जातीय राजकारणामुळे होणारी मतांची विभागणी, आपकडून रिंगणात असलेले वामनराव चटप आणि मंत्री विरुद्ध खासदार, अशा सामन्यामुळे या मतदारसंघात आरंभापासूनच चुरशीच्या लढतीचे चित्र असून यात कोण बाजी मारेल, हे प्रचाराच्या अंतिम टप्प्यातच स्पष्ट होणार आहे.
गेल्या वेळी २९ हजाराने विजयी झालेले भाजपचे खासदार हंसराज अहीर यांना तेव्हा पुगलियांना पराभूत करता यावे म्हणून संजय देवतळे, सुभाष धोटे या काँग्रेसच्या आमदारांनीच मतांची मोठी रसद पुरवली होती. आता तेच देवतळे विरोधात उभे ठाकल्याने अहिरांनी नरेश पुगलियांकडे आशेने बघणे सुरू केले असले तरी या गटाने आपले पत्ते अद्याप उघड केलेले नाही. चांगला जनसंपर्क व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मिळवून दिलेला न्याय, या बळावर सध्या अहिरांचा प्रचार सुरू आहे. सौम्य स्वभावाचे म्हणून ओळखले जाणारे राज्याचे पर्यावरणमंत्री संजय देवतळेंसमोर यावेळी गटबाजीत विखुरल्या गेलेल्या स्थानिक नेत्यांना एकत्र आणण्याचे मोठे आव्हान आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकत मर्यादित असली तरी देवतळे की चटप, या मुद्यावरून राष्ट्रवादीचे नेते ५० टक्क्यात विभागले गेले आहेत. हाच प्रकार भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या बाबतीतही आहे. सेनेचे स्थानिक नेते अहिरांना अस्मान दाखवण्याची भाषा करू लागले आहेत. गेल्या वेळी १ लाख ७० हजार मते घेणारे शेतकरी नेते वामनराव चटप यावेळी आपकडून रिंगणात आहेत. आपचे विदर्भातील एकमेव तगडे उमेदवार, अशी ओळख असलेल्या चटपांमुळे या मतदारसंघात होणाऱ्या जातीय मतांच्या ध्रृवीकरणाकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. चटप धनोजे कुणबी, तर देवतळे खरे कुणबी समाजाचे प्रतिनिधित्व करतात. येथे साडेचार लाखाच्या आसपास धनोजे व ६० हजार खरे कुणबी आहेत. संख्येने कमी असूनही देवतळेंना संधी का, असा प्रचार आता धनोजे कुणबी समाजात सुरू झाला असून हा प्रचार कसे वळण घेतो, यावर बरेच काही अवलंबून राहणार आहे.
शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस या प्रमुख पक्षात असलेले धनोजे कुणबी समाजाचे नेते थेट चटपांच्या गळाला लागल्याचे चित्र सध्या आहे. कुणबी समाजात सुरू असलेल्या या वर्चस्वाच्या लढाईवर बारीक लक्ष ठेवून देवतळे व अहिरांनी पक्षाची परंपरागत मते जोडण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. दलित व मुस्लिम मतदार विभागला जाऊ नये, यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे, तर कुणबी वगळता इतर बहुजन मतांवर भाजपने लक्ष केंद्रित केले आहे. याशिवाय, सरकारविरोधी मते आपकडे वळू नये, यासाठीही भाजपचे प्रयत्न सुरू झाले आहेत. देवतळे किंवा काँग्रेसला मत नकोच, अशी भूमिका घेणाऱ्या मतदारसंघातील अनेक प्रस्थापित नेत्यांसमोर अहीर व चटप, असे दोन पर्याय आहेत. गेल्या वेळी अहीर विजयाच्या समीप जातांना दिसताच या नेत्यांची पावले भाजपकडे वळली होती. यामुळे प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात चटपांमुळे होणारे मतविभाजन कुणाच्या पथ्थ्यावर पडते, याकडे लक्ष आहे.
जनसंपर्काचा फायदा मिळेल – हंसराज अहीर
प्रकल्पग्रस्त, तसेच शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न गेल्या पाच वर्षांत मार्गी लावले. सतत संपर्क ठेवला. त्याचा फायदा यावेळी नक्की मिळेल व जनता जातीय राजकारणात बळी पडणार नाही.
लोकाभिमुख निर्णयाचा फायदा – संजय देवतळे
मंत्री म्हणून प्रदूषणाच्या प्रश्नावर अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. त्याचे परिणाम भविष्यात दिसतील, तसेच आघाडी सरकारने घेतलेल्या अनेक लोकाभिमुख निर्णयाचा फायदा मिळेल.
शेतकरीच केंद्रस्थानी – वामनराव चटप
पराभूत झाल्यावरही सतत पाच वष्रे जनतेच्या सेवेत राहिलो. ती करतांना जातीभेद केला नाही. यावेळीही शेतकरी केंद्रस्थानी ठेवूनच रिंगणात असल्याने यश नक्की मिळेल.