|| सुहास जोशी
‘द्रव्यवती’- फक्त पावसाळ्यात वाहणारी नदी. कधीकाळी जयपूरच्या बाहेरून वाहणारी. शहराच्या विस्तारात नदी शहराच्या मध्यावर आली आणि तिचा नाला झाला. ‘अमिनाशाह नाला.’ पावसाळ्याच्या चार महिन्यांत वीस-बावीस दिवस पाऊस पडायचा, नदी वाहायची. उरलेल्या दिवसातदेखील नदी वाहायची, पण ती सांडपाण्याची. पुढे पुढे अतिक्रमण फोफावले, नाल्याची दुर्गंधी आणखीनच वाढू लागली, नाल्याचे पात्रदेखील आक्रसून गेले. अशात जे व्हायचे तेच झाले, १९८१ साली महामूर पाऊस आला. रौद्ररूप धारण केलेल्या नदीने शहराला तडाखे द्यायला सुरुवात केली. अतिक्रमणांनी आणखीनच अडचण वाढली. नदी शहरात प्रवेश करते त्याच्या थोडे पुढेच एका बाजूला सैन्याची वसाहत होती. तेथे पाणी शिरण्याचा धोका वाढू लागला. त्या ठिकाणी १८६० मध्ये रामसागर धरण बांधले होते. स्फोट करून ते तोडण्याचा निर्णय घेतला. पण पुरापासून कसलाच धडा घेतला नाही.
अतिक्रमणं आणखीनच फोफावू लागली, नदी जवळपास नामशेषच झाली. शहराबाहेर आणखीन १५ किमीचा प्रवास करून द्रव्यवतीचा हा नाला धुंद नदीत जाऊन मिळतो. या ठिकाणी याच नाल्याच्या पाण्यावर भाजीपाला केला जायचा. प्रदूषित पाण्यावर होणारा हा भाजीपाला जयपूर शहरातच विकला जायचा. शेवटी त्याचा फटका बसलाच. सुमारे सहा वर्षांपूर्वी साथीच्या रोगाने थैमान घातले. प्रकरण कोर्टात गेले. मग जयपूर शहर प्राधिकरण जागे झाले.
सुरुवात झाली ती सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावण्यापासून. ‘टाटा प्रोजेक्ट्स’ने यामध्ये पुढाकार घेतला. या प्रकल्पाचा संपूर्ण आराखडा मांडला. देशात असे काही प्रारूप नव्हतेच. अहमदाबादला साबरमतीच्या ११ किमी. पट्टय़ाचे काम झाले होते. पण तेथील परिस्थिती वेगळी आणि द्रव्यवतीची परिस्थिती वेगळी. द्रव्यवती नदी पात्राच्या बाजूने जागा तुलनेने कमीच होती. अतिक्रमणे हटवण्याचे काम मोठे होते. स्थानिक प्रशासनाची मदत मिळत गेली. प्रकल्पाची सुरुवात झाली तीच मुळात शंभर वर्षांतील सर्वाधिक पूर रेषेपर्यंतच्या भागाची बांधबंदिस्ती करून. त्यानंतर सांडपाणी अजिबात येणार नाही याचा चोख बंदोबस्त केला. पूर आलाच तर पाणी वाहून जाण्यासाठी योग्य व्यवस्था हवी. त्यातच पाणी साचून राहिले तर अरुंद पात्राचा धोका होताच, त्यामुळे पात्रात सिमेंट काँक्रिटचा वापर करावा लागल्याचे प्रकल्प अधिकारी सांगतात. दर पंचवीस मीटरवर पाणी मुरावे यासाठी मातीचा भाग तसाच ठेवला. दर शंभर मीटरला सहा मीटर जागा मोकळी ठेवली. तेथे चेक डॅम बांधले, पात्रातील खोली आणि उंचीचा ताळमेळ घातला. पात्राच्या दोन्ही बाजू बंदिस्त केल्या. थोडक्यात कालव्याचे स्वरूप आले. त्याच्या वरील बाजूस सर्वाधिक पूरपातळी रेषेपर्यंत मातीचा भाग आणि पुढे दहा-पंधरा फुटांचे बंदिस्त कुंपण.
काँक्रिट वापरण्यावर आक्षेप अनेकांचे आहेत, नदीला बंदिस्त करू नये हादेखील मुद्दा आहेच. पण शहरातल्या नदीचं काय करायचं, याचं उत्तर कठीणच. नाल्याने केलेले उत्पातदेखील तेवढेच मोठे होते. शांघाय शहरातील शांघाय नदीचा प्रकल्प असाच मार्गी लागला होता. टाटा प्रोजेक्ट्सने सुरुवातीच्या टप्प्यात त्यांच्याशी सल्लामसलतदेखील केली होती.
