आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात सुरू असलेल्या नेतृत्व बदलाच्या चर्चा, हालचालीविषयी आपणास काहीही माहिती नाही. त्यावर बोलायचे नाही, असे काँग्रेसचे नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी स्पष्ट केले. ‘नो कॉमेन्ट्स, बघू या!’ असे ते उत्तरले. जर कदाचित नेतृत्व बदलणार असेल तर अवश्य सांगेन, असे सांगून त्यांनी या मुद्यावर भाष्य न करता गोपनियता बाळगणे पसंत केले.
डोळ्यावरील शस्त्रक्रियेसाठी अमेरिकेत गेलेले शिंदे गेल्या बुधवारी मुंबईत परतले. त्यानंतर शुक्रवारी सकाळी ते दोन दिवसांच्या भेटीसाठी सोलापुरात दाखल झाले. त्यानंतर निवडक पत्रकारांशी बोलताना शिंदे यांनी नेतृत्व बदलाविषयी बोलण्यास नकार दिला. राज्यात मुख्यमंत्रिपदावर पुन्हा आपले नाव आघाडीवर असल्याच्या वृत्ताकडे लक्ष वेधले असता शिंदे यांनी ‘नो कॉमेन्ट्स’ एवढेच उत्तर देत, या विषयावर काहीही सांगायचे नाही, असे स्पष्ट केले.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नेतृत्व बदलून त्यांचा उत्तराधिकारी म्हणून शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे.  त्याबाबत विचारले असता शिंदे यांनी, आपणास काहीही माहिती नाही.मुख्यमंत्री म्हणून पुन्हा राज्यात येण्याची इच्छा आहे का, असे विचारले असता शिंदे यांनी, मुख्यमंत्रिपदासाठी आपले नाव १९८५ पासून प्रत्येक वेळी येत गेले. यापूर्वी राज्याची धुरा यशस्वीपणे सांभाळली आहे. आता काय होणार, हे माहीत नाही, बघू या, असे वक्तव्य करून हा विषय पूर्णत: टाळला.