नमो लाटेने आख्खा देश व्यापलेला असताना खुद्द गुजरातमध्ये ‘गरजणारे चाळीस’हून
(रोअरिंग फोर्टीज) मोठी मोदीलाट सध्या वाहत आहे. पंतप्रधानपदावर गुजराती व्यक्ती पाहण्याची ९९ टक्के खात्री असलेल्या गुजराती जनतेच्या अस्मिता दर्शनाला मतरूपात उधाण पाहायला मिळणार आहे.
भाजपने यंदा निवडणूक प्रचाराची सुरुवातच गुजराती अस्मितेला हात घालून सुरू केल्यामुळे राज्यातील नागरिकांच्या (असल्याच तर) समस्या, स्वप्नविक्री, विकासाचे गाजर आदी पारंपरिक निवडणुकीचे मुद्दे हे गौण आहे. विविध मतदानपूर्व चाचण्या आणि मतपंडित या द्विपक्षीय राज्यामध्ये भाजप २३ तर काँग्रेस केवळ तीन जागांवर विजय मिळवेल असे भाकीत मांडत असले, तरी भाजप मात्र सवीसच्या सव्वीस जागा ताब्यात घेण्याच्या तोऱ्यात आहे. मोदींनी गुजरातमध्ये केलेली विकासकामे, त्यांची लोकप्रियता आणि अस्मिता या तीन मुद्दय़ांच्या प्रचाराची फळे निवडणुकोत्तर काळात पाहायला मिळणार आहेत. गेल्या दोन निवडणुकींमधील चित्र पाहिले तर काँग्रेस (२००४ -१२, २००९-११) उत्तरोत्तर खिळखिळे होत चालल्याचे दिसत आहे. त्यात यंदा मोदी जादूटोण्याचाच एक परिणाम म्हणजे त्यांनी केशूभाई पटेल यांच्यासारख्या कडव्या प्रतिस्पध्र्याचा विरोध निवळून टाकला आहे. काँग्रेसच्या डझनभर कडव्या व लोकप्रिय नेत्यांना भाजपमध्ये आणून त्यांनी सगळ्याच जागा काबीज करण्याचा आत्मविश्वास पक्षाला दिला आहे. मोदीकरणामुळे आणि आधीच देशपातळीवर निष्प्रभ ठरलेल्या काँग्रेसच्या चेहरेहीन उमेदवारांमुळे काँग्रेसला यंदा मोठी दरी दिसणार आहे, यात शंका नाही.
उमेदवारी चित्र
आदिवासी व काही अल्पसंख्य इलाखे तसेच मध्य गुजरातमध्ये नमो वाऱ्यांची शक्ती क्षीण आहे. गांधीनगरमधील अडवाणींच्या उमेदवारीबाबत नाटय़ घडायला जबाबदार सध्याचा मोदीप्रभाव मोठा मानला जात आहे. उमेदवारींबाबतही पक्षामध्ये मोदीगिरी सुरू असल्याच्या कारणाची नाराजी या आठवडय़ामध्ये अडवाणींकडून जाहीरपणे व्यक्त झाली. ज्येष्ठ नेत्यांना आणि अडवाणीवादी नेत्यांचे पत्ते मोदींनी काटल्याचा अडवाणींनी उट्टा काढल्याची चर्चा सध्या गुजरातमध्ये आहे. बडोद्यामध्ये काँग्रेसने मोदींविरोधात अगदीच नवखा उमेदवार उभा केला आहे. मुस्लिमबहुल इलाखे आणि काँग्रेसच्या काही पारंपरिक बालेकिल्ल्यांतूनही नमो जादू वाहत आहे. सध्या गुजरातमधील अस्मिता उधाणाचेच पडसाद दोन महिन्यांनंतर समोर येणाऱ्या निकालात दिसणार आहेत.
काँग्रेससाठी इष्टापत्ती?
काँग्रेसला जसा गुजरातमध्ये चेहरा नाही, तसाच नरेंद्र मोदी यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत आपल्याइतकी प्रखर नेतृत्वशक्ती आपल्याच पक्षात तयार होऊ दिलेली नाही. संपूर्ण गुजरातच्या औद्योगिक, नागरी, आर्थिक विकासाचे श्रेय एकटय़ा नरेंद्र मोदी यांच्या माथीच आहे. परिणामी पंतप्रधान झाल्यानंतर राष्ट्रीय राजकारणात सक्रिय झालेल्या मोदींची गुजरात पकड सैल होईल. नेमके काँग्रेसला पाय पसरण्यास ही इष्टापत्ती असेल असे मानले जात आहे.
२००९ बलाबल
एकूण जागा २६
१५ भाजप
११ काँग्रेस