कुलवंतसिंग कोहली ksk@pritamhotels.com

८ डिसेंबरला माझा दोस्त, माझा जीवश्चकंठश्च मित्र वयाची ८३ वर्षे पूर्ण करून ८४ वर्षांचा झाला. मनात आलं, चला त्याला भेटून येऊ. त्याला थेट फोन केला, ‘‘धरम, वीरे, कैसा हैं तू? तेणूं मिलना दी इच्छा है।’’ पलीकडून उत्तर आलं, ‘‘अरे कुलवंत, तुसीं की पुछा दे हो? सिद्धे आओं घर..’’

निघालो गाडी काढून आणि थेट पोहोचलो धर्मेद्रच्या घरी. दोन्ही हात उंचावून बॉलीवूडमधलाच नाही, तर जगातला खराखुरा ‘ही-मॅन’ धर्मेद्र जागेवरून उठला. आनंदाने सद्गदित होत पुढे आला आणि कडकडून मिठी मारली. तो व मी, दोघांच्याही डोळ्यांत पाणी होतं. आम्ही एकमेकांच्या पाठीवर हळूहळू थोपटत होतो. धरम म्हणाला, ‘‘काके, किती वर्षांनी भेटलो. आजचा वाढदिवस स्पेशल झाला.’’

आमची गेल्या साठ वर्षांची दोस्ती; पण या वाढदिवसाच्या निमित्ताने मी त्याला कितीतरी वर्षांनी भेटलो. म्हणजे, कुठल्यातरी कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटलो असेल तर असू, अन्यथा नाहीच. परंतु परवा भेटल्यानंतर मधे मोठा खंड पडला असेल असं आम्हाला दोघांनाही वाटलं नाही. तो आठवणींच्या हिंदोळ्यांवर झोके घेऊ  लागला. एवढा दांडगा पंजाब दा पुत्तर, पण त्याच्या गावच्या आठवणींनी एकदम कोमल झाला. त्याच्या डोळ्यांतून झरझर अश्रू वाहू लागले. कधीही डोळ्यांत पाणी न येऊ  देणारा मीही गदगद झालो.

धरम मला म्हणाला, ‘‘कुलवंत, मेरे भाई- ‘कभी दर्दे यादें मांझी यादों से तडपता रहा।  कभी हसरतें मुस्तकबील के लिये रोता रहा। सोचा ना कभी भी बारे हाल के। होकर खुशहाल भी कभी बदहाल थे।’ .. कसे दिवस गेले, कळलं नाही. तुझ्या ‘प्रीतम’मध्ये जेवण्याचं स्वप्न होतं माझं. ते पुरं करायला मला कोणाकडून तरी दहा रुपये उसने घ्यावे लागले होते.’’

मी चकित होऊन धरमला विचारलं, ‘‘काय सांगतोस? आजवर कधी बोलला नाहीस ते?’’

‘‘क्या सुनाऊं  वीर, त्याची पण एक मोठी गोष्ट आहे. तुला माहिती आहे, माझी निवड ‘फिल्मफेअर’च्या टॅलेंट हंटमध्ये झाली.’’

‘‘हां, बिल्कूल मालूम है। आम्ही तुझे फोटो पाहिले होते ना ‘फिल्मफेअर’मध्ये! नंतर काही महिन्यांनी तू बिमल रॉय यांच्याबरोबर ‘प्रीतम’मध्ये आला होतास, पाठोपाठ तुला घेऊन रमेश सेहगलसाहेब आले होते.’’

