प्रा. मं. गो. राजाध्यक्ष

या मुंबापुरीत दररोज हजारो लोक आपल्या भवितव्याची स्वप्ने बाळगून येत असतात. या महानगरात आपल्या रोजगाराची, पोटापाण्याची सोय होत असल्याने येथेच स्थायिक होतात. काही भाग्यवान जागा मिळवून राहतात, तर काहींना डोक्यावर छप्पर नसले तरी मिळेल त्या जागेचा आसरा घेऊन तिला आपल्या मालकीची बनवितात. देशाच्या कानाकोपऱ्यातून एखादी व्यक्ती मुंबईला येते तेव्हा ती प्रथम पोहोचते ती बोरीबंदर येथील ‘व्हिक्टोरिया टर्मिनस’ (आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) वर. या नगरीत आलेला नवागत या छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या वास्तूला डोळे भरून पाहून घेतो. तिच्या भव्यतेपुढे तो दिपून जातो. कदाचित तेच त्याचे पहिले व आत्मीयतेने केलेले निरीक्षण असते. कारण नंतर लक्षावधी मुंबईकरांप्रमाणे एकामागोमाग येणाऱ्या प्रवाशांनी तुडुंब भरलेल्या लोकलमधून उतरून घाईघाईने स्थानकाच्या बाहेर पडण्यासाठी तोही त्यात सामील झालेला असतो. मिनिटा मिनिटांवर आयुष्यक्रम आखलेल्या मुंबईकराला नंतर या वास्तूकडे मान उंचावून पाहायलाही वेळ नसतो. डोळय़ाला झापड लावलेल्या घोडय़ाप्रमाणे त्याचे धावणे होते. याच देखण्या स्थानकाला पूर्वी ‘मुंबईची म्हातारी’ असे संबोधत. पण मला ती नेहमीच एक लावण्यवतीच जाणवली- आसुसल्याप्रमाणे तिचे सौंदर्य न्याहाळावे अशी!

Puppy beaten, Pimpri,
Video : पिंपरीत श्वानाच्या पिल्लाला बेदम मारहाण; गुन्हा दाखल, मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल
raj kundra properties
ईडीकडून शिल्पा शेट्टीच्या पतीची संपत्ती जप्त; कथित ६६०० कोटींची बिटकॉइन फसवणूक काय?
Construction supervisor murder,
कोंढव्यात बांधकाम पर्यवेक्षकाचा चाकूने भोसकून खून; इमारतीवरून फेकून दिले
Smuggling liquor, Delhi to Mumbai, State Excise Department, Seizes 205 Bottles, Foreign Liquor, Arrests one man, crime, marathi news,
दिल्लीवरून मुंबईत मद्याची तस्करी

रोज तिकिटांसाठीही या स्थानकात प्रचंड रांगा लागलेल्या असतात. मग ती स्थानिक लोकलच्या प्रवासासाठी असो वा लांब पल्ल्याच्या गाडय़ांसाठी. पण अशाच एखाद्या क्षणी जर कोणी शेजारीच असलेल्या खांबावरील नक्षीकाम पाहिले तर आपली नजर आश्चर्याने थक्क होते. हळूहळू आपली नजर वरवर जाते. तेथील स्टार चेंबरच्या छतावरील नक्षीकाम पाहताना आपण ज्या कामासाठी आलो आहोत, त्याचा क्षणभर विसर पडतो. अशा प्रकारचे वास्तू शिल्पकलेचे नितांत सुंदर उदाहरण असलेले हे रेल्वे स्थानक केवळ या मुंबईचेच नव्हे, तर साऱ्या भारताचे भूषण ठरलेले आहे.

