ही लोकसभा निवडणूक इतिहास झटकून टाकणारी ठरली. या निवडणुकीत राजकीय व्यवस्थेचा इतिहास जसा नरेंद्र मोदी यांनी बदलला, त्याचप्रमाणे निवडणुका आणि राजकीय पक्ष कार्यपद्धतींच्या इतिहासाशीही त्यांनी काडीमोड घेतला. यापुढे सर्वानाच आपलं राजकारण आणि त्याची भाषा बदलावी लागेल. याचं आणखी एक कारण म्हणजे देशात विचारधारोत्तर वर्ग आता स्थिरावलाय. या वर्गाचं प्राधान्य आहे ते भौतिक गरजा भागवण्याला! राजकीय विचारधारा, बांधिलकी वगैरे फोलकटी शब्दांशी या वर्गाला घेणंदेणं नाही. मोदींचं मूल्यमापन होईल ते त्यांच्या कामगिरीवर. त्यांच्या झेंडय़ाचा रंग या मूल्यमापनाच्या आड येणार नाही.
ताज्या निवडणुकीतला नरेंद्र मोदी यांचा विजय आणि काँग्रेसचा पराभव याकडे केवळ राजकीय जयापजय इतक्याच मर्यादित अर्थानं पाहणं अयोग्य ठरेल. ही काही केवळ राजकीय घटना नाही. तिला अनेक सामाजिक, सांस्कृतिक आणि अर्थातच आर्थिकही पदर आहेत. हिंदी सिनेमाच्या क्षेत्रात ‘दिल चाहता है’ या चित्रपटाला, क्रिकेटच्या बाबतीत महेंद्रसिंग धोनी यांना जे महत्त्व आहे, तितकंच- किंबहुना त्याहीपेक्षा अधिक महत्त्व नरेंद्र मोदी यांच्या या विजयाला आहे. (सिनेमा, क्रिकेटची उदाहरणं नरेंद्र मोदी यांच्यासाठी दिल्यानं काहींना लगेच थिल्लरपणाचा आरोप करायचा मोह होईल याची कल्पना आहे. पण मुद्दा अधिक स्पष्ट व्हावा यासाठी या आरोपाचा धोका पत्करण्यात काहीही गैर नाही.) हिंदी सिनेमातले त्यागमूर्ती, गरीब, ‘माँ, मैं बी. ए. पास हो गया’ असे म्हणत सायकलवरून घरी येणारे बावळट नायक ‘दिल चाहता है’ या सिनेमानं बदलले. श्रीमंती मिरवण्यात जराही लाज न बाळगणारे, आपल्या आयुष्यातल्या नायिकेच्या शोधात मर्सिडीजमधून फिरणारे आणि अधिक श्रीमंतीचं स्वप्न पाहणारे नायक ‘दिल चाहता है’ सिनेमानं दिले. धोनी याचा उदय होईपर्यंत क्रिकेट हा खेळ बऱ्याच अंशी मुंबई, कोलकाता, दिल्ली, चेन्नई, बेंगलुरू वगैरे असा श्रीमंती महानगरी होता. शिवाजी पार्कचं किंवा तत्सम वातावरण, चांगले गुरू, प्रेमळ माध्यमं वगैरे नसतानाही दूर झारखंडातून येऊन दशकभर क्रिकेटचा संघ हाकायचा आणि मैदानाबाहेरच्या राजकारणालाही पुरून उरायचं, हे धोनीनं करून दाखवलं. त्यामुळे क्रिकेट अधिक मोकळं झालं.
