गुजरात मॉडेलचा देशभर गवगवा केला जात असला, तरी देशभरात एक रुपयाला टॉफी मिळते व तेवढय़ाच किमतीत अदानी उद्योग समूहाला एक मीटर जागा मिळते, असा हल्ला चढवून उद्योगपतींच्या हिताची धोरणे राबवणाऱ्या भूलभुलयाला बळी पडू नका, असे आवाहन काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केले.
काँग्रेसचे उमेदवार दत्तात्रय बनसोडे यांच्या प्रचारार्थ सोमवारी क्रीडा संकुल मदानावर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.  गांधी म्हणाले की, ही निवडणूक दोन विचारधारांची आहे. एक विचारधारा देश जोडण्याची भाषा करते, तर दुसरी देश तोडण्याची. एकाला देशाला प्रगतिपथावर नेत असताना सामान्य माणसाची प्रगती व्हावी ही इच्छा असते, तर दुसऱ्या विचारधारेत देश प्रगतिपथावर जात असताना काही निवडक लोकांचीच प्रगती अपेक्षित असते. सामान्यांचा विचार ते करीत नाहीत.
‘इंडिया शायिनग’च्या वेळी देशातील जनतेने अनुभव घेतला आहे. एनडीएच्या काळात भारत चमकत नव्हता, तर ती चमक नेत्यांच्या घरात व गाडीत दिसत होती. काँग्रेसची राजवट आल्यानंतर कोटय़वधी लोकांना रोजगार दिला गेला. शेतकऱ्यांसाठीचे ७० हजार कोटींचे कर्ज माफ केले.  उद्योग वाढत असताना सामान्य माणसाचे हित लक्षात ठेवले.
गुजरात मॉडेलची देशभर चर्चा केली जात आहे ती केवळ लोकांची दिशाभूल करण्यासाठी. वाजपेयींच्या काळात वाजपेयी-अडवाणींची जोडी होती. आता अडवाणींऐवजी अदानी हे जोडीदार बनले आहेत. गुजरातमध्ये त्यांना ४५ हजार एकर जमीन केवळ ३०० कोटींत देऊ करण्यात आली. एक रुपयात तुम्हाला टॉफी मिळते. अदानींना एक मीटर जागा गुजरात सरकारने दिली. त्यांनी गुजरातमध्ये उद्योग सुरू केला तेव्हा त्यांच्याकडे ३ हजार कोटींची मालमत्ता होती, ती आता ४० हजार कोटींवर पोहोचली. ही वाढ केवळ जमिनीच्या किमतीची आहे.  यूपीएचे सरकार पुन्हा सत्तेवर आल्यास मोफत उपचार-औषधे, सर्वाना पक्की घरे, सर्वासाठी निवृत्तिवेतन लागू केले जाईल. त्याचा लाभ गरिबांना होईल. मेड इन चायनाऐवजी मेड इन इंडिया, महाराष्ट्र, लातूर अशी भूमिका घेऊन अधिकाधिक युवकांना रोजगार दिला जाईल असे त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोदींच्या निम्मी गर्दी!
क्रीडा संकुलावरच राहुल गांधी यांची सभा घेऊन मोदी यांच्या सभेला तोडीस तोड उत्तर देण्याचे काँग्रेसने ठरवले होते. मात्र, मदानावर १० हजार खुच्र्या ठेवून मोदींइतकी गर्दी होणार नाही हे काँग्रेसने गृहीत धरले होते. त्यानुसार मोदी यांच्या सभेपेक्षा निम्मीच गर्दी क्रीडा संकुलावर होती.

मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul mocks modi says his gujarat development model is a toffee model
First published on: 15-04-2014 at 03:47 IST