येथे महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला होता तो सांडपाण्यामुळे. त्यामुळे तब्बल १७० दशलक्ष लिटर पाणी दिवसाला प्रक्रिया करण्याची क्षमता असणारी यंत्रणा तीन टप्प्यांत उभी केली. नदी पात्रात थेट सांडपाणी जाणार नाही याची दक्षता घेतली. जे काही पाणी जाईल ते सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून सोडल्यावरच. नदीची संपूर्ण लांबी किती तर तब्बल ४७ किमी. सुरुवातीला नदीची रुंदी केवळ १५० फूट, मधल्या टप्प्यात २१० फूट तर अखेरीस ४५० फुटांपर्यंत पोहोचली. शेवटच्या १२ किमीचा भाग शहराबाहरेचा. तेथे पात्र ५०० फुटांपर्यंत विस्तारलेले. तेथे केवळ दोन्ही बाजूने बंदिस्ती आणि पात्रात मात्र केवळ माती आणि दगडगोटे.
पाहता पाहता या सर्व परिसराचे रूपडेच बदलत गेले. नदीच्या दोन्ही बाजूने कालव्याच्या वरच्या भागात दोन्ही बाजूस सायकल आणि चालण्यासाठी विशेष सुविधा तयार केली. अमिनाशाह दग्र्याच्या जवळ तयार झालेल्या पाणथळ जागेचे रूपांतर बर्ड पार्कमध्ये, शहराच्या मध्यभागी किनाऱ्यावर लॅण्डस्केप गार्डन आणि शेवटच्या टप्प्यात एक लाख वनस्पतींचे बॉटनिकल गार्डन. या बॉटनिकल गार्डनमध्ये तब्बल १४५० प्रजातींची झाडे. अगदी वाळवंटात वाढणारी झाडेदेखील लावली. लॅण्डस्केप गार्डनमुळे तेथील परिसरच बदलला. कधीकाळी येथील जुनं घर विकताना मालकाच्या नाकीनऊ यायचे, तेथेच त्याला या बदलामुळे आठ लाख रुपये अधिक भाव मिळाला. ‘द्रव्यवती रिव्हर फेसिंग’ या नावाने तर अपार्टमेंटचा नवीन प्रकल्पच येथे आला. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पूर्ण क्षमतेने काम करू लागले. दिवसाला तब्बल १७० दशलक्ष लिटर सांडपाणी, म्हणजेच जयपूर शहरातील सुमारे साठ टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया होऊ लागली. अधिकारी सांगतात की प्रक्रिया केलेल्या सांडपाण्यावर टर्शरी ही प्रगत प्रक्रिया केली तर हेच पाणी पिण्यासाठीदेखील योग्य ठरेल.
तब्बल १६७६ कोटींचा हा संपूर्ण प्रकल्प. महत्त्वाचे म्हणजे यामध्ये पुढील दहा वर्षांची देखभाल- दुरुस्तीदेखील टाटा प्रकल्पाकडेच राहणार आहे. त्यामुळे द्रव्यवतीच्या भाग्यरेखेचे हे बदल टिकवून ठेवण्याचे आणि त्याच्या भल्याबुऱ्याची सारी जबाबदारी त्यांचीच असणार.
भारतातील पहिलं वॉटर म्युझिअम
नदीचा सुरुवातीचा पाचएक किमीचा जंगलातील भाग संपल्यावर शहराच्या जवळच १८६० मध्ये रामसागर धरण बांधण्यात आले, जे १९८१ च्या पुराच्या वेळी फोडण्यात आले होते. तो सारा मलबा काढताना मोठाच खजिना हाती लागला. १८९१ सालातील जयपूरला पाणीपुरवठा करणारी यंत्रणाच त्या चिखलात दबली होती. वाफेवर चालणारा पंप आणि वाफ तयार करण्यासाठी बॉयलर सापडले. दोन्ही यंत्रे बऱ्यापैकी सुस्थितीत होती, मग ती जागा तशीच राखायचे ठरले. पंप आणि बॉयलर दोन्हीची स्वच्छता करून चकाचक करण्यात आले आणि तयार झालं ‘भारतातलं पहिलं वॉटर म्युझिअम’. आजही या दोन्ही यंत्रांवरील ‘‘London & Erith 1891’ असा लोगो स्पष्टपणे वाचता येतो. सोबत त्या काळात वापरली जाणारी अवजारं तसेच कूपनलिका खोदणारी यंत्रदेखील आहे. आज बॉयरल रूमचं कॅफेमध्ये रूपांतर झालंय. महत्त्वाचं म्हणजे हे सर्व प्रकल्पाच्या मूळ खर्चात नसलेले, पण सापडलेला ठेवा जोपासायचा या उद्देशाने हे म्युझिअम जन्माला आलं.
suhas.joshi@expressindia.com