कुलवंतसिंग कोहली

हे जग सुंदर आहे.. ते मी अधिक सुंदर करू शकेन याचा मला विश्वास असायला हवा. खरं सांगू? आज वयाच्या ८५ व्या वर्षी मागे वळून जेव्हा मी पाहतो तेव्हा हेच जाणवतं, की नियतीनं मला जो छोटासा चौकोन दिला, तो मी सुंदर करण्याचा प्रयत्न केला. त्यात किती यश लाभलं याचा हिशेब ती नियतीच करील. एक नक्की : तो हिशेब मी नाही करणार. तसं करत बसलो तर अहंकाराचा वारा मनाला स्पर्शून जाईल! वाहेगुरूंनी जे सांगितलंय, तेच ज्ञानदेवांनी सांगितलंय.. ‘बापरखुमादेवीवरू विठ्ठले अíपला.’ जे जे केलं ते त्याच्या चरणी रुजू आहे.

Mumbai temperature at 37 degrees
मुंबईचा पारा ३७ अंशावर
navi mumbai accident marathi news
नवी मुंबई: भीषण अपघातात एकाचा मृत्यू, आरोपी फरार
youth drowns at mahim beach after holi celebration
माहीमजवळ समुद्रात बुडून एकाचा मृत्यू; तिघांना वाचविले; एक बेपत्ता
Pune Division , Central Railway, miraj, mega Block , 29 march 2024, Trains Cancelled, Rescheduled,
रेल्वेचा मेगाब्लॉक! पुणे-मिरज दरम्यान अनेक गाड्या रद्द

माझे पापाजी रावळिपडीहून मुंबईला आले. मुंबईहून परत पिंडीला गेले. परत एकदा मुंबईला आले. पुन्हा मुंबई सोडून दुसरीकडे जायला निघाले. आणि माझ्या बिजीच्या मनात आलं : आपण दादरला उतरावं, इथंच राहावं, इथल्या मातीत रुजावं. ही माती पण छान.. स्वीकारशील. तिनं पंजाबी बियाण्याचं कलम आपल्यात रुजवून घेतलं, ते फुलवलं आणि त्याचं मोठय़ा वृक्षात रूपांतर केलं. आज एक समाधान वाटतं, की आमच्या ‘प्रीतम पंजाब हिंदू हॉटेल’ या नावाच्या छोटय़ाशा टपरीनुमा रेस्टॉरंटला आज प्रीतम रेस्टॉरंट, पार्क वे, प्रीतम ढाबा, मिडटाऊन प्रीतम, ग्रँडममाज्, टर्टुलिआ अशा अनेक फांद्या उपजल्या आहेत. पंधराशेहून अधिक कुटुंबं या ‘प्रीतम’च्या सावलीत आहेत. एका छोटय़ाशा कुटुंबाची मुंबईच्या घडणीत ही छोटीशी भर!

पापाजींनी मला एक सल्ला दिला होता, तो म्हणजे ‘व्यवसायासाठी कधीही कर्ज काढू नकोस. आणि काढलेस तर त्याचे हप्ते वेळेवर भरत जा. एका कर्जावर दुसरं कर्ज म्हणजे बुडित बँकेवरची हुंडी!’ पशांची कदर असायलाच हवी असं त्यांचं म्हणणं असायचं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण मला पापाजी दरमहा शंभर रुपये पगार देत असत. ही गोष्ट आहे १९५२-५३ ची. तेव्हा शंभर रुपये म्हणजे खूप असायचे. मी व माझी पत्नी- आम्ही दोघं त्यावेळी फिरायला म्हणून टॅक्सीने दादरहून फोर्टला जायचो, गेटवे ऑफ इंडियाला भटकायचो, नंतर समोरच्या ताजमध्ये जेवण करायचो आणि परत यायचो. या सगळ्या गोष्टी जेमतेम दहा रुपयांत व्हायच्या. टोनीचा जन्म झाला तेव्हा मी बिजीला म्हणालो, ‘‘मला थोडे जास्त पसे द्यायला सांग ना पापाजींना.’’ पापाजींसमोर अशी मागणी करायची माझी हिंमत नसायची. तर तीच मला ओरडली, ‘‘तुला आणखी पसे कशाला हवेत? सगळं काही घरात मिळतं. तुला खर्चच काय आहे? बाहेर भटकून मित्रांवर पसे उडवायचे असतील तर तसं चालणार नाही. निमूटपणे जे चाललंय तसंच चालू दे. पापाजींना सांगू नकोस. ते आणखी ओरडतील तुला.’’ मी चूप बसलो.

