मीना नाईक meenanaik.51@gmail.com

ज्येष्ठ अभिनेत्री रेखा कामत यांचे अलीकडेच निधन झाले. त्यांच्या धाकटय़ा बहिणीने जागवलेल्या त्यांच्या आठवणी..

book review cctvnchya gard chayet by geetesh gajanan shinde
आत्मशोधाच्या पदपथावरील कविता
documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
environment, elections, nations,
चारशे कोटी विसरभोळे?
peter higgs marathi articles loksatta,
पदार्थ विज्ञानातील जादूगार…

माझ्या सर्वात मोठय़ा दोन बहिणी- कुमुद आणि कुसुम सुखटणकर. त्यांना आम्ही भावंडं ‘ताई’ आणि ‘माई’ म्हणतो. ताईमध्ये (रेखा) आणि माझ्यात १८ वर्षांचं अंतर होतं. त्यामुळे ती मला माझ्या आईसारखीच होती. तिच्या दोन्ही मुलींमध्ये आणि माझ्यात फारसं वयाचं अंतर नसल्याने आमचे मैत्रिणीगत संबंध आहेत.

माझ्या दोन्ही बहिणींचा पहिला चित्रपट ‘लाखाची गोष्ट’! दोघी सख्ख्या बहिणी एकाच चित्रपटात नायिका म्हणून पदार्पण करणाऱ्या त्या बहुतेक पहिल्याच होत्या. हंसाबाई वाडकर यांच्या शिफारशीमुळे राजाभाऊ परांजपे यांनी त्यांना ‘लाखाची गोष्ट’ चित्रपटात भूमिका दिल्या. ‘लाखाची गोष्ट’ हा चित्रपट त्या काळात- म्हणजे १९५३ पूर्वी झालेल्या पौराणिक, ऐतिहासिक चित्रपटांपेक्षा खूप वेगळा होता. सामाजिक आशयाच्या या चित्रपटाचे पटकथा, संवादलेखन केलं होतं ग. दि. माडगूळकर यांनी, तर संगीतरचना केली होती सुधीर फडके यांनी. हे त्रिकूट एकत्र आलं ते याच चित्रपटामुळे. चित्रपटाच्या नायिकांची नावं कुमुद- कुसुम अशी जुनाट नसावीत म्हणून गदिमांनी त्यांचं रेखा आणि चित्रा असं नामकरण केलं.

‘लाखाची गोष्ट’ला भरपूर लोकप्रियता मिळाली. लागोपाठ तीन शोज् असे एक आठवडा रोज पाहणारे प्रेक्षक त्यावेळेस अनेक होते. प्रमोद नवलकर आणि पुरुषोत्तम बाळ हे त्यापैकीच. रेखाताईचं सात्विक, सोज्वळ रूप प्रेक्षकांना खूप भावायचं. तर चित्राताईचं नाकीडोळी नीटस, देखणं रूप लोकांना भुरळ घालायचं.

रेखाताईला वाचनाची प्रचंड आवड होती. अगदी शेवटपर्यंत तिचं वाचनवेड कधीच कमी झालं नाही. तिच्या लहानपणी सहजासहजी पुस्तकं उपलब्ध नसायची. तेव्हा शेजाऱ्यापाजाऱ्यांकडे पुस्तक मिळालं की ती वाचनात दंग व्हायची. वडील ऑफिसमधून आल्यानंतर घरात कुमुद नसली की त्यांचा रागाचा पारा चढायचा. छोटय़ा कुमुदने यासाठी खूप ओरडा खाल्ला आहे.

‘लाखाची गोष्ट’ला पटकथा-संवादलेखनात गदिमांबरोबर काम करणारे ग. रा. कामत यांचाही व्यासंग अफाट होता. इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषांमधलं त्यांचं वाचन अमर्याद होतं. ‘लाखाची गोष्ट’च्या वेळेस ग. रा. कामत भेटल्यावर वाचनप्रिय रेखाताई त्यांच्या प्रेमात पडली नसती तरच नवल! तिने राजाभाऊ परांजप्यांना ते सांगितलं. राजाभाऊंनी मध्यस्थी करून त्यांचं लग्न जुळवून दिलं. तिच्या लग्नात मी दीड वर्षांची होते. लग्नानंतरही रेखाताई मराठी चित्रपटांत नायिकेची भूमिका करतच होती. ‘गृहदेवता’ या चित्रपटात तिची दुहेरी भूमिका होती आणि त्यात एका भूमिकेसाठी तिने स्कर्ट-ब्लाऊज घातला होता. या चित्रपटाला नॅशनल अ‍ॅवार्ड मिळालं होतं.

