उस्मानाबादच्या राजकारणात डॉ. पद्मसिंह पाटील हे नाव उच्चारले की, साहजिक प्रतिमा तयार होते ती ‘पहेलवान’ अशी. शिवसेनेचे उमेदवार रवींद्र गायकवाड यांचे नाव राजकारणात चर्चिले जाते ते ‘सामंजस्य करारा’साठी. राजकीय जुळवाजुळवीत काँग्रेस उमेदवाराला एका निवडणुकीत जाहीर समर्थन दिल्यानंतर सेनेच्या गायकवाड यांच्याविषयीचा समज ‘मॅनेज उमेदवार’ असाच करून दिला जातो. सेनेची ताकद जिल्ह्य़ात विखुरलेली असली तरी डॉ. पाटील यांच्या विरोधात असणारा राग नेहमी तीव्रतेने व्यक्त होतो. परंतु मतपेटीत मात्र राष्ट्रवादीच्या घडय़ाळाची टिकटिकच पोहोचते. या वेळी पुन्हा गायकवाड व डॉ. पाटील यांच्यात सरळ लढत आहे. या वेळच्या निवडणुकीत महायुतीला लोकमंगल उद्योग समूहाचे रोहन देशमुख यांचाही सामना करावा लागणार आहे.
मागील निवडणुकीतील पवनराजे िनबाळकर हत्येचा मुद्दा कळीचा होता, तोच मुद्दा यंदाच्या निवडणुकीत महायुतीकडून पुन्हा उचलला जात आहे. गेल्या निवडणुकीत प्रा. गायकवाड यांच्या भूमिकेवर संशय घेतला जात असे.
आमदार ओमराजे निंबाळकर व गायकवाड यांच्या आक्रमक प्रचाराला डॉ. पाटील कसे उत्तर देतात, यावर बरीच गणिते अवलंबून असतील. हा मतदारसंघ तसा दुष्काळी. बार्शी व औसा या दोन तालुक्यांतही अवर्षण असतेच. सिंचनाच्या सोयी निर्माण करणे डॉ. पाटील यांना सहज शक्य झाले असते. मात्र कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचा आग्रह त्यांनी एवढा धरला की, मोठे प्रकल्प उभारले गेले नाहीत. आता मराठवाडय़ाच्या हक्काचे २१ टीएमसी पाणी मिळावे, म्हणून प्रत्येक पक्षाला संघर्ष करावा लागतो आहे. डॉ. पाटील यांचे पुत्र आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिलेले सौरऊर्जा प्रकल्पाचे आश्वासन अजूनही पूर्ण झाले नाही.
महायुतीच्या आक्रमक प्रचारात अण्णा हजारे यांच्या प्रचाराची भर पडणार असल्याने डॉ. पाटील यांना ही निवडणूक अवघड आहे, असे चित्र आहे. सोलापूर, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्य़ांतील ११ तालुके व ६ विधानसभा मतदारसंघ मिळून उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ तयार झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सिंचनक्षेत्र वाढविण्यात यशस्वी – डॉ. पद्मसिंह पाटील  
आगामी काळात कृष्णा खोऱ्याचे २५ टीएमसी पाणी, कौडगाव एमआयडीसी, उस्मानाबादसाठी स्वतंत्र विद्यापीठ, उस्मानाबादची ‘सौर जिल्हा’ म्हणून जागतिक पातळीवर नोंद होण्यासाठी काम करायचे आहे.
रेल्वेमार्गासाठी प्रयत्न – रवींद्र गायकवाड  
मराठवाडय़ाच्या विकासात २१ टीएमसी पाण्याचा प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे. तो सोडविण्यास प्रयत्नशील राहणार आहे. तुळजापूर रेल्वेच्या नकाशावर यावे, तसेच गुलबर्गा-लातूर या नवीन दक्षिणोत्तर रेल्वेमार्गासाठी प्रयत्न करणार आहोत.
विकासात्मक पर्याय देणार- रोहन देशमुख
जिल्ह्य़ातील जिल्हा बँक, दूध संघ, सूतगिरणी, सहकारी साखर कारखाने मोडीत निघाले. शासकीय रुग्णालयात सामान्यांना उपचार मिळत नाही. त्यासाठी सोलापूर, पुणे या शहरांचा आधार घ्यावा लागतो. या सर्वाना विकासात्मक पर्याय देण्याचे काम लोकमंगल उद्योग समूहाने केले.

मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Padmasinha patil in trouble again
First published on: 07-04-2014 at 05:00 IST