|| पराग कुलकर्णी
गेल्या रविवारी आपण नऋत्य मोसमी वारे- अर्थातच मान्सून कुठून येतो आणि कसा येतो ते पाहिले. त्याचबरोबर मान्सूनवर परिणाम करणारा एक घटक- ‘इंडियन ओशन डायपोल’ काय आहे आणि त्याचा मान्सूनवर कसा परिणाम होतो हेही बघितले. आज आपण असाच एक दुसरा घटक- खरं तर घटना बघणार आहोत- जी केवळ भारतातील मान्सूनवरच नाही, तर जागतिक हवामानावरही परिणाम करते; ज्याबद्दल आपण दरवर्षी ऐकत असतो : एल-निनो!
एल-निनोचं नाटय़ घडते जगातील सर्वात मोठय़ा महासागरात- म्हणजेच ऑस्ट्रेलियाच्या पूर्वेकडे आणि दक्षिण अमेरिकेच्या (पेरू, इक्वेडोर या देशांच्या) पश्चिमेकडे पसरलेल्या अथांग प्रशांत महासागरात. सतराव्या शतकात मच्छिमारांना दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्याजवळ सागराच्या पाण्याचे तापमान वाढलेले जाणवले. तो महिना होता डिसेंबरचा. म्हणजे येशूच्या जन्माचा! त्यावरून या उष्ण पाण्याच्या प्रवाहाला नाव पडले ‘एल-निनो.’ ज्याचा अर्थ स्पॅनिश भाषेत- लहान मुलगा, दैवी मुलगा (येशू) असा होतो. याच्या उलट जेव्हा परिस्थिती निर्माण होते- म्हणजे सागराच्या पाण्याचे तापमान नेहमीपेक्षा कमी होते, त्याला ‘ला-नीना’ (लहान मुलगी) असे म्हणतात. पण हे एल-निनो आणि ला-नीना कसे काम करतात हे पाहण्याआधी हे दोघेही नसताना सामान्य परिस्थितीत काय होते, हे आधी पाहावं लागेल.
तर सामान्यपणे व्यापारी वारे (Trade Winds) हे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात. या वाऱ्यांमुळे प्रशांत महासागरातील उष्ण पाणी पश्चिमेकडे- म्हणजे आशिया खंडाकडे नेले जाते. या उष्ण प्रवाहामुळे या भागातले तापमान वाढून हवा विरळ होते आणि त्यातील बाष्पामुळे त्यातून ढग तयार होतात व त्या भागात- ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया- चांगला पाऊस पडतो. याचाच एक दुसरा आणि उलट परिणाम पेरू, इक्वेडोर या देशांवर दिसून येतो. कोरडय़ा वाऱ्यांमुळे इकडे पाऊस पडत नाही आणि त्यांना दुष्काळाचा सामना करावा लागू शकतो. पण याचबरोबर महासागरातील गरम पाण्याची जागा तळातील थंड पाण्याने घेतली जाते; ज्यामुळे त्या भागात माशांचे प्रमाण वाढून मासेमारीसाठी चांगली परिस्थिती निर्माण होते.
तर आता एल-निनोमध्ये काय होते ते बघू या. एल-निनोमध्ये या व्यापारी वाऱ्यांचा जोर कमी होतो. त्यामुळे सामान्यपणे जे उष्ण पाणी पश्चिमेकडे जाते, ते न जाता प्रशांत महासागराच्या पूर्वेलाच राहते. त्यामुळे पेरू, इक्वेडोरच्या जवळपासचे पाण्याचे तापमान वाढते. यातून ढग तयार होऊन या भागात जास्त पाऊस पडतो. वर पाहिल्याप्रमाणे याच्या उलट परिणाम दुसऱ्या टोकाला- म्हणजे ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया या आशियामधल्या देशांवर होतो. तिकडे पावसाचे प्रमाण कमी होते आणि दुष्काळाची शक्यता निर्माण होते.