तिच्या चित्रपटात काम करण्याला ग. रा. कामतांचा पूर्ण पािठबा होता. तोपर्यंत ग. रा. कामत हिंदूी चित्रपटांचं पटकथालेखन करायला लागले होते. देव आनंदच्या ‘काला पानी’चं लेखन त्यांचंच होतं. पण त्यांनी रेखाताईला स्पष्टपणे सांगितलं, ‘तुला मी माझ्या चित्रपटात काम देईन असं समजू नकोस. स्वत:च्या बायकोला प्रमोट करतोय असं लोकांनी म्हणता कामा नये.’ त्यामुळे रेखाताईने फक्त मराठी चित्रपटांमध्ये विविध भूमिका केल्या आणि त्या गाजल्याही.

लग्नानंतर १०-१२ वर्ष कामतांचं बिऱ्हाड पुण्यात होतं. आम्ही दर मे महिन्यात पुण्याला जायचो आणि भरपूर आंबे खायचो. त्यावेळेस कामतांकडे बा. सी. मर्ढेकर, पु. ल. देशपांडे, व्यंकटेश माडगूळकर, पु. भा. भावे, गंगाधर गाडगीळ, श्री. पु. भागवत अशी साहित्यिक मंडळी यायची आणि गप्पांचा फड जमायचा. या साहित्यिक गप्पांमधून रेखाताईची साहित्याची जाण वाढत होती. तिने स्वत: कधी साहित्यनिर्मिती केली नाही, पण साहित्यिक मूल्य ओळखण्याची तिची क्षमता होती. पुण्यात असताना कामत आणि रेखाताई खूप इंग्रजी चित्रपट पाहायचे. तिने अभिनयाचे धडे कधी कुणाकडे गिरवले नव्हते, पण या चित्रपटांतल्या दिग्गज कलाकारांचा अभिनय बघून बघून तो आत्मसात करण्याचा प्रयत्न ती करत असे.

याच सुमारास रेखाताई काही जुन्या नाटकांतून कामं करायला लागली होती. ‘सौभद्र’, ‘एकच प्याला’, ‘भावबंधन’, ‘पुण्यप्रभाव’, ‘बेबंदशाही’ या नाटकांचे प्रयोग असले की ती मुंबईला यायची. प्रयोग पोदार कॉलेज, किंग जॉर्ज हायस्कूलच्या सभागृहात व्हायचे. ती आली की मी तिची पाठ सोडत नसे. शांताबाई आपटे, बाबूराव पेंढारकर, चंद्रकांत गोखले यांना मी रंगमंचावर पाहिलं आहे. केशवराव दाते रेखाताईच्या ‘खडाष्टक’मधल्या रागिणीच्या भूमिकेसाठी तालमी घ्यायचे, तेही पाहिलं आहे. ती मुंबईला प्रचंड ऊर्जा, उत्साह घेऊन यायची. आम्हा भावंडांना खूप आनंद व्हायचा. त्या काळात पुण्यात मासे मिळत नसत. मग आई तिच्यासाठी खास मासे आणून ते व्यवस्थित पुण्याला जाईपर्यंत टिकतील असे बांधून देत असे.

माझ्यापेक्षा मोठे दोन भाऊ शिक्षणासाठी पुण्यामध्ये तिच्याकडे राहत होते. मीसुद्धा माझ्या १० वी- ११ वीच्या काळात तिच्याकडे मुंबईत राहत होते. तोपर्यंत ते मुंबईला राहायला आले होते. कामतांचं हिंदूी चित्रपटसृष्टीतलं काम वाढलं होतं. त्यात त्यांच्या कन्यारत्नाची- संजीवनीची भर पडली होती.

