्व लाभलेले असे हे खेळ आणि खेळणी आहेत. त्यांचे स्वरूप कालानुरूप बदलते आहे.. देण्याच्या पद्धती बदलत आहेत. त्यात तंत्रज्ञानाचा शिरकाव झाला आहे. पण देण्याची, खेळण्याची, मन रमवण्याची, रिझवण्याची भावना मात्र तशीच हजारो वष्रे टिकून आहे.
ग्लासगोला हजारो मल दूर राहणाऱ्या आपल्या दीड वर्षांच्या नातीला टणाटण उडय़ा मारणारा एक क्रेझी बॉल हवा आहे, हे कळल्यावर माझ्या भावाने मुंबईत घरात बसल्या बसल्या ‘अ‍ॅमेझॉन.कॉम’लाच मध्यस्थ करून त्या बॉलचे पाकीट नातीकडे पोहोचते केले. पाकीट उघडल्यावर आतून पिवळा क्रेझी बॉल दिसल्यावर नातीच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि ‘बॉल’ हा चीत्कार स्काइपवर पाहिल्यावर माझ्या भावाला त्याच्या जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटले. नातीने आता त्याचे नाव ‘बॉल-आजोबा’ ठेवले आहे. माझ्या दृष्टीने त्याने वसंतसेनेचा वारसा पुढे चालविला आहे.
खेळण्यांना फार मोठा इतिहास लाभला आहे. आणि त्यांनी आपले बालपण समृद्ध केलेले आहे. सागरगोटे, ठिकऱ्या, साप-शिडी, फासे.. काहीच नसेल तर एक साधी लाकडाची काठी अन् .. ‘लकडी की काठी, काठी पे घोडा, घोडे की दूम पें जो मारा हतौडा..’ माझ्या लाडक्या देशाने प्रत्येक बदलत्या युगात नवनवे खेळ-खेळणी साकारली आहेत. सावंतवाडीच्या लाकडाच्या खेळण्यांनी आमची कपाटे भरली आहेत. अहमदाबाद-सुरतेच्या पतंगांच्या वैविध्याने आमच्या रूक्ष जीवनात रंग भरले आहेत. आजही दर संक्रांतीला माझी एक उद्योजक मत्रीण मला दोन सुंदर मोठे रंगीबेरंगी पतंग पाठविते; अन् ते मग पुढचे काही महिने हॉलच्या िभतींवर लटकतात. रुबिक क्यूब फार नंतरचा. त्याआधी रंग आणि आकार यांची सूत्रसंगती साधणारी खेळणी एतद्देशात होती, हे आपण लक्षात ठेवावयास हवे. फाशांनी तर शकुनीच्या हातून महाभारत घडविले. पण सारीपाटाचा डाव त्याही आधी शंकर-पार्वती मांडून बसले होते.  
ऐंशी-नव्वदीच्या दशकात मी प्रथम लिव्हरपूलला गेलो तेव्हा ‘टॉयज् आर अस’ या प्रचंड दुकानाच्या शृंखलेने माझे लक्ष वेधून घेतले. १९४८ साली चालॅस् लाझारस याने रोवलेल्या या रोपटय़ाच्या आज जगभर ७५० हून अधिक शाखा आहेत. ‘बेबीज आर अस’ या बाळांच्या दुनियेचाही प्रारंभ झाला आहे.  इंग्रजी ‘आर’ आद्याक्षर उलटे काढून (Toys R us) दुकानाचे नाव लिहिताना जाणीवपूर्वक केलेली व्याकरणातील चूक आज अब्जावधी पौंडांमध्ये फलद्रूप झाली आहे. १९५९ मध्ये रुथ हँडलरने जन्माला घातलेली बार्बी डॉल गेल्या सहा दशकांत आकार, वय, रंग, रूप, कपडे, तिचे मेकअप किट, फíनचर, किचनवेअर.. इतकेच काय, पण प्रेग्नन्सी किटनेही समृद्ध झाली आहे. तिने मुलींच्या बारशापासून बोहोल्यापर्यंत साथसंगत केली आहे.
