मधुबाला हृदयाच्या विकारानं बालपणापासूनच त्रस्त होती. लहानपणी दारिद्र्यामुळे तिच्यावर उपचार करता येणे शक्य नव्हते. पण तिच्याकडे पसे आल्यानंतरही वेळच्या वेळी जर तिला परदेशातल्या एखाद्या डॉक्टरला दाखवलं गेलं असतं तर तिला काही र्वष अजून मिळाली असती. मधूच्या हृदयाला भोक होतं असं सांगितलं जातं. त्यामुळे शुद्ध आणि अशुद्ध रक्ताची मिसळण होत असे आणि मधू आजारी पडत असे.

अताउल्लाखान भाग्यवान होता. त्याचा शब्द न् शब्द ऐकणारी मुलगी त्याला लाभली होती. त्या मुलीनं बापासाठी सर्वस्व दिलं होतं. पण मी जवळून पाहत होतो- बाप मात्र तिच्या जिवावर मजा करत होता. मधुबाला हृदयाच्या विकारानं बालपणापासूनच त्रस्त होती. तिच्या लहानपणी दारिद्र्यामुळे तिच्या या विकारावर उपचार करता येणे शक्य नव्हते. पण तिच्याकडे पसे आल्यानंतरही वेळच्या वेळी जर तिला परदेशातल्या एखाद्या डॉक्टरला दाखवलं गेलं असतं तर तिला काही र्वष अजून मिळाली असती. पण वास्तव, रोकडय़ा जगात या ‘जर-तर’ला काहीही अर्थ नसतो. मधूच्या हृदयाला भोक होतं असं सांगितलं जातं. त्यामुळे शुद्ध आणि अशुद्ध रक्ताची मिसळण होत असे व मधू आजारी पडत असे असं डॉक्टर मंडळींच्या चर्चातून मी ऐकलं. पण या सगळ्या चर्चाच. मधुबाला अकाली हे जग सोडून गेली, हेच करकरीत वास्तव.

मधुबाला आजारी असताना अताउल्लाखान तिच्या आजाराबद्दल कोणाला सांगत नव्हते. मला आठवतंय त्याप्रमाणे मी एकदा ‘मुघल-ए-आझम’च्या सेटवर जेवण घेऊन गेलो होतो. चित्रपटाचं काम तब्येतीत सुरू होतं. मधुबालाच्या हातात बेडय़ा वगरे असल्याचा एक शॉट सुरू होता. के. असिफ यांच्या वास्तवदर्शीत्वाच्या आग्रहामुळे मधूच्या हातात खऱ्या बेडय़ा होत्या. कपडे वजनदार. बेडय़ा वजनदार. पण ते परिधान करणारी अभिनेत्री अभिनयाच्या दृष्टीने जरी वजनदार असली तरी प्रकृतीनं खालावलेली होती. अचानक सेटवर राज कपूरजी आले. त्यांनी असिफना बाजूला नेलं. त्यांना सांगितलं, ‘‘अहो, मधू खूप आजारी आहे. काल मी तिच्याबरोबर बाजूच्याच सेटवर शूटिंग करत होतो आणि तिला ठसका लागला. ती धापा टाकायला लागली. आणि तिला रक्ताची उलटी झाली. तिच्यावर अजिबात ताण देऊ नका. आणि हा असला वास्तवतेचा आग्रह धरू नका. सिनेमा लवकर पूर्ण करा, नाहीतर खड्डय़ातच जाल.’’ के. असिफ यांनी राजजींकडे बारकाईनं पाहिलं. एक जळजळीत नजर अताउल्लाखानकडे टाकली. ते ज्युनिअर आर्टिस्टसमोर काहीतरी बढाया मारण्यात रमलेले होते. असिफजींनी शांतपणे त्या दिवशीचं पॅकअप् केलं. मधुबालाला जरा बरं वाटायला लागल्यावर त्यांनी पुन्हा शूटिंग सुरू केलं. आणि नंतर वेगानं चित्रपट पूर्ण करायचा प्रयत्न केला.

