भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्याविरोधात गेली १० वर्षे संघर्ष केलेले आणि राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे परळीतून विधानसभेची निवडणूक लढविलेले फुलचंद कराड यांनी मुंडेंशी गट्टी करीत शुक्रवारी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासह बीड जिल्ह्य़ातील अनेक गावांमधील सरपंच, उपसरपंच, साखर कारखान्याचे संचालक व राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आता भाजपची कास धरली आहे.
मुंडे, प्रदेशाध्यक्ष फडणवीस,  एकनाथ खडसे, तावडे आदी नेत्यांच्या उपस्थितीत कराड आणि पूर्वी भाजपमध्ये असलेले व नाराजीतून दूर गेलेले पुण्यातील उज्ज्वल केसकर यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व अजितदादांभोवती चांडाळचौकडी तयार झाली असून ती अन्य नेत्यांना त्यांच्यापर्यंत जाऊ देत नाही. धनंजय मुंडे यांना नेता स्वीकारणे शक्य नाही आणि अवमानकारक वागणुकीला कंटाळून राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये आल्याचे कराड यांनी स्पष्ट केले. आता परळीत राष्ट्रवादी काँग्रेस शिल्लक राहिली नसून निवडणुकांपर्यंत त्यापक्षाचे कंबरडे मोडणार असल्याचे मुंडे यांनी सांगितले.