टोनी तीन वर्षांचा होईपर्यंत माझा पगार तेवढाच होता. एकदा सहज बोलतोय असं दाखवून पापाजी म्हणाले, ‘‘कुलवंत, शंभर रुपये पुरत असतील ना तुला? माझा तर अंदाज आहे- त्यातलेही थोडे पसे तू बाजूला काढून साठवून ठेवत असशील.’’ ते खरंच होतं. माझी पत्नी दरमहा वीस-पंचवीस रुपये वाचवत असे आणि तिच्याजवळ साठवून ठेवत असे.

पुढे मला व्यवसायातली गणितं नीट कळत आहेत आणि मी तो बऱ्यापकी करू शकेन असा विश्वास आल्यानंतर पापाजींनी हळूहळू माझ्यावर व्यवसाय सोडून दिला. काही वेळा माझ्याकडून एखादी चूक घडली तर मात्र ते ओरडत असत. पण ते मला ओरडले हे मी कधीही बिजीला किंवा पत्नीला सांगितलं नाही. पापाजीच बिजीला सांगायचे. मग वेळ बघून ती मला विचारायची, ‘‘आज पापाजींचं आणि तुझं काही झालं का? ते तुला ओरडले का?’’ मी उत्तरत असे- ‘‘हा बीजी, मेरी गलती हो गयी थी।’’ त्यावर ती मला सांगे, ‘‘बघ बाळा, तुला आत्ता ते ओरडले. पण त्यांच्या ओरडण्याचा हेतू लक्षात घे. त्यांच्याकडे आयुष्याचा अनुभव आहे. आणि तू अजून लहान आहेस. काही काळ गेल्यावर तुला कळेल, की वडलांनी सांगितलेलं सोळा आणे खरं होतं. त्याचा राग मानून घेऊ नकोस.’’

काही दिवसांनी आम्ही प्रीतम जिथं होतं, त्याच्यावरील तिसऱ्या मजल्यावर राहायला आलो. प्रीतमचं काम वाढत गेलं. त्याची लोकप्रियता वाढत गेली. मग पापाजी दररोज संध्याकाळी खाली येऊन बसत असत. आजूबाजूला काय चाललंय, याकडे फक्त बघत असत. त्यांना मद्यपान आवडत असे, पण त्या मद्यपानाला त्यांनी स्वत:वर आरूढ होऊन दिलं नाही. बिजी- माझी आई ही अशिक्षित होती, पण अनुभवानं आणि उपजत बुद्धिमत्तेनं तिला विशिष्ट तर्कशास्त्र दिलं होतं. दादरमध्ये प्रीतम थाटायचं ही तिची कल्पना. तिच्या मतांवर ती ठाम असायची. ती पापाजींनाही आपलं मत पटवून द्यायची. त्यांच्यात मतभेदही व्हायचे. पण अंतिमत: तिचं मत स्वीकारलं जायचं. आणि तेच योग्य होतं असं नंतर सिद्ध व्हायचं. तिला लिहिता-वाचता यायचं नाही, पण महत्त्वाची कागदपत्रं कोणती आहेत, हे तिला समजायचं. ते सर्व ती जपून ठेवायची. पापाजींनी कधी मागितले, की तत्परतेनं ती संबंधित कागदपत्रं आणून द्यायची.