‘मुघल-ए-आझम’चा विषय निघालाच आहे तर एक गंमत आठवली, ती सांगून टाकतो. शिशमहलचा तो अद्भुत सेट मी व्हर्जनि अवस्थेत पाहिला होता. ‘प्यार किया तो डरना क्या..’ या गाण्याचं शूटिंग होणार होतं. लाइटिंगचं काम झालं. कॅमेरा जेव्हा सर्व अँगल्सने ट्रायल्स घेत होता त्यावेळी एक मजा झाली. आरशांवरून प्रकाश परावर्तित तर होत होताच, पण मधुबालाच्या गोऱ्यापान त्वचेवरूनही तो परावर्तित होत होता. तेव्हा कॅमेरा कसा लावायचा, यावर घनघोर चर्चा झाली होती. स्वर्गीय अप्सरा जर कुठं असेल तर ती आत्ता इथं ‘मुघल-ए-आझम’च्या सेटवर आहे असंच मला वाटून गेलं.

मधुबालाच्या बालपणीचा एक किस्सा अताउल्लाखान यांनी मला सांगितलेला आठवतोय.. ‘‘मुमताज लहान होती. दिल्लीच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या माझे वाईट दिवस सुरू होते. नोकरी नाही.. आणि घरखर्च तर चालूच आहे- अशी भयानक स्थिती निर्माण झालेली. त्या काळात एका संध्याकाळी मी उद्विग्न होऊन घरी परतलो होतो आणि पाहिलं तर घरात मुली एक छोटं नाटुकलं करत आहेत. आणि बेबी डोक्याला दुपट्टा बांधून राजाची भूमिका करतेय. तिचा रुबाब पाहून मी हैराण झालो. मी विचार केला- काहीच शिकवण नसताना ही मुलगी इतकी ऐट दाखवते, तर मग खरोखरच ती चित्रपटात गेली तर काय करेल! मी लगेच बेगमला म्हणालो, आपण मुंबईला जाऊ या. ती तयार झाली नाही. ती दिल्लीतच राहिली. मी मात्र मुमताजला घेऊन मुंबईत आलो.. आणि मग पुढची कहाणी घडली. ती अगदीच लहान असताना मुमताजला बघून एक फकीर आमच्या झोपडीच्या दारात आला. तिच्या चेहऱ्याकडे पाहून म्हणाला, ‘ही मुलगी खूप गुणी आहे. ती खूप मोठी होईल. फक्त..’ असं म्हणून तो थांबला. आम्ही उत्सुकतेनं त्याच्याकडे पाहू लागलो. तो फकीर गप्प बसला. तिचा चेहरा निरखित राहिला. आणि शेवटी म्हणाला, ‘तिला दीर्घायुष्य लाभणार नाही. तिनं छत्तिसावं वर्ष पार केलं की मग ती दीर्घायुषी होईल. तिनं ती वेस फक्त ओलांडायला हवी.’’

