डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिल, तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील प्रस्तावित स्मारकासाठी लागणाऱ्या साऱ्या परवानग्या येत्या दोन आठवडय़ात देण्यात येतील, अशी ग्वाही केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. विधानसभा निवडणूक समोर असल्याने या दोन्ही स्मारकांना परवागनी देऊन राजकीय लाभ मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.     ५ डिसेंबर २०१२ रोजी तत्कालीन केंद्रीय वाणिज्यमंत्री आनंद शर्मा यांनी डॉ. आंबेडकर स्मारकासाठी इंदू मिलची जागा राज्य सरकारला हस्तांतरित करण्याची घोषणा लोकसभेत केली होती. काही तांत्रिक बाबींमध्ये पर्यावरण मंत्रालयाची परवानगी आवश्यक असल्याने हा प्रस्ताव केवळ कागदावरच राहिला होता. राज्यात व केंद्रात काँग्रेस आघाडीचे सरकार असतानादेखील पर्यावरण मंत्रालयाने इंदू मिलसाठी परवानगी देण्यास वेळकाढूपणाचे धोरण अवलंबविले होते.