लोकशाहीप्रधान देशात मतदानाचे महत्त्व नव्याने सांगण्याची गरज नाही. पण आजवरची मतदानाची प्रक्रिया पाहिली तर मतदान ही यांत्रिकता बनली आहे. आजच्या मतदानातून लोक मत मांडताना दिसत नाहीत. कारण अद्यापही मतदान कसे करावे याविषयीची पूर्वअट पूर्ण झालेली नाही. लोकप्रतिनिधी निवडीचा अधिकार जसा मतदारांना मिळाला आहे तद्वत अयोग्य काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींना परत बोलावण्याचा अधिकारही मिळाला पाहिजे.
अद्यापही आपली लोकशाही फॉर्मल अवस्थेत आहे. अल्पशिक्षित निरक्षर वर्गानेच लोकशाहीचा ढाचा सांभाळला आहे. जे शिष्ट असतात, ज्यांना लोकशाहीचा अर्थ कळलेला आहे ते मात्र मतदान करत नाहीत, उलट लोकशाहीबद्दल बोटे मोडत राहतात. हा लोकशाहीतील कच्चा दुवा आहे. एखाद्या साखळीत अनेक कडय़ा जोडलेल्या असतात. तिला हिसडा दिला तर कच्ची कडी तुटते. या देशातील कच्ची कडी म्हणजे मतदानासाठी आवश्यक असलेल्या निर्भय वातावरणाचा अभाव होय. अजूनही खेडय़ापाडय़ात इशाऱ्यावर मतदान करण्यास भाग पाडले जाते. कारण दैनंदिन जीवनासाठी कोणावर तरी अवलंबून राहण्याची स्थिती तेथे अद्याप आहे. पुरेसे शिक्षण नसले तरी अनुभवातून हा वर्ग काहीतरी शिकलेला असतो. पण अभावग्रस्त समाजव्यवस्थेमुळे स्वाभिमानामुळे मत नोंदवण्याची हिंमत त्याच्यात होत नाही. राजकारणाचा तपशील सामान्य जनतेनेही समजून घेतले पाहिजेत असे म्हणणे सोपे असले तरी प्रत्यक्षातील त्याचे जगणे जाणून घेतले पाहिजे. मत बनवण्याचे स्वास्थ्य सामान्य माणसाला मिळायला हवे. विवंचनेमध्ये गुरफटलेल्या या वर्गाला ‘राईट टू व्होट’ प्रमाणे ‘राईट टू लेझर’ म्हणजे फुरसतीचा हक्क प्राप्त झाला पाहिजे. त्यातून उमेदवारातील चांगला की वाईट यातील पर्याय निवडणे सोपे जाईल. मतदान करताना आपल्या आशाअपेक्षांना न्याय देऊ शकेल अशा उमेदवाराची बाजू घेतली पाहिजे. आपला विवेक जागृत ठेवायला हवा.