नरेंद्र मोदी यांच्या विजयामुळे नेमकं हेच होणार आहे. आपल्या देशात राजकीय सत्ता कोणाकडे असायला हवी, याचे काही अलिखित नियम आहेत. एकतर ती घरातनं यायला हवी. मोदींचे वडील चहावाले. त्यामुळे ती शक्यता नाही. जातीपातीचं मोठं समीकरण असायला हवं. उदाहरणार्थ लालुप्रसाद यादव किंवा मायावती वगैरे. मोदी यांच्याकडे तेही भांडवल नाही. पक्ष निवडून येण्याच्या ताकदीचा हवा आणि त्या पक्षानं आपली निवड करायला हवी. त्याबाबतही मोदी यांचा पाढा नन्नाचाच. मोदी यांच्या पक्षनेतृत्वाचा ज्येष्ठ नागरिक संघ झालेला आणि त्यातले सर्व जरठ राजकीय पालवीच्या प्रतीक्षेत. त्यामुळे अशा पक्षाकडून त्यांचं नाव पुढे दामटलं जाण्याची शक्यता नाही. याच्या जोडीला माध्यमस्नेह नाही. असलाच, तर उलट माध्यमांकडून होणारा दुस्वास. माध्यमवीरांकडून ‘पुरोगामी’ वगैरे विशेषणांची कौतुकारती नाही. मागे कोणतीही उच्चभ्रूंची प्रभावळ नाही. ‘तृतीय-पानी’ संपर्क नाही. इंग्रजीही तसं बेतास बातच. ‘मी आहे हा असा आहे..’ असं म्हणण्याची रग आणि थेट मातीशी संपर्क मिरवणारा गावंढळपणा इतक्याच भांडवलावर थेट पंतप्रधानपदाला हात घालणारा नरेंद्र मोदी हा पहिला नेता. त्यांच्या विजयामुळे जी मोठीच खळबळ उडालेली दिसते त्यामागे अनेक कारणं आहेत. सत्तेचं म्हणून एक पर्यावरण असतं. सत्ता जितकी जास्त काळ एखादी व्यक्ती वा व्यवस्था यांच्या हाती राहते, तेव्हा ते पर्यावरण अधिकाधिक घट्ट होत जातं. दिल्लीत हे सत्तापर्यावरणवादी पदोपदी भेटत असतात. आपण कसं अमुकला घडवलं किंवा तमुकला हिसका दाखवला, अशा वल्गना इंडिया हॅबिटॅट सेंटरच्या उबदार, स्कॉची वातावरणात बसून त्यांच्याकडून पेरल्या जात असतात. बातम्या पेरायची आणि वातावरणनिर्मितीची व्यवस्था या वातावरणातून होत असते. सत्तेभोवती- गरज किंवा सवय म्हणूनही- नांदणाऱ्यांना या पर्यावरणाची सवय होते. त्याचा अंदाज बांधता येतो. मोदी यांच्याबाबत ती सोय नव्हती. गृहस्थ काय करेल आणि काय नाही, त्याचा नेम नाही. त्याचमुळे मोदींच्या निवडीमुळे विद्यमान सत्तापर्यावरण पार उलथून पडलंय. विद्यमान व्यवस्था अस्तित्वात नाही आणि नव्याचा अंदाजही नाही, अशा वातावरणात सर्वच जण चाचपडतात. आताही नेमकं तेच होताना दिसतंय.  
या तीनही गोष्टींत आणखी एक समान धागा आहे. ‘दिल चाहता है’ हा सिनेमा, महेंद्रसिंग धोनी आणि नरेंद्र मोदी यांचं यश या सर्वाचा पाया एकच आहे. तो म्हणजे आर्थिक सुधारणा. हे तिघे आर्थिक सुधारणोत्तर आलेल्या संपन्नावस्थेचे प्रतिनिधी आहेत. या सुधारणांनी संपत्तीच्या विकेंद्रीकरणाला सुरुवात झाल्यानंतर मध्यमवर्गीय म्हणवून घेणाऱ्यांचा वैचारिक/ सामाजिक/ आर्थिक किरटेपणा दूर व्हायला लागला. याचं कारण आपणही सधन होऊ शकतो याची जाणीव या वर्गाला व्हायला लागली. त्याआधी या वर्गानं गरिबी काही आवड म्हणून निवडलेली नव्हती. श्रीमंत होता येत नाही आणि गरीब म्हणवून घेण्याची लाज वाटते, म्हणूनच हा वर्ग मध्यम राहिलेला होता. १९९१ नंतर त्याला श्रीमंतीची स्वप्नं पडायला लागली. आणि काही वर्षांनंतर ती पूर्ण होऊ शकतात हेही जाणवायला लागलं. एकेकाळी श्रीमंतीचं प्रतीक मानले जाणारे फोन घरोघरी कचऱ्यासारखे झाले. आणि मारूती ८०० का असेना, पण मध्यमवर्गीय सुखेच्छांना चारचाकं जोडली जाऊ लागली. दशकभरानंतर या आर्थिक सुधारणांची फळं अधिक गोमटी झाली. तोपर्यंत अमेरिका, इंग्लंडला जाणारी पोरं ही अभ्यासातल्या अतिहुशारातली असायची. अगदीच मोजकी. उच्चभ्रू वर्गासारखी. पण नंतर माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या रेटय़ामुळे बौद्धिकदृष्टय़ा मध्यमवर्गीय असलेल्या, अभ्यासात जेमतेम असणाऱ्यांनाही परदेशात संधी मिळू लागल्या आणि वाढता डॉलर बघता बघता नाना-नानी पार्कातला चर्चेचा विषय बनला. मध्यमवर्ग झपाटय़ानं वाढू लागला.
