|| अतुल देऊळगावकर

जागतिक हवामानबदलाचे दुष्परिणाम दुष्काळ, तापमानवाढ, वणवे, महापूर अशा नानाविध स्वरूपात सबंध जग भोगते आहे. तरीही देशोदेशीचे सत्ताधीश शहामृगी वृत्तीने त्याकडे डोळेझाक करीत आहेत. याविरोधात आता लहानग्यांनीच दंड थोपटले आहेत. हवामानबदलाविरोधातील जागतिक लढय़ात जगभरातील मुले सहभागी होत आहेत.. पाच जून या पर्यावरणदिनाच्या निमित्ताने या लढय़ाचा साद्यंत धांडोळा..

कुठल्याही काळातील आजी-आजोबा आपल्या नातवंडांच्या काळजीने कळवळत असतात. सत्यजित राय यांच्या ‘शाखा प्रशाखा’ चित्रपटात लहानगा नातू आजोबांशी गप्पा मारताना सांगून जातो.. ‘‘मला पाढे, एबीसीडी सगळं येतं. इतकंच काय, मला ना पांढरा पसा आणि काळा पसा कुठे ठेवतात, हेसुद्धा समजतं.’’ आयुष्यभर मूल्ये जपलेल्या आपल्याच घरातील मुले भ्रष्ट व अनीतीच्या मार्गाने जात आहेत, हे समजून आल्यावर वृद्ध आजोबा सुन्न होतात. हृदयविकाराच्या झटक्यातून बरे होणारे आजोबा (म्हणजे राय स्वत:!) मूल्यऱ्हास झालेल्या काळात नातवंडांचे काय होईल, या चिंतेने ग्रासून जातात. (१९९० साली राय यांना सभोवताल पाहून असे ‘भविष्य’ दिसले होते. मग पुढील पिढीला सांगण्यासारखे आपल्याकडे काय असेल?)

या चित्रपटाच्या दोन वर्षे आधी- १९८८ साली ‘नासा’मधील प्रमुख हवामानशास्त्रज्ञ डॉ. जेम्स हॅन्सेन यांनी अमेरिकी सिनेटसमोर जागतिक उष्मावाढ होत असल्याचे शपथपूर्वक निवेदन (टेस्टिमोनी) केले होते. ‘आधुनिक हवामानशास्त्राचे पितामह’ असे संबोधन लाभलेल्या हॅन्सेन यांना वाढते कर्ब उत्सर्जन आणि तापमानवाढ यांचा जीवसृष्टीवर होत असलेला परिणाम स्पष्टपणे जाणवला होता. त्यांच्या निवेदनामुळे संपूर्ण जग हादरून गेले. १९९२ मध्ये रियो येथील जागतिक हवामान परिषद व त्यानंतरच्या सर्व परिषदांवर हॅन्सेन यांचा प्रभाव थेट जाणवतो. हॅन्सेन यांनी ‘जगातील हवेत कर्ब वायूंची संहती ३५० पार्ट्स पर मिलियनपर्यंत आणून तापमानवाढ १.५ अंश सेल्सियसपर्यंत रोखले तरच पृथ्वीला कडेलोटापासून वाचवता येऊ शकेल,’ हा सिद्धांत मांडला होता. संपूर्ण जगाने त्याला स्वीकारले आहे. तेव्हापासून ‘१.५ अंश सेल्सियस’ हेच जागतिक चच्रेच्या केंद्रस्थानी आहे. सध्या ४१० असलेल्या कर्ब संहतीला ३५० पर्यंत आणण्याकरिता जगभर आटोकाट प्रयत्न चालू आहेत. डॉ. हॅन्सेन म्हणजे कर्ब उत्सर्जनामुळे काळवंडलेल्या जगाची सफाई मोहीम! ७८ वर्षांच्या या झुंजार वैज्ञानिकाचा कर्बविरोधी लढा २९ वर्षांपासून अनेक दिशांनी चालूच आहे. ‘अवघे जग हे कडेलोटाच्या बिंदूपाशी आले आहे. यापुढे कर्ब उत्सर्जन व तापमान वाढू न देणे हाच एकमेव उपाय आहे,’ याचे भान हॅन्सेन सतत आणून देत आहेत. त्याचवेळी ते जगातील अग्रगण्य प्रदूषक असलेल्या अमेरिकेतील (स्वदेशी) कोळशाच्या खाणींच्या विरोधात निदर्शने करून तुरुंगवासही सहन करीत असतात. अमेरिकेतील एकंदरीत वीज उत्पादनापकी ४० टक्के वीज कोळशापासून तयार केली जाते. कोळसा जाळण्यामुळे होणारे प्रदूषण हे सर्वाधिक असल्यामुळे हॅन्सेन हे त्याचे कडवे विरोधक आहेत. ‘अमेरिकेतील कोळशाच्या खाणींचे मालक राजकीय नेते असल्यामुळे त्याविषयी तेलाएवढी ओरड होत नाही,’ असे हॅन्सेन नेहमी सांगतात.

पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे कल्पनातीत हवामान, चक्रीवादळे व वणवे यांना सामोरे जाण्याची वेळ आपल्या नातवंडांच्या पिढीवर येणार आहे, या कल्पनेने हॅन्सेन हे व्याकूळ झाले होते. त्यांनी २००९ साली ‘स्टॉम्र्स ऑफ माय ग्रँड चिल्ड्रेन : द ट्रथ अबाऊट द किमग क्लायमेट कॅटास्ट्रोफ अ‍ॅण्ड अवर लास्ट चान्स टू सेव्ह ह्य़ुमॅनिटी’ हे पुस्तक लिहून काढले. सतत एकच ध्यास घेतलेल्या व्यक्ती घरीदारी नेहमी तोच विषय बोलत असतात. सत्यजित राय यांनी चित्रपटात दाखवलेल्या काळात आधीच्या पिढीची मूल्ये नाकारताना वरकरणी का असेना, किमान लज्जा दिसत असे. आता तर उदारता आणि मूल्ये मानणाऱ्यांना स्वत:च्या घरातच बहिष्कृत व्हावे लागते. अशा उफराटय़ा कौटुंबिक पर्यावरणात आजोबांना त्यांची मुले व नातवंडे मिळून ‘पुरे करा आता समाजासाठी जगणे’ असा स्वकेंद्री बाणा शिकवतात. परंतु हॅन्सेन यांची नात सोफी किव्हलीहॅन हिने खेळण्या-बागडण्याच्या वयात आजोबांच्या संघर्षांत उडी घेतली. तिने आणि केल्सी कॅस्कॅडिया रोज ज्युलियाना या १६ वर्षांच्या मुलीने ८ ते ११ वयोगटातील २१ मित्र-मत्रिणींना साथीला घेऊन ‘हवामानबदलासाठी’ त्यांच्याच अमेरिकी सरकारला न्यायालयात खेचले! पालकांच्या पिढीला अजिबात सुचली नाही अशी धडाडी बालकांनी दाखवली. २०१५ मध्ये ओरेगॉनच्या जिल्हा न्यायालयात या मुलांनी- ‘अमेरिकी सरकारने कोळसा खाणी व तेल या जीवाश्म इंधनांना मुक्त वाव दिला. त्यामुळे कर्ब उत्सर्जन वाढून हवामानबदलास हातभार लागला. शासनाची ही धोरणे पुढील पिढय़ांचे भविष्य धोक्यात आणत आहेत. ही घटनेने दिलेल्या जीवनाच्या हक्काची पायमल्ली आहे,’ असे सांगून आपल्या देशाचे तत्कालिन अध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांच्या विविध खात्यांनी अधिकाराचा गरवापर केल्याचा आणि तेल-कोळसा कंपन्यांनी नफ्यासाठी प्रदूषण वाढवत नेल्याचा आरोप ठेवला. त्यांच्या खटल्याला ‘अवर चिल्ड्रेन्स ट्रस्ट’ या सेवाभावी संस्थेने पाठिंबा दिला आणि खुद्द डॉ. हॅन्सेन हे ‘पुढील पिढय़ांचे पालक’ या नात्याने या खटल्यात सहभागी झाले.

सद्धांतिक पातळीवर कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ हे राष्ट्रीय धोरण ठरवत असतात; न्यायालय नव्हे. आधी ओबामा व नंतर ट्रम्प- अशा दोन्ही सरकारांनी ‘हवामानबदलाविषयीची चर्चा ही संसदेत होऊ शकते, न्यायालयात नाही,’ असा युक्तिवाद केला. त्यावर फिर्यादींनी ‘स्वच्छ पर्यावरण हा जनतेचा हक्क नाही काय?,’ असा मूलभूत सवाल केला. २०१६ च्या प्राथमिक सुनावणीत न्यायाधीश थॉमस कॉफिन म्हणाले, ‘प्रदूषणमुक्त पर्यावरण हा हक्क काही घटनेने दिलेला नाही. त्यामुळे हवामानबदलाविषयी भाष्य करण्यास न्यायालयीन यंत्रणा हे काही योग्य स्थान नाही. तरीदेखील हा खटला अभूतपूर्व असून गुणवत्तेच्या निकषावर तो चालू राहणे आवश्यक आहे.’

