काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने मराठा व मुस्लिमांना आरक्षण देऊन त्यांना चुचकारण्याचा प्रयत्न केला असतानाच आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विविध जातीपातींना आपल्याकडे कसे खेचता येईल या दृष्टीने भाजपने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. या पाश्र्वभूमीवर भाजपने समाजकारणात सक्रिय असलेल्या जातीपातींना ‘लक्ष्य’ केले आहे. त्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवण्यास पद्धतशीरपणे सुरुवातही केली आहे. मराठा, धनगर, कोळी, ओबीसी समाजाला मेळविण्यासाठी घटकपक्षांवर अवलंबून राहण्यापेक्षा थेट पक्षाशी जोडून स्वतची ताकद वाढविण्यावर भाजपने भर दिला आहे.
लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यावर राज्यात सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीने मराठा व मुस्लिम आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. तर धनगरांना अनुसूचित जमातीमध्ये टाकण्याचा मुद्दा पेटविण्यात आला. धनगरांबाबतचा निर्णय केंद्र सरकारच्या अखत्यारित असल्याने भाजपची कोंडी करण्याचा राज्यातील सत्ताधाऱ्यांचा डाव आहे. मात्र, आदिवासी मंत्र्यांनी आणि या समाजाच्या नेत्यांनीच जोरदार विरोध केल्याने सरकारची पंचाईत झाली आहे. त्याचा फायदा उठविण्याचे प्रयत्न भाजपकडून केले जात असून धनगरांचे बेमुदत उपोषण यशस्वी मध्यस्थी करून संपविण्यात आले. महायुतीची सत्ता आल्यावर धनगरांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देऊन या समाजाला आपल्याबरोबर घेण्यासाठी प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस व पंकजा मुंडे यांनी पावले टाकली.
विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी कोळी आणि मराठा समाजाच्या मेळाव्यांमध्ये सहभागी होऊन या समाजाच्या नेत्यांशी समन्वयाचे प्रयत्न सुरू केले आहेत. मुंबईसह कोकणपट्टीत कोळी समाज मोठय़ा प्रमाणावर आहे. मराठा समाजाच्याही अनेक संघटना असून त्यांच्या नेत्यांशी तावडे यांनी संपर्क सुरू केला आहे.
ओबीसी समाजातील नेत्यांना भाजपसोबत घेण्याची जबाबदारी पंकजा मुंडे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यादृष्टीने प्रदेश भाजप नेत्यांचे विभागवार मेळावे व सभांचे कार्यक्रम पुढील दोन आठवडय़ात पार पडतील.

नेते व जबाबदारी
* विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे पंकजा मुंडे : उत्तर महाराष्ट्र व मराठवाडा
* प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस : विदर्भातील काही भाग व रत्नागिरी जिल्हा
* विनोद तावडे : विदर्भातील काही भाग, मुंबई-ठाणे व सिंधुदुर्ग
* सुधीर मुनगंटीवार : विदर्भात मेळावे