ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला राम राम ठोकून भिवंडी मतदारसंघातून भाजपचे उमेदवार म्हणून लढत असलेल्या कपिल पाटील यांचा शनिवारी ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सर्वसाधारण सभेत सपशेल पराभव झाला़ त्यामुळे महायुतीला मोठा धक्का बसला आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेत राष्ट्रवादीचे बहुमत असून कपिल पाटील अध्यक्ष होते. मात्र राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊनही त्यांनी बँकेचे अध्यक्षपद सोडले नव्हते. त्यामुळे बँकेच्या एकूण २८ पैकी राष्ट्रवादीच्या २१ सदस्यांनी सहनिबंधकांकडे अध्यक्षांविरूद्ध अविश्वास ठराव मांडला होता. या ठरावाविरूद्धची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर पूर्वनियोजित वेळेनुसार झालेल्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादीची २१, बहुजन विकास आघाडीची ३ तसेच मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे १ अशा २५ मतांनी कपिल पाटील यांच्याविरूद्धचा अविश्वास ठराव संमत करण्यात आला.

४०० समाजकंटक तडीपार
मुंबई : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभा अनुक्रमे रविवारी व सोमवारी होत असताना पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. या सभांमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई सुरू करण्यात आली असून आतापर्यंत चारशेहून अधिक समाजकंटकांना तडीपार करण्यात आले आहे. या दोन्ही सभा वांद्रे-कुर्ला संकुलात ज्या ठिकाणी होणार आहेत त्या मैदानाची व आसपासच्या परिसराची कसून तपासणी करण्यात आली आहे. याशिवाय  गुन्हे अन्वेषण विभागाचे साध्या वेशातील अधिकारीही सभास्थानी तैनात करण्यात आले आहेत.

राज्यात ६३ टक्के मतदान
मुंबई : राज्यात आतापर्यंत २९ मतदारसंघांमध्ये सरासरी ६३ टक्के मतदान झाले आहे. हाच कल मुंबई, ठाणे परिसरात कायम राहतो का, याबाबत मात्र साशंकता आहे. विदर्भात पहिल्या टप्प्यात झालेल्या १० मतदारसंघांमध्ये ६२.८८ टक्के मतदान झाले होते. दुसऱ्या टप्प्यात १९ मतदारसंघांमध्ये ६२.८४ टक्के मतदान झाले. गतवेळच्या तुलनेत आतापर्यंत राज्यातील मतदानात १३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. राज्यात आतापर्यंत सर्वाधिक ७३ टक्के मतदान हे हातकणंगले मतदारसंघात झाले असून, भंडारा- गोंदिया आणि कोल्हापूरमध्ये प्रत्येकी ७२ टक्के मतदान झाले. पुण्यात केवळ ५४.२४ टक्के मतदान झाले असले तरी
गतवेळच्या तुलनेत १४ टक्क्यांनी वाढ झाली आहे.