२०१७ ला डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यावर काही महिन्यांतच कोळसा व तेल उद्योगांनी आरोपपत्रातून त्यांची नावे वगळण्याची व खटला खारीज करण्याची विनंती केली. राजकीय व कॉर्पोरेट क्षेत्रातील धुरंधरांनी ‘पोरांच्या खटल्या’ला संपवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. एकंदरीत मागील चार वर्षांत या खटल्याने बरेच चढउतार पाहिले. ‘पणती व तूफान’ दंतकथा वाटावी अशी ही लढाई होती. अखेर २०१८ च्या नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने ‘ज्युलियाना विरुद्ध अमेरिका’ हा दिवाणी दावा चालू ठेवण्याचे आदेश दिले. त्यावेळी न्यायालयाबाहेर खटल्याच्या समर्थनार्थ हजारो मुले जमली होती. यंदा www.joinjuliana.org हे संकेतस्थळ सुरू करून ‘अधिकाधिक तरुणांनी हवामानबदलविरोधी मोहिमेला पाठिंबा द्यावा,’ असे आवाहन मुलांनी केले. आठवडाभरात ३२ हजार तरुणांनी त्यास पाठिंबा जाहीर केला. कायदेतज्ज्ञ, शास्त्रज्ञ, प्राध्यापक, पर्यावरणतज्ज्ञ, महिला संघटना व धार्मिक संस्था यादेखील मुलांनी दाखल केलेल्या या ऐतिहासिक खटल्याच्या बाजूने उभ्या राहिल्या. याचा निकाल काय लागेल, हे काही सांगता येत नाही. डॉ. हॅन्सेन म्हणतात, ‘आम्ही लवकरात लवकर खटला जिंकणे आवश्यक आहे. परंतु आमचा पराभव झाला तर आम्ही नव्याने आणखी दमदार खटला दाखल करू.’

शाळकरी मुले व तरुण हवामानबदलाच्या लढय़ात उतरल्यामुळे त्यांना जगभरातून पाठिंबा वाढू लागला. तर जगातील समस्त प्रसारमाध्यमांनी ‘ज्युलियाना विरुद्ध अमेरिका’ खटल्यावर गौरवाचा वर्षांव केला. या बातम्यांचा मुलांवर खोलवर प्रभाव पडू लागला. ओरेगॉनपासून सात हजार कि.मी. अंतरावरील स्वीडनमधील एक शालेय बालिका नवा इतिहास घडवत होती.

स्वीडनमधील नवव्या इयत्तेतील मुलगी ग्रेटा थनबर्ग ही हवामानबदलाच्या बातम्या ऐकून अस्वस्थ होत असे. तिने तिसरीत- म्हणजे वयाच्या आठव्या वर्षी ‘हवामानबदल’ हा शब्द ऐकला आणि ती त्याच्या खोलात जाऊ लागली. ग्रेटाच्या शाळेत पर्यावरणाची हानी, हवामान- बदलामुळे होणारे भयंकर परिणाम यांविषयी माहिती दिली जायची, वृत्तपट दाखवले जायचे. त्याचवेळी जगभर होणाऱ्या घडामोडी जाणून घेत असताना संवेदनशील ग्रेटा दु:खी होत असे. परंतु त्याबद्दल ती कोणाशीही बोलत नसे. तिचे हे अबोलपण वाढतच गेले. अकराव्या वर्षी तिचे जेवण कमी झाले. ती बाहेर पडेनाशी झाली. तिचे घरातल्यांशिवाय इतरांशी बोलणे जवळपास बंद झाले. डॉक्टरांनी ‘विषण्णावस्थेमुळे स्वमग्नता’ (सिलेक्टिव्ह ऑटिझम) असे निदान केले. परिस्थिती भीषण आहे हे पाहून गप्प व स्वस्थ बसायचे की निषेध व्यक्त करायचा, याचा तिने निर्णय केला आणि जाहीर बोलण्यास आरंभ केला. सुरुवात अर्थात घरापासूनच! कार्बनच्या पाऊलखुणा जाणणाऱ्या ग्रेटाने तिचे वडील (विख्यात अभिनेते) स्वान्त आणि आई (प्रसिद्ध नृत्यांगना) मलेना यांना शाकाहारी होण्यास प्रवृत्त केले. दोघांना विमानप्रवास बंद करायला लावला. या छोटय़ा मुलीने आई-वडिलांना उच्चभ्रू, उधळ्या जीवनशैलीकडून साधेपणाकडे नेले. २०१७ च्या ऑक्टोबर महिन्यात स्वीडनच्या जंगलात भयानक वणवा पेटला, तर २०१८ साली युरोपभर उष्णतेची लाट पसरली. हे पाहून तिने २० ऑगस्ट २०१८ रोजी ‘पर्यावरणासाठी विद्यालय बंद’ असा फलक रंगवला, शाळेत रजा टाकली आणि स्वीडनच्या संसदीय अधिवेशनाबाहेर ती ठाण मांडून बसली. तिच्या पालकांनी तिला या कृतीपासून परावृत्त करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

