देशातील जनतेने याआधीही २००४ आणि २००९ साली ‘भाजप’च्या ‘मार्केटिंग’चा फुगा फोडला होता आणि काँग्रेस पक्षाला सत्तेत आणले होते, यावेळीही जनता भाजपच्या सध्याचा ‘गुजरात मॉडेल’चा फुगा फोडून काँग्रेसला पसंती देईल, असा विश्वास काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी वर्ध्यातील जाहीर सभेत व्यक्त केला.
नरेंद्र मोदींना लक्ष्य करीत महाराष्ट्राच्या विकासाचे मॉडेल ‘गुजरात मॉडेल’पेक्षा अधिकपटीने चांगले असल्याचेही राहुल गांधी म्हणाले.
“देशात सध्या गुजरात मॉडेलवरून मार्केटिंग केले जात आहे. परंतु, गुजरात मॉडेलपेक्षा महाराष्ट्राचे विकासाचे मॉडेल अधिक चागंले आहे. महाराष्ट्रात परकीय गुंतवणुकीची टक्केवारी गुजरातपेक्षाही अधिक असून महाराष्ट्राची प्रगती योग्य दिशेने होते आहे” असेही ते पुढे म्हणाले.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी राज्य सुस्थितीत राहावे, यासाठी अतोनात प्रयत्न केले आहेत. ‘मनरेगा’ सारखी योजना राबवून काँग्रेसने खेड्यातील गरीब जनतेचे रोजगाराचे प्रश्ने सोडविले, तर दुसरीकडे भाजपकडून फक्त विकासाच्या नावे जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्यात येते आहे. अशी खरमरीत टीकाही राहुल गांधी यांनी यावेळी केली.
महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मजबूत सरकार आहे आणि यावेळीही राज्यात केलेल्या विकास कामांच्या बळावर पुन्हा एकदा जनता आघाडी सरकारला सत्तेत आणेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.