एनडीएचा घटकपक्ष असलेल्या लोकजनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय युवक अध्यक्ष संजय सराफ यांनी आपण हुर्रियत नेते सय्यद अली शहा गिलानी यांना भेटलो होतो, अशी कबुली रविवारी दिली मात्र भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचा संदेश त्यांना दिल्याचा त्यांनी इन्कार केला. त्यांनी सांगितले, की हुर्रियत नेते गिलानी यांच्याशी आपले व्यक्तिगत चांगले संबंध आहेत. गेली अनेक वर्षे आपण त्यांना भेटत आहोत. ज्या संदर्भात आपण त्यांना भेटल्याचे प्रसिद्ध झाले, त्या संदर्भात आपण भेटलो नाही. आपण नरेंद्र मोदी यांचे दूत म्हणून भाजपशी हुर्रियतचा संवाद घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यासाठी येथे आलो हे खरे नाही. मार्च महिन्यात गिलानी यांच्यावर दिल्लीत उपचार करण्यात आले होते त्यामुळे आता तरी त्यांना भेटून विचारपूस करावी, या हेतूने गेलो होतो.
गिलानींना भेटायला जे दोन दूत गेले होते, त्यात तुम्ही होतात असे विचारले असता सराफ यांनी सांगितले, की ज्या वृत्तपत्राने या चुकीच्या बातम्या दिल्या त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाईचा मार्ग आपण पडताळून पाहत आहोत. काही कारण नसताना या प्रकरणात आपले नाव घेण्यात आले. गिलानी यांनी शुक्रवारी असावा दावा केला होता, की मोदी यांनी दोन दूत आपल्याकडे पाठवले व काश्मीरप्रश्नी तोडगा काढण्याचे वचन देऊन भाजपबाबत नरमाईची भूमिका घेण्यास सांगितले.
गिलानी यांनी दोन दूतांची नावे सांगितली नाहीत पण त्यांची भेट २२ मार्च रोजी त्यांची भेट झाली होती. विभाजनवादी नेत्यांनी असा दावा केला, की दूतांनी विभाजनवादी नेत्यांना एनडीए सरकार आल्यावर काश्मीर प्रश्नी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुला यांनी शनिवारी याबाबतची गुप्तता संपवून विभाजनवादी नेत्यांनी यामागचा हेतू व खरे सूत्रधार कोण हे सांगण्याचे आवाहन केले. गिलानी यांनी दूत भेटल्याचा दावा केला असला, तरी जमात-ए-इस्लामी व हुर्रियत कॉन्फरन्सच्या मवाळ गटाने जहाल गटावर हेतूत वक्यव्ये करून लोकांची दिशाभूल केल्याचा आरोप केला. मवाळ गटाचे मिरवैझ उमर फारूख यांनी गिलानी यांना जम्मू-काश्मीर प्रश्नी चर्चा करण्याच्या मार्गाबाबत फटकारले आहे.