News Flash

अर्थपूर्ण लसूण शेती

काही हजार वर्षांपासून भारतात लसणाचा उपयोग औषधी म्हणून केला जातो.

काही हजार वर्षांपासून भारतात लसणाचा उपयोग औषधी म्हणून केला जातो. षड्रसांपकी आंबट वगळता पाचही रस असलेला लसूण हा बहुपयोगी आहे. जगातील अनेक देशांत लसणाचे उत्पादन आज घेतले जाते व प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात याला अतिशय मानाचे स्थान दिले जाते. मांसाहारी व शाकाहारी या दोन्हीही गटांत लसणाची जागा मात्र ठरलेलीच आहे. अन्नाला चव आणणारा लसूण म्हणूनच सर्वाच्या आवडीचा झाला आहे.

लसणाची नेमकी उत्पत्ती कुठे झाली याला निश्चित आधार नाही. प्रत्येक खंडातील लोक आमच्या येथेच लसूण पहिल्यांदा उत्पादित झाला असा दावा करतात. देव-दानवांच्या युद्धात राहूने चोरून अमृत प्राशन केले. त्याचा गळा कापल्यानंतर जे अमृताचे कण पडले त्यातून लसणाची उत्पत्ती झाली अशी आख्यायिका सांगितले जाते. लसणाला संस्कृतमध्ये रसोण (रस+उणे) असे संबोधले जाते. लसूण हे कांद्याप्रमाणेच कंदवर्गीय पीक आहे. एका लसणाच्या गड्डय़ात २० ते २५ पाकळय़ा असतात व प्रत्येक पाकळीला स्वतंत्र आवरण असते. सर्दी, खोकला, फुप्फुसाच्या आजारावर रामबाण औषध म्हणून लसूण वापरली जाते.

१७२२ साली आपल्या देशात जेव्हा प्लेगची साथ होती तेव्हा औषध म्हणून लसणाचा वापर केल्याचे संदर्भही अनेक जण सांगतात. जंतप्रकृती, भूक न लागणे यावर लसूण हे गुणकारी आहे. तुटलेले हाड सांधण्यासाठी याचा वापर होतो. शरीरातील शुक्र धातूचे प्रमाण लसणामुळे वाढवले जाते, मात्र ते पित्तवर्धक आहे. सर्दी व खोकल्यावर औषध म्हणून उपयोगात आणण्यासाठी लसणाचे तेलही काढले जाते. लसूण उत्पादनासाठी थंड वातावरण लागते. पाण्याचा निचरा होणारी जमीन यासाठी आवश्यक आहे. जमिनीचा पीएच ५.५ ते ६.८ इतका असावा लागतो. थंड हवेच्या भागात मार्च ते एप्रिल महिन्यांत लसणाची लागवड केली जाते, तर अन्य ठिकाणी ऑक्टोबर ते नोव्हेंबर या थंडीच्या दिवसांत लसणाची लागवड केली जाते.

गावरान व संकरित असे लसणाचे ढोबळ दोन प्रकार आहेत. देशभरात अनेक ठिकाणी लसूण संशोधन केंद्रेही अस्तित्वात असून तेथे लसणाच्या विविध जाती निर्माण केल्या जात आहेत. सरासरी एका एकरला ६ ते ८ क्विंटल लसणाचे बियाणे लागते. लावणीपूर्वी जमीन नांगरणे, पाळी घालणे व काही ठिकाणी पाऊस पडला नाही तर पाणी देऊन लसूण लावला जातो. काही शेतकरी सुरुवातीला रोप तयार करून त्यानंतर त्याची लावण करतात, तर काही जण थेट पेरणी यंत्राद्वारे लसूण पेरतात. जमिनीत २ ते ४ सेंमी खाली लसणाचे बी गेले पाहिजे. दोन ओळींतील अंतर ३० सेंमी, तर दोन रोपांतील १५ सेंटिमीटर असणे अपेक्षित आहे. आधुनिक पद्धतीने शेती करणारी मंडळी अन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये, जमिनीतील ओल कमी होऊ नये यासाठी मल्चिंग पेपरचाही वापर करतात. लसणाला