धार्मिक, साहसी तसेच नेहमीच्या पर्यटनासाठी सर्वाधिक पसंती ज्याला मिळते तो हिमाचल प्रदेश थंड हवेसाठी प्रसिद्ध आहे. सध्या मात्र लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने तेथील हवा चांगलीच तापली आहे. ७ मे या दिवशी हिमाचलात मतदान होणार असून अरविंद केजरीवाल यांच्या ‘आप’ने येथील सर्व ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. मात्र, मुख्य लढत आहे ती भाजप व काँग्रेसमध्येच. लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजप प्रबळ असल्याने सव्वा वर्षांपूर्वी विधानसभा जिंकूनही सत्ताधारी काँग्रेसचे ‘वीर’ पराभवाच्या छायेत दिसत आहेत.
२००४ प्रमाणे गेल्या सार्वत्रिक निवडणुकीतही सत्तासुंदरीला वश करण्यात भाजपला अपयश आले. त्या निराशाजनक पाश्र्वभूमीवर ज्यांच्याकडून पक्षाला मोठी आशा होती त्या नितीन गडकरी यांच्याकडे पक्षाची धुरा सोपविण्यात आली. मात्र, गडकरींच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात भाजपने कर्नाटक, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड ही तीन महत्त्वाची राज्ये सत्ता असूनही गमावली. हिमाचल विधानसभेच्या ६८ पैकी ३६ जागा जिंकून काँग्रेसचे वीरभद्र सिंह तब्बल सहाव्यांदा मुख्यमंत्रिपदी आरूढ झाले, तर भाजपला २६ जागांवर समाधान मानावे लागले. विधानसभेतील हे संख्याबळ पाहता आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचीच सरशी होईल, असे कोणालाही वाटणे साहजिक आहे, परंतु परिस्थिती नेमकी याच्या उलट आहे.
हिमाचलमध्ये विधानसभेच्या तुलनेत लोकसभेच्या अगदी अल्प म्हणजे केवळ चार जागा आहेत. कांग्रा, मंडी, हमीरपूर आणि शिमला. यातील मंडीचा अपवादवगळता उर्वरित तिन्ही ठिकाणी भाजपचे खासदार आहेत. जनमत चाचण्यांनुसार व सध्याचा कल लक्षात घेता आगामी निवडणुकीनंतरही या बलाबलात काही फरक पडणार नाही, अशीच चिन्हे आहेत. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी प्रतिभा सिंह या गेल्या वर्षी झालेल्या पोटनिवडणुकीत मंडीतून विजयी झाल्या होत्या. हा मतदारसंघ काँग्रेस राखेल, असे दिसते. अन्य तीन जागांवर मात्र भाजपसाठी अनुकूल वातावरण आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लक्षणीय लढती
हिमाचलमध्ये भाजपचे पहिले मुख्यमंत्री ठरलेले शांताकुमार हे कांग्रामधून निवडणूक लढवत आहेत. गेल्या वेळी या मतदारसंघातून भाजपचेच डॉ. राजन सुशांत निवडून आले होते. यावेळी सुशांत यांनी केजरीवाल यांच्या ‘आप’शी सोयरीक केली आहे. राजन यांना उमेदवारी देऊन ‘आप’ने भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र ही खेळी यशस्वी ठरण्याची चिन्हे नाहीत. धुमलपुत्र अनुराग ठाकूर हे हमीरपूरचे विद्यमान खासदार. हमीरपूर हा भाजपचा बालेकिल्ला. काँग्रेसमध्ये दाखल झालेले अपक्ष आमदार रािजदरसिंह राणा यांना काँग्रेसने अनुराग यांच्यासमोर उभे केले आहे, तर ‘आप’चे कमलकांत बात्रायेथून नशीब आजमावत आहेत.

प्रचारातील मुद्दे
घरगुती वापराच्या अनुदानित सिलिंडर्सची संख्या नऊवरून बारापर्यंत वाढविणे व त्यासाठी आधार कार्डाची सक्तीही नसणे यावर काँग्रेसकडून प्रचारात भर दिला जात आहे. वीरभद्र सिंह यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या कल्याणकारी योजना तसेच भाजपचे माजी मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमल यांच्या राजवटीतील भ्रष्टाचार हे मुद्देही काँग्रेस मांडत आहे. दुसरीकडे भाजपने मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांनाच लक्ष्य केले आहे. वीरभद्र हे केंद्रीय पोलादमंत्री असताना म्हणजे मे २००९ ते जानेवारी २०११ या कालावधीत त्यांच्या आशीर्वादाने झालेल्या घोटाळ्याची सध्या सीबीआय चौकशी सुरू असून वीरभद्रांवर आरोपपत्रही दाखल झाले आहे. ते मुख्यमंत्री असल्याने त्यांची चौकशी नि:पक्षपाती होऊ शकणार नाही, असा दावा करत भाजपने वीरभद्र यांच्या राजीनाम्याचीच मागणी केली आहे. सीबीआय चौकशी व आरोपांच्या या ससेमिऱ्यामुळे ८० वर्षीय वीरभद्र जेरीस आल्याचे दिसत आहे. संयुक्त पुरोगामी आघाडीची गेल्या १० वर्षांतील कूचकामी कामगिरीही भाजपच्या प्रचारातील महत्त्वाचा मुद्दा आहे.

मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress virbhadra singh in shadow of defeat
First published on: 02-04-2014 at 04:27 IST