लोकसभा निवडणुकीत एकही उमेदवार निवडून येणे तर सोडाच पण रिंगणात असलेल्या सर्व उमेदवारांचे डिपॉझिटच जप्त झाल्याची नामुष्की ओढवून घेणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला विधानसभेत मात्र याउलट चित्र असेल असा ठाम विश्वास आहे. मोदीलाटेचा फटका बसला असला तरी सेना-भाजपच्या राज्यातील सुमार कामगिरीमुळे विधानसभेत मनसेला त्याचा फायदा होईल असा विश्वास मनसे आमदार व सरचिटणिसांच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. आज, गुरुवारी राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक माटुंगा येथील यशवंत नाटय़गृहात आयोजित करण्यात आली आहे.
मनसेच्या आमदार व सरचिटणीसांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत लोकसभा निवडणुकीतील पराभवाचे चिंतन करण्यात आले. यापूर्वीही लोकसभा निवडणुकीत भल्याभल्यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे डगमगून जाण्याचे कारण नाही, असे मत मनसेच्या पदाधिकाऱ्याने यावेळी व्यक्त केले. महाराष्ट्रातील विधिमंडळात सेना-भाजपची कामगिरी सुमार राहिलेली आहे. महापालिका निवडणुकीत सेना-भाजपचा विजय झाल्यानंतर मुंबईकरांसाठी ‘बुरे दिन शुरू है’ असेही मनसेच्या एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले. संपूर्ण मुंबईत जागोजागी अनधिकृत बांधकामे व झोपडय़ा उभ्या राहात आहेत. अनधिकृत फेरीवाल्यांनी एकही पदपथ मोकळा सोडलेला नाही.
मुंबईतील रस्त्यांची कोटय़वधी रुपयांची कामे मंजूर करूनही निम्म्याहून अधिक कामांना सुरुवातही होऊ शकलेली नाही. एकीकडे मुंबईत पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे तर दुसरीकडे कोटय़वधी रुपये खर्चूनही चोरी आणि गळती रोखण्यात पालिकेत सत्तेवर असलेल्या सेना-भाजपला यश आलेले नाही. त्यातच वाढती अतिक्रमणे कोणाच्या आशीर्वादाने उभी राहतात त्याची लोकांना कल्पना असल्याचे मनसेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
 मुंबई, ठाणे, पुणे, कल्याण-डोंबिवली येथील सेनेच्या कारभाराबाबत लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे हे लक्षात घेता विधानसभेत लोकांपर्यंत पोहोचल्यास निश्चित चित्र बदलेले असा विश्वास मनसेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. ३१ मे रोजी सोमय्या मैदानात आयोजित करण्यात आलेल्या सभेत पक्षाध्यक्ष राज ठाकरे मनसेच्या पराभवाची चर्चा करतील तसेच मरगळ झटकून कामाला लागण्याचे आदेश कार्यकर्त्यांना देतील, असेही सूत्रांचे म्हणणे आहे.