07 July 2020

News Flash

‘राज’कीय वाऱ्याचा अंदाज घेऊन मुंडेंबाबत शिवसेनेचा वाघ थंड!

भाजप नेते नितीन गडकरी यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन लोकसभा निवडणूक लढवू नका, अशी विनंती करताच खवळलेल्या शिवसेनेच्या

| April 17, 2014 04:13 am

भाजप नेते नितीन गडकरी यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन लोकसभा निवडणूक लढवू नका, अशी विनंती करताच खवळलेल्या शिवसेनेच्या वाघाने गडकरी यांच्यांवर जोरदार हल्ला करत भाजपमध्येच त्यांना एकाकी पाडले. मात्र ऐन लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपनेते गोपीनाथ मुंडे यांनी राज यांच्याकडे मतांसाठी जोगवा मागूनही शिवसेनेच्या वाघाने साधी गुरगुरही का केली नाही याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तर मुंडे यांनी राज यांचे पत्र मागून अवलक्षण केल्याचे भाजपच्या वर्तुळात बोलले जात आहे.
महायुतीत मनसेला सामावून घ्यावे यासाठी सुरुवातीपासून आग्रही असलेल्या मुंडे यांनी भाजपच्याच  बैठकीमध्ये मनसेमुळे सेना-भाजपच्या किती जागा पडल्या याची आकडेवारी जाहीर करत मनसेची ताकद मान्य केली होती. तथापि गडकरी यांनी राज यांची भेट घेऊन लोकसभा निवडणूक न लढण्याची विनंती केली. राज-गडकरी यांच्या भेटीमुळे संतप्त झालेल्या उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या मुखपत्रामधून गडकरी यांची थेट व्यापारी म्हणून संभावना केली. मनसेचा पाठिंबा नरेंद्र मोदी स्वीकारणार का, महाराष्ट्रात भाजपचे अधिकार कोणाला हे सवाल पत्रकार परिषद घेऊन उपस्थित केले. भाजप नेतृत्वाच्या उत्तरानंतरच भाजपबाबतची शिवसेनेची भूमिका जाहीर करू, असा इशाराही उद्धव यांनी दिला होता.
प्रचार अंतिम टप्प्यात असताना गोपीनाथ मुंडे यांनीच बीड लोकसभा मतदारसंघात स्वत:साठी राज यांना चार-पाचवेळा दूरध्वनी करून पाठिंबा देण्याची विनंती केली. राज यांनी मुंडे यांना पाठिंबा देताना जोगेश्वरीच्या सभेत त्याची जाहीर वाच्यता केल्यामुळे आता शिवसेना नेतृत्व गोपीनाथ मुंडे आणि भाजपबाबत काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून राहिले. विशेष म्हणजे भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस तसेच  विनोद तावडे यांनी साधी प्रतिक्रियाही व्यक्त केलेली नाही. मुंडे यांनी पाठिंबा मागितल्यामुळे शिवसेनेत कमालीची अस्वस्थता असली तरी भाजपचे ‘राज’कीय वारे कोणत्या दिशेने वाहात आहे, याचा अंदाज आल्यामुळे मुंडेबाबत अद्यापि शिवसेनेचा वाघ थंडच बसून असल्याचे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 17, 2014 4:13 am

Web Title: shiv sena quiet on mns munde support
Next Stories
1 महाराष्ट्राचा ‘मनसे’ आवाज दिल्लीत घुमणारच- राजू पाटील
2 कार्यकर्ता, उमेदवार, नेता : सबकुछ एक!
3 दुसऱ्या टप्प्यात दिग्गजांचे भवितव्य ठरणार
Just Now!
X