देशातील दुर्बल सरकार हटवण्यासाठी नवमतदारांना साद घालत मुंबईतील रेल्वे प्रवाशांची दुर्दशा दूर करण्याची आणि देशभरात रेल्वे विद्यापीठे स्थापन करण्याची ग्वाही भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी सोमवारी येथे दिली. ‘तुमच्यासाठीच जगेन, झुंजत राहीन आणि तुमची स्वप्ने भंग होऊ देणार नाही’, असे भावनिक आवाहनही मोदी यांनी केले. वांद्रे-कुर्ला संकुलात झालेल्या महायुतीच्या निवडणूक प्रचार सभेत ते बोलत होते. या सभेसाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपचे गोपीनाथ मुंडे, रिपाइंचे रामदास आठवले यांच्यासह महायुतीचे उमेदवार उपस्थित होते.
मुंबईच्या विकासात रेल्वेचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचा उल्लेख करून मोदी म्हणाले की, आधुनिकीकरण आणि व्यावसायिकतेचा वापर न केल्याने मुंबईत आज रेल्वेची दुर्दशा झाली आहे. आधुनिकतेबरोबरच विविधांगी विचार करून मुंबईकर प्रवाशांना लाभदायक निर्णय सत्तेवर आल्याचे निर्णय घेण्याचे आश्वासन मोदी यांनी दिले. रेल्वेला लागणारे प्रगत मनुष्यबळ पुरवण्यासाठी देशभरात रेल्वे विद्यापीठे स्थापन करता आली असती. मात्र असा वेगळा विचार केंद्र सरकारने कधीच केला नाही. मात्र आपण सत्तेवर आल्यावर रेल्वेबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातील, असे आश्वासन मोदी यांनी दिले. बारावीची परीक्षा विद्यार्थी जीवनाला जेवढी कलाटणी देते, तेवढेच महत्त्व आता असल्याचे सांगून १८ ते २८ या वयोगटातील नवमतदारांना मोदी यांनी साद घातली. तुमचे जीवन अंध:कारमय होऊ नये, यासाठी सरकार उलथून टाकण्याचे आवाहन मोदी यांनी केले.
मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर टीकेची झोड उठवली. राहुल गांधी यांच्यासाठी ‘गरीब’ हे ‘पर्यटन स्थळ’ आहे. त्यांना गरिबांविषयी चर्चा करण्यात मजा येते. मात्र मला गरिबांबाबत विचार करताना नीट झोपही लागत नाही. भारत ही आमच्यासाठी मातृभूमी आहे, तर त्यांच्यासाठी ‘मात्र’ भूमी आहे. ही आमची ‘मदरलँड’ आहे, तर त्यांची ‘मदर्स लँड’ आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.  सभेच्या सुरुवातीला भाषण करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी शरद पवार व काँग्रेस यांच्यावर टीकेची झोड उठवली. कल्याणमध्येही मोदींनी राहुल गांधी यांचा जादुगार असा उल्लेख करत टीका केली.

शिवसेनाप्रमुखांचे स्मरण !
डिसेंबर महिन्यात याच मैदानात झालेल्या सभेच्या वेळी नरेंद्र मोदी यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख करण्याचे टाळल्याने त्याची शिवसेनेमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटली होती. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात मात्र मोदी यांनी शिवसेनाप्रमुखांचे यांचे स्मरण करीत शिवसेना नेते किंवा शिवसैनिक दुखावणार नाहीत याची योग्य खबरदारी घेतली.