एक्सप्लोर 

विशी.. तिशी.. चाळिशी..

(संग्रहित छायाचित्र)

डॉ. आशुतोष जावडेकर

आज माणसांचं आयुष्य एवढय़ा झपाटय़ानं बदलतंय, की दर पाच वर्षांनी एक पिढी इतिहासजमा होते आहे. त्यामुळे पिढय़ांतील अंतर (जनरेशन गॅप) दिवसेंदिवस वाढते आहे. साहजिकच त्यांची मनोवृत्ती, धारणा आणि दृष्टिकोन यांच्यात अंतराय निर्माण होत आहे. या विसंवादाकडे हसतखेळत पाहणारं सदर..

‘तेजस, तुझी कॉफी आता गारढोण, शिळी, दोन दिवसांची जुनी झालीय,’’ असं जोराने ओरडत तेजसची बायको वैतागून घराबाहेर कामांना पडली, तरी तेजसचं लक्ष काही तिकडे गेलं नाही. तो एव्हाना चौदा वर्षांचा सऱ्हाईत नवरा असल्याने, एकीकडे मोदी, राहुल गांधी किंवा ट्रम्प वगैरे ‘लोकसत्ता’च्या अ‍ॅपवर वाचताना बायकोला गोड आवाजात ‘‘बाय हनी’’ म्हणतो. पण आज मात्र त्याला काही उत्तर देता येऊ नये, इतका तो व्हाट्सअ‍ॅपवर गर्क झालेला. समोरून अरिन चॅटवर जे सांगत होता ते भलतंच रोचक होतं. म्हणे, बहुधा त्यांच्या ग्रुपचं काहीतरी पेपरमध्ये छापून आलं होतं. त्यांचा ग्रुप म्हणजे तेजस, अरीन आणि माहीचा! ते फेसबुकवर केव्हा भेटलेले आणि कधी त्या तिघांचा मस्त, वेगळा आणि घट्ट ग्रुप व्हाट्सअ‍ॅपवर बनला, हे त्यांनाही आता पटकन नीटसं आठवत नसे. पण फार जुना नव्हताच.

मागच्या वर्षी अरीनने एद शीरानच्या एका गाण्यावर भारावून जात एक हॅपनिंग पोस्ट फेसबुकवर टाकली होती. त्यावर माहीने तिच्या नेहमीच्या शास्त्रीय संगीताच्या प्रेमाला जागत- ज्याला तेजस ‘दुराभिमान’ म्हणत असे- त्या गाण्यात मध्यम कसा तीव्र आहे वगैरे लिहिलं होतं आणि अरिनने त्या कॉमेंटला नुसतं सभ्यपणे लाइक केलं, तरी तेजसने मात्र त्याखाली तोंड वेंगाडणाऱ्या पाच स्माइली टाकल्या होत्या! ‘शेप ऑफ यू’सारख्या हॉट गाण्यात तीव्र-मध्यम वगैरे धाटणीचं विश्लेषण त्याला अशक्य विनोदी वाटलं होतं. त्याची अपेक्षा होती की, ही कोण माही नावाची मुलगी आहे ती आता भडकून त्याच्यावर पलटवार करेल. पण कसलं काय, उलट तिचीही एक स्माइली खाली खिदळत पडली. तेव्हाच त्याला ती आवडली. अरीनला त्याने इनबॉक्स केलेला की, ही कोण मुलगी आहे वगैरे. तर ती काही अरीनच्या कॉलेजची नव्हती आणि मुळात कॉलेजवयीनदेखील नव्हती. ती बहुधा तीस वर्षांची आहे, असं अरीनने तेजसला सांगितलेलं.

