News Flash

आवळा पिकाचा प्रयोग, अन् ध्यास..

४४ एकरांवर त्यांनी आवळय़ाची लागवड केली आहे.

लातूरच्या कमलाबाई राठी (वय ७०) या ३० वर्षांपूर्वी शेतीला जाऊ लागल्या अन् त्यांचे शेतीवर प्रेम जडले. आजही दर दोन दिवसांनी काहीही करून शेतीला गेल्याशिवाय त्यांना चन पडत नाही. यातूनच लातूर तालुक्यातील भातांगळी येथील त्यांच्या शेतावर ३ हजार आवळय़ांची झाडे उभी असून मराठवाडय़ात सर्वाधिक आवळा उत्पादन करणारे शेतकरी म्हणून त्यांची नोंद आहे.

खानदानी शेतकरी कुटुंबात एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे शेतीचा वारसा आपसूक येतो. ग्रामीण भागात शेतीचे महत्त्व अजूनही आहे मात्र शहरात त्यातही सुखवस्तू कुटुंबात व मारवाडी समाजात शेतीची आवड निर्माण होणे अवघड असते. लातूरच्या राठी कुटुंबातील कमलाबाई विजय राठी (वय ७०) या ३० वर्षांपूर्वी सासूला सोबत म्हणून शेतीला जाऊ लागल्या अन् त्यांचे शेतीवर अपरंपार प्रेम जडले. आजही दर दोन दिवसांनी काहीही करून शेतीला गेल्याशिवाय त्यांना चन पडत नाही. यातूनच लातूर तालुक्यातील भातांगळी येथील त्यांच्या शेतावर ३ हजार आवळय़ाची झाडे उभी असून मराठवाडय़ात सर्वाधिक आवळा उत्पादन करणारे शेतकरी म्हणून त्यांची नोंद आहे. ४४ एकरांवर त्यांनी आवळय़ाची लागवड केली आहे.

कमलाबाई राठी यांचे पती विजय राठी हे लातुरातील मोठे उद्योजक, शिवाय विविध स्वयंसेवी संस्थांत काम करतात. त्यांना शेतीकडे लक्ष द्यायला वेळ नाही. कमलाबाईंना शेतीची आवड आहे, त्यामुळे प्रसंगी शेतीतून नफा झाला नाही व व्यवसायातील पसे तिकडे गुंतवावे लागले तरीही फारशी खळखळ न करता विजयभाऊ मदत करतात. शहरातून जाऊन ग्रामीण भागात शेती करणे व त्यातही मारवाडी महिलेने हे अवघड काम मात्र शेतीची खडानखडा माहिती घेऊन व सर्व बाबींचा बारकाईने अभ्यास करून, व्यवस्थापनकौशल्य अंगी बाळगून कमलाबाईंनी एक वेगळा आदर्श उभा केला आहे.

शहरातून ग्रामीण भागात जाऊन देखभाल कमीत कमी करण्यासाठी व पाणी कमी असल्यामुळे कमी पाण्यात नेमके काय घेता येईल याचा अभ्यास त्यांनी सुरू केला. आवळय़ाची शेती ही किफायतशीर असल्याचे काही जणांकडून कळले. त्यानंतर नगरजवळील पुणतांबे येथील बारहाते यांची आवळय़ाची शेती पाहिली. उत्तर प्रदेशातील अलाहाबादजवळील प्रतापगड जिल्हय़ात जगातील सर्वात मोठे आवळय़ाचे क्षेत्र आहे. तेथून अनेक प्रांतात व विदेशातही आवळा पाठवला जातो. आवळय़ावर प्रक्रिया करून तो विकला जातो. विदर्भातील डिग्रज येथील म्हेत्रे यांची शेतीही राठींनी पाहिली व त्यानंतर आपल्या शेतात आवळा लागवड करण्याचे त्यांनी ठरवले. आवळय़ाची लागवड योग्यप्रकारे व्हावी यासाठी दहा बाय दहा मीटर अंतरावर झाडी घ्यावी लागतात. त्यांनी आसपासच्या भागातून आवळय़ाची रोपे उपलब्ध करून लागवड केली. सहा, सात वष्रे झाडे सांभाळली मात्र अतिशय बारीक आवळा येऊ लागल्यामुळे या झाडांचे करायचे काय? ही चिंता त्यांना लागली. बारीक आवळय़ाला बाजारात फारशी मागणी नाही. त्यामुळे हा आवळा घेणे आíथकदृष्टय़ा परवडणार नाही हे त्यांच्या लक्षात आले. इतकी वष्रे पसे खर्च करून झाडे सांभाळली आता करायचे काय? हा प्रश्न होता. विदर्भातील डिग्रज येथील गणेश म्हात्रे यांच्याकडे ८५ एकरावर आवळा आहे. त्यांच्याशी संपर्क साधला. ते स्वत लातूरला आले व त्यांनी आहे ती सर्व झाडे तोडून नवीन मोठे आवळे येणारे झाडे लावण्याचे सुचवले. अर्थात यासाठी पुन्हा भांडवली गुंतवणूक करावी लागणार, शिवाय चार-पाच वष्रे उत्पन्नही येणार नाही. तेव्हा धाडस करायचे की नाही? यावर खल झाला व शेवटी धाडस करण्याचे निश्चित झाले.