‘ग्रेट इंडियन पेनिन्सुला’ अथवा जी. आय. पी. या रेल्वे कंपनीच्या मुंबईच्या कार्यालयासाठी नवीन इमारत बांधायचे ठरले; तेव्हा जी. आय. पी. कंपनीने शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्याला त्यांचा वास्तुविशारद देण्याची विनंती केली. वास्तविक रेल्वे ही खासगी कंपनी असल्याने सरकारवर तशी बांधिलकी नव्हती. पण रेल्वे स्थानकाचे महत्त्व ओळखून बांधकाम खात्याने फ्रेड्रिक विल्यम स्टीव्हन्स या तरुण, कल्पक व तडफदार वास्तुविशारदाची सेवा रेल्वेला दिली. कारण सरकारी अधिकारीही कला संस्कृतीशी भावनिकरीत्या जुळलेले असण्याचा तो काळ होता. या वेळी स्टीव्हन्स केवळ तीस वर्षांचे होते. नुकतीच त्यांनी मुंबईची ‘सेलर होम’ (आताचे पोलीस मुख्यालय) ही इमारत बांधून पूर्ण केली होती, त्यामुळे स्टीव्हन्स हे प्रसिद्धीच्या वलयात आले होते. मूळ मुंबादेवी मंदिराच्या जागेवर व फणशी तलावाजवळ या नवीन रेल्वे स्थानकाची रचना करण्याचे काम स्टीव्हन्सना आव्हानात्मक नक्कीच होते. त्या काळातील वास्तुशास्त्रात एक भव्यदिव्य विक्रम करण्याची संधी त्यांच्यापुढे चालून आली होती. तिचा त्यांनी पुरेपूर उपयोग केला नसता तर नवलच!

१८७६ मध्ये स्टीव्हन्सनी या वास्तूच्या आराखडय़ांना आरंभ केला. हे संकल्पन करताना त्यांनी गॉथिक – सार्सेनिक वास्तुशैलीचा मोठय़ा कल्पकतेने वापर केला. भव्य अशा त्या वास्तूची अलंकारिक अशी सौंदर्यस्थळे आपल्या मनात कल्पून त्यानुसार संपूर्ण आराखडा बनविणे हे केवळ अशा कल्पक व सृजनशील वास्तुविशारदाचेच काम होते. आणि ते शिवधनुष्य स्टीव्हन्स यांनी लीलया पेलले. १८७७ मध्ये या वास्तूच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली व एका दशकात म्हणजे १८८७ मध्ये ही इमारत बांधून पूर्ण झाली. त्या काळात ब्रिटिशांची वास्तुरचनेबाबत काही ठाम मते होती. देशाच्या विविध भागांत वेगवेगळय़ा वास्तुशैलींचा वापर त्यांच्याकडून केला जात असे. कोलकात्याला क्लासिकल, मुंबईला गॉथिक, मद्रासला सॉरसेनिक व बाकी हिंदूस्थानभर इंग्लिश कॉटेजिस लादण्यात येत असत. स्वत: स्टीव्हन्स हे पुनरुज्जीवित गॉथिक शैलीचे पुरस्कर्ते होते. त्यांनी पौर्वात्य वास्तुशैलीचा युरोपियन शैलीशी सुंदर मिलाफ केला व या वास्तूचे काम मोठय़ा कौश्यल्यपूर्णरीत्या केले. पाहताक्षणी नजरेचे पारणे फेडील अशी वास्तू त्यांनी उभारली. इमारतीच्या बांधकामातही उच्च प्रतीचे मार्बल, नक्षीदार टाइल्स, रंगीत दगड, खिडक्यांसाठी स्टेनग्लासेस यांची जणू मुक्तहस्ते उधळणच केली होती. या इमारतीच्या मध्यभागी मोठा घुमट असून चोहोबाजूंनी वर निमुळते होत जाणारे मनोरे उभारले आहेत. भारतात त्या काळी प्रथमच खालून कोणताही आधार न देता अशा प्रकारचा घुमट बनविला, जो त्या इमारतीला एखाद्या मुकुटाप्रमाणे दिसतो. त्यामुळे ही इमारत पाहणाऱ्याच्या मनात एकदम भरते. दुसरे म्हणजे या इमारतींसमोरील प्रचंड अशी मोकळी जागा हीदेखील या इमारतीचे सौंदर्य नजरेत साठविण्यात मदत करते. हे भाग्य अन्य कोणत्याही इमारतीच्या वाटय़ाला आले नाही. इमारतीच्या घुमटावर ‘प्रोग्रेस’ हे प्रगतीचे प्रतीक असलेली भव्य अशी शिल्पाकृती आहे. साडेसोळा फूट उंचीच्या या प्रगती देवतेच्या उजव्या हातात मशाल असून, तिने आपला डावा हात गतिशील चक्रावर ठेवला आहे. रेल्वे ही जणू प्रगतीचे चिन्हच आहे हे दर्शविण्यासाठी या शिल्पाकृतीची निर्मिती करण्यात आली होती.

