आमदार मंगलप्रभात लोढा यांना लोकसभेसाठी भिवंडीतून उमेदवारी देण्यास स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी तीव्र विरोध केला असून, त्यांनी प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रदेश नेत्यांच्या भेटी घेतल्या. मात्र हा विरोध थंड करून त्यांनाच उमेदवारी मिळण्याची चिन्हे आहेत. भाजप लढवीत असलेल्या उर्वरित मतदारसंघांतील उमेदवार निश्चितीसाठी बुधवारच्या बैठकीतही एकमत न झाल्याने गुरुवारी नवी दिल्लीत होणाऱ्या पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत दोन-तीन जागांवरील उमेदवारांचा निर्णय होणे अपेक्षित आहे. उत्तर-मध्य मतदारसंघातून पूनम महाजन, तर सोलापूरमधून शरद बनसोडे यांची निवड होण्याची शक्यता आहे.
उमेदवार ठरविण्यासाठी भाजपच्या सुकाणू समितीची बैठक बुधवारी झाली. त्यास ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे आले नाहीत. देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, एकनाथ खडसे, सुधीर मुनगंटीवार आदी नेत्यांच्या झालेल्या बैठकीत उत्तर-मध्य, सोलापूरचा निर्णय झाला. पुण्यातील उमेदवारीसाठी मुंडे-गडकरी गटात मतभेद असल्याने गिरीश बापट की अनिल शिरोळे यांच्याबाबत निर्णय होऊ शकला नाही. प्रकाश जावडेकर यांचे नावही पुढे आले आहे. त्यामुळे पुणे व लातूरबाबत १८ मार्चनंतर निर्णय होईल. अन्य पक्षांचे उमेदवार पाहून भाजप निर्णय घेणार आहे.
भिवंडीतून आगरी किंवा कुणबी समाजाचा उमेदवार दिल्यास विजय निश्चित असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. धुळे व रावेर मतदारसंघातून जाहीर करण्यात आलेला उमेदवार बदलावा, अशी मागणी पक्षनेतृत्वाकडे करण्यात आली आहे. धुळ्याबाबत काही विचार होण्याची शक्यता असून रावेरमध्ये एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे यांच्या नावाचा विचार सुरू आहे. नगर व नांदेडमधील उमेदवार बदलाची मागणी होत असून, त्याचा मात्र सध्या विचार सुरू नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.