रेखाताई पु. ल. देशपांडय़ांच्या ‘तुझं आहे तुजपाशी’, ‘सुंदर मी होणार’ या वेगळ्या अभिनयशैलीच्या नाटकांमध्ये काम करत होती.. तेही सिनेकलावंतांच्या संचात. षण्मुखानंद सभागृहात त्यांचे हाऊसफुल्ल गर्दीत प्रयोग होत असत. अशा तऱ्हेने काही काळ रेखाताई रंगभूमीवर रमली होती.

याच सुमारास मधुसुदन कालेलकरांची काहीशी मेलोड्रॅमॅटिक वळणाची नाटकं कमालीची लोकप्रिय होत होती. त्यांच्या ‘दिवा जळू दे सारी रात’, ‘दिल्या घरी तू सुखी रहा’, ‘कल्पवृक्ष कन्येसाठी’ या नाटकांमध्ये रेखाताई प्रमुख भूमिकांमध्ये होती. या नाटकांचे महाराष्ट्रात हजारो प्रयोग झाले. त्यामुळे चित्रपटांपासून दुरावलेली रेखाताई नाटकांद्वारे पुन्हा एकदा लोकांसमोर आली. त्यातून तिला भरपूर पैसा आणि प्रसिद्धी दोन्ही मिळत होतं. पण तिला नावीन्याची ओढ होती.

साठचं दशक संपता संपता विजया मेहता ‘रंगायन’तर्फे काही एकांकिका दिग्दर्शित करत होत्या. महेश एलकुंचवार या नवोदित लेखकाच्या एकांकिका ‘सत्यकथे’त प्रसिद्ध होत होत्या. विजयाबाईंनी त्यातल्याच काही एकांकिका बसवायला घेतल्या. त्यातल्या ‘यातनाघर’मध्ये मी, रेखाताई आणि दिलीप कुलकर्णी होतो. ग्रँट रोडच्या टोपीवाला महापालिका शाळेत आमचे प्रयोग व्हायचे. तिने आणि मी एकत्र काम केलेले हे एकमेव नाटक. जुन्या पठडीतल्या आणि नंतर मेलोड्रॅमॅटिक नाटकांमध्ये हजारो प्रयोग करणाऱ्या रेखाताईने हेही आव्हान स्वीकारलं. व्यावसायिक नाटकांमध्ये भरपूर प्रेक्षकांसमोर अधिराज्य गाजवणाऱ्या रेखाताईने तितक्याच ताकदीने ‘रंगायन’च्या प्रायोगिक नाटकाला जेमतेम येणाऱ्या प्रेक्षकांसमोरही महत्त्वाची भूमिका साकारली होती. दिग्दर्शक होता अमोल पालेकर.

याच सुमारास तिने सई परांजपे यांनी रूपांतरित केलेल्या ‘बिकट वाट वहिवाट’ या नाटकात श्रीकांत मोघेंबरोबर काम केलं. ‘फिल्डर ऑन द रूफ’चा हा मराठी अवतार होता. दिग्दर्शिका सई परांजपेच होत्या. विजय बोंद्रे यांनी रूपांतरित केलेल्या ‘स्वप्नगाणे संपले’ या नाटकातही सतीश दुभाषींबरोबर तिची प्रमुख भूमिका होती. ‘डेथ ऑफ अ सेल्समन’ या आर्थर मिलरच्या प्रसिद्ध नाटकाचे बोंद्रे यांनी मराठीकरण आणि दिग्दर्शन केलं होतं.

यादरम्यान ‘कानेटकर युग’ सुरू झालं. ‘नाटय़संपदा’ आणि ‘चंद्रलेखा’ या संस्था प्रामुख्याने कानेटकरांची नाटकं करायच्या. त्यांच्या अनेक नाटकांत रेखाताईने विविध भूमिका केल्या. या नाटकांची भाषाशैली आणि अभिनयशैली वेगळ्या वळणाची होती. ‘प्रेमाच्या गावा जावे’सारख्या हलक्याफुलक्या नाटकातली तिची आजीची भूमिका लहानथोरांच्या मनामनांत रुजली. छोटी मुलं कधी थिएटरमध्ये, कधी बाहेर कुठेही भेटली की चॉकलेट घेऊन आजीला भेटायला यायची. रेखाताईला कुठल्याही मोठय़ा पुरस्कारापेक्षा हे बक्षीस जास्त मोठं वाटायचं.