याशिवाय इमारतीच्या दर्शनी भागावर जे घडय़ाळ दिसते, त्याखाली राणी व्हिक्टोरियाचा उभा पुतळा बसविण्यात आला होता. मात्र स्वातंत्र्यानंतर परकीय खुणा असू नयेत या भावनेने त्याला तेथून हलविण्यात आले. अद्याप तेथील मोकळी जागा ओकीबोकी दिसते अन् तेथील खुणा दर्शवीत असते. त्याखालच्या भागात जी शिल्पे केली आहेत, ती तंत्रज्ञान, शास्त्र, व्यापार तसेच कृषी या विषयावर आधारित आहेत. प्रवेशद्वारावरील फाटकाच्या खांबावर एका बाजूला इंग्लंडचे प्रतीक म्हणून राजेशाही सिंहाचा पुतळा असून, डावीकडे भारताचे प्रतीक म्हणून बंगालचा वाघ दाखविण्यात आला आहे. यातील प्रत्येक गोष्ट ही अर्थपूर्ण असून ही सर्व शिल्पे थॉमस अर्प या ब्रिटिश शिल्पकाराने बनवली आहेत. त्यासाठी खास भारतामधून पोरबंदर सॅंड स्टोन इंग्लंडला नेण्यात आला होता. इमारतीच्या एका भागावर जी.आय.पी. कंपनीच्या दहा संचालकांचे चेहरे उठाव शिल्प रूपात बद्ध केले आहेत. त्यामध्ये सर जमशेटजी जीजीभाई व जगन्नाथ शंकरशेठ हे दोन भारतीय संचालक आजही तेथे दिसतात. याशिवाय अवाढव्य अशा या इमारतीवर अगणित अशी शिल्पे, सुबक नक्षीकाम आहे की, ज्याची नोंदही करणे केवळ अशक्य आहे. याचबरोबर अलंकारिक असे लोह व पितळी धातूंचे कठडे हेही जागोजागी दिसून येतात व या सौंदर्यात भर घालतात. यातील प्रत्येक गोष्ट ही अभ्यासपूर्ण आहे.

या ऐतिहासिक इमारतीचे संकल्पन करताना स्टीव्हन्स यांनी इतक्या बारकाईने विचार केला होता की, इमारतीच्या दर्शनी भागावर तसेच खांबांच्या तळभागावर मानव, पशू, पक्षी, पाने, फुले याच्या अलंकारिक आकारांचे देखणे खोदकाम केले आहे. त्याचेही सविस्तर आराखडे स्टीव्हन्सनी तयार केले होते. तसेच इमारतीच्या सौंदर्याला जराही बाधा येऊ नये याची पूर्ण खबरदारी घेतली होती. अगदी पाणी बाहेर फेकणारे पाइपसुद्धा बाहेरून दिसू नयेत म्हणून त्यांना गॉथिक गॉरगाईल्स (काल्पनिक पशू ) यांचा वापर केला आहे. या स्थानकाच्या सौंदर्यात ते अधिकच भर घालतात आणि हे सर्व करायला त्यांनी मदत घेतली ती स्थानकासमोरीलच जगप्रसिद्ध सर जे.जे.स्कूल ऑफ आर्टच्या वास्तुशास्त्र-शिल्प विभागाचे प्रमुख जॉन लॉकवूड किपिलग यांची. १८६५ मध्ये लॉकवूड किपिलग जेव्हा स्कूल ऑफ आर्टमध्ये रुजू झाले, तेव्हा त्यांनी भारतीय समाजजीवन आपल्या कलेद्वारे चांगलेच आविष्कृत केले. आल्या आल्या त्यांना क्रॉफर्ड (आताची महात्मा फुले मंडई) मार्केटच्या प्रवेशद्वाराची उठाव शिल्पे अन् आतील कारंजा तयार करण्याचे काम मिळाले.

