सतीश लळीत

अनेक साहित्यिकांनी आपल्या लेखनातून काही पात्रे आणि काही जागा अजरामर करून ठेवल्या आहेत. मग ती पात्रे किंवा जागा वास्तवातील असोत, लेखकाच्या कल्पनेतील असोत की वास्तवाचा आधार घेतलेली काल्पनिक असोत. जसा पुलंनी रत्नांग्रीचा अंतु बर्वा अजरामर करून ठेवला, तशीच बटाट्याची चाळ. ती आजही कुठेतरी उभी असेल आणि पुनर्विकासाला आली असेल असे वाटावे. असेच एक ठिकाण आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील किंजवडे गावचे शब्दप्रभू दिवंगत बाळकृष्ण प्रभुदेसाई यांनी अमर करून ठेवले आहे. आज मी त्यांच्या साहित्यातील मनात घर केलेल्या एका ठिकाणाच्या शोधाबद्दल सांगणार आहे.

अत्यंत संवेदनक्षम मन आणि अप्रतिम शब्दकळा असलेले बाळकृष्ण प्रभुदेसाई अल्पायुषी ठरले. अवघे चाळीस वर्षांचे आयुष्य त्यांना मिळाले. त्यांचा जन्म किंजवड्यात १९४० साली झाला आणि त्यांनी कोल्हापुरात जानेवारी १९८०मध्ये जगाचा निरोप घेतला. प्रभुदेसाई यांना आणखी आयुष्य मिळते तर मराठी सारस्वतात आणखी कित्येक साहित्यरत्नांची भर पडती. पण तसे व्हायचे नव्हते. प्रभुदेसाई यांचे लेखन मोजकेच, पण वाचकाच्या मनाचा ठाव घेणारे आणि मनात घर करून राहणारे आहे. त्यांचा साहित्यनिर्मितीचा काळ साधारणपणे १९६६ ते १९७४ पर्यंतचा आहे. त्यांचा पहिला ‘जहाज’ कथासंग्रह १९७७ साली आला, तर दुसरा ‘गंधर्व’ कथासंग्रह तब्बल १० वर्षांनी- १९८७ साली तोही त्यांच्या मृत्यूनंतर आला.

‘आदिवास’ (१९७८) आणि ‘नायक’ (१९८३ मरणोत्तर) या त्यांच्या दोन कादंबऱ्या. ‘आला क्षण, गेला क्षण’ आणि ‘कालचक्र एक क्षणभर थांबले’ ही त्यांची दोन अप्रकाशित नाटके. ‘जहाज’ या कोकणातील निसर्गाबरोबरच वेगळेच गडद भावविश्व साकारणाऱ्या पहिल्याच कथासंग्रहाला महाराष्ट्र राज्य शासनाचा आणि वाल्मीक पुरस्कार मिळाला आणि सर्वांचे लक्ष या नव्या दमाच्या लेखकाकडे वळले.

कोकणच्या निसर्गाचे वर्णन त्यांनी साहित्यात आणलेच. पण तेवढ्यावर ते थांबले नाहीत. ओघवत्या, सहजसोप्या भाषाशैलीत मानवी भावभावना आणि आंतरिक मानसिक द्वंद दाखवण्यावर त्यांनी भर दिला. डॉ. उज्ज्वला सामंत यांनी प्रभुदेसाईंच्या लेखनकळेचे नेमके वर्णन (सिंधुसाहित्य सरिता, कोमसाप, मालवण) केले आहे. त्या म्हणतात, ‘‘स्वानुभव हा त्यांच्या लेखनाचा पाया आहे. प्रतीकात्मकता, निसर्गसौंदर्य, जीवनानुभव, संस्कृती, नित्य अनुभव, नियतीच्या चौकटीतील निमूट जीवन, जगण्याचा अनुभव यांचा प्रत्यय त्यांच्या लेखनातून येतो.

वास्तव रेखाटताना सर्जनशील मनाला न पटणाऱ्या गोष्टी प्रभुदेसाई मांडताना दिसतात. ‘गंधर्व’ या कथेमध्ये तानी भावणीच्या संदर्भात- ‘‘मामा, मुळात या भावणी कोकणात आणल्या कुणी? खोत इनामदारांनीच ना? तानी भावीण असली म्हणून लगेच वाईट कशी? तिच्या पिढ्यान् पिढ्या गावानं नासवल्या तेव्हा चालतं.’’ या परखड बोलण्यातून किंवा ‘‘भावीण वाड्यावर चोरूनमारून आली तर चालते, पण राजरोस नको.’’ हे विचार किंवा ‘नायक’ या कादंबरीतील पंढरी दलित लेखक आहे. त्या कादंबरीतील ‘त्या निष्प्रेम उजाड भूमीने जणू त्यांना जन्म देऊन दूर लोटून दिले होते आणि तरीसुद्धा चिवटपणे त्या कातळात रुजलेल्या करवंदीसारख्या त्याच्या आणि त्याच्या जमातीच्या पिढ्यान् पिढ्या त्या रणरणत्या उन्हात जणू होरपळून जात होत्या, हे तत्कालीन अस्पृश्य समाजाचे वर्णन जगण्याच्या अस्वस्थतेसहित आले आहे.