तिच्यासोबत कुणीही मित्र-मत्रिणी आले नाहीत. तरीही तिचा निर्धार ढळला नाही. संसदीय सदस्यांचे लक्ष वेधण्याकरिता ग्रेटा सकाळी ८.३० ते दुपारी ३ पर्यंत फलक घेऊन एकटीच बसून राहिली. दुसऱ्या दिवशीपासून मात्र तिच्याभोवती लोक जमा होऊ लागले. ग्रेटा बोलू लागली : ‘हवामान- बदलाविषयी सगळेच बोलतात. कृती कोणीच करीत नाही. निदान आपल्या देशाने (स्वीडन) पॅरिस करारानुसार कर्ब उत्सर्जन कमी करणे आवश्यक आहे.’ तेवढय़ात स्वीडनच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा झाली. तिला  लोकांसमोर भाषण करण्याचा आग्रह चालू झाला. पण ग्रेटाच्या पालकांना तिच्या तब्येतीची काळजी वाटत होती. ती मात्र तिच्या निर्णयाशी ठाम होती. ‘हवामानाकरिता जनयात्रा’समोर (पीपल्स क्लायमेट मार्च) ग्रेटाचे अतिशय छोटे, पण प्रभावी व्याख्यान झाले. ‘याचा जास्तीत जास्त प्रसार करून अधिकाधिक लोकांपर्यंत हा संदेश पोहोचवा..’ या तिच्या आवाहनामुळे त्याची दृक्मुद्रणे समाजमाध्यमांतून सर्वदूर पोहोचली आणि या निरागस व कळकळीच्या आवाहनाने संपूर्ण जगाला भुरळ घातली. निवडणुकीनंतरही दर शुक्रवारी ग्रेटा लोकांना हवामान- बदलाविरोधात कृतिशील होण्याचे आवाहन करू लागली. तिच्या बातम्या जगभर जात राहिल्या आणि तिला ओसंडून पाठिंबा मिळू लागला. ग्रेटा नामक बालिकेचे हवामानबदलाविषयीचे विचार ऐकण्यासाठी तिला जगभरातून आमंत्रणे येऊ लागली आणि तिच्या अंगी सात हत्तींचे बळ आले. पाहता पाहता नोबेलविजेते वैज्ञानिक, अर्थशास्त्रज्ञ, जागतिक पातळीवरील पर्यावरण संघटना व संस्था ग्रेटाच्या पाठीशी उभ्या राहिल्या. एरवी भल्या भल्या शास्त्रज्ञ व पंडितांना न मोजणारे राजकीय नेते या बालिकेला आदराने ऐकू लागले. ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस, युरोपियन युनियनमधील सर्व राष्ट्रप्रमुख, उच्चपदस्थ नोकरशहा, उद्योगपती, वैज्ञानिक व पत्रकार तिची आवर्जून भेट घेऊ लागले. या सर्वाशी नम्रतापूर्वक, पण ठामपणे ग्रेटा संवाद साधू लागली.

ग्रेटाने ब्रुसेल्समधील युरोपीय संसदेबाहेर झालेल्या निदर्शनात व्याख्यान दिले. ‘एक्स्टिन्क्शन रिबेलियन’ या आंतरराष्ट्रीय संघटनेचा ‘बंडखोरांचा जाहीरनामा’ प्रसारित करताना लंडनमध्ये ग्रेटा म्हणाली, ‘संपूर्ण मानवजात अभूतपूर्व संकटाला सामोरे जात असताना आपले नेते अतिशय बालिश वर्तन करीत आहेत. आपण जागे होऊन र्सवकष बदल घडवणे अनिवार्य आहे.’ तिच्या वाणीचा प्रभाव झपाटय़ाने वाढत गेला. ब्रिटनच्या हाऊस ऑफ पार्लमेंटमध्ये सर्व खासदारांना संबोधित करण्यासाठी तिला पाचारण केले गेले. ग्रेटाचे संपूर्ण भाषण बीबीसीपासून अनेक वाहिन्या व वृत्तपत्रांनी ठळकपणे प्रसिद्ध केले. ती म्हणाली, ‘मी ग्रेटा थनबर्ग! मी १६ वर्षांची असून, पुढील पिढय़ांच्या वतीने आपल्याशी संवाद साधत आहे. आपण म्हणता, आम्ही लहान आहोत. परंतु आम्ही हवामानाचे शास्त्र जे सांगत आहे त्याचीच उजळणी करीत आहोत. आम्ही वेळ वाया घालवतो याची तुम्हाला काळजी वाटत आहे. पण तुम्ही विज्ञानाचा संदेश ऐकून आमचे हिरावलेले भविष्य परत मिळवून द्याल, त्याक्षणी आम्ही शाळेत परत जाऊ. याचसाठी हा अट्टहास आहे. हे अती आहे काय? तुमच्या मुला-नातवंडांप्रमाणे २०३० साली मीदेखील ३० वर्षांची होईन. हे वय फारच महत्त्वाचे असते असे तुम्ही आम्हाला सांगता. पण आमच्यासाठी ते तसे असेल का, हे काही मला सांगता येत नाही. ‘मोठी स्वप्ने बघा’ असे आम्हाला लहानपणी सांगितले गेले. तुम्ही आम्हाला खोटी आशा दाखवली, आमच्याशी खोटे बोलत आलात. आमचे भवितव्य अंध:कारमय आहे याची जाणीवच आमच्यापकी कित्येकांना नाही. जगाची कधीही भरून न निघणारी हानी घडविणाऱ्या घटनांची साखळी २०३० पासून सुरू होईल. हा संहार होऊ द्यायचा नसेल तर आतापासूनच तातडीने कर्ब उत्सर्जन निम्म्यावर आणण्यासाठी कृती निकडीची आहे. हवेचे प्रदूषण, तापमानवाढ व आपत्ती यासंबंधीची आय.पी.सी.सी. (इंटर गव्हर्नमेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज)ची आकडेवारी अनेक छुप्या संभाव्यतांचा विचार करू शकत नाही, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. थोडक्यात, आपण कडेलोटाकडे जात आहोत, अशी ही आणीबाणी आहे. मी बोलतेय ते आपल्याला ऐकू येतेय ना?