खेळण्यांनी आणि खेळांनी नेमके काय केले? त्यांनी आनंद तर दिलाच; पण त्याचबरोबर आयुष्यात रंगही भरले. ती स्थळ, काळ, वेळ, खंड, भाषा, प्रदेश यांच्या बंधनात अडकून पडली नाहीत. बॅगपायपरच्या स्वरांच्या मागे मुले आर्यलड आणि उत्तर इंग्लंडमध्ये धावली आहेत. तशीच लोकलमध्ये एकतारीवर सुंदर सिनेगीते वाजविणाऱ्या अवलियाच्या मागे आम्हाला आमच्या घामटय़ातला विरंगुळा सापडला आहे. ती एकतारी विकत घेतल्यावर आमच्या हातून ती तशी कधीच वाजली नाही, हा भाग विरळा. शांतारामबापूंच्या अमर रजतपटावर संध्याबाईंच्या हातात वाजणारी ती एकतारी, मागे ओढले जाणारे ते चाकावरचे ताशासदृश खेळणे या दृश्याची भुरळ मला आजही पडते. अनेकदा ऑपरेशन केल्यामुळे माझ्या ज्या बालरुग्णांनी मला ‘काळ्या यादी’त टाकलेले असते, त्यांची मने जिंकण्यासाठी मी खिशातून त्यांना छोटे खेळणे काढून दिले आहे. बुद्धिबळाच्या डावाने भारताला जगज्जेते दिले आहेत आणि क्रिकेटच्या रूपाने सर्वसमावेशक धर्म दिला आहे. माझ्या लेखी, भारतातील ‘सेक्युलॅरिझम’ क्रिकेटची बॅट आणि बॉल घेऊन अवतरले आहे. जुने मोजे ठासून भरलेला कापडी बॉल आणि दादरच्या खांडके बिल्डिंगच्या तिसऱ्या मजल्याच्या गॅलरीत रंगलेला क्रिकेटचा सामना यांनी माझे बालपण समृद्ध केले आहे. त्या गॅलरीत फक्त स्ट्रेट ड्राइव्ह मारणारे माझे मामा-काका मंडळी आज दुर्दैवाने मला कायमची सोडून गेली आहेत. पण आजही मोज्याला अंगठय़ापाशी भोके पडल्यावर किंवा त्याचे इलॅस्टिक गेल्यावर तो थेट फेकून देण्याऐवजी याचा बॉल करून बिल्डिंगमधल्या पोरांना द्यावा का, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही.
.. पण आज बिल्डिंगमधली खाली जमणारी बच्चेमंडळी टेक्नोसॅव्ही आहेत.  त्यांच्याकडे व्हिडीओ गेम्स् आहेत, रिमोट कन्ट्रोल कार्स आहेत, हातात छोटे भीम आहेत, लेझर ऑपरेटेड पॉइंटर्स आहेत आणि खेळाच्या नव्या क्लृप्त्या, कल्पना आहेत. गोष्ट परवाचीच आहे. मे महिन्याच्या सुट्टय़ांमुळे सध्या बिल्डिंगच्या आवाराचे अक्षरश: गोकुळ झाले आहे. ७ ते १२ वयोगटाचा लपंडाव सुरू होता.  १, २, ३, ४.. १० पर्यंत आकडे म्हणून लपण्यापूर्वी इतर भिडूंना पकडून आपल्यावरचे राज्य घालविण्याच्या संस्कृतीत वाढलेले आम्ही! पण हा भिडू मात्र शांत होता. सगळे लपल्यावर अजिबात घाईगर्दी न करता तो सिक्युरिटी केबिनमध्ये शिरला आणि बिल्डिंगच्या पाìकग लॉटमध्ये लावलेल्या सिक्युरिटी कॅमेरांच्या टीव्हीवर दिसणाऱ्या सोळा फ्रेम्समधून त्याने कोण कोण कुठे कुठे लपले आहे, ते शोधून काढले.. पुढे त्यांना पकडणे सोपे होते.
.. खेळ तोच राहिला होता; पण खेळायची पद्धत बदलली आहे.
Application of science and technology  म्हणजे काय,  हे कळायला मला आता विद्यापीठीय oration किंवा ‘key-note addressची गरज उरली नव्हती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व जनात…मनात बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Toys games and kids

ताज्या बातम्या