आमच्या प्रीतमची ती पहिली शेफ! तिनं प्रीतमची शेगडी सुरू केली. माझी श्रद्धा आहे- म्हणूनच आम्हाला बरकत आहे. बिजीनं आमच्या स्वयंपाकघरातील पदार्थ ठरवले, त्यातील मसाल्यांचं, तिखटा-मीठाचं प्रमाण ठरवलं. ती व पापाजी स्वत: सकाळी आणि संध्याकाळी दादरच्या भाजीबाजारात जाऊन भाज्या आणायचे. प्रत्येक वेळच्या जेवणासाठी ताज्या भाज्या वापरायची त्यांनी शिस्त घालून दिली. तिचं पालन आम्ही आजही करत असतो. माझं लग्न झाल्यावर ती दादरच्या मार्केटमध्ये माझ्या पत्नीला- मिहदर कौरला सोबत घेऊन जाऊ लागली. अनेक वर्षे लोकांना माहीत नव्हतं, की बिजीसोबत येणारी स्त्री ही तिची सून आहे. सगळे समजायचे, की ती तिची मुलगीच आहे. असं बिजीचं वागणं होतं. माझी पत्नीही तिची मुलगी असल्यासारखंच वागायची. मी सदैव आपल्या व्यवसायात बुडालेला. तशात सामाजिक उपक्रमांत हिरीरीनं भाग घेणारा. माझ्या पत्नीनं घरची आघाडी सांभाळली. मला मुलांनी कोणत्या शाळेत प्रवेश घ्यावा, त्यांनी भविष्यात काय करावं, यांसारखे प्रश्न कधी पडले नाहीत. ते सर्व पत्नीने सांभाळलं. ती माझ्या आयुष्यातली गृहिणी, सखी, सचिव, अर्धागिनी वगरे नाही; ती माझं आयुष्य आहे!

आमच्या मुलांवर आमचं खूप प्रेम आहे. टोनीनं मुंबईतच शिक्षण घेतलं. पण गोगीनं आपण अमेरिकेत एम.बी.ए.च्या शिक्षणासाठी जायचं असं मनाशी ठरवलं होतं. पापाजी व माझ्यासमोर त्यानं हा प्रस्ताव मांडला. मीही त्याला नाराज करायचं नाही म्हणून होकार दिला आणि एक गोष्ट त्याला बजावून सांगितली. ती म्हणजे- ‘‘तुझ्यात हिंमत असेल तर सर्व धडपड तुझी तुलाच करावी लागेल.’’ मला वाटलं, तो गप्प बसेल. पण त्यानं सगळी माहिती काढली. अनेक अमेरिकी विद्यापीठांत अर्ज केले. संबंधित परीक्षांत त्यानं उज्ज्वल यश मिळवल्यानं त्याला सर्वानीच प्रवेश देऊ केला. त्यानं कॅलिफोर्नियातील विद्यापीठ निवडलं. याचं कारण माझा एक पुतण्या तिथं होता.

तो कॅलिफोर्नियाला गेला आणि मग मला त्याची अनुपस्थिती प्रकर्षांनं जाणवू लागली. तो सतत डोळ्यांसमोर येऊन उभा राही. रात्री-अपरात्री मी त्याच्या खोलीत जाऊन बसे. त्याच्या रिकाम्या कॉटवरून, उशीवरून हात फिरवत बसे. शेवटी तीन आठवडय़ांनी मी टोनीला म्हणालो, ‘‘तू तुझ्या बायकोला घेऊन अमेरिकेला जा. गोगीला समजावून सांग. त्याला काही देशांची सर घडव आणि परत घेऊन ये.’’ टोनीला गोगीचं मन माहिती होतं. तो मला म्हणाला, ‘‘डॅडी, हे बरोबर नाही. आपण त्याचं मन का मोडावं?’’ पण मला राहवेना. मी सरळ गोगीला फोन लावला. त्याला सांगितलं, ‘‘बेटा, तू परत ये. तुझ्यावाचून मी राहू शकत नाही.’’ बोलता बोलता माझ्या गळ्यात आवंढा आला. मी फोनवरच रडलो. गोगी म्हणाला, ‘‘डॅडी, मला इमोशनली ब्लॅकमेल करू नका.’’ त्यानं खूप मनधरणी केली. टोनी, त्याची पत्नी, माझी पत्नी सगळ्यांनी रदबदली केली. पण माझं मन ते समजून घेईना. मी आजारी पडायची वेळ आली. शेवटी टोनी त्याच्या पत्नीबरोबर अमेरिकेला गेला. गोगीला त्यानं काही ठिकाणी फिरवलं आणि माझा गोगी परत आला. त्याला मिठी मारून त्याचा हात हातात धरून मी खूप वेळ बसलो होतो.