अताउल्लाखान हे बेजबाबदार गृहस्थ होते. मधुबाला बालकलाकार म्हणून हळूहळू नाव कमावत होती आणि तिची आई सतत बाळंत होत होती. एक फारशी चच्रेत नसलेली गोष्ट मी आज सांगणार आहे. ही गोष्ट मला सरदार चंदूलाल शहा यांनी सांगितली होती. चंदूलाल शहा यांना सरदारकी वंशपरंपरागत मिळाली नव्हती, ती त्यांना लोकांनी कौतुकानं बहाल केली होती. चंदूलाल शहांनी कैक चित्रपट निर्माण केले, कित्येक चित्रपटांना वित्तपुरवठा केला. मधुबालाच्या प्रारंभीच्या काही चित्रपटांचे ते फायनान्सर होते. या सुंदर मुलीचं त्यांना कौतुक होतं. ही फार मोठी कलाकार होणार याचा त्यांना अदमास होता. मधुबालाच्या मृत्यूनंतर आम्ही बोलत असताना ते म्हणाले, ‘‘मधू जितकी गोड मुलगी होती, तितका तिचा बाप बेदरकार होता. एकदा मला रतिलालने (रतिलाल हा सरदारांचा पुतण्या!) फोन केला. त्यावेळी मी क्लबात पत्ते खेळत होतो. त्यानं मला सांगितलं, ‘मधुबाला आलीय. तिला व्याजानं दोन हजार रुपये तातडीनं हवेत.’ मी त्याला सांगितलं, ‘पसे दे, पण व्याजानं वगरे नको. तिला एवढंच सांग, की जर कधी मी चित्रपटासाठी तुला विचारलं तर तेव्हा मात्र नाही म्हणू नकोस.’ नंतर मला कळलं, की अताउल्लाखानची बायको दहाव्या वेळी बाळंत होणार होती व ती अडली होती. डॉक्टरच्या सांगण्यानुसार ताबडतोब ऑपरेशन केलं नाही तर मूल व आई दोघंही दगावणार होते. आणि हे महाशय कुठेतरी बाहेर गेले होते. न अता- न पता! चौदा वर्षांची मधू एकटीच घरात निर्णय घेणारी होती. तिनं माझ्याशी संपर्क साधायचा प्रयत्न केला. तिला पसे मिळाले. आई हॉस्पिटलला पोचली. ऑपरेशननंतर आई वाचली, बाळ गेलं. मधूनं ते लक्षात ठेवलं. मधुबालाचा ‘महल’ हिट् झाला. ती मोठी अभिनेत्री झाली. आणि काळाच्या ओघात मी मात्र खंक झालो. माझ्याकडे अजिबात पसे नव्हते. पण रतिलाल म्हणाला, ‘आपण एक चित्रपट करू.. मधुबाला आणि देव आनंदला घेऊन. त्यातून आपल्याला पसे मिळतील.’ रतिलाल गेला अताउल्लाकडे. अताउल्लानं त्याला एवढी मोठी रक्कम सांगितली की तो गप्पच बसला. नंतर मधूचा फोन आला.. ‘अब्बू काय म्हणाले असतील ते असो. मी तुमच्या चित्रपटात काम करीन.. आणि एकही पसा न घेता करीन.’ कुलवंत, मधूनं तिला अडचणीच्या वेळी एक छोटीशी मदत आम्ही केली होती, त्या मदतीचं तिला विस्मरण झालेलं नव्हतं. तिनं आमची छोटीशी विनंती लक्षात ठेवली. आपल्या इंडस्ट्रीत अशी माणसं भेटत नाहीत. अताउल्लाच्या भांगेत तुळस उगवली होती. रतिलालने चित्रपटाचं नावच ‘मधुबाला’ ठेवलेलं. पण सिनेमा काही तितकासा चालला नाही.’’ हाच एकमेव प्रसंग मधुबालाच्या आयुष्यातला असणार- की ज्या प्रसंगात आपल्या पित्याचं तिनं ऐकलं नाही.

देव आनंदचा उल्लेख आलाच आहे तर आणखी एक छोटीशी आठवण मधुबालानं मला सांगितली होती, ती सांगतो. मधुबाला व देव आनंद पहिल्यांदाच एकत्र काम करत होते. त्यांच्यात फारशी दोस्ती झालेली नव्हती. मधुबाला ही तशी शिकलेली नव्हती. इंग्रजीचा तिला गंधही नव्हता. चित्रपटाच्या सेटवर जेव्हा शूटिंग चालू नसे तेव्हा देव एखादं इंग्रजी पुस्तक वाचत बसलेला असे.