‘‘ते तर आहेच, पण त्यापूर्वीही मी ‘प्रीतम’मध्ये आलो होतो.’’ धर्मेद्र खुशीत सांगत होता, ‘‘तुला ठाऊक आहे कुलवंत, मला लहानपणापासून चित्रपट पाहण्याचा शौक होता. एका बाजूला कुश्ती, शरीराची मरम्मत, व्यायाम, भरपूर खाणंपिणं. आपण पंजाबी. मी जाटपुत्तर. मजबूत खात असे, मजबूत फिरत असे. अभ्यासातही मी चांगला होतो. खरं सांगायचं तर माझे पेयों (वडील) शाळामास्तर होते. त्यांच्या धाकानं अभ्यास करायचो व पास व्हायचो. माझं माझ्या आईशी खूप जमायचं. आई फारशी शिकलेली नव्हती, पण तिचं सामान्यज्ञान शिकलेल्या बायकांपेक्षा खूप जास्त होतं. मी मोठा व्हावं अशी तिची इच्छा होती. कसं मोठं व्हायचं, ते तिला ठाऊकनव्हतं; पण ती नेहमी सांगायची- मोठा हो, खूप मोठा हो. पण त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे तू चांगला हो! महान होताना कोणालातरी लहान करावं लागतं, पण चांगलं व्हायचं असेल तर स्वत:लाच चांगलं व्हावं लागतं. त्यासाठी चांगलं राहावं लागतं. मी शिक्षण संपवून काही काळ नोकरीही केली. नोकरीवर सायकलवरून जात असे. दर आठवडय़ाला गुपचूप एखादा चित्रपट बघत असे. सायकलवरून गढवालला चित्रपट पाहायला जाताना वाटेत पोस्टर्स लागायची. ती पोस्टर्स मी थांबून पाहत असे. मी दिलीपकुमार आणि सुरैय्या यांचा जबरदस्त फॅन होतो. नौकरी करता, सायकल पे आता-जाता; फिल्मीं पोस्टरों में अपनी झलक देखता, रातों को जागता, अनहोने सपने देखता. उपरवाले से कभी पुछता, क्या मैं दिलीपकुमार बन सकता हूँ?’’

मधूनच धरमची एक कमेंट, ‘‘भई कुलवंत, आजकाल मी कविता लिहितो. फिल्मी दुनियेत मी दुसऱ्यांची शायरी बोलायचो, आजकाल मी माझी कलम चालवतो व तीच बोलतो.’’ पुढे सांगू लागला, ‘‘तर, सिनेमाच्या वेडानं मी भारावलो गेलो होतो. एक दिवस ‘फिल्मफेअर’ची टॅलेंट हंटची जाहिरात पाहिली. पेयोंजवळ बोलायचं धैर्य अजिबात नव्हतं. मी आईजवळ गेलो. तिला सांगितलं, मला नोकरीसाठी मुंबईला जावं लागेल. मेरी भोली मां! मला म्हणाली, ‘पुत्तर, अर्जी लिखियो।’ मी म्हणालो, ‘अगं, अर्जी लिहायची नसते तिथं. तिथं माझा चेहरा हीच माझी अर्जी असेल.’ तिचे आशीर्वाद घेऊन मी मुंबईत आलो. टॅलेंट हंटमध्ये उत्तीर्ण झालो. ग्रेट बिमल रॉय, रमेश सेहगल, अर्जुन हिंगोरानी यांनी मला त्यांच्या नव्या चित्रपटांसाठी एक एक रुपया देऊन करारबद्ध केलं.. तीन रुपयांत तीन चित्रपटांचा हीरो! मी मुंबईत राहिलो; पण खिशात खुळखुळा, कारण घरून आणलेले पैसे संपले.’’

धरम तेव्हा वर्सोव्याला एक मित्र- भगवंत याच्याबरोबर खोली शेअर करून राहत होता. त्याबद्दल धरमची आठवण अशी, ‘‘दोघांच्याही खिशात पैसे नव्हते. अर्जुन हिंगोरानी यांच्या ‘दिल भी तेरा हम भी तेरे’साठी मला करारबद्ध केलं होतं. त्याच्या ‘मुझ को इस रात की तनहाई में आवाज न दो’ या गाण्याचं रेकॉर्डिग ‘मेहबूब स्टुडिओ’मध्ये होतं. मला तिथं बोलावलं गेलं; पण जायचं कसं? खिशात पैसे नाहीत. मी व भगवंत, दोघंही चालत निघालो. पण तिथं पोहचेपर्यंत आम्हाला खूप उशीर झाला. नवख्या धर्मेद्रसाठी कोण थांबणार? मग आता काय करायचं? आम्ही दोघं निघालो व चालत चालत ‘रणजित स्टुडिओ’त पोहोचलो. त्या दिवशी आम्हाला खरंच पैशांची गरज होती. दोघांजवळचे सर्व पैसे संपले होते. रणजित स्टुडिओत रमेशजींचं ऑफिस होतं. त्यांच्या समोरून मी उगाच चार-पाच वेळा ये-जा केलं. त्यांचं माझ्याकडे लक्ष नव्हतं. माझीही त्यांच्याकडे पैसे मागायची हिंमत नव्हती. पंजाबी जाट माणूस मी, भीक मागणार कसा? पण पोटातल्या भुकेनं लाजेवर मात केली. मी मनाचा हिय्या करून रमेशजींना हाक दिली. त्यांनी भुवई वर करून डोळ्यांनीच विचारलं, ‘काय आहे?’ मी म्हणालो, ‘सर, थोडा अ‍ॅडव्हान्स हवाय, आपण सिनेमा साइन केला आहे ना, त्यासाठी.’ ‘अरे, तो क्या हुआ। सिनेमा साइन केला ना, हेच भरपूर झालं.’ मी व भगवंत निमूट बाहेर पडलो. समोरच्या ‘श्री साऊंड स्टुडिओ’जवळ एक काके-दा-हॉटेल होतं. गुप्ताजी त्याचे मालक. मी त्यांच्याकडे गेलो. त्यांना म्हणालो, ‘मी घरी पाकीट विसरलोय, मला तुम्ही दहा रुपये उधार द्याल का?’ त्या भल्या माणसानं अगदी थोडय़ाशा ओळखीवर मला दहा रुपये दिले. ते खिशात आल्यावर मला स्वर्ग गवसला!’’