मी त्यावेळी खालसा कॉलेजच्या संचालक मंडळाचा सदस्य होतो. खालसाचे प्राचार्य डॉ. जगजितसिंग यांना गोगी खूप आवडायचा. त्यांचं एक वेगळं नातं होतं. गोगीनं त्यांना सांगितलं, ‘‘मला पापाजी परत घेऊन आले. मला एम.बी.ए. करायचंच आहे, पण त्याचबरोबर मला लॉसुद्धा करायचं आहे.’’ त्यांनी त्याला सगळी मदत केली. गोगीनं अर्धवेळ एम.बी.ए. केलं. लॉच्या परीक्षेत तो महाराष्ट्रात पहिला आला.

मग माझ्या आणि टोनीसोबत त्यानं स्वत:हून प्रीतममध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. टोनी आणि गोगीनं आधी सर्व डिपार्टमेंट्समध्ये काम केलं. किचनमध्ये काम करणं हे हॉटेल व्यवसायातलं सर्वात महत्त्वाचं काम. अन्नपूर्णेचे पुजारी कशा पद्धतीनं स्वयंपाक करतात, त्यांचा तिखटा-मीठाचा, मसाल्यांचा अंदाज किती पक्का असतो, हे समजल्याशिवाय हा व्यवसाय कोणाला उलगडणारच नाही. मला आणि त्या दोघांना तंदूरमध्ये रोटी भाजता येते. तशीच जर कोणती अडचण निर्माण झाली तर आम्ही अडू देणार नाही याची आम्हाला खात्री आहे!

या दोघांची मुलंही याच व्यवसायात स्वत:हून आली. आम्ही त्यांच्या मागे लागलो नाही. टोनीचा मुलगा अभयराज. तो अमेरिकेत कॉन्रेलला शिकला. त्यानं जेव्हा माझ्यासमोर अमेरिकेत शिकायला जाण्याचा प्रस्ताव मांडला, तेव्हा मात्र मी गोगीच्या वेळी केली तशी चूक केली नाही. मी टोनीला म्हणालो, ‘‘तुझीही तयारी आहे तर आपण स्वत: जाऊन अभयराजची अ‍ॅडमिशन घेऊ.’’ मग मी, माझी पत्नी, टोनी, टोनीची पत्नी अनीता कौर असे सगळे कॉन्रेलला गेलो होतो!

प्रीतमच्या इमारतीतच सीसीडी होतं. ते आमचे भाडेकरू होते. त्यांची मुदत संपल्यावर तो गाळा आम्ही परत घेतला आणि तिथंच आम्ही प्रीतम ज्यूसेट सुरूकेलं. अभयराज परतल्यावर त्यानं ज्यूसेट बंद करू असा प्रस्ताव मांडला. तो म्हणाला, ‘‘मला आजीच्या नावानं काहीतरी सुरू करायचंय.’’ आणि त्यानं त्या जागी तरुणाईला आवडेल अशा खाद्यपदार्थाचं रेस्टॉरंट सुरू केलं- ‘ग्रँडममाज्’! आज त्याच्या अनेक शाखा आहेत. गोगीचा मोठा मुलगा जयबीरसिंग हा त्याच्यापेक्षा हुशार आहे. तो सध्या स्वित्र्झलडमध्ये केटिरग शिकतोय आणि त्याच्या कॉलेजात तो पहिलाच आहे. जयच्या भावाला- जोहानसिंगलाही त्यातच रुची आहे. तो दिल्लीत केटिरग शिकतोय. माझ्या लेकीचा- जसदीप कौरचा मुलगा इमरूनला दिल्लीच्या प्रदूषणाचा त्रास होत असे. तो मुंबईत आला आणि त्यानं शिक्षण संपवून ‘टर्टुलिया’ नावाच्या रेस्टॉरंट्सची साखळी उभी केली आहे. किटी पार्टीज् हा मुंबईतल्या स्त्रीवर्तुळातला आवडीचा भाग. किटी पार्टीज्च्या निमित्तानं सासू-सुनांच्या उखाळ्यापाखाळ्या काढण्याची ती जागा आहे. टोनीच्या पत्नीला ते काही आवडत नाही. आम्ही तिला स्टोअरचं काम बघण्याचं सुचवलं. ती ते काम बघते. गोगीची पत्नी गुंजन कौर अकाऊंट्स बघते. त्यामुळे आमचा सगळा व्यवसाय आता इन्टॅक्ट आहे.