‘मी त्याला विचारलं, देव, तू सतत काय वाचत बसलेला असतोस? मी बघ कशी मजा करत असते आणि तू नुसता गंभीर.’ देव मला म्हणाला, ‘मधू, कलाकारानं स्वत:ला सतत अपग्रेड करायला हवं. त्यासाठी सतत वाचायला हवं. वाचन माणसाला घडवतं. त्यातही इंग्रजी भाषेत जगातलं सारं ज्ञान आलेलं आहे. इंग्रजी चित्रपटही आपण पाहिले पाहिजेत. त्यांची क्वालिटी उत्तम असते. जगात काय चाललं आहे, हे आपल्याला कळतं.’ मी त्याच्या हातातलं पुस्तक घेतलं. इंग्रजी पुस्तक ते.. मला काही म्हणजे काही कळेना. मी ते उलटसुलट पाहिलं व खजील झाले. मी देवला म्हणाले, ‘तुम ही मुझे सिखाओ.’ आणि आमची शिकवणी सुरू झाली. त्यानं मला नंतर एक चांगला इंग्रजी शिकवणारा शिक्षकही दिला. मी इंग्रजी शिकले. देवशी चुकतमाकत बोलू लागले. हळूहळू ती भाषा मला अवगतही झाली.’’

खरंच, इंग्रजी तिला अशी काही येऊ लागली, की तिला हॉलिवूडमधून ऑफर घेऊन फ्रँक काप्रा आला होता. मíलन मन्रो आणि मधूची तुलना होऊ लागली होती. ‘टाइम’ने तिच्यावर कव्हरस्टोरी केली होती. मन्रो आणि मधूमध्ये काही साम्यं होती; आणि एक मोठा भेद होता. दोघीही गरीब परिस्थितीतून मोठय़ा झाल्या. दोघींनी अफाट कष्ट उपसले. दोघींनाही मनाजोगता सोबती मिळाला नाही. दोघीही करारी बाण्याच्या होत्या. दोघींच्याही मागे बडे राजकीय नेते लागले होते. दोघीही ३६ व्या वर्षीच निधन पावल्या. दोघींनाही त्यांच्या देशात प्रतिष्ठेचे मानले जाणारे पुरस्कार- ऑस्कर आणि फिल्मफेअर कधीही मिळाले नाहीत, तरीही त्यांनी फिल्म इंडस्ट्रीवर राज्य केलं. मात्र, दोघींत एक मोठा फरक होता. मन्रोनं जवळपास विवस्त्र असा एक शॉट् एका चित्रपटात दिला होता. मधू मात्र अंगभर कपडय़ांतच नेहमी दिसली. मधुबालाचं सौंदर्य अश्लील नव्हतं, तर ते दैवी होतं. आणि ते तसंच राहावं म्हणून ती प्रयत्नरत राही. मधुबाला देखणी तर होतीच; पण हृदयाच्या अशा भयानक आजारातही तिचं सौंदर्य अम्लानच राहिलं.

मी तिच्या शेवटच्या वाढदिवसाला तिला भेटायला गेलो तेव्हा तिचा तजेलदार चेहरा नेहमीसारखाच ताजातवाना होता. कांती सतेज होती. तिची देहयष्टी थोडीशी बारीक झाली होती, इतकंच. शेवटी ती मधुबाला होती! मधुबाला आणि मर्लिन मन्रोमध्ये जी साम्यं होती त्यांतलं एक साम्य म्हणजे त्यांच्या मागे बडे राजकीय नेते लागले होते. मन्रोमागे जॉन केनेडी आणि रॉबर्ट केनेडी होते, तर मधुबालाच्या प्रेमात पाकिस्तानचे माजी पंतप्रधान भुत्तो होते. झुल्फिकार अली भुत्तो! ते व्यवसायानं वकील होते. धनंतर होते. सरंजामदार होते. त्यांच्याकडे अफाट पसा होता. ‘महल’ पाहिल्यानंतर भुत्तो तिच्या प्रेमात बुडाले होते अशा खबरा इकडे येत होत्या. माझा गॉसििपगवर विश्वास नाही, पण मलाही तेव्हा कुतूहल वाटलं होतं. ते तिच्या सौंदर्यानं मोहित झाले होते. तिच्या अभिनयावर ते फिदा होते आणि नृत्यावर खूश होते. त्यांनी तिला लग्नाची मागणी घातली. पण ती मागणी ऐकल्यावर तिनं त्यांना नम्रपणे सांगितलं म्हणे, की मी अभिनय सोडू शकणार नाही. आपण आपल्या आधीच्या दोन्ही बायकांना घटस्फोट द्यावा आणि मगच मी तुमच्याशी लग्नाचा विचार करीन. भुत्तो आणि तिची प्रेमकहाणी तिथंच संपली.