मग पुढे एकदा एका दुसऱ्याच व्हाट्सअ‍ॅप ग्रुपच्या वास्तव जगातल्या गेटटुगेदरला ते तिघे पहिल्यांदा समक्ष अचानक भेटलेले आणि त्यांच्याही नकळत त्यांना कळलं असावं, की वयं निराळी असली, व्यवसाय वेगळे असले, जगणंच वेगळं असलं आणि मूळ गावंही त्यांची वेगळी असली, तरी त्यांचं जमणार होतच एकमेकांशी! त्यांची मत्री होणार होतीच जणू पूर्वसंचितासारखी. नुकताच चाळिसावा वाढदिवस तेजसने साजरा केला. तेव्हा पार्टीतही सगळ्यांच्या ध्यानी आलं की, ‘तेजसदा’- ‘तेजसदा’ असं सारखं म्हणणारा तो कुणी विशीचा पोरगा आणि जिला तेजसने केक कापल्यावर स्वत: भरवला ती कुणी त्याची नवी तरुण मत्रीण हे दोघे त्याचे नवे ‘बेस्टी’ आहेत. त्याच्या समवयस्क मित्रांनी नंतर त्याला विचारलंच की, ‘‘साल्या तेज्या, सुबोध भावेच्या त्या सीरियलची इन्स्पिरेशन घेऊन तरुण मत्रिणीवर लाइन टाकलीय का?’’ तर तो फक्त हसला. लाइन टाकली होतीच त्याने, पण दोस्तांना वाटली तशी नव्हे. त्याने पिढीचं अंतर ओलांडत आपली रेष जरा वाकवत, जुळवत विस्तारली होती!

‘दा आणि माही, ऐका..’ अरीन टाइप करू लागला. तोवर त्याने माहीलाही तातडीने ग्रुपवर ऑनलाइन येण्यासाठी पाचारण केलं होतं. एक तर एवढय़ा सकाळी अरीन कधी हाय-हॅलो करत नसेच. दोघांना काही कळेना. अरीननं वाघाच्या गतीनं टाईप करत लिहिलं- ‘आपल्या ग्रुपचं नाव आणि आपले डिटेल्स हॅक झालेत मोस्टली. आज पेपरमध्ये आपल्या ग्रुपचं नाव आलंय!’ माहीने सुस्कारा सोडत लिहिलं, ‘कुल अरी! अरे काय हायपर होतो आहेस. अजून कालची सॅटर्डे पार्टीची तुझी व्हिस्की किंवा व्होडका किंवा कोकम सरबत उतरलं नाहीये का?’ मग तेजसही खिदळला. शेवटी वैतागून अरीनने स्क्रीनशॉट टाकला- जो त्याला त्याच्या मित्राने पाठवला होता. वर्तमानपत्रात रविवार पुरवणीत नवं सदर सुरू होत होतं. तिघांनी त्या ताज्या सदराच्या मजकुरावर चिंतन केलं. लेखकाने त्यात लिहिलं होतं- ‘लग्न, मत्री, प्रणय, ग्रुप्स, खरेदी, कपडे, संगीत, लेखन ते राजकारण- भारतातली विशीची पिढी अगदी मोकळं जगू पाहते आहे. तिशीतले युवक रॅटरेसमध्येही जिगरीने आहेत आणि नुसतं सेव्हिंग न करता जगभर बीएनबीवर भटकत आहेत. आणि चाळिशीच्या आसपासचे पोक्त होण्याऐवजी उलट फिरून विशीची मोकळीक मिळवू पाहताहेत.’ अरीन म्हणाला, ‘इथपर्यंत ठीक आहे रे तेजसदा, पण हा डायलॉग बघ! हे वाक्य असंच्या असं मी तुला परवा चॅटवर म्हणालो होतो. ते तसंच्या तसं या सदरात आलंय!’

माहीने नेहमीच्या काळजीपूर्वकतेने ते दोन्ही तपासलं, तर खरंच डिट्टो होतं ते. परवाच अरीनने ग्रुपवर लिहिलेलं- ‘तेजसदा, तू ना एक्सप्लोर करायला हवंस अजून.’

तेजस म्हणालेला, ‘काय एक्सप्लोर करू ? म्हणजे माहीसारखे म्युच्युअल फंड्स? का गाणी? का राजकीय लेख? का पोरांचा होमवर्क?’