वेगवेगळ्या नावांनी जरी हे व्यवसाय सुरू असले तरीही त्यांना बांधून ठेवणारा धागा आहे- ‘प्रीतम’! या नावामुळे आम्ही एक आहोत. अलीकडच्या काळात उद्ध्वस्त होत जाणारी कुटुंबव्यवस्था पाहून मला अस्वस्थ व्हायला होतं. आमचा एकत्र कुटुंबपद्धतीवर अतिशय विश्वास आहे. पापाजींचा एकत्र परिवार होता. सहा भावंडांची सहा घरं होती खरी, पण त्या घरांना एक करणारं छत त्या सहाही घरांना बांधून ठेवत होतं. पापाजींचा आपल्या भावंडांवर विश्वास होता. म्हणूनच माझे पापाजी त्यांच्या जिवावर मला व माझ्या बिजीला रावळिपडीत ठेवून मुंबईत येऊ शकले. आजसुद्धा माझी मुलं, नातवंडं, सुना, नातसुना असे आम्ही सारे एकत्रच राहतो. सर्वाना निवडीचं स्वातंत्र्य आहे. पण स्वातंत्र्यातला संयम त्यांना कळतो. मुलांच्या क्रेडिट कार्डची बिलं ते स्वत:च माझ्या सहीसाठी पाठवतात. मी त्यांना म्हणतो, ‘‘अरे, हे तुमचं वैयक्तिक आहे.’’ तर ते म्हणतात, ‘‘नाही पापाजी, आम्ही काय करतो, हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे.’’ घरातला म्हातारा माणूस त्यांना ओझं वाटत नाही, तर तो आपला मार्गदर्शक वाटतो. अजून काय हवं?

मित्रांनो, हे सदर मला टाइम मशिनप्रमाणे वाटत आलंय. त्यानिमित्तानं तुमच्या सोबत आयुष्यातील उलटून गेलेल्या पानांपर्यंत पुन्हा जाऊन मला पोचता आलं. ती पानं नव्यानं जगता आली. काय कमावलं, काय गमावलं, याचा हिशेब मांडता आला. एका ‘प्रीतम’पुरता होतो तो लाखो लोकांत वाटला गेलो. पण या प्रवासात काही मंडळींबाबत लिहायचं होतं ते मात्र राहून गेलं. मला माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, संगीतकार खय्याम, राजिंदरसिंग बेदी, महेंद्र कपूर, माझे शेरीफपदाचे दिवस याबद्दल तुमच्याशी बोलायचं होतं. पण ते राहून गेलं. पुन्हा केव्हातरी! गेले ५१ आठवडे आपण दर रविवारी भेटत होतो. आज या आठवडी भेटीगाठींना इथे या सदरात विराम देण्याची वेळ आली आहे. दिवस, आठवडे, महिने कसे गेले कळलंच नाही. दर आठवडय़ाला अक्षरश: शेकडय़ांनी ई-मेल येत होते, पत्रे येत होती. मी किमान धन्यवाद तरी देण्याचा प्रयत्न केला. पण काही वेळा ते जमलं नाही. त्याबद्दल आपण मला क्षमा करावी.

प्रत्येक चांगल्या गोष्टीला एक शेवट असतो. पण ‘शेवट’ हे ‘संपणं’ नसतं, ती पुन्हा एका नव्या पर्वाची सुरुवात असते. तुमच्या आयुष्यातील एका नव्या सुरुवातीसाठी तुम्हाला शुभेच्छा!

ksk@pritamhotels.com

शब्दांकन : नीतिन आरेकर

(समाप्त)