पंढरीच्या निमित्ताने लेखकाने अनुभव, साहित्यविश्व व दलित लेखक यांविषयी चिंतन मांडले आहे. ‘आदिवास’ कादंबरीतील इंजा धनगराच्या गोष्टीतील वास्तव असो, त्यावेळच्या उच्चवर्णीय समाजातील असूनही प्रभुदेसाई या सर्वांच्या दु:खाशी एकरूप होताना दिसतात. त्यांच्या व्यथा-वेदनांना शब्दरूप देताना दिसतात.

त्यांच्या ‘गंधर्व’ कथासंग्रहाने तर मला अक्षरश: भुरळ घातली. या संग्रहातील सर्वच कथा विलक्षण प्रत्ययकारी आहेत. ‘गंधर्व’ ही शीर्षककथा तर अक्षरश: भूल पाडणारी आहे. या कथेचा नायक असलेला दिगंबरमामा हे अफलातून व्यक्तिमत्त्व आहे. खोत इनामदाराच्या प्रतिष्ठित घराण्यात जन्मलेला दिगंबरमामा कचकडी नैतिकमूल्ये भिरकावून देणारा आणि स्वच्छंदी, मन:पूत जगणारा आहे. नाटक, भजन, संगीत यासाठी तो घरादारावर लाथ मारून एकप्रकारचे संन्यस्त जीवन स्वीकारतो. या कथेत मामा-भाच्याच्या अकृत्रिम प्रेमाचे दर्शन आपल्याला होतेच, पण त्याहीपेक्षा मामाच्या कलंदर आयुष्याची चित्तरकथा, त्याच्या आयुष्यात आलेली तानी भविणीची मुलगी जानकी, उत्तरेश्वराचा मठ, त्या परिसराचे वर्णन मोहून टाकते.

या कथेत बुधवळ्याचा सडा आणि सडा संपल्यावर घाटी उतरून खाली आल्यावर नदीकाठी असणारा गर्द झाडीतला उत्तरेश्वराचा मठ वारंवार भेटतात. हे बुधवळे गाव मालवण तालुक्यात मालवण, देवगड तालुक्यांच्या सीमेवर आहे. २५-२६ वर्षांपूर्वी सिंधुदुर्गातील अश्मयुगीन कातळशिल्पांचा शोध घेण्यासाठी या भागातील अनेक सडे पालथे घातले होते. त्यावेळी हा बुधवळ्याचा सडाही दोन-चारवेळा पालथा घातला होता. नंतर या सड्याला लागून असलेल्या कुडोपी सड्यावर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या कातळशिल्प ठिकाणाचाही शोध लागला आणि आता हे ठिकाण ‘युनेस्को’ने ‘जागतिक वारसा स्थळ’ म्हणूनही विचारात घेतले आहे. आता या कातळशिल्पांना भेट देण्यासाठी येणाऱ्या देशी-विदेशी पाहुण्यांना सड्यावर जाताना नेहमी हा मठ थोडावेळ डोक्यात चमकून जायचाच. हे थोडे विषयांतर झाले.

पण प्रत्येक वेळी बुधवळ्याचा सडा तुडवताना मनात रेंगाळायचा तो ‘गंधर्व’ कथेतील दिगंबरमामा, त्याचा भाचा आणि बुधवळ्याचा झाडापेडात लपलेला उत्तरेश्वराचा मठ. केव्हातरी वाट वाकडी करून सड्याची घाटी उतरून खाली बुधवळ्यात उतरायचे आणि हा मठ खरोखरच आहे की तो प्रभुदेसाईंच्या कल्पनेतील आहे, हे पाहण्याची इच्छा व्हायची. पण का कोण जाणे, तेव्हा ते शक्य झाले नाही.

यावेळी मात्र या मठाचा शोध घ्यायचाच असे ठरवून बाहेर पडलो. ओरोसहून निघालो. कणकवलीला आचरा रस्ता पकडला. किर्लोस, रामगड, श्रावण अशी गावे मागे टाकत पळसंबच्या पुलावर आचरा रस्ता डावीकडे टाकून उजवीकडे बुधवळे रस्ता पकडला. इथून सात किलोमीटर अंतर पार करून बुधवळ्यात पोचलो. गावातील हॉटेल म्हणजे हमखास माणसे सापडण्याचे ठिकाण. तिथे पाचसहा रिकामटेकडे गडी गजाली मारीत बसलेले होतेच. चहाची ऑर्डर देऊन मीही त्यांच्या गजालीत सामील झालो. बोलता बोलता गावात एखादा मठ वगैरे आहे का, याची चौकशी केली. पण काही माग लागेना. बुधवळ्याला लागूनच मठ बुद्रुक नावाचे गाव आहे, अशी माहिती एकाने दिली. पण बुधवळ्यात मठ नाही, यावर सगळे ठाम होते. तरीही हार न मानता बुधवळे आणि परिसरातील मंदिरे पाहायला निघालो. रामेश्वर मंदिर, पेठवाडीतील केळेश्वर मंदिर, गवळदेव, येरमवाडीतील महालक्ष्मी मंदिर, मठ बुद्रुकचा बोंबडेश्वर, पावणादेवी पाहून झाली. पण मठाचा काही सुगावा लागेना. किंवा प्रभुदेसाईंनी ‘गंधर्व’मध्ये वर्णन केलेला किंवा साधर्म्य असलेला परिसर काही सापडेना.