इथून पुढचा काळ हा मध्यमवर्गाच्या भरभराटीचा. ती भरभराट केवळ आर्थिकच होती असं नाही, तर ती सामाजिक आणि राजकीयदेखील होती, ही बाब अत्यंत महत्त्वाची.  कारण या प्रगतीनं आसपासच्या सांस्कृतिक आणि सामाजिक पर्यावरण-बदलालाही गती दिली. परंतु या बदलाची गरज आसपासच्या राजकारणानं आणि समाजकारणानं घेतली नाही. ते जुन्याच पद्धतीनं साधी राहणी आणि उच्च विचारसरणी अशा मुदलातल्याच खोटय़ा सुवचनांभोवती फिरत राहिलं. दुर्दैवानं यातला साधेपणा हा गरिबीशी जोडला गेलाय. त्यामुळे साधं राहायचं म्हणजे गरीब राहायचं असा काहीतरी आपला समज होता. इतके दिवस दरिद्रीच राहिलेल्या मध्यमवर्गात तो खपून गेला. परंतु नंतर स्वकष्टानं बरे दिवस पाहू लागलेल्या वर्गाला मात्र तो खुपू लागला. या वर्गाचं यश हे स्वकष्टानं मिळवलेलं यश होतं आणि आहे. या यशामुळे त्याच्या भौतिक गरजा बदलल्या. या बदलत्या आणि वाढत्यादेखील भौतिक गरजा भागवणं त्याला नैतिक मार्गानं शक्य होऊ लागलं. अशा वातावरणात राहणीतल्या साधेपणाचा संबंध गरिबीशी जोडणं योग्य नाही याचं भान या वर्गाला आलं आणि सधनता व साधेपणा हे परस्परविरोधी नाहीत याचाही अनुभव त्यानं घेतला. त्यामुळे साधी राहणी आणि उच्च विचारसरणी या वचनातला फोलपणा त्याला लक्षात यायला लागला. याच्या जोडीला या मध्यमवर्गाच्या देशी आणि परदेशी जगण्यानं आणखी एक बदल घडवला. तो आहे जात आणि धर्म यांच्या भिंतींची जाडी कमी होण्याचा. हल्ली तरुण मुलामुलींत एक प्रकारचा लैंगिक मोकळेपणा आलेला आहे. म्हणजे मित्रमंडळींमधला तरुण ज्या देहिक मोकळेपणानं दुसऱ्या तरुणाशी वागतो, त्याच मोकळेपणानं तो चमूतल्या तरुणीशीही वागत असतो. हीच बाब जात आणि धर्माच्या बाबतही लागू पडते. एखादा/ एखादी विशिष्ट जात/ धर्माची आहे याची आवर्जून दखल घेतली जात नाही. अर्थात हा बदल प्रामुख्याने शहरांपुरता आहे, हे जरी खरं असलं तरी आज जवळपास निम्म्या भारताचं शहरीकरण झालेलं आहे, हेही लक्षात घ्यायला हवं. त्यामुळे किमान निम्म्या जनतेतील जाती-प्रजातींच्या दरी मोठय़ा प्रमाणावर कमी व्हायला लागलीय, हे कसं अमान्य करणार?