हवामान संकट म्हटले की सगळे जण कर्ब उत्सर्जनात कपात इथे येऊन थांबतात. तापमानवाढ १.५ अंश सेल्सियसपर्यंत रोखायची असेल तर तात्काळ कर्ब उत्सर्जन थांबवून शून्यावर आणणे आवश्यकच आहे. ‘कमी करणे’ हाच उपाय असल्याच्या गरसमजुतीतून सर्व व्यवहार आहेत तसेच चालू आहेत. ब्रिटनमध्ये तेल व कोळशासाठी मोठे नियोजन व आखणी चालू असणे हा शुद्ध असमंजसपणा आहे. मानवी इतिहासात या वर्तनाची अतिशय बेजबाबदार अशीच नोंद होईल. आम्हाला बरेच जण विचारतात, ‘हवामान संकटावर तुमच्याकडे रामबाण उपाय आहे काय?’ तो कसा असेल? अखिल मानवजातीसमोरील ‘न भूतो, न भविष्यती’ अशा ऐतिहासिक संकटावरील इलाज आमच्याकडे किंवा कुणाकडे कसा असेल? आम्हाला वाटते, विज्ञानाकडेच याची उत्तरे आहेत. विज्ञान केव्हापासून कर्ब उत्सर्जन रोखण्याचा आग्रह धरत आहे. आपण सगळे जण एकत्रितपणे विज्ञानाच्या दिशेने जाऊ या. परंतु तुम्ही ते ऐकले नाही व वेळेवर कृती केली नाही. तुम्हाला संकटाची व्याप्ती माहीत नाही व माहिती करून घ्यायचीही नाही. तुम्हाला कोणतेच बदल न घडवता सारे काही तसेच ठेवायचे होते. आता परिस्थिती हाताबाहेर गेली, नाकातोंडात पाणी गेल्यावर हालचालही जिवाच्या आकांतानेच करावी लागेल. काळाच्या कसोटीच्या प्रसंगी पूर्णपणे वेगळा विचार करणे गरजेचे आहे. तुम्हा प्रौढांना जागे करण्यासाठी आम्ही हा खटाटोप करीत आहोत. तुमचे मतभेद विसरून तुम्ही कृती केली पाहिजे. आम्हा मुलांना आमची आशा व स्वप्ने परत हवी आहेत, म्हणून आम्हाला हे करावे लागत आहे. मी बोलतेय ते आपल्याला ऐकू येतेय ना?’

ग्रेटाची ही कळकळ व साधे, सरळ कथन थेट हृदयाला भिडणारे आहे. ज्ञान-विज्ञानाचा आधार असल्यामुळे त्या प्रतिपादनाला धुडकावूनही लावता येत नाही.

अवघ्या काही महिन्यांत ग्रेटा जगातील पर्यावरणीय चळवळीची आंतरराष्ट्रीय राजदूत झाली. २०१८ च्या डिसेंबरमध्ये पोलंडच्या कॅटोविस शहरातील जागतिक हवामान परिषदेस संबोधित करण्याचा मान शाळकरी ग्रेटाला मिळाला आणि २०० राष्ट्रांच्या प्रमुखांना तिने जाहीर फटकारले : ‘हवामानबदल समजून सांगण्याएवढे तुम्ही प्रगल्भ नाही. तुम्ही आम्हा बालकांवर अवाढव्य ओझे लादले आहे. लोकप्रिय होण्यासाठी धडपडण्याची मला आस नाही. मला आपली सजीव पृथ्वी आणि हवामान यांची काळजी आहे.’