त्यावर तो डोळा मारत हसत म्हणाला की, ‘हे तर करच, पण आधी बेडवरचं लव्ह-मेकिंगही एक्सप्लोर कर रे बिनधास्त! फार साधा आहेस तू!’ आणि मग खिदळत माही आणि अरीनने स्माइलींची झड चॅटवर लावली होती.

तेच वाक्य तसंच सदरात लिहून वर हा लेखक म्हणत होता : ‘सर्वच आघाडय़ांवर ‘एक्सप्लोर’ करायच्या शक्यता दुणावल्या आहेत आणि त्यासाठी धाडस हवं. पण म्हणून सगळं आलबेल आहे का? अर्थात नाही.. निरंतर सिगारेट, ड्रिंक्स.. अमली पदार्थ.. प्रॅक्टिकल प्रेम म्हटलं तरी मग नराश्य.. काऊंसेलरची भरलेली क्लिनिक.. जीवघेणी स्पर्धा. .मधेच कधी हरवल्यासारखं वाटणं.. किती बदलत चाललंय जग! हे बदल काही फक्त शहरी नाहीत. खेडय़ातही हेच बदल दिसत आहेत. तर, या सदरात आहेत एक विशीचा चंट तरुण, तिशीची नवतरुणी आणि चाळिशीचा बाप्या. ते शिकत जातात एकमेकांकडून एकमेकांच्या पिढीविषयी आणि जगण्याविषयी.. आणि मग पन्नास- साठ- सत्तर वयाची पिढीही त्या गप्पांत कधी पालक म्हणून, कधी आजी-आजोबा बनून अवतरतेच.. आणि मग वयातीत असं काही मधेच मिळूनही जातं सगळ्यांना.’

तिघे हे वाचून थांबले. शंभर टक्के हा त्यांचाच ग्रुप. मग एकदम तेजसला आठवलं, की मधे एकदा त्याने खाली कॉलनीच्या बागेत पोराला फिरवताना रेळेकाकांना या ग्रुपविषयी सांगितलं होत. रेळेकाका त्याच वर्तमानपत्रात काम करतात! कळलं लिकेज! त्याने ते ग्रुपवर सांगितलं तसं अरिन टाइपला- ‘चक्! तू ना दा!’ आणि त्याने वळवलेल्या मुठीचं चिन्ह टाकलं. एक क्षण शांतता पसरली तेव्हा तिघांना वाटलं की, आता काय करायचं! पण तेजस विचार करून म्हणाला, ‘मी रेळेकाकांना गप्पांमध्ये ते एक्सप्लोरचं वाक्य आणि आपल्या ग्रुपचं फक्त नाव सांगितलेलं. बाकी काही नाही. काही खरं होणार नाही. बघू पुढे.’ तोवर माही ग्रुपवर ऑडिओ मेसेज पाठवत म्हणाली, ‘‘चिल यार! हू नोज, आपल्यालाही आपल्या काही प्रश्नांची उत्तरं इथे या सदरात मिळून जायची! फक्त गाईज, आपल्या ग्रुपचं नाव असं पेपरात बघताना मला तरी भारी वाटतंय. आणि मी या क्षणी तुम्हा दोघांना मिस करते आहे!’’ ते ऐकून अरिन हसत म्हणाला ‘‘चक्!’’

.. आणि तेजसने खुशीत गार कॉफी व समोर पडलेला पेपर उचलला, तेव्हा पुरवणीमध्ये त्यांच्या ग्रुपचं आणि सदराचं नाव होतं : ‘वीस-तीस-चाळीस’! आणि जणू वाचकांना ते विचारत होतं की, काय काय बरं एक्सप्लोर करायचं राहिलंय तुमचं? प्रेम? शिक्षण? खेळ? गाणं? – करा मंडळींनो! मनाला सांगा, तुझं वय वीस-तीस-चाळीस आणि शोधा! उशीर नावाची गोष्ट आपण नुसते बसलेलो असतो तोवरच जिवंत असते!

ashudentist@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Vishi tishi chalishe article by dr ashutosh javadekar

ताज्या बातम्या