शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीदिनी शिवसैनिकांना घट्ट ठेवण्याकरिता शिवबंधन धागा बांधण्यात आला खरा, पण निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे एकेक खासदार सत्ताधारी पक्षात जाऊ लागले आहेत. आधीच शिवसेनेत फारसे सक्रिय नसलेले परभणीचे खासदार गणेश दुधगावकर यांनी शनिवारी राष्ट्रवादीच्या नेत्यांची भेट घेतली.
गेल्या मंगळवारी शिवसेनेचे शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या भेटीसाठी काँग्रेसच्या मुख्यालयात गेले होते. वाकचौरे यांच्या पक्षप्रवेशाचा सोमवारचा मुहुर्त पक्का करण्यात आला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीत नेहमीच कुरघोडीचे राजकारण सुरू असते. काँग्रेसने एक खासदार फोडल्यावर राष्ट्रवादीने आपणही मागे नाही हे दाखवून दिले. परभणीचे खासदार गणेश दुधगावकर हे शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटले. दोनच दिवसांपूर्वी शिवसेनेचे खासदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा अजितदादांनी केला होता. दुधगावकर हे अजित पवार यांना भेटल्याचे पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले.
उमेदवारी नाही !
काँग्रेस सरकारमध्ये राज्यमंत्रीपद भूषविलेले दुधगावकर हे २००९ मध्ये शिवसेनेच्यावतीने परभणीतून निवडून आले असले तरी त्यांची शिवसेनेशी नाळ जोडू शकली नाही. काही दिवस ते पक्षाच्या बैठकांच्या ठिकाणी फिरकत नव्हते. वाकचौरे यांना शिर्डीतून काँग्रेसने उमेदवारीचे आश्वासन दिले तरी दुधगावकरांना परभणीतून उमेदवारी दिली जाणार नाही. तेथे अजितदादांचे निकटवर्ती विजय बांभळे यांचे नाव निश्चित आहे.
परभणीचा शिवसेनेला शाप
परभणी मतदारसंघात १९८९ पासून फक्त १९९८चा अपवाद वगळता सातत्याने शिवसेनेचा खासदार निवडून येतो. १९८९ आणि १९९१ मध्ये अशोक देशमुख निवडून आले, पण पुढे त्यांनी काँग्रेसची वाट धरली. १९९६, ९८ आणि १९९९ मध्ये सुरेश जाधव निवडून आले.  २००४ मध्ये तुकाराम रेंगे-पाटील निवडून आले. पुढे तेही सत्ताधाऱ्यांच्या गटात गेले. २००९ मध्ये निवडून आलेले दुधगावकर हेसुद्धा शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत आहेत.