यंदाच्या जानेवारीत स्वित्र्झलडमधील दावोस येथे जागतिक आर्थिक परिषदेसाठी २५०० महनीय सदस्य विमानाने पोहोचले. त्यात डोनाल्ड ट्रम्प, नरेंद्र मोदी, अँजेला मर्केल, इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्यासह अनेक राष्ट्रप्रमुख, बडे उद्योगपती, पत्रकार, चित्रपट तारे आदी उपस्थित होते. ग्रेटाने हवाई प्रवास टाळून ३२ तास रेल्वेचा प्रवास केला. केवळ पशाचे मोजमाप करणाऱ्या ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ला तिने थेट सुनावले, ‘पृथ्वीवरील अमूल्य संपदा ओरबाडून काही कंपन्या, काही लोक आणि काही धोरणकत्रे हे बेसुमार संपत्ती कमावत आहेत. येथे जमलेल्यांपकी अनेक जण या गटातील आहेत. परंतु त्यामुळे तुम्ही तुमच्या बालकांना संकटांच्या खाईत लोटत आहात.’ ती जगातील धोरणकर्त्यांना म्हणाली, ‘तुम्ही आशावादी असावे असा माझा आग्रह नाही. परंतु तुम्ही अस्वस्थ होणे आवश्यक आहे. मला दररोज वर्तमानाची भीती वाटते. तुम्हालाही तशी भीती वाटली तरच तुमचे वर्तन संकटकाळातून बाहेर काढण्याचे असेल. घराला आग लागल्यावर आपण आटोकाट प्रयत्न करू, तसे शर्थीचे प्रयत्न तुम्ही करा. कारण आपल्या घराला खरोखरीच आग लागलेली आहे.’ ग्रेटामधील निर्मळता व प्रांजळपणा लहानथोरांना खेचून घेत आहे.

जगाच्या कल्याणासाठीची ग्रेटाची आर्त हाक कुणाच्याही मनाचा ठाव घेते. निस्वार्थपणे सर्वाना सम लेखून ग्रेटा आवाहन करते. त्यामुळे तिच्या या आवाहनाला नतिक सामथ्र्य प्राप्त होते आणि त्यातून ऐकणारे सहजगत्या तिच्यासोबत जातात. तिचे तार्किक व रोखठोक प्रतिपादन लोक ऐकून घेतात, हे पाहून तिला मिळणारी आमंत्रणे वाढत आहेत. दुसरीकडे तिच्यामुळे स्फूर्ती घेऊन हवामानबदल रोखण्याचे आवाहन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत कित्येक पटीने वाढ होत आहे. स्वतच्या देशाला व जगाला जाग आणण्यासाठी लाखो मुले शाळा बंद ठेवत आहेत. १५ मार्च २०१९ रोजी ऑस्ट्रेलियापासून अमेरिकेपर्यंत १२० राष्ट्रांतील १५ लाख विद्यार्थ्यांनी ‘हवामानबदल रोखण्यासाठी राजकीय नेत्यांनी कृती करावी’ हे बजावण्यासाठी शाळा बंद पाडल्या. दिल्लीत ७००, तर  हैदराबादेत ४०० मुले ‘श्वास स्वच्छ हवा’ म्हणत होते. (२००० साली पर्यावरणवादी पत्रकार अनिल अग्रवाल यांच्या प्रेरणेमुळे पाच हजार बालकांनी स्वच्छ हवेचा हक्क मागितला आणि त्यामुळे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी डिझेल वाहनांना वायुइंधन वापरण्याचे आदेश दिले होते.) मुंबई, भावनगर, उदयपूर येथील मुलेदेखील पर्यावरणरक्षणाच्या मागणीसाठी सरसावली होती. जगभरातील मुले निराशा, संताप व भीती व्यक्त करीत होती. या पहिल्या जागतिक हवामान आंदोलनाने जग हादरून गेले आणि बालकांच्या उत्साहाला उधाण आले. जगातील समस्त प्रसारमाध्यमांनी या पर्यावरण योद्धय़ांचे भरभरून कौतुक केले. ‘द गार्डियन’ने यास ‘ऐतिहासिक सविनय कायदेभंग चळवळ’ संबोधले. मात्र, ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांना शाळा बंद पाडून वेळेची नासाडी करणारे हे बालउद्योग अजिबात आवडले नाहीत. हे ऐकून ग्रेटा ट्विटरवर उत्तरली : ‘परंतु राजकीय नेत्यांनी काहीही कृती न करता ३० वष्रे वाया घालवली आहेत. आणि हे त्याहून कणभर वाईट आहे.’ नॉर्वे सरकारने २०१९ च्या नोबेलसाठी १६ वर्षांच्या ग्रेटा थनबर्ग हिचे नाव सुचवले आहे आणि त्याला जगभरातून समर्थन मिळते आहे. तिच्या अवस्थांतराविषयी ग्रेटा म्हणते, ‘शाळेत मी अबोल, बुजरी, भिडस्त, मागे राहणारी म्हणून प्रसिद्ध होते. आणि आता मला सतत बोलावे लागत आहे आणि लोक ऐकत आहेत असा विचित्र विरोधाभास घडून आला आहे.’