स्टीव्हन्स यांना ही वास्तू पूर्ण करण्यास दहा वर्षे लागली. प्रथम बोरीबंदर असे नाव असलेल्या या स्थानकाचे १८८७ साली महाराणी व्हिक्टोरियाच्या सुवर्ण जयंतीनिमित्त ‘व्हिक्टोरिया टर्मिनस’ असे नामकरण करण्यात आले. पुढे १९९६ मध्ये या स्थानकाचे नाव ‘छत्रपती शिवाजी टर्मिनस’ करण्यात आले व पुन्हा २०१७ साली ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’ असा नामविस्तार करण्यात आला. असे एकंदर चार वेळा या ऐतिहासिक वास्तूचे नामकरण करण्यात आले आहे. या वास्तूच्या रूपाने ब्रिटिशांनी भारताला दिलेला हा एक अमूल्य ठेवा समजला जातो. अशा या भव्य इमारतीच्या घुमटावरील प्रगती देवाच्या शिल्पावर पन्नासएक वर्षांपूर्वी वीज पडली व तिचे मस्तक आणि उजवा हात भंग पावला. त्याची दुरुस्ती करून पुन्हा पूर्ववत करण्यासाठी इंग्लंडला नेण्याचा विचार झाला. त्यासाठी भारतातून पोरबंदर स्टोन नेण्याचेही ठरले, पण ते अतिशय खर्चीक होत होते. ज्या जे.जे.स्कूल ऑफ आर्टचा या वास्तूच्या उभारणीत मौलिक हातभार लाभला होता, त्याच आर्ट स्कूलने ही समस्या सोडविली. तुटलेले मस्तक व हात आर्ट स्कूलच्या शिल्पकला विभागात आणण्यात आले. विभागप्रमुख प्रा. मांजरेकर यांनी विद्यार्थी व कारागीरांच्या मदतीने ते यशस्वीरीत्या पूर्ण केले व क्रेनच्या साहाय्याने ते वर चढवून मूळ जागेवर बेमालूमरीत्या बसविण्यात आले. ते बसवण्यासाठी अ‍ॅराल्डाइट अ‍ॅडेसिव्हचा वापर करण्यात आला. पुढे अ‍ॅराल्डाइटने आपल्या उत्पादनाच्या जाहिरातीसाठी या घटनेचा वापरही केला.

वास्तू शिल्पकलेचे एक सुंदर उदाहरण म्हणून ख्याती पावलेल्या या इमारतीचे ताजमहालखालोखाल पर्यटकांकडून छायाचित्रण करण्यात आले आहे. या वास्तूच्या निर्मितीने एफ. डब्ल्यू. स्टीव्हन्स यांची ख्याती सर्वत्र झाली. या वास्तुरचनेचे जे स्वप्न त्यांनी पाहिले होते, ते साकारण्यात जे.जे.स्कूल ऑफ आर्टच्या कला विद्यार्थ्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. या यशाने स्टीव्हन्स यांना स्वतंत्रपणे काम करण्याची जिद्द निर्माण होऊन त्यांनी १८८४ मध्ये स्वतंत्रपणे काम करण्यास आरंभ केला. यानंतर त्यांना मुंबई महापालिकेच्या इमारतीचे संकल्पन करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. वास्तविक या कामासाठी त्या काळातील जॉन विरेट, जॉन बेग व किसहोम यांनी इंडो- सार्सेनिक शैलीत वास्तू संकल्पना सादर केल्या होत्या. पण गॉथिक शैलीचा ठाम पगडा तसेच व्हिक्टोरिया टर्मिनस हे भव्य स्थानक संकल्पित केलेल्या व गॉथिक शैली गाजवणाऱ्या स्टीव्हन्स यांच्या नावलौकिकामुळे त्यांच्याकडे म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या इमारतीचे काम सोपविण्यात आले. स्टीव्हन्स यांच्या यशाची ही पावतीच होती. समोरासमोरच या दोन इमारती डौलाने उभ्या राहिल्या.