कांचन, कृष्णा, बनारस, आनंद, एम ७ अशा विविध जातींची झाडे लावली गेली. यासाठीचे तांत्रिक मार्गदर्शन म्हेत्रे यांनी केले. गतवर्षीपासून या झाडांना मोठे आवळे लागण्यास सुरुवात झाली आहे. ६५ ते ७० ग्राम वजनाचा एक आवळा आहे. मागच्या वर्षी अतिशय कमी पाऊस होता. त्याचा लाभ आवळय़ाचे चांगले उत्पादन येण्यात झाला. या झाडांना कमी पाणी लागते. उन्हाळय़ात पाणी न देताही हे झाड जगते. अर्थात पहिली तीन वष्रे झाडांचे संगोपन करावे लागते. दुसऱ्यांदा झाडे लावल्यानंतर कुठलीच चूक ठेवायची नाही या पद्धतीने काळजी घेतली गेली. खोडअळीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी मोरचूद, चुना याचे द्रावण करून ते एक दिवस भिजवून झाडाच्या बुंध्यापासून पाच फूट अंतरापर्यंत लावले. त्यामुळे खोडअळी गेली. रासायनिक खताचा वापर न करता सेंद्रिय खताचा वापर केला. आंतरपीक घेतल्यामुळे अतिरिक्त खर्च कमी झाला. आलेला आवळा काढताना तो खाली पडला तर त्याची प्रत कमी होते व बाजारात त्याला कमी मागणी असते. त्यामुळे लोखंडी मोठय़ा शिडय़ा तयार केल्या गेल्या व त्यावर उभे राहून आवळे काढण्याची पद्धत सुरू केली.

यावर्षी बाजारपेठेत सरासरी २५ रुपये किलोचा भाव मिळाला. आवळे लागण्यास सुरुवात झाल्यानंतर पहिल्या वर्षी एका झाडाला ५ किलो, दुसऱ्या वर्षी १० किलो, तिसऱ्या वर्षी ४० किलो, चौथ्या वर्षी ८० किलो व त्यानंतर १०० ते १२० किलो आवळा येतो. बाजारपेठेची गरज लक्षात घेऊन हा माल विकावा लागतो. आवळा विकण्याऐवजी प्रक्रिया केली तर पाचपटीपेक्षा अधिक पसे मिळतात. आवळा कँडी, बीट आवळा सुपारी, आवळा सरबत, आवळाकंठी असे विविध पदार्थ तयार करून विकता येतात. राठी कुटुंबातील प्रत्येक सदस्य आता यात चांगलाच गुंतला आहे. सुनांपासून ते नातीपर्यंत आनंदाने सगळे हे काम करतात. घरगुती महिलांना व्यवसाय करायचा असेल तर त्यांना आवळा देऊन त्यांनी प्रक्रिया करून तयार केलेला माल विकत घेण्याची सोयही राठी यांनी उपलब्ध केली आहे. यात अधिकाधिक महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा, त्यांच्या खिशात चार पसे जावेत हा हेतू आहे.

आवळा कँडीला बाजारात २५०, आवळा मुरंब्यास २०० रुपये किलो असा भाव मिळतो. पित्तावर आवळा हा औषधी म्हणून वापरला जातो. आयुर्वेदात आवळय़ाला फार महत्त्व आहे. शेतकऱ्यांना आपल्या शेतात बांधावर किंवा अन्य ठिकाणी आवळय़ाची लागवड करता येऊ शकते. मराठवाडय़ात पाण्याचे दुíभक्ष्य दरवर्षी वाढते आहे. आंब्यांचा मोहोर गळणे, डाळिंब, द्राक्ष अशा फळबागांचेही मोठे नुकसान होते. आवळय़ाच्या बाबतीत हे नुकसान कमी प्रमाणात होते कारण ज्यावेळी गारपीट, वादळवारे असते त्यावेळी आवळा लागत नाही. आवळय़ाची लागणच ऑगस्ट महिन्यात सुरू होते व ती जानेवारी महिन्यात संपते.

उत्तर प्रदेशातील प्रतापगड या एका जिल्हय़ात ८५ हजार हेक्टरवर आवळय़ाची लागवड आहे. मराठवाडय़ातील आठही जिल्हय़ात आवळय़ाचे क्षेत्र वाढवले तर शेतकऱ्याला याचे वेगळे पसे मिळू शकतील शिवाय आंतरपीक घेता येईल. एका झाडाला तीन हजार रुपये याप्रमाणे पसे मिळू शकतात व आलेल्या आवळय़ावर प्रक्रिया केली तर १० ते १२ हजार रुपये मिळतात. राठी कुटुंब आíथकदृष्टय़ा सक्षम आहे. मात्र या वयातही त्या अतिशय निष्ठेने शेती करतात. निर्मितीचा आनंद वेगळाच असतो. आपल्याकडून काही चांगले विचार घेऊन इतरांनी त्याचे अनुकरण केले तर तो आनंद काही औरच असतो, असे राठी आवर्जून सांगतात.

वरदान ठरणारी आवळा लागवड

कमी पाण्याची, तुटपुंजी भांडवली गुंतवणुकीची, किरकोळ देखभालीची, हवामान बदलास तोंड देणारी व किफायतशीर उत्पादन देणारी शेती म्हणून आवळा उत्पादनाकडे पाहिले जाते. याचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून आवळय़ाची लागवड केली, तर शेतकऱ्यांसाठी ते वरदानच ठरणार आहे.

pradeepnanandkar@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2016 3:35 am

Web Title: amla crop in maharashtra
टॅग : Maharashtra
Next Stories
1 मानवनिर्मित दुष्काळ बदलायला शिकवतोय
2 आंबा निर्यातवाढीसाठी ‘पणन’ने कंबर कसली
3 कृषीवार्ता : केंद्राकडून ८ हजार ५०० टन डाळींची निर्यात
Just Now!
X