संजीवनी आणि माधवी या दोन मुली आणि संसार सांभाळत रेखाताईची आगेकूच चालू होती. व्यावसायिक, प्रायोगिक नाटकांमधून आपलं स्थान तिने निर्माण केलं होतं. पण एका वेगळ्याच माध्यमाचा अनुभव घेण्याची तिला संधी मिळाली. ती होती जाहिरातींमध्ये काम करण्याची! तिने अनेक जाहिरातींमध्ये कामं केली. अगदी शाहरूख खान आणि आमीर खानबरोबरसुद्धा. तिची सोशीकता, संयम या वाढत्या वयातही तितकाच होता. ते पाहून शूटिंग संपल्यावर अक्षरश: त्यांनी तिला मिठी मारली.

९०च्या दशकात मराठी मालिका येत होत्या. ‘प्रपंच’ मालिकेत तिची आत्याची भूमिका अजूनही लोकांच्या स्मरणात आहे. रेखाताईकडे चित्रपटाचा अनुभव होता. पण मालिकांमधला अभिनय, तिथली लगबग, वेळेत एपिसोड शूट करायची धांदल या बदलत्या व्यवस्थेतही तिने स्वत:ला बिनतक्रार सामावून घेतलं. त्याबद्दल ती कधीही कुणाकडे कुरबुरसुद्धा करत नसे. ती पक्की प्रोफेशनल होती. सांगितलेल्या कॉल टाईमला हजर राहून आपली वेशभूषा, रंगभूषा करून ती तयार असायची. कधी कधी सबंध दिवस तिला बसवून शुटिंग संपताना तिचा शॉट घेतला जायचा. तरीही न कंटाळता आपलं काम ती चोख करायची. मला तर वाटतं, चित्रपटापेक्षा हे माध्यम तिला अधिक जवळचं वाटायचं. तिच्यामध्ये कामाचा उरक, चटपटीतपणा होता. त्यामुळे मालिकांचं झटपट होणारं शुटिंग चित्रपटाच्या रेंगाळणाऱ्या शुटिंगपेक्षा तिला सोपं वाटायचं.

तिच्या व्यावसायिक प्रामाणिकपणाचे अनेक अनुभव सांगता येतील. तिने कधीही कुठल्याच निर्मात्याला आपल्या घरगुती अडचणी सांगितल्या नाहीत. आणि घरच्यांनाही कामाच्या ठिकाणच्या गैरसोयींची तक्रार केली नाही. आमचे वडील गेले त्याच्या दुसऱ्याच दिवशी तिच्या ‘प्रेमाच्या गावा’चा प्रयोग होता. रात्रभर आईकडे बसून जागरण झाल्यावर सकाळी ती प्रयोगाला गेली. तिने कुणालाही याबद्दल काहीही सांगितलं नाही. मोहन वाघ चिंतेत होते.. प्रयोग रद्द करावा लागतोय की काय! प्रयोग सुरू झाला. पण एका ठिकाणी मानसिक अस्वस्थतेमुळे ती सुन्न झाली. तिला संवाद आठवेना. अरिवद देशपांडय़ांनी तिला सांभाळून घेतलं. पण िवगेत आल्यानंतर तिच्या दु:खाचा बांध फुटला आणि ती ढसाढसा रडली. त्यानंतर मात्र तिने प्रयोग व्यवस्थित पार पाडला.

एकदा तिची धाकटी मुलगी माधवी हिची एम. ए.ची परीक्षा होती. शेवटच्या दिवशी दोन पेपर होते. पहिल्या पेपरनंतर रेखाताई तिला जेवणाचा डबा घेऊन गेली. त्या दिवशी तिचा नाशिकला प्रयोग होता. डबा देऊन तिला सांगून रेखाताई प्रयोगाला निघून गेली. माधवीला तिच्या व्यावसायिक प्रामाणिकपणाची सवय होती. तिच्यावर काहीही परिणाम झाला नाही. ती विद्यापीठात प्रथम क्रमांकाने पास होऊन गोल्ड मेडल मिळवती झाली.