धरम पुढे सांगत होता, ‘‘आम्ही रणजितमध्ये, श्री साऊंडमध्ये निर्मात्याच्या ऑफिसबाहेर बसलो असताना आमच्यासमोरून नट-नटय़ा, दिग्दर्शक आदी महत्त्वाच्या लोकांसाठी खुशबूदार जेवण आणलं जाई. सारे जण म्हणत, ‘हे ‘प्रीतम’मधलं जेवण आहे.’ मीटिंग कुठे होती? तर, ‘प्रीतममध्ये होती’ असं कानावर येई. त्या स्वर्गसुखाच्या क्षणी आम्ही ठरवलं- आज आपण ‘प्रीतम’मध्ये जेवू या! आम्ही दोघंही दबकत दबकत आत शिरलो. त्या वेळी तू काऊंटरवर होतास. आम्ही जेवण मागवलं. दबाके खा लिया! बिलाचे पैसे देऊनसुद्धा आमच्याजवळ दोन रुपये व तीन आणे शिल्लक राहिले होते. तेव्हा मी तुझ्या ‘प्रीतम’मध्ये पहिल्यांदा आलो. त्याच वेळी मला वाटलं, की मैं अपने टब्बर में (कुटुंबात) आलोय. नंतरची खरी मजा अशी, की त्यानंतर अगदी आठ दिवसांनी बिमलदा मला तुमच्याकडे जेवायला घेऊन आले. आम्ही ‘बंदिनी’ची चर्चा इथं केली. मग ‘शोला और शबनम’साठी चर्चा करायला रमेश सेहगल यांच्याबरोबर आलो. अर्जुन हिंगोरानी हे मला ‘दिल भी तेरा हम भी तेरे’च्या रीलीजनंतर इथं घेऊन आले. त्यानंतर मी ‘प्रीतम’मध्ये येतच गेलो. ये मेरा लकी रेस्टॉरंट है कुलवंत! एकदा काय झालं, पुन्हा अशी स्थिती आली की माझ्याकडे पैसे नव्हते. दादरच्या शानबाग नावाच्या मित्राकडे मी शंभर रुपये उधार मागितले. त्यानंही लगेच ते मला दिले. मी हीरो झालो, सिनेमे मिळू लागले. एक दिवस मी शानबागला त्याचे शंभर रुपये द्यायला गेलो, तर तो मला म्हणाला, ‘हे परत नको करूस. उद्या मला नातवंडांना सांगता येईल, की द ग्रेट धर्मेद्र माझे शंभर रुपये देणं लागतो!’ काय सांगू? त्या शंभर रुपयांची किंमत आजच्या शंभर कोटींना नाही. शानबागच्या ऋणात आजही असण्याचा आनंद आहे.’’

धरम नेहमी आमच्याकडे येत असे. त्याच्या नव्या चित्रपटाच्या नायिकांना घेऊन तर तो नियमितपणे यायचा. मनापासून खायचा, खाऊ  घालायचा. तो आला की मला साद द्यायचा, ‘‘कुलवंतजी, आओ, हमे जॉईन करो।’’ मला जावंच लागे. हळूहळू तो दिसला की मी घरी कळवत असे, ‘‘आज घरच्या थाळ्याला खाडा!’’