जर कमी शक्तीचे व्यापारी वारे आणि प्रशांत महासागराच्या पूर्वेला वाढलेलं तापमान- म्हणजे एल-निनो आहे हे समजलं की याच्या उलट परिस्थिती- म्हणजेच ला-नीना! ला-नीनात व्यापारी वाऱ्यांचा जोर खूप जास्त असतो आणि त्यामुळे उष्ण पाण्याला ते जास्त दूपर्यंत वाहून नेऊ शकतात. याचा परिणाम अर्थातच प्रशांत महासागरातील पूर्वेकडच्या पाण्यावर होतो; ज्याचे तापमान कमी राहते. परिणामी ऑस्ट्रेलियामध्ये खूप जास्त पाऊस आणि दक्षिण अमेरिकेत दुष्काळी स्थिती निर्माण होते. जी आपण सामान्य अवस्था बघितली, त्याचेच तीव्र रूप आपल्याला ला-नीनामध्ये दिसते.
प्रशांत महासागर हा जगातला सर्वात मोठा महासागर आहे. त्यामुळे इथे घडणाऱ्या या गोष्टी- जसे की वाऱ्यांचा जोर, त्यांच्या दिशा आणि कमी-अधिक होणारे तापमान यांचा परिणाम सगळ्या जगावर होतो.
पण एल-निनोचा आपल्या मान्सूनशी कसा काय संबंध येतो? याचे उत्तर आहे- आपण मागच्या लेखात बघितलेल्या मान्सूनच्या गावाशी आणि तिथे निर्माण होणाऱ्या मास्केरेन हायशी! एल-निनोमध्ये व्यापारी वारे कमी तीव्रतेने वाहत असतात. त्याचा परिणाम मास्केरेन हायच्या दाबावर होतो. मास्केरेन हायचा दाब कमी झाला की मान्सूनची तीव्रताही कमी होते. कारण मान्सूनचे वारे जास्त दाबाकडून (मास्केरेन हाय) कमी दाबाकडे (भारताचा भूभाग) वाहतात. अशाच प्रकारे ला-नीनामध्ये व्यापारी वाऱ्यांचा प्रभाव जास्त असतो; ज्यामुळे मास्केरेन हायचा दाब वाढण्यास साहाय्य होते. त्यामुळे मान्सूनला पुढे ढकलण्यास मदत होते आणि आपल्याकडे चांगला पाऊस पडतो. थोडक्यात, एल-निनोमुळे भारतात कमी पाऊस पडू शकतो, तर ला-नीनामुळे जास्त!
अर्थात या शक्यता असतात. एल-निनो असतो तेव्हा भारतावर त्याचा परिणाम होतोच असे नाही. पण जेव्हा भारतात दुष्काळी स्थिती असते तेव्हा एल-निनोही सक्रिय असतो असे आढळून आले आहे. त्यामुळेच इतर घटकांसोबत भारतीय मान्सूनवर परिणाम करणारा एल-निनो हा एक महत्त्वाचा घटक आहे.
कोरिऑलिस इफेक्ट, मास्केरेन हाय, इंडियन ओशन डायपोल, एल-निनो आणि ला-नीना या सगळ्या गोष्टी आपल्या पावसावर कसा परिणाम करतात हे आपण बघितले. आपल्या रोजच्या जगण्यात पुढे ही नावे लक्षात राहतील- न राहतील, त्यामागचे विज्ञान लक्षात राहील- न राहील; पण जेव्हा आपण अशा गोष्टी समजावून घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा लक्षात राहते- सोप्या तत्त्वांवर चालणारा निसर्ग आणि त्याच्या गुंतागुंतीच्या आणि एकमेकांवर अवलंबून असलेल्या भव्य व्यवस्था! या व्यवस्था आणि हा निसर्ग आपल्या उपभोगासाठी नाही, तर या व्यवस्था आणि निसर्गामुळेच आपलं अस्तित्व आहे, हे एकदा आपण लक्षात ठेवले की येणाऱ्या पावसाच्या पाण्याला ‘कोठून आलास?’ असे विचारणारे आपण ‘का रे, कुठे चालैलास?’ असे विचारून त्याला साठवून ठेवण्याचा प्रयत्न करू शकू. नाही का?
parag2211@gmail.com