रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात स्थानिक कार्यकर्त्यांच्या असहकाराबद्दल राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने डोळे वटारले असले तरी नारायण राणे यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतल्याशिवाय राष्ट्रवादीला भवितव्य नसून, पक्ष विस्तारण्याकरिता आता कोकणातच संधी असल्याने ‘आघाडीचा धर्म’ पाळताना राष्ट्रवादी हात दाखवून अवलक्षण करण्याची चिन्हे आहेत.
नारायण राणे यांचे पुत्र निलेश यांच्या प्रचारात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रवादीची नेतेमंडळी अजूनही सहभागी झालेली नाहीत. सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी प्रचारात सहभागी होण्यास नकार दिला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांचा राणे यांना असलेला विरोध जगजाहीर आहे. शेवटी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मध्यस्थी करावी लागली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोकणाचा दौरा केला. उद्या शरद पवार कोकणात जात आहेत. आघाडीचा धर्म पाळला जाईल, अशी ग्वाही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिली आहे. राष्ट्रवादीच्या वतीने मदतीचे आश्वासन दिले जात असले तरी राणे यांना राष्ट्रवादीच्या एकूणच भूमिकेबद्दल चांगलेच अवगत आहे. राष्ट्रवादीची तेवढी मदत होणार नाही हे गृिहत धरून राणे यांनी स्वत:ची यंत्रणा राष्ट्रवादीचे प्राबल्य असलेल्या गावांमध्ये कार्यांन्वित केली आहे.
पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादीचा बालेकिल्लाच आहे. मराठवाडय़ात पक्ष विस्तारण्यावर मर्यादा आहेत. विदर्भात पक्ष कधीच बाळसे धरू शकला नाही. मुंबईत अनेक प्रयत्न करूनही पक्ष वाढत नाही. उत्तर महाराष्ट्रात पक्षाची ताकद आणखी वाढण्याची तेवढी शक्यता नाही. यामुळेच कोकण आणि ठाणे यावर राष्ट्रवादीने अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. ठाणे (२४), रायगड (७), रत्नागिरी (५) आणि सिंधुदुर्ग (३) अशा विधानसभेच्या ३९ जागा आहेत. गेल्या वेळी या पट्टय़ातून राष्ट्रवादीचे १० आमदार निवडून आले होते. काँग्रेस आणि राणे यांना मागे टाकण्यात राष्ट्रवादी यशस्वी झाली होती. राणे यांचे प्राबल्य असलेल्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत राष्ट्रवादीचे तीन आमदार निवडून आले, पण या भागात राणे यांचा अपवाद वगळता काँग्रेसचे कोणीच निवडून आले नव्हते. राष्ट्रवादीच्या आमदारांचे संख्याबळ वाढविण्याकरिता कोकण आणि ठाणे हे दोन भाग पक्षाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. ठाणे जिल्ह्यात पक्ष वाढविण्यासाठीच अनधिकृत बांधकाम या संवेदनशील विषयाला पवार यांनी स्पर्श केला.
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांमध्ये पक्ष वाढविण्याला संधी असल्याचे राष्ट्रवादीच्या धुरिणांचे म्हणणे आहे. यातूनच कोकणातील भास्कर जाधव यांना प्रदेशाध्यक्षपदाची संधी देण्यात आली. राणे काँग्रेसवासी झाल्यावर कोकणात निर्माण झालेली राजकीय पोकळी राष्ट्रवादीने भरून काढली. हळूहळू राष्ट्रवादीने या पट्टय़ात आपला जम बसविला आहे. अशा वेळी राणे यांच्यापासून थोडे अंतर ठेवल्याशिवाय राष्ट्रवादीला पर्याय नाही.
संग्रहित लेख, दिनांक 13th Apr 2014 रोजी प्रकाशित
काँग्रेसला ‘हात’ दाखवून राणेंना अवलक्षण!
रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात स्थानिक कार्यकर्त्यांच्या असहकाराबद्दल राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने डोळे वटारले असले तरी नारायण राणे यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतल्याशिवाय राष्ट्रवादीला भवितव्य नसून, पक्ष विस्तारण्याकरिता आता कोकणातच संधी असल्याने ‘आघाडीचा धर्म’ पाळताना राष्ट्रवादी हात दाखवून अवलक्षण करण्याची चिन्हे आहेत.
First published on: 13-04-2014 at 01:29 IST
TOPICSकाँग्रेसCongressनारायण राणेNarayan Raneराष्ट्रवादी काँग्रेस पक्षNCPलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Election
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Teasing narayan rane ncp seeks chance to explore party in konkan