धरम गप्पांना एकदम जबरदस्त माणूस. गोष्टीवेल्हाळ आणि दिलखुलास. कसला देखणा दिसायचा तो! मराठीत एकनाथांनी वर्णन केलंय ना अगदी तस्सा- ‘राजस, सुकुमार, मदनाचा पुतळा!’ दणदणीत उंची, दणकट बांधा, बळकट शरीर, रुंद व कमावलेले खांदे, पीळदार दंड, व्यायामानं कणखर झालेले लांब बाहू आणि कातीव मांडय़ा. पुरुष असावा तर असा! एके काळी धरमला ‘जगातल्या सर्वात सुंदर दहा पुरुषांपैकी एक’ असं जागतिक कौतुक मिळालं होतं. ‘धरम-वीर’ चित्रपटाच्या वेळी आरशात तो स्वत:कडे निरखून बघत असे; त्याचं त्यालाच आश्चर्य वाटे की, हा आरशातला माणूस इतका देखणा कसा? त्या सेटवर मी गेलो, की धरम मला हा प्रश्न विचारे. इतकं असूनही तो नरमदिल होता, विनम्र होता, साधा होता. ‘गुड्डी’मध्ये तुम्हाला जो एकुणातला माणूस (Total human being) धर्मेद्र दिसतो ना, अगदी तस्साच आहे तो.. आजदेखील! त्याचाच एक कलाम आहे-‘मेरी रूह मेरे चेहरे का आयना है। मेरी आँखों में मेरे मन की अबमरत पढ सकते हो। बेसखम्ताही मेहसूस हो सकता है। एक ऐसा अहसास हूँ, जो देखते ही मेहसूस हो सकता है।’

तो कार्सचा शौकीन आहे. त्याची पहिली कार- फियाट- त्यानं घेतली, तेव्हा तो सर्वात आधी बिमल रॉय यांच्याकडे गेला. त्यांना पैरीपौना करून म्हणाला, ‘‘कारला सर्वात आधी तुमचे पवित्र पाय लागू द्यात. आज माझे पेयों इथं नाहीत, बीजीपण नाही. तुम्ही व मनोबीना आँटीच मला त्यांच्या जागी आहात.’’ मनोबीनाजींनी त्याच्या कारची पूजा केली, त्याच्या गालांवरून अलाबला करून दृष्ट काढली व ते दोघंही कारमध्ये बसले. ती कार घेऊन तो ‘प्रीतम’मध्ये आला. मी नव्हतो, पण पापाजींना कार दाखवली. त्या दिवशी माझ्या पापाजींनी त्यांना जेवण दिलं.

धरम मला म्हणायचा, ‘‘कुलवंत, मला सगळं काही या मुंबईनं, महाराष्ट्रानं दिलं. पंजाबी माँने मला लालनपोषण करून वाढवलं आणि महाराष्ट्र माँच्या हाती सोपवलं. महाराष्ट्र माँने मला अंगडंटोपडं घातलं, दोन वेळच्या जेवणाची सोय केली, अभिनेता म्हणून घडवलं. माझ्या मुलांना, नातवंडांनाही महाराष्ट्रानं आपलं मानलं. मी कृतज्ञ आहे. पण मला खरं तर, आजही आमची ती जुनी मुंबई आठवतेय. त्यात धावणारी ट्राम आठवतेय. चॉकलेटी-पिवळ्या रंगाची इंजिन लोकल आठवतेय. लाल रंगाची लांबलचक नागिणीसारखी सळसळत जाणारी बेस्टची डबलडेकर बस आठवतेय. रिकाम्या मरिन ड्राइव्हवर हातात चणे घेऊन फिरत जाणं आठवतंय.. झोपेत ही सारी माझी आठवण जागी होते, स्वप्नात बागडते, मला बागडवते आणि डोळे उघडले की पऱ्यांच्या दुनियेत हरवून जाते! त्यामुळेच आजकाल मला डोळे बंद ठेवायला आवडू लागलंय बहुधा.’’ धरम सांगत होता, ‘‘अशाच विपन्नावस्थेच्या दिवसांत मरिन ड्राइव्हवर फिरत असताना समोर दिसणाऱ्या ‘केवल महल’ आणि ‘कपूर महल’ या इमारती बघून मी भगवंतला म्हणालो होतो, ‘बघ, आपल्या वडिलांनी आपल्यासाठी केवढय़ा मोठय़ा इमारती बांधून ठेवल्यात अन् आपल्याला त्याचा पत्ता नाही.’ (धरमच्या वडिलांचं नाव केवललिंग आणि भगवंतच्या कपूरसिंग!) आम्ही तेव्हा खूप हसलो, इतके हसलो की, डोळ्यांत पाणी आलं.’’