यातल्या कोणत्याही बदलाची दखल राजकीय वर्गानं घेतलेली नाही. त्यामुळे ते जुन्याच वळणानं वागत राहिले. हा विसंवाद पदोपदी दिसत होता. जो वर्ग श्रीमंतीचं स्वप्न पाहतोय, त्या वर्गाला हा सत्ताधारी राजकारणी वर्ग गरिबी निर्मूलनाची प्रवचनं देत होता. नवश्रीमंत होऊ पाहणाऱ्या या आकांक्षी वर्गाला चालायला आणि वाहनं चालवायला उत्तम रस्ते हवे होते. मुलंबाळं, घरातल्या वडिलधाऱ्यांसाठी उद्यानं हवी होती. आणि स्वत:साठी हवी होती आर्थिक उन्नतीची संधी! या वर्गाच्या हाती पैसा खुळखुळू लागला होता. एकदा तो हाती असला, की माणसं थांबायला तयार नसतात.
कारण त्याच्याअभावी ती इतकी र्वष थांबलेली असतात, की तो हाती आल्या आल्या आपल्या समस्या झटपट कशा सुटतील यासाठी ते अधीर झालेले असतात. या संपत्तीचा गुणाकार कसा करता होईल, ही त्यांची विवंचना होती.
नरेंद्र मोदी यांचा उदय झाला तो या टप्प्यावर. आपल्याला जे हवं असेल ते न्याय्य मार्गानं दिलं जाणार नसेल तर सामर्थ्यांच्या बळावर ते मिळवता येतं, हा संदेश त्यांच्या राजकारणातून मिळत गेला. त्यातही पुन्हा एक काव्यात्म न्याय आहे. तो असा, की ज्या काँग्रेसनं ही आर्थिक स्वप्नांची पायाभरणी केली, तीच काँग्रेस पुढे त्यापासून पळ काढू लागली. म्हणजे ज्या पक्षानं मध्यमवर्गाला हा रस्ता दाखवला तो काँग्रेस पक्षच पुढे हा रस्ता चुकला आणि जुन्या पद्धतीनं राजकारण करू लागला. या जुन्या पद्धतीत सरकार हे मायबाप असतं आणि गरीबांना कुठे हे मोफत दे, कुठे त्यात सवलत दे.. हेच त्याचं काम असतं. म्हणजे आपण कोणीतरी काहीतरी देणारे आहोत आणि गरीब जनतेनं ते गोड मानून घ्यायला हवं, असं त्या पक्षाचं वागणं होतं. त्याचवेळी मोदी मात्र मिळेल त्या माध्यमातून जनतेची भाषा बोलत होते, जनतेच्या स्वप्नांना आपली भावनिक उब देत होते. हा विसंवाद प्रचंड होता. इतका, की ज्या काँग्रेसनं राजीव गांधी यांच्या काळात दूरसंचार क्रांती घडवून आणली, त्याच काँग्रेसचा आजचा नेता राहुल गांधी या सगळय़ापासून फटकून जुन्या पद्धतीनं राजकारणात वाट शोधत राहिला.
ही काँग्रेसच्या पराभवाची सुरुवात होती. आताच्या ताज्या निकालानंतर सर्वच म्हणताहेत की, १९८४ नंतर एका पक्षाला इतका मोठा जनादेश कधी मिळाला नव्हता. त्या वर्षी ३१ ऑक्टोबरला इंदिरा गांधी यांची हत्या झाली आणि लगेचच झालेल्या निवडणुकीत मतदारांनी राजीव गांधी यांच्या पदरात भरभरून मतांचं माप टाकलं. त्यानंतर थेट आता २०१४ सालच्या या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपला एकहाती सत्ता मिळाली आहे. पण १९८४ आणि २०१४ च्या निकालांमध्ये एक मूलभूत फरक आहे. त्या वर्षीच्या निवडणुकीला इंदिरा गांधी यांच्या हत्येचा इतिहास होता आणि त्यामुळे तयार झालेली सहानुभूती होती. ही निवडणूक बरोबर त्याच्या विरोधातली आहे. म्हणजे त्या निवडणुकीनं इतिहासाचा आधार घेतला, तर ही निवडणूक इतिहासाला झटकून टाकणारी आहे. या निवडणुकीत राजकीय व्यवस्थेचा इतिहास जसा मोदी यांनी बदलला, त्याचप्रमाणे वैयक्तिक इतिहासालाही मूठमाती देण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यात ते किती यशस्वी होतात, ते भविष्यात दिसेलच. परंतु निवडणुकांच्या आणि राजकीय पक्ष कार्यपद्धतींच्या इतिहासाशी त्यांनी काडीमोड घेतलाय, हे नक्की. यापुढे आता सर्वानाच आपलं राजकारण आणि त्याची भाषा बदलावी लागेल, हे नि:संशय.