मधुबालाचं सौंदर्य हे शापित सौंदर्य असावं. त्या सौंदर्याला विश्रांतीचा, आरामाचा उ:शाप मुळीच नव्हता. ती सतत कामात राही. तिला सारखं हसू फुटे. एकदा का हसू फुटलं, की ती मग हसतच राही. तिच्या कमकुवत हृदयाला बहुधा त्या हसण्यामुळे आराम मिळत असावा. ‘निराला’ चित्रपटात ती देव आनंदबरोबर काम करत होती. काम करता करता तिला एकदम हसू फुटलं. मी तेव्हा सेटवर जेवण घेऊन गेलो होतो. तिचं हसू थांबेचना. शेवटी वेळेआधीच लंच टाइम घोषित करण्यात आला. जेवताना देव आनंदने तिला हळुवारपणे सांगितलं, की तुझ्या या सुंदर हसण्यानं कामातली एकाग्रता भंग पावते आहे. मी डिस्टर्ब होतोय. तिनं त्याच्या या बोलण्याचं दु:ख वाटून घेतलं नाही किंवा तिला ते बोलणं म्हणजे आपला अपमानही वाटला नाही. तिनं क्षणात देव आनंदची माफी मागितली.

ती अतिशय वक्तशीर होती. काय वाटेल ते झालं तरी सेटवर वेळेवर पोहोचलंच पाहिजे, हा तिचा दंडक होता. मुंबईत एकदा प्रचंड पाऊस झाला. तेव्हाही मुंबईत ट्रॅफिक जाम होत असे. रस्त्यावर पाणी तुंबत असे. आमच्या जवळच रूपतारा स्टुडिओ होता. तिथं तिचं शूटिंग होतं. पावसातून रस्त्यातील चिखल तुडवत मधुबाला तिथं कशीबशी पोचली. तिथं गेल्यावर तिला पाहून जे लोक त्या तशा पावसातही शूटिंगला हजर राहिले होते त्यांना धक्काच बसला. तिला शूटिंग रद्द झालेलं आहे हे कुणीच सांगितलं नव्हतं. मधुबालाच्या अंगात तेव्हा चांगलाच ताप भरलेला होता. पण बांधिलकीच्या भावनेतून ती तिथं पोचली होती. हे माझ्या कानावर आलं. मी तिला ‘प्रीतम’मध्ये घेऊन आलो. तिला गरमागरम चहा पाजला. मग ती घरी परतली.

तिला बऱ्याच वेळा एकाकी वाटत असे. देव आनंदमुळे तिला वाचनाची सवय लागली होती. ती बऱ्याचदा सेटवर वाचत बसे. दिलीपकुमार प्रकरणानंतर तिला अधिकच उदास वाटू लागलेलं. अशावेळी तिची उदासी दूर करायला तिच्या आयुष्यात आला एक मस्त कलंदर. या मस्त कलंदराबरोबर तिनं लग्नही केलं. त्या लग्नानं तिला बरंच काही दिलं.. आणि बरंच काही हिरावूनही घेतलं.

त्याबद्दल पुढच्या वेळी..

ksk@pritamhotels.com

शब्दांकन : नीतिन आरेकर