नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देतानाच लोकसभा लढविण्याचा निर्णय राज ठाकरे यांनी जाहीर केल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. मुंबईत तीन ठिकाणी शिवसेनेच्या विरोधात उमेदवार उतरविण्याचे जाहीर केल्याने मतविभाजनाचा फायदा उचलण्याचा काँग्रेसचा प्रयत्न राहणार आहे.
राज ठाकरे यांनी युतीच्या विरोधात पूर्ण तयारीने रिंगणात उतरावे, असाच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचा सुरुवातीपासूनच प्रयत्न होता. कारण २००९च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मनसेने केलेल्या मतविभाजनामुळेच आघाडीला फायदा झाला होता.
आम आदमी पक्षाने काँग्रेसबरोबरच भाजपचेही नुकसान होऊ शकते. दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपच्या झाडूचा फटका काँग्रेसबरोबरच भाजपलाही बसला होता.
मुंबईत गुरुदास कामत, मिलिंद देवरा आणि एकनाथ गायकवाड यांच्या विरोधात मनसेने उमेदवार जाहीर केले आहेत. मुंबईत मनसे अधिक ताकदवान व्हावी, असाच सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न राहणार आहे. मुंबई किंवा कल्याण-डोंबिवलीसह काही महापालिकांमध्ये मनसेने काँग्रेस वा राष्ट्रवादीच्या मतांवर डल्ला मारला होता. मोदी यांना पाठिंबा जाहीर केल्याने काँग्रेसची पारंपरिक मते फुटणार नाहीत. नाशिकमध्ये मनसे हा घटक राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांनाही फायदेशीर ठरू शकतो. कल्याण मतदारसंघात शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी मुलाला निवडून आणतो या शब्दावर स्वत: लढण्याचे टाळले. या मतदारसंघात आगरी समाजाच्या मतांचे चांगले प्राबल्य असल्याने मनसेचे राजू पाटील हे शिवसेनेसाठी अडचणीचे ठरू शकतात.
राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांची विचारसरणी तोडफोडीचीच आहे. मनसेने स्वतंत्रपणे लढण्याचे जाहीर केले असले तरी आम्ही फायद्यातोटय़ाचे बघत नाही. विकासाच्या मुद्दय़ावर जनता काँग्रेसलाच पाठिंबा देईल, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी व्यक्त केली. मनसेने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा जाहीर केला. दुसरीकडे भाजप आणि शिवसेनेत मनसेच्या मुद्दय़ावर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. एकूणच शिवसेना कमकुवत झाल्यानेच बहुधा भाजपने मनसेला जवळ केले असावे, असे मत राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादी आणि शिवसेना जास्त जागांवर समोरासमोर
राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या विरोधात आक्रमकपणे लढण्याचे अप्रत्यक्षपणे सूचित केले आहे. राज्यात राष्ट्रवादीच्या वाटय़ाला आलेल्या २१ मतदारसंघांपैकी १४ मतदारसंघांत राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी लढाई होती. मनसेच्या भूमिकेमुळे त्याचा फायदा राष्ट्रवादीलाच होईल, असे पक्षाच्या गोटातून सांगण्यात येते. नाहीतरी आम्ही सांगतो तेथे उमेदवार उभे करा, असा प्रेमळ सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनसेला विधानसभेच्या सभागृहातच दिला होता.
संग्रहित लेख, दिनांक 10th Mar 2014 रोजी प्रकाशित
मनसे निर्णयाने काँग्रेसच्या आशा पल्लवीत
नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देतानाच लोकसभा लढविण्याचा निर्णय राज ठाकरे यांनी जाहीर केल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

First published on: 10-03-2014 at 03:24 IST
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns set to contest lok sabha elections congress hops rised