लोकसभेच्या राज्यातील पहिल्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीत विदर्भातील दहा मतदारसंघांतील २०१ उमेदवारांचे भवितव्य आज गुरुवारी मतदानयंत्रांत बंद होणार आहे. पारंपरिकदृष्टय़ा काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या या पट्टय़ात यंदा भाजप-शिवसेना युतीने काँग्रेस आघाडीसमोर कडवे आव्हान उभे केले आहे.  
गेल्या निवडणुकीत विदर्भातील दहापैकी प्रत्येकी पाच जागा आघाडी व युतीने जिंकल्या होत्या. यंदा मात्र नेतृत्वाचा अभाव, पक्षांतर्गत गटबाजी आणि राष्ट्रवादीकडून सुरू असलेली कोंडी हे मुद्दे काँग्रेसला तापदायक ठरत आहेत.  
नागपूर आणि रामटेक हे दोन्ही मतदारसंघ कायम राखण्यासाठी काँग्रेसला ताकद लावावी लागली आहे. नागपूरमध्ये नितीन गडकरी आणि विलास मुत्तेमवार यांच्यात चुरशीची लढत आहे. संघ मुख्यालय असलेल्या नागपूरमध्ये १९९१चा अपवाद वगळता भाजपचा विजय झालेला नाही. यंदा संघाची यंत्रणा गडकरींसाठी सक्रिय आहे. गोंदियात प्रफुल्ल पटेल आणि भाजपचे नाना पटोले यांच्यात लढत आहे. अमरावतीत राष्ट्रवादीच्या नवतीन राणा यांनी शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांना आव्हान दिले असले तरी अखेरच्या टप्प्यात त्या मागे पडल्याचे चित्र आहे. अकोल्यात प्रकाश आंबेडकर, भाजपचे संजय धोत्रे आणि काँग्रेसचे हिदायक खान यांच्यात लढत असून, येथे तिरंगी लढतीचा नेहमीच भाजपला फायदा होतो. रामटेकमध्ये माजी मंत्री मुकुल वासनिक यांचा शिवसेनेचे तुमाले यांनी चांगलाच घाम काढला आहे.
रणमैदान
नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली-चिमूर, वर्धा, भंडारा-गोंदिया, अकोला, अमरावती, बुलढाणा आणि यवतमाळ-वाशीम

एकूण मतदार १,२१,७५,६६२
पुरुष ६२,२३,५८१
महिला ५८,५२,०४१
एकूण उमेदवार २०१

(प्रमुख उमेदवार : नितीन गडकरी, प्रफुल्ल पटेल, विलास मुत्तेमवार, आनंदराव अडसूळ, भावना गवळी, मुकुल वासनिक, सागर मेघे, नवनीत कौर-राणा, वामनराव चटप)
२००९चे चित्र्
काँग्रेस आघाडी: नागपूर, रामटेक, वर्धा, गडचिरोली, भंडारा-गोंदिया
शिवसेना-भाजप युती: अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, अकोला, यवतमाळ-वाशिम