बिगररालोआ पक्षांचा मोदीविरोधी सूर गेल्या दोन दिवसांत टिपेला गेला असतानाच बुधवारी गांधीनगर येथे मतदान करून बाहेर पडताच लोकांसमोर भाषण केल्याने आणि कमळ हे भाजपचे निवडणूक चिन्ह उंचावून दाखवल्याने निवडणूक आयोगाने नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा नोंदविण्याचे आदेश गुजरातच्या प्रशासनाला दिले. आयोगाच्या आदेशानुसार सायंकाळी सहापर्यंत मोदींविरोधात प्राथमिक तक्रार नोंदविण्यात आली.
उमेदवार मतदान करून बाहेर पडल्यावर पत्रकारांशी दोन-चार वाक्ये बोलतात. गांधीनगर येथे मतदान करून बाहेर पडल्यावर मोदी यांना अनेक पत्रकारांनी घेरले आणि त्यांच्याशी सुरू झालेल्या संवादाला पत्रकार परिषदेचेच रूप आले. त्यात मोदी यांनी कमळ हे निवडणूक चिन्ह उंचावून दाखवले, भाजपलाच मत देण्याचे आवाहन केले आणि काँग्रेसवर सडकून टीका केली. त्यामुळे काँग्रेस महासमितीचे के. सी. मित्तल यांनी तात्काळ निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल केली. आयोगाने संपूर्ण चित्रफित पाहून कारवाईचा निर्णय घेतला.
आयोगाने म्हटले आहे की, मोदी यांनी गुजरातच्या तसेच देशाच्या इतर काही भागांत निवडणूक सुरू असताना भाजपचे निवडणूक चिन्ह दाखवून आणि भाषण करून लोकप्रतिनिधीत्व कायदा १९५१ च्या कलम १२६ (१)अ आणि १२६ (१)ब यांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे मोदी यांच्यासह ती सभा आयोजित करणाऱ्यांवर प्राथमिक तक्रार किंवा गुन्हा नोंदवावा.
कुणीही मतदान केंद्रात जाताना टोप्या, निवडणूक चिन्हाचे कपडे, शाल घालून जाऊ शकत नाही असा एक नियम आहे त्याचाही आधार निवडणूक आयोगाने घेतला. आयोगाने त्या सभेचे चित्रीकरण करणाऱ्या दूरचित्रवाहिन्यांवरही कलम १२६ (१) अन्वये कारवाईचा आदेश दिला. मतदानाच्या ४८ तास आधी कोणत्याही सभेचे प्रक्षेपण करता येत नाही तसे केल्यास तो कायद्याचा भंग आहे, असे आयोगाने म्हटले आहे.
भाजपच्या प्रवक्त्या मीनाक्षी लेखी यांनी, निवडणूक आयोगाचा आदेश मान्य आहे, असे सांगितले. मात्र मोदींनी आचारसंहितेचा भंग केला नसल्याचा दावाही त्यांनी केला. मोदी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यास मर्यादा माहीत हव्यात, असे आपने नोंदवले.

जेव्हा मोदीही ‘सेल्फी’ छायाचित्र घेतात..
नरेंद्र मोदी यांनी मतदान केंद्रातून बाहेर पडल्यावर ‘सेल्फी छायाचित्र’ काढले. ते मतदानासाठी येताच ‘मोदी..’ असा एकच जयघोष सुरू झाला. मोदींनी खुर्चीवर बसले असताना अचानक एका जवानाला बोलावले व त्याला उत्तम क्षमतेचा कॅमेरा खिशातून काढून द्यायला सांगितला व त्याने सेल्फी छायाचित्र काढले. छायाचित्र काढताना काही अडथळे येत होते. त्यांनी पुन्हा जवानास बोलावून मोबाईल कॅमेरा उघडण्यास सांगितले. शेवटी मोदींनी त्यांचे शाई लावलेले बोट व कमळाचे चिन्ह दिसेल असे छायाचित्र काढले.