उपमुख्यमंत्री अजित पवार हे भीडभाड न ठेवता आपली मते बिनधास्तपणे मांडत असतात. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेसबद्दलचे संबंध, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर होणारे आरोप, गारपीटीमुळे झालेले नुकसान, सरकारचे मदतीचे पॅकेज याबद्दल..
ल्ललोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी राष्ट्रवादीने सारी ताकद पणाला लावली असली तरी आपल्यासह विविध मंत्र्यांवर झालेले आरोप, त्यातून पक्षाच्या प्रतिमेवर परिणाम झाला का ?
आरोप करण्याची विरोधी पक्षाच्या व विशेषत: भाजपच्या नेत्यांना सवयच जडली आहे. १९९५पूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्यावर असेच आरोप करण्यात आले होते. पुढे या आरोपांचे काय झाले ? आताही आरोप करण्याची मालिकाच सुरू झाली आहे. मावळ गोळीबार आपल्या सूचनेनुसारच झाला, असा विरोधकांचा आरोप होता. न्यायालयीन चौकशीत सारे समोर आले. सिंचन घोटाळ्यातही असेच झाले. सिंचनाच्या क्षेत्रात वाढ झाली ही बाब विरोधकही मान्य करतील. पण सिंचनाचे क्षेत्र वाढले नाही, झालेला खर्च नेत्यांच्या खिशात गेला, असा खोटा आरोप सुरू केला. धरणांच्या खर्चात युती सरकारच्या काळात वाढ झाली नव्हती का, याचे उत्तर भाजप नेत्यांनी द्यावे. कारण तेव्हा भाजपकडेच हे खाते होते. भूसंपादन किंवा अन्य तांत्रिक बाबींमुळे खर्च वाढतो. हे फक्त महाराष्ट्रात झाले नाही, तर सर्वच राज्यांमध्ये होते. तरीही राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनीच सारे केले असे खोटे आरोप केले गेले. खोटय़ानाटय़ा आरोपांचा पक्षाला खुलासा करावा लागतो.   
ल्लराष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर झालेल्या लोकसभेच्या तीन निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला राज्यातून खासदारांचा दुहेरी आकडा गाठता आलेला नाही. यंदा चांगल्या यशाबद्दल आशावादी आहात ?
तीन निवडणुकांच्या तुलनेत आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला नक्कीच चांगले यश मिळेल. यंदा आम्ही चांगली तयारी केली आहे. प्रभावी उमेदवार उभे केले आहेत. प्रत्येक मतदारसंघातील स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करूनच उमेदवार ठरविण्यात आले. यातून गटबाजी राहिली नाही. राज्यातून आघाडीचे जास्तीत जास्त खासदार निवडून आले पाहिजेत यावर आमचा कटाक्ष आहे. हातकणंगलेमध्ये आमच्यापेक्षा काँग्रेसकडे सक्षम उमेदवार असल्याने आम्ही ती जागा काँग्रेसला सोडली. काहीही करून राज्यातून चांगले यश मिळावे हीच पक्षाची भूमिका आहे.
ल्लराज्यात मोदी यांची लाट आहे, असे वाटते का ? तसेच पक्षनेतृत्वाकडून मोदी यांच्या न्यायालयीन खटल्याच्या निकालाचा हवाला दिला जात असल्याने पक्षात त्याची प्रतिक्रिया उमटली आहे, त्याबद्दल ?
नरेंद्र मोदी यांची हवा भाजपने तयार केली आहे. हवा आहे की नाही हे निकालानंतर दिसेलच. पण राज्यातील मतदार यूपीए आणि आघाडी सरकारने केलेल्या कामांच्या आधारे आघाडीला पाठिंबा देईल. केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या दहा वर्षांंत अनेक क्षेत्रांमध्ये भरीव काम केले.फक्त ही कामे जनतेपर्यंत पोहचविण्याची जाहिरातबाजी करण्यात आम्ही कमी पडलो. गुजरात दंगलीवरून पक्षाध्यक्ष पवार यांनी मोदी यांच्यावर टीकाही केली आहे.
ल्लआघाडी यंदा चांगली कामगिरी करेल, असा विश्वास तुम्ही व्यक्त करता. पण दोन्ही मित्र पक्षांमध्ये समन्वयाचा अभाव जाणवतो. नंदुरबारमध्ये विजयकुमार गावित यांची कन्या भाजपमधून लढण्यास राष्ट्रवादीची फूस असल्याचा संशय काँग्रेसच्या गोटातून व्यक्त केला जातो.?
