समाजवादी पक्षातून बाहेर पडलेल्या अमर सिंग आणि जया प्रदा यांना राष्ट्रीय लोकदलकडून (रालोद) उत्तर प्रदेशमधून लोकसभा निवडणुकीचे तिकीट देण्यात आले आह़े  रालोदमध्ये प्रवेश केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अमर सिंग यांना फतेहपूर सिक्री आणि रामपूरच्या खासदार जया प्रदा यांना बिजनोर लोकसभा मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आह़े रालोदचे प्रमुख अजितसिंग यांनी बागपतमधून निवडणूक लढविण्याचे ठरविले आहे, तर त्यांचा मुलगा जयंत चौधरी यांना मथुरा मतदारसंघात उमेदवारी दिल्याची घोषणा पक्षाच्या पहिल्या उमेदवार यादीत करण्यात आली आह़े  सात उमेदवारांच्या पहिल्या यादीत कर्तार सिंग भादना, अंजू उपाख्य मुस्कान आणि निरांजन धनगर यांच्याही नावांचा समावेश असून, त्यांना अनुक्रमे कैराना, बुलंद शहर आणि हाथरस येथून उमेदवारी देण्यात आली आह़े

पंजाबमध्ये काँग्रेस -पीपीपी आघाडी
चंडिगढ : पंजाबमध्ये काँग्रेसने मनप्रितसिंग बादल यांच्या नेतृत्वाखालील पीपल्स पार्टी ऑफ पंजाब (पीपीपी) या पक्षाशी लोकसभा निवडणुकीसाठी आघाडी केली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्या सूनबाई आणि भटिंडा मतदारसंघातील विद्यमान खासदार हरसिमत कौर यांच्याविरुद्ध मनप्रितसिंग बादल रिंगणात उतरणार आहेत. उर्वरित १२ जागा काँग्रेस लढणार आहे.मनप्रितसिंग बादल हे प्रकाशसिंग बादल यांचे पुतणे असून ते शिरोमणी अकाली दल-भाजप सरकारमध्ये अर्थमंत्री होते.

‘झामुमो’ नेते शिबू सोरेन दुमकामधून लढणार
रांची : झारखंड मुक्ती मोर्चाचे (झामुमो) सर्वेसर्वा शिबू सोरेन दुमका मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढविणार आहेत. त्यांचे सहकारी विजय हंसदा हे राज महाल मतदारसंघातून, तर आमदार जगन्नाथ महातो हे गिरिदिह मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत. झारखंड मुक्ती मोर्चाचे सरचिटणीस सुप्रियो भट्टाचार्य आणि विनोदकुमार पांडे यांनी मंगळवारी पक्षाच्या उमेदवारांची यादी जाहीर केली असली तरी जमशेदपूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही.झारखंड मुक्ती मोर्चाने काँग्रेसबरोबर निवडणूकपूर्व समझोता केला असून १० जागा आघाडीतील घटकपक्षांसाठी सोडल्या आहेत.

साराभाईंची निवडणुकीतून माघार
अहमदाबाद : प्रख्यात नृत्यांगना आणि आम आदमी पक्षाच्या सदस्य मल्लिका साराभाई यांनी लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. २००९ मध्ये त्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. ‘आप’च्या कुणीही आपल्याशी संपर्क साधलेला नाही असे त्यांनी स्पष्ट केले. अर्थात आपण आम आदमी पक्षाची कार्यकर्ती म्हणून काम करत राहू असे साराभाई यांनी स्पष्ट केले. त्यांनी ८ जानेवारीला आम आदमी पक्षात प्रवेश केला आहे. मल्लिकांनी पक्षकार्यात अधिक सक्रिय व्हावे, अशी अपेक्षा पक्षाचे राज्य समन्वयक सुखदेव पटेल यांनी स्पष्ट केले.

दंगलग्रस्तांनाही मतदार व्हायचेय!
मुझफ्फरनगर :दंगलीमुळे जिल्ह्यातील नव्या भागात स्थलांतरित व्हावे लागलेल्या मुझफ्फरनगरमधील सुमारे ३३ हजार लोकांनी मतदार यादीत नावनोंदणी करण्यासाठी अर्ज केल्याची माहिती संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याने मंगळवारी दिली़  दंगलग्रस्त मतदारांनीही लोकसभा निवडणुकीबाबत उत्साह दाखविला, ही जमेची बाजू मानण्यात येत आह़े तब्बल ३३ हजार २२ स्थलांतरित दंगलग्रस्तांनी नव्या ठिकाणांहून मतदार यादीत नाव नोंदणीसाठी अर्ज केला आहे आणि त्यांची नव्या ठिकाणाहून नोंदणी करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा न्यायदंडाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी कोशल राज शर्मा यांनी दिली़  या स्थालांतरितांना नोंदणी करणे शक्य व्हावे, यासाठी निवडणूक आयोग पुनर्वसन करण्यात आलेल्या २२ गावांमध्ये विशेष मोहीम राबवीत आहे, असेही त्यांनी सांगितल़े