बहुधा हा मठ प्रभुदेसाईंनी आपल्या कल्पनेतूनच उभा केला असावा, असे म्हणून परतायची तयारी केली. पण मन काही तयार होईना. कारण प्रभुदेसाईंनी इतकं सुंदर वर्णन केलं आहे की, हा मठ कुठेतरी उभा असणारच, असे सारखे मनाशी वाटत होते. जाताना पुन्हा एकदा हॉटेलात डोकावलो. तिथे आलेल्या एका नवीन जाणत्याने ‘आता इतके फिरलासच तर मीर्लेश्वराचा देऊळ बघून जावा. मात्र वायच गावाभायर आसा,’असा सल्ला दिला. जाणत्याचा सल्ला मानायचा म्हणून आणि आता आलो आहेच तर हेही मंदिर बघू या, असं म्हणून मीर्लेश्वर दर्शनाला निघालो. मंदिर सापडायला काही फार वेळ लागला नाही. गावाबाहेर एका गर्द राईत पोचलो आणि समोरचे ते दृश्य बघून ‘युरेका’ क्षण आल्याची हर्षभरित जाणीव झाली आणि मी ‘जितं मया, जितं मया’ असा जयघोष केला.

मंदिराचे आयताकृती भव्य प्रांगण, त्यासभोवती असणारी आठ फूट उंचीची चिरेबंदी भिंत, तीस फूट उंचीचा, चिरेबंदी कमानींचा भव्य दिंडीदरवाजा, दोन देवड्या, पाच भव्य दीपमाळा, उजव्या आणि डाव्या बाजूला असलेल्या ओवऱ्यांचे अवशेष या सगळ्याच्या मध्यभागी असलेले आकर्षक, कौलारू मंदिर, मंदिराच्या मागे असलेली तळी, नदी आणि तिचा घाट, अत्यंत निसर्गरम्य परिसर बघून हाच तो ‘दिगंबरमामाचा मठ’ यावर शिक्कामोर्तबच झाले. मंदिराच्या मागे असलेली नदी, पलीकडची घाटी आणि वरचा बुधवळ्याचा सडा या सगळ्या कथेतील खाणाखुणा प्रत्यक्ष जुळल्या.

मंदिरासभोवतीच्या ओवऱ्या आता उरलेल्या नाहीत. कालौघात त्यांची गरज संपली आहे. पण चौथरे शिल्लक आहेत. प्रभुदेसाईंनी आपले लेखनस्वातंत्र्य घेऊन या परिसरातील वास्तूंबद्दल काही बदल केले आहेत. कथेतील मठ काळ्या पाषाणाचा आहे, प्रत्यक्षात तो चिरेबंदी आहे. मीर्लेश्वराचा ‘उत्तरेश्वर’ झाला आहे. उत्तरेश्वराच्या कळसाचा उल्लेख एकदोन ठिकाणी येतो, प्रत्यक्षात मीर्लेश्वराच्या मंदिराला कळस नाही. ते कोकणी शैलीतील उतरत्या लाकडी कौलारू छपराचे मंदिर आहे. अर्थात कथेमध्ये अधिक जिवंतपणा आणि भारदस्तपणा येण्यासाठी हे बदल त्यांनी केले असावेत.

मीर्लेश्वराच्या परिसरात फिरताना तिथल्या अनेक जागा पाहून त्या कथेतील जागांशी ताडून पाहत होतो. बहुतेक धागे जुळत होते. कधी वाटायचे, दिगंबरमामा इथेच या दगडी सोप्यावर पहुडला असेल, जानकीने सडापाणी करण्यासाठी मागच्या याच तळीवरून पाणी आणले असेल, मामा आणि भाच्याने याच इथे बसून आमरसपुरीचा फडशा करीत गप्पा केल्या असतील. तिथे एक प्राचीन वाटावी अशी लाकडी हातखुर्ची आहे. कधीकाळी दिगंबरमामा या खुर्चीत भाच्याची वाट बघत बसला असेल. कथेतला प्राजक्त आणि त्याचा पार कुठे दिसला नाही, पण दिंडीदरवाजाबाहेर भलेमोठे बकुळीचे झाड मात्र आहे. त्याखाली मातीत बकुळीची असंख्य फुले पडली होती. कथेतील ‘गंधर्व’ दिगंबरमामाच्या अंगावर ओघळलेल्या प्राजक्ताच्या फुलांसारखी…

सतीश लळीत / satishlalit@gmail.com