रेखाताईला जुनी गाणी, कविता तोंडपाठ असायच्या. ती उत्तम गायची. एकदा ‘पुण्यप्रभाव’ नाटकाचा प्रयोग होता. त्यात ती ‘किंकीणी’ साकारायची. किंकीणीला एक पद होतं. पण ते सहसा म्हणत नसत. त्या प्रयोगाला अनंत दामले ऊर्फ नूतन पेंढारकर आले होते. त्यांनी रेखाताईला विचारलं, ‘काय, आज पद घेणार का?’ ताई म्हणाली, ‘पाहिजे तर म्हणते.’ दामले म्हणाले, ‘म्हणा, म्हणा. मी ऑर्गनवर बसतो.’ आणि खरंच ते ऑर्गनवर बसले आणि तालमीशिवाय रेखाताईने ते पद सादर केलं.

सुमित्रा भावेंच्या ‘वास्तुपुरुष’मध्ये तिने एक भूमिका केली होती. त्यांचं ज्या वाडय़ात शुटिंग असायचं ती जागा हॉटेलपासून बरीच दूर होती. वाटेत ही कलाकार मंडळी गाण्याच्या भेंडय़ा खेळायची. रेखाताईकडे जुन्या गाण्यांचा भरपूर खजिना होता. तिला ती सगळी व्यवस्थित आठवायची. एरवी तिला अनेक गोष्टी आठवायच्या नाहीत, पण गडकऱ्यांची स्वगतं ती धडाधड म्हणून दाखवायची. मालिकेच्या शुटिंगच्या वेळेस पानभर संवाद दोनदा वाचून तिच्या बरोब्बर लक्षात राहायचे. तिच्या सहकलाकारांना याचं आश्चर्य वाटायचं.

ती अत्यंत साधी होती. फिक्या रंगाच्या सुती साडय़ा नेसायची. आपल्या श्रीमंतीचा देखावा करणं तिला कधीच जमलं नाही. तिची श्रीमंती तिची पुस्तकं आणि माणसं जमवण्यात आणि जोडण्यात होती. मेकअप तर सोडाच, पण साधी लिपस्टिकही तिने लावल्याचं मला आठवत नाही. ती जशी साधारण आयुष्यात वागत होती, तशीच आपल्या पडद्यावरच्या भूमिकाही ती साकारायची. ती आम्हाला जशी माया, प्रेम द्यायची, तशाच तिच्या भूमिकांमधून ते अभिनयांकित व्हायचं. वाचन आणि अभिनय याव्यतिरिक्त भरतकाम, क्रोशे विणकाम, शिवणकाम, पाककला यामध्येही ती निष्णात होती. ती उत्तम मांसाहारी जेवण करायची. ग. रा. कामत हे तेव्हा राज खोसलांच्या चित्रपटांचे पटकथालेखन करायचे. खास रेखाताईच्या हातचे मासे खायला ते वरचेवर कामतांकडे यायचे.

ती अत्यंत निगर्वी होती. एवढी मोठी नावाजलेली अभिनेत्री असूनसुद्धा तिचे कोळणी, भाजीवाले, छोटे-मोठे सहकलाकार, शिवाजी पार्कवर नियमित फिरायला येणारी मंडळी आणि घरातली नातवंडं यांच्याशी मैत्रीचे संबंध होते. तिचं कुणाशी भांडण झालंय, वादविवाद, वैचारिक संघर्ष हे तिच्या वागणुकीत मी कधीच पाहिलं नाही. एखाद्याची एखादी गोष्ट तिला आवडली नाही तर ती कधीही बोलत नसे. ती फक्त सहन करायची.

तिला आम्हा भावंडांचं आणि आमच्या मुलांचंही खूप कौतुक होतं. माझी मुलगी मनवा हिच्या पहिल्याच ‘पोरबाजार’ या चित्रपटाचा रिलीज होता, तेव्हा ती थिएटरमध्ये तिला भेटायला, शुभेच्छा द्यायला आली होती. आम्हाला कुणालाच जे जमलं नाही, ती निर्मिती करण्याची तिची धडाडी पाहून तिला अभिमान वाटायचा. शेवटच्या काही दिवसांत तिला बोलणंही कठीण होत होतं. तरी म्हणायची, ‘सगळे बरे आहेत ना! सुखी राहा. आनंदात राहा.’ तिच्या आयुष्याचा हाच मूलमंत्र होता. तो ती आम्हाला देऊन गेली.