ही वास्तू निर्माण करून प्रसिद्ध पावलेल्या स्टीव्हन्सनी पुढे फोर्ट भागांतील अनेक इमारती उभारल्या. त्यांचे शेवटचे काम हे चार्टर्ड बॅंकेच्या इमारतीचे होते. असा हा मुंबईच्या वैभवात भर घालणारा थोर वास्तुविशारद मलेरियाच्या आजाराने ५ मार्च १९०० रोजी कालवश झाला. शिवडी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आज जरी ते देहाने आपल्यात नसले तरी त्यांच्या कलाविष्कारामुळे ते कायमचे प्रत्येक मुंबईकराशी तादात्म्य पावले आहेत.

अशा या आपादमस्तक नक्षीदार कोरीव कामाचे अलंकार लेवून १३५ वर्षे अभिमानाने उभ्या असलेल्या या लावण्यलतिकेला युनेस्कोच्या जागतिक ऐतिहासिक वारसा समितीने ‘जागतिक ऐतिहासिक वारसा वास्तू’ म्हणून खास दर्जा देऊन मध्य रेल्वेच्या मुख्यालयाला जागतिक दर्जावर नेले, हे प्रत्येक भारतीयाला खचितच गौरवास्पद आहे. मी तेथे बसविलेल्या प्लाकचे छायाचित्र घेण्यास गेलो, तेव्हा माझ्या नजरेस पडले की, एका िभतीवर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या एका कामगाराने आजूबाजूला कसेतरी सिमेंट फासून बसविल्याप्रमाणे सदर वारसा मिळालेली प्लाक बसवली आहे. त्याला ना होती कलात्मक जागा, ना कलात्मक चौकट, ना त्यामागे होती सौंदर्यदृष्टी! अजूनही वाटते की, या इमारतीचे अविभाज्य अंग असलेल्या महाराणी व्हिक्टोरिया राणीचा भव्य पुतळा जो या संपूर्ण इमारतीच्या शिल्परचनेसोबत जाणारे शिल्प होते, ते या इमारतीचाच एक भाग होते- ते तेथून निखळून काढल्यामुळे दर्शनी भागावरील ही जागा ओकीबोकी दिसते. नाहीतरी आज संपूर्ण बॅलार्ड इस्टेट ही ब्रिटिशांचीच देणगी आहे. आपले राष्ट्रपती भवन, पार्लमेंट हाऊस, रिझव्‍‌र्ह बॅंक या सर्वच इमारती काही ब्रिटिश वास्तुविशारदांच्या सृजनशीलतेचा आविष्कार म्हणूनच आपणास मिळाल्या आहेत. तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही इमारतदेखील आपल्या गौरवाचे स्थान आहे. आणि गंमत म्हणजे आज हा राणीचा पुतळा सध्या कोठे आहे याचाही थांगपत्ता कोणाला नाही. त्याचबरोबर  या इमारतीमध्ये एफ. डब्ल्यू. स्टीव्हन्स यांचाही कलाकार या नात्याने अर्धपुतळा उभारला तर ते यथोचित होईल. भावी पिढय़ांना अभिमानास्पद वाटेल अशा रीतीने हा वारसा जपणे हे आपणा सर्वाचेच कर्तव्य आहे.

rajapost@gmail.com

(समाप्त)