पूर्वी काय झाले हे चघळत बसण्यापेक्षा यंदा काय करायला पाहिजे यावर अधिक भर द्यायला पाहिजे. काँग्रेसचा उमेदवार असेल तेथे राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मदत करायलाच पाहिजे. या संदर्भात आपली पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याशीही चर्चा झाली आहे. २००९च्या लोकसभा निवडणुकीत सांगलीमध्ये आमच्या काही नेत्यांनी अपक्षाच्या मागे ताकद उभी केली. त्याची प्रतिक्रिया काँग्रेसमध्ये उमटली. मग काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी हातकणंगले, कोल्हापूर, नगर, मावळ आदी मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीला तेवढी मदत केली नाही. यातूनच उभयतांचे नुकसान झाले. यंदा असे होऊ नये म्हणून आमच्याकडून खबरदारी घेतली जाईल. राष्ट्रवादीच्या विरोधात तेव्हा काँग्रेसच्या काही ठराविक नेत्यांनी भूमिका बजाविली होती. आता त्याची पुनरावृत्ती होऊ नये एवढीच अपेक्षा.
ल्लमुलीला भाजपमधून उमेदवारी देण्यामागे गावित यांना राष्ट्रवादीची फूस असल्याची चर्चा आहे, याबद्दल ?
डॉ. गावित यांनी मुलीला भाजपमधून उभे करू नये म्हणून पक्षाध्यक्ष पवार, मी स्वत:, आर. आर. पाटील यांच्यासह काही सहकाऱ्यांनी त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसचे माणिकराव गावित यांच्याशी असलेल्या वादामुळे ते ऐकण्याच्या मन:स्थितीतच नव्हते. मुलीची उमेदवारी जाहीर झाल्यावर तात्काळ त्यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करण्याचे पत्र मुख्यमंत्र्यांना दिले.
ल्लनिवडणुकीच्या तोंडावर झालेली गारपीट आणि अवकाळी पावसाने राज्यातील शेतीचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. याचा निवडणुकीत तुम्हाला फटका बसण्याची शक्यता वाटते का ?
अवकाळी पावसाने राज्यातील २८ जिल्ह्यांमधील शेतीचे नुकसान झाले. हे संकट मोठेच आहे. एकाच आर्थिक वर्षांत दुष्काळ, अतिवृष्टी आणि गारपीट तथा अवेळी पाऊस यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याचा हा प्रसंग राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला. शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी म्हणून मंत्रिमंडळाने सुमारे चार हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले. मदत वाढवून दिली. निवडणूक आचारसंहितेमुळे मदतीत काही अडचणी येत आहेत. काही प्रकरणांमध्ये जागच्या जागी निर्णय घेण्यात आले. तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्या. परिणामी आपत्तीग्रस्तांना लगेचच मदत करता आली. आचारसंहितेमुळे अधिकारी बरोबर येत नाहीत. काही त्रुटी आढळल्यास अधिकारी वर्ग निवडणूक आयोगाकडे अंगुलीनिर्देश करतो. शेतकऱ्यांना वेळीच मदत मिळावी यावर सरकारचा भर आहे.  
ल्लराज्याची आर्थिक परिस्थिती गंभीर आहे. विकास कामांवरील खर्चात कपात करावी लागेल का ?
दुष्काळ, अतिवृष्टी आणि गारपीट या नैसर्गिक आपत्तीचा फटका बसलेल्यांना एकाच आर्थिक वर्षांत मदत करावी लागली. याचा राज्याच्या तिजोरीवर बोजा पडला. विकास कामांवरील खर्चात कपात करण्यात आली असली तरी महत्त्वाच्या कामांना पुरेसा निधी दिला जाईल. ल्लमुख्यमंत्रीपद मिळवायचेच हा तुमचा निर्धार आहे. या दृष्टीनेच आपण लोकसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केल्याचे बोलले जाते ?
राजकारणात सक्रिय असलेल्या प्रत्येकाचीच सर्वोच्च पद मिळावे ही इच्छा असते व त्यात चुकीचे ते काहीच नाही. अगदी सहकारी संस्थांपासून ते लोकसभेपर्यंत कोणत्याही निवडणुकीत यश मिळवायचेच या निर्धाराने उतरतो. यामुळे लोकसभा निवडणुकीत जास्त रस घेतो हे काही नवीन नाही.
ल्लसंतोष प्रधान