जगाचे भविष्य घडविणाऱ्या दहा किशोरवयीन मुलामुलींचा ‘पुढील पिढीचे नेते’ असा गौरव ‘टाइम’ साप्ताहिकाने २७ मे २०१९ च्या विशेषांकात केला आहे. आणि अर्थातच मुखपृष्ठावर झळकत आहे- ग्रेटा! मोठय़ांना उद्देशून ‘तुम्हाला ऐकू येतंय ना?’ असे काकुळतीने वारंवार विचारणारी ग्रेटा ‘टाइम’ला म्हणाली, ‘नऊ महिन्यांपूर्वी माझं बोलणं कुणाच्याही कानांपर्यंत जात नव्हतं. आता संपूर्ण जग मला ऐकते आहे.’ आता तिचे म्हणणे ऐकण्यासाठी ट्विटरवर तिच्यामागे दहा लक्ष लोक आहेत. ग्रेटावर लिहिण्यासाठी शाळेपासून परिषदांपर्यंत सर्वत्र ‘टाइम’चे पत्रकार व छायाचित्रकार तिच्यासोबत गेले. तिचा संचार न्याहाळून त्यांनी तिच्याशी संवाद साधला आणि तिच्याविषयीची मते जाणून घेतली. जगभरातील महनीय व्यक्तींशी संभाषण करूनदेखील ग्रेटा स्वत:च्या मतांशी ठाम असते. पर्यावरणविषयक जगप्रसिद्ध पत्रकार व लेखिका नाओमी क्लायन म्हणतात, ‘तिच्यावर कुणाचाही प्रभाव पडू शकत नाही. तिला कुणाच्या मार्गदर्शनाची गरज नाही. उलट, आपल्याला तिच्याकडून नवे मुद्दे मिळतात. तिच्या विचारांमध्ये स्पष्टता आहे आणि तिची उपजत व उत्स्फूर्त प्रेरणा ही उदात्त व उत्तम आहे.’

नाटककार व्होल्कर लुडविग यांनी जर्मनीत मुलांसाठी ‘ग्रिप्स रंगभूमी’ सुरू  केली. पुण्याच्या थिएटर अ‍ॅकेडमीने त्यांची अनेक नाटके मराठीत आणली. ‘छान छोटे, वाईट मोठे’ हे त्यापकी एक झकास नाटक होते. मोठय़ांची विचार करण्याची रीतच सदोष असते, त्यामुळे त्यांना छोटय़ांचे निरोगी, निरागस मन समजू शकत नाही, असा दृष्टान्त देणारी ती नाटके होती. आता जगाच्या रंगभूमीवर ही मुले मोठय़ांवर संस्कार करू लागली आहेत. बालकांपासून शिकवण घेत ब्रिटनमधील पालकांनी मोर्चा काढला. मुले व पालक मिळून लोकप्रतिनिधींना पर्यावरणीय कृतीचा आग्रह धरू लागले आहेत. इथून पुढील प्रत्येक निवडणुकीत पर्यावरणाचे प्रश्न असणे अनिवार्य झाले आहे. ‘हवामानकांड थांबवा’ या मागणीसाठी ‘शाळा बंद’ आंदोलनाने आणखी एक जागतिक धक्का दिला. २४ मे रोजी १२५ देशांतील १२ लक्ष विद्यार्थ्यांनी राजकीय नेत्यांवरील टीकात्मक हल्ल्यांची तीव्रता वाढवली. मुलांच्या कल्पकतेचा बहर पुठ्ठय़ांवरील घोषवाक्यांतून व्यक्त होऊ लागला : ‘भविष्यच नसेल तर शिक्षणाला अर्थ काय?’, ‘तुम्हाला धडा शिकवण्याकरिता आम्ही धडे शिकणे थांबवतो’, ‘आम्ही ज्यांना निवडून देत नाही, अशांनाच आमची काळजी आहे’, ‘आपण नष्ट होऊ असं डायनासोरनाही वाटलं नव्हतं’! या अनुभवामुळे मुलांच्या अंगावर मूठभर मांस चढत आहे. आता २७ सप्टेंबरला पर्यावरण चळवळीच्या अध्वर्यु राशेल कार्सन यांच्या स्मृतिदिनी त्यांना आदरांजली वाहताना पृथ्वी वाचविण्यासाठी संपूर्ण जगातील उत्पादन बंद करण्याची हाक मुलांनी दिली आहे.