याचं आणखी एक कारण म्हणजे देशात विचारधारोत्तर वर्ग आता स्थिरावलाय, हे या निवडणुकांनी सिद्ध केलंय. या वर्गाचं प्राधान्य आहे ते दैनंदिन, भौतिक गरजा भागवण्याला. उगाच राजकीय विचारधारा, बांधिलकी वगैरे फोलकटी शब्दांची या वर्गाला भुरळ पडणारी नाही. ‘बाप दाखव, नाही तर श्राद्ध कर..’ असा रोकडा व्यवहार या वर्गाचा आहे. तेव्हा कोणीतरी केवळ धर्मनिरपेक्षतेचा आव आणतोय आणि करत मात्र काहीच नाही, तेव्हा त्याला घरी पाठवण्यात या वर्गाला काहीही कमीपणा वाटत नाही. त्याचमुळे मुसलमान, दलित, आदिवासींनी आपला तथाकथित पाठिराखा असलेल्या काँग्रेस, समाजवादी पक्ष, बहुजन समाज पार्टी अशा पक्षांना निर्णायकरीत्या नाकारलंय. पंतप्रधानपदाचं स्वप्न पाहणाऱ्या मायावतींना तर एकही खासदार निवडून आणता आलेला नाही. मराठय़ांभोवतीच आपलं राजकारण फिरवत ठेवणाऱ्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीलाही मतदारांनी दणका दिलाय. हे सर्व आपल्या निधर्मिकतेची पिप्पाणी जोरजोरात वाजवत होते. त्याखेरीज नव्या मतदारांचं लक्ष वेधून घेईल असं या पक्षांचं संचित नव्हतं. तेव्हा एका बाजूला धर्मनिरपेक्षी निष्क्रिय आणि दुसरीकडे धर्मसंबंध न नाकारणारा सक्रीय अशी निवड करायची वेळ आली तेव्हा जनतेने दुसरा पर्याय निवडला. यातून दिसली ती एकच बाब. ती म्हणजे एखादा देवळात जातो की मशिदीत, की कुठेच नाही- याच्याशी जनतेला काहीही देणंघेणं नाही. तो आपल्यासाठी काय करतो/ करू इच्छितो, एवढय़ा एकाच प्रश्नाचा विचार जनता यापुढे करेल आणि त्याच्या उत्तरावर जनतेचं मत अवलंबून राहील. ‘गर्वसे कहो..’च्या उन्मादात हा वर्ग कदाचित सामील होणार नाही. कारण आपल्या धर्मात गर्व करावं असं काही नाही आणि लाज बाळगावी असंही काही नाही, हे तो जाणतो. त्यामुळे नरेंद्र मोदींच्या गंगापूजनाचा जसा चॅनेलीय विद्वानांना धक्का बसला तसा या वर्गाला बसला नाही. नेत्याच्या विचारधारेत आपण वाहून जावं असं या वर्गाला वाटणार नाही.
हा मोठा बदल आहे आणि तो निश्चितच आवश्यक होता. बुद्धी आणि विचार खुंटीवर टांगून इतके दिवस चाललेलं भावनेचं राजकारण आता पुरे, असाच त्याचा अर्थ आहे. राजकारण्यांच्या खऱ्या-खोटय़ा विचारधारांची ओझी जनता यापुढे वाहायला तयार नाही. मोदी यांचीदेखील पारख होईल ती याच मुद्दय़ावर. संसद भवनात शिरताना मोदी विनम्र झाले, भावनावश झाले, त्यांनी ज्येष्ठांना कसं वंदन केलं, वगैरे सर्व मुद्दे हे उपकथानकाचाच भाग असतील. मुख्य कथा एकाच मुद्दय़ाभोवती फिरेल.. मोदी आपल्यासाठी काय करणार आहेत? त्यांचं मूल्यमापन होईल ते त्यांच्या कामगिरीवर. त्यांच्या झेंडय़ाचा रंग मूल्यमापनाच्या आड येणार नाही. तेव्हा मोदी यांच्या विजयगीतात सूर मिसळणाऱ्यांना याचं भान असायला हवं. त्यांना कळायला हवं.. संसद भवनातलं पुराणं गीत आता संपलंय.