लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने संगणकीय कामांसाठी ‘वॉर रूम’ सुरू केला आहे. राजकीय युद्धाच्या तयारीस ५०जणांचे पथक गेल्या चार महिन्यांपासून कार्यरत झाले आहे. राज्यातील तब्बल ८९ हजार मतदान केंद्रांची माहिती अद्ययावत करण्याचे काम येथे केले जाते. कॉल सेंटरसारखी या केंद्राची रचना असून, संगणकतज्ज्ञांची मोठी फळी हे काम करीत आहे. एका मतदान केंद्रासाठी दहा युवक कार्यकत्रे, भाजपच्या भाषेत ‘वनबूथ टेन यूथ’ अशी रचना केली आहे.
महायुती जागावाटपात कोणत्या जागा कोणत्या मित्रपक्षाला हे न पाहता प्रत्येक मतदान केंद्रासाठी कार्यकत्रे सज्ज ठेवले आहेत. मतदान केंद्रासाठी प्रमुख कार्यकर्त्यांला सूचना देण्यास प्रत्येकाचे भ्रमणध्वनी एकत्रित करण्यात आले आहेत. त्यांना औरंगाबादच्या केंद्रातून सूचना दिल्या जातात. ज्याचे दूरध्वनी क्रमांक देण्यात आले आहेत, ते नक्की भाजपचे कार्यकत्रेच आहेत का, याची खात्री करून घेण्यात आली आहे. मोदींच्या राज्यातील सभांसाठी द्यावयाचे निरोप याच केंद्रातून दिले जातात. कार्यकर्त्यांना आपलेपणा वाटावा, म्हणून मोदींच्या सभेची वैयक्तिक निमंत्रणे देण्यात आली होती.
मतदान केंद्रापर्यंत जाण्यास मतदारांना त्रास होऊ नये म्हणून मतदान ओळखपत्रावरील ‘इपीक क्रमांक’ कळविल्यास त्या मतदाराचे केंद्र कोणते, तेथे कसे जायचे याची माहिती कार्यकर्त्यांपर्यंत लगोलग देण्याची व्यवस्था केली आहे. ५०जण प्रत्येक मतदान केंद्रातून येणारी माहिती संगणकावर संकलित करतात. त्याच्या विश्लेषणाचेही काम सतत सुरू असते, अशी माहिती या वॉर रूमची जबाबदारी सांभाळणाऱ्या डॉ. विजया रहाटकर यांनी दिली.
वॉर रूममध्ये काम करणारे ५०जणांचे पथक प्रशिक्षित आहे. कोणत्या विधानसभा मतदारसंघात काय सूचना द्यायच्या, तेथील राजकीय स्थिती काय, तो कोणाशी बोलतो आहे, याची जाणीव कार्यकर्त्यांना करून देण्यात आली आहे. उत्तम भाषा व संगणकावर त्वरेने काम करण्याची क्षमता असणाऱ्यांमुळे वेगवेगळय़ा प्रकारची माहिती वॉर रूममध्ये उपलब्ध होते. मतदान केंद्रप्रमुखाचा रक्तगट ते त्याच्यासमवेत काम करणाऱ्या १० कार्यकर्त्यांनी नक्की काय करायचे, या सूचनाही येथून दिल्या जाणार आहेत.
मोदींच्या समर्थनार्थ त्यांना ‘मिस कॉल’ द्या, या योजनेचा प्रसारही याच वॉर रूममधून झाला. आता भाजपशी सहानुभूती असणाऱ्यांची यादी तयार केली जात आहे. ही यादी त्यांच्या व्यवसायानुरूप आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला कसे जोडून घेता येईल, याचा आराखडा बनविणे सोपे जाईल, असा दावा ही जबाबदारी सांभाळणाऱ्या डॉ़ विजया रहाटकर यांनी केला आह़े
संग्रहित लेख, दिनांक 22nd Feb 2014 रोजी प्रकाशित
औरंगाबादला भाजपची ‘वॉर रूम’!
लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने संगणकीय कामांसाठी ‘वॉर रूम’ सुरू केला आहे. राजकीय युद्धाच्या तयारीस ५०जणांचे पथक गेल्या चार महिन्यांपासून कार्यरत झाले आहे.
First published on: 22-02-2014 at 02:53 IST
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp start high tech election war room in aurangabad