लोकसभा निवडणुकीत घडय़ाळाची टिकटिक मंदावल्याने धास्तावलेले पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी आता दररोज पक्षाच्या मुख्यालयात ठाण मांडण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुका दुरुस्त करण्याच्या दृष्टीने त्यांनी नियोजन सुरू केले आहे.
लोकसभा निवडणुकीत झालेल्या पक्षाच्या दारुण पराभवाने कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खचले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत चित्र बदलण्याबाबत कार्यकर्त्यांत साशंकता आहे. अशा वेळी कार्यकर्त्यांना कामाला लावण्याकरिता स्वत: पवार यांनी लक्ष घातले आहे. २००९ मध्ये लोकसभा निवडणुकीची जबाबदारी पवार यांनी तरुण नेतेमंडळींकडे सोपविली होती, पण त्याचा फारसा काही चांगला परिणाम न बघायला मिळाल्याने गेल्या विधानसभा निवडणुकीत पवार यांनी लक्ष घातले होते व त्याचा परिणाम पक्षाची कामगिरी सुधारली होती.
 यंदा लोकसभा निवडणुकीची सारी सूत्रे पवार यांच्याकडे होती, पण मोदी लाटेत पक्षाचा पार सफाया झाला. काँग्रेसच्या तुलनेत जास्त जागा मिळाल्या एवढीच राष्ट्रवादीसाठी समाधानाची बाब ठरली. लोकसभा निवडणुकीत पराभव झाला तरी खचून न जाता विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागण्याचा आदेश पवार यांनी दिला असून, गुरुवारी व शुक्रवारी पक्षाचे मंत्री, नेते, लोकप्रतिनिधी यांच्याकडून आढावा घेतला जाईल, असे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी सांगितले.
प्रति राष्ट्रवादी काँग्रेस?
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी पवार यांनी बैठकांचे सत्र सुरू केले आहे. लागोपाठ दुसऱ्या दिवशी पवार हे पक्षाच्या मुख्यालयात उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांच्यासह अन्य नेत्यांशी त्यांनी चर्चा केली. राष्ट्रवादी काँग्रेस या नावाने अन्य एका पक्षाची नोंदणी करण्यात आली आहे. या विरोधात निवडणूक आयोगाकडे सुरू असलेल्या सुनावणीत सारी कागदपत्रे जमा करणे, जुने दाखले याची माहिती पवार यांनी जमा केली आहे.