रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाला राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या कळपात ओढण्यात भाजपला यश आले आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत त्याबाबतची घोषणा अपेक्षित आहे. लोकजनशक्ती पक्षाच्या संसदीय मंडळाने युतीबाबत निर्णय घेण्याचे सर्वाधिकार पक्षाचे सर्वेसर्वा रामविलास पासवान यांना दिले आहेत.
लालूप्रसाद यांच्या राष्ट्रीय जनता दलाबरोबर जागावाटपाची चर्चा ठप्प झाल्याचे मान्य करतानाच, भाजपबरोबर जाण्याचे पर्याय खुले असल्याचे पासवान यांनी स्पष्ट केले. राष्ट्रीय जनता दलाने आम्हाला सन्मानाची वागणूक दिली नसल्याचा आरोप पासवान यांनी केला. कारागृहातही आपण लालूप्रसाद यादव यांना भेटलो होतो. मात्र केवळ तीनच जागा देऊ अशी चर्चा त्यांच्या पक्षाचे नेते करू लागले. तरीही आम्ही काँग्रेसवर निर्णय सोपवला. अनेक महिने वाट पाहूनही काही निर्णय होत नाही. आमच्या पक्षाची काहीच ताकद नसल्याची भावना राजदची झाल्याने आम्हाला पर्याय शोधावा लागत असल्याचे पासवान यांनी स्पष्ट केले.
मोदींच्या बरोबर जाण्याने धर्मनिरपेक्ष प्रतिमेला धक्का बसणार नाही काय असे विचारता, आम्हाला कुणी धर्मनिरपेक्षता शिकवू नये. एका हातात संमिश्र भावना तर दुसऱ्या बाजूला पक्षाचे हित आहे. भाजप-लोकजनशक्ती पक्षाला आघाडीत सात जागा पासवान यांच्या पक्षाला मिळणार आहेत. आणखी एका जागेबाबत चर्चा सुरू आहे. काँग्रेस नेते शकील अहमद यांनी मात्र पासवान भाजपबरोबर जाणार नाहीत असा विश्वास व्यक्त केला आहे.तिसरी आघाडी अस्तित्वात येण्याची शक्यता पासवान यांनी फेटाळून लावली. काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाबरोबर आघाडीचे खूप प्रयत्न केल्याचे पासवान यांनी सांगितले. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना आपण दोन वेळा भेटलो. मात्र परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर पक्षाला याबाबत निर्णय घेण्यास सुचवले. लालूप्रसाद तुरुंगात गेल्यावर आपल्याला रडू आले. गेले सहा महिने आघाडीवरून अस्वस्थ होतो. आमचा पक्ष छोटा आहे त्यामुळे निवडणुकीच्या तयारीला वेळ लागतो असे त्यांनी सांगितले. संसदीय मंडळाच्या बैठकीत काय चर्चा झाली हे सांगण्याचे पासवान यांचे पुत्र आणि संसदीय मंडळाचे प्रमुख चिराग यांनी नकार दिला. मात्र भाजपशी आघाडी करण्यास कुणीही विरोध केला नसल्याचे अन्य एका नेत्याने स्पष्ट केले. संयुक्त जनता दलाने या संभाव्य आघाडीवर टीका केली आहे. जातीय शक्तींशी लढा देण्याच्या भूमिकेपासून पासवान का बाजूला झाले. २००२ ची परिस्थिती आणि आता असे काय घडले की पासवान भाजपबरोबर जात आहेत असा सवाल बिहारचे जलस्रोत मंत्री विजय कुमार चौधरी यांनी विचारला आहे.दरम्यान पासवान यांनी भाजपशी युतीचे संकेत देताच पक्षाचे एकमेव आमदार झकीर हुसेन खान यांनी लोकजनशक्ती पक्षाचा राजीनामा दिला आहे.
सात मतदारसंघ मिळणार
*लोकजनशक्ती पक्षाला हाजीपूर, समस्तीपूर, जमुई, मुंगेर, खगरिया आणि वैशाली हे मतदारसंघ मिळतील.
*तर औरंगाबादमधून संयुक्त जनता दलाचे बंडखोर खासदार सुशीलकुमार सिंह यांना लोकजनशक्ती पक्षातर्फे लढवण्यास भाजप तयार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 27th Feb 2014 रोजी प्रकाशित
पासवान पुन्हा भाजपच्या गळाला
रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाला राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या कळपात ओढण्यात भाजपला यश आले आहे.

First published on: 27-02-2014 at 04:43 IST
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Paswan who left nda over modi signals tie up with bjp for new option paswan who left nda over modi signals tie up with bjp for new option