तशी नियतीही त्या दोघांच्या डोळ्यांत पाणी आणत होती. सुरुवातीच्या दिवसांत एका रात्री धरम भगवंतला म्हणाला, ‘‘चल, जेवू या आता.’’ भगवंत म्हणाला, ‘‘हे चलचित्र के हीरो, आज घर में आटा भी नहीं है। रोटी कैसे बनेगी?’’ मग दोघं लोटाभर पाणी पिऊन झोपले. धरम सांगत होता, ‘‘रात्री दोन-अडीचच्या सुमारास काहीतरी खुडखुड आवाज झाला, म्हणून मी उठलो. बघतो तर, भगवंत इसबगोलच्या डब्यात चमचा घालून ढवळत होता. आम्ही पंजाबी, आमची पोटं मुंबईच्या पाण्यानं बिघडतील म्हणून आमच्या स्थानिक वैद्यानं आम्हाला इसबगोलचा डबा दिला होता. भगवंत म्हणाला, ‘यार, पोट जरा बिघडलंय, म्हणून इसबगोल खातोय.’ मला कळलं, पोट बिघडलंय वगैरे काही नाही; बिघडलीय ती भुकेमुळे झोप! म्हणालो, ‘मलाही अर्धा डबा दे, तू अर्धा डबा खा!’’ धरम छान बोलत असे. या दिवसांबद्दल बोलताना तो पटकन बोलून गेला- ‘‘आयुष्य हा एक सुंदर संघर्ष आहे!’’

धर्मेद्र हा सुपरस्टार झाला. त्यानं १२५ सुपरहिट सिनेमे दिले आणि न चाललेलेही काही सिनेमे दिले. परंतु त्याला चित्रपटांच्या दुनियेसाठी निवडणाऱ्या ‘फिल्मफेअर’च्या त्या बाहुलीनं नेहमीच हुलकावणी दिली. प्रत्येक ‘फिल्मफेअर अ‍ॅवॉर्ड नाइट’नंतर तो ‘प्रीतम’मध्ये यायचा व मला सांगायचा, ‘‘कुलवंत, आज एक नवीन सूट मी कपाटात बंद करून ठेवणार.’’ तो प्रत्येक फिल्मफेअर पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या वेळी नवा सूट शिवत असे. त्याला वाटे, आज आपल्याला पुरस्कार मिळणार; पण तो पुरस्कार त्याला हुलकावणी देऊन दुसऱ्याच्या गळ्यात पडायचा. ‘सत्यकाम’, ‘चुपके चुपके’, ‘शोले’.. प्रत्येक वेळी त्याच्या आशेवर पाणी पडायचं; पण त्याच्यातल्या चांगल्या माणसानं पुरस्कारासाठी कोणताही गैरप्रकार केला नाही. शेवटी, या साध्यासरळ माणसाच्या गळ्यात त्या काळ्या देखण्या बाहुलीने आपली माळ जीवनगौरव पुरस्काराच्या निमित्तानं घातली.

मी शेरीफ असतानाची गोष्ट. इस्लाम जिमखान्यावर एक मोठा कार्यक्रम होता. दिलीपकुमारसाहेब, धरम आदी अनेक जण तिथं होते. त्या वेळी दोन-तीन हजार लोकांसमोर दिलीपसाब म्हणाले, ‘‘धरम मेरा हीरो है। मेरी एक रंजीश है उपरवाले के पास। मैं जब उपर जाऊंगा तब खुदा से पुछुंगा के मुझे एक अ‍ॅक्टर तो तुमने बना दिया लेकीन धरम जैसी शकम्ल क्यूं नहीं दी? धरम, क्या कहूँ, मैं तो तुमसे प्यार करता ही हूँ, लेकीन सायरा मुझ से भी कई गुना ज्यादा तुम्हारी फॅन है!’’

ज्या दैवताकडे बघत बघत धर्मेद्र चित्रपटात आला, त्याच दैवतानं त्याच्यासाठी हे उद्गार काढले. त्या दिवशी मी धरमच्या डोळ्यांतून घळाघळा वाहणाऱ्या धारा पाहिल्या. धरम म्हणाला, ‘‘या शब्दांनंतर आता मला एकही अ‍ॅवॉर्ड मिळालं नाही तरी चालेल.’’

हां, यार धरम, एक बात बताऊं, जो उस दिन कह नहीं पाया. दोस्त, आज तेरा नाम ही खुद एक अ‍ॅवॉर्ड बन चुका है! इसके साथ तू एक अच्छा और ग्रेट इन्सान भी बन चुका है। तेरी माँ स्वर्ग से तुझपर गर्व महसूस करती होगी!

शब्दांकन : नीतिन आरेकर