ज्युलियानाच्या खटल्यामुळे अमेरिकेतील वातावरण तापू लागले तेव्हा ‘एक्सन मोबिल’, ‘शेल’, ‘बी. पी.’ या तेल कंपन्या आणि ‘पेप्सिको’, ‘जी. एम.’, ‘युनिलीव्हर’ या आघाडीच्या बडय़ा कंपन्या एकत्र जमल्या आणि त्यांनी ‘क्लायमेट लीडरशिप कौन्सिल’ (२०१६) स्थापन केली. त्यांचा ‘आम्हीही जगाची काळजी करतो व कर्ब उत्सर्जन रोखण्याच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देतो..’ असा आव होता. परिषदेने ‘कर्ब उत्सर्जन करणाऱ्यांकडून दर टनामागे ४० डॉलर कार्बन कर वसूल करून तो अमेरिकी नागरिकांच्या खात्यावर जमा केला जाईल’ अशी ‘कार्बन लाभांश’ योजना जाहीर केली. त्याचवेळी या तेल कंपन्या ‘ज्युलियाना खटला’ मोडीत काढण्यासाठी पराकाष्ठा करीत आहेत. तेल कंपन्यांचे उत्पादन भरघोस व्हावे असे तंत्रज्ञान पुरविण्यासाठी ‘मायक्रोसॉफ्ट’, ‘गुगल’, ‘अ‍ॅमेझॉन’ या कंपन्या करार करतात, यावरून या कंपन्यांचे लागेबांधे स्वच्छपणे दिसतात. हे हितसंबंध उघड झाल्यावर या कंपन्यांमधील कर्मचारीसुद्धा मालकांचा निषेध करू लागले.

नुकताच संयुक्त राष्ट्रांनी जागतिक जैवविविधतेसंबंधीचा १८०० पानी अहवाल प्रसिद्ध केला. ‘जीवसृष्टीतील दहा लक्ष प्रजाती लुप्त होण्याच्या अवस्थेत आहेत. याचे भयंकर पडसाद मानवजातीला भोगावे लागतील,’ असे त्यात म्हटले आहे. वैज्ञानिकांच्या इशाऱ्याप्रमाणे, हवामान बिघडत आहे. सध्या आधीच दुष्काळ आणि निर्जलीकरणाने हैराण असलेल्या भारतात तीव्र उष्णतेची लाट पसरली आहे. या उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात तीन ते चार अंश सेल्सियसची वाढ जाणवत आहे. ग्रामीण भागांच्या मानाने शहरांमध्ये उन्हाचा चटका हा चार ते पाच अंश सेल्सियसने अधिक असतो. झाडी व तलाव कमी होणे, काँक्रीटीकरण वाढणे, प्रदूषण यामुळे शहरांत उष्णता टिकून राहते. हा ‘शहरातील उष्णतेच्या बेटाचा परिणाम’ आहे. येणाऱ्या मोसमी पावसावर ‘एल निनो’ची दाट छाया असण्याची शक्यता वाढली आहे. देशाचा अर्थसंकल्प, संसदीय चर्चात तर नाहीच, पण यंदाच्या लोकसभा निवडणुकीतील जाहीरनाम्यांतही कुठेही हवामानबदल व पर्यावरण हे मुद्दे दिसले नाहीत. त्याचा विचार व अभिकल्पच नसल्यामुळे कृतीचीही शक्यता नाही. असे आपल्या राजकीय पर्यावरणाचे आज दारिद्रय़ आहे. मोठय़ांनाही हे समजतेय. पण वेगळा विचार म्हणजे मतपेटीतील पराभव ही भीती त्यांना ग्रासून राहते. १५ मार्चच्या जागतिक हवामान आंदोलनात सहभागी झालेल्या दिल्लीतील मुलांनी ‘अब की बार क्लायमेट चेंज पे सरकार’ असे फलक हाती धरून घोषणाही दिल्या होत्या. असा दबाव वाढत जावो, असेच प्रवाहपतित मोठे दुरून सांगतील.

सोफी, ज्युलियाना व ग्रेटा या छोटय़ांमुळे पर्यावरण व हवामानबदल हे विषय घराघरांपर्यंत पोहोचले. ऑस्ट्रेलिया व युरोपीय संघाच्या निवडणुकीत मतदारांकडून पर्यावरण व हवामान या मुद्दय़ांचा रेटा वाढला. जागरूक पालक व संवेदनशील नेते सध्याची राजकीय अर्थव्यवस्था बदलू शकतील का, हे त्यांच्यासमोरील मोठेच आव्हान आहे. सध्या संपूर्ण जग व जागतिक संस्था या मूठभर कॉर्पोरेट कंपन्यांच्या ताब्यात आहेत. त्यांच्या नफ्यापुढे राष्ट्रांचे हित गौण ठरवले जाते. अशा महाकाय टोळीसत्तेशी जगातील लहानग्यांची लढाई चालू आहे. त्यांच्या भविष्यकाळातील वादळांना परतवून लावण्यासाठी ही बालके एका भयंकर चक्रीवादळाचा सामना करीत आहेत. अशा कोटय़वधी मुंग्यांनी आकाशी उडावे आणि सूर्यासी गिळावे आणि त्यातून अत्यवस्थ पृथ्वीस संजीवनी मिळावी अशीच सर्व जगाची अपेक्षा आहे!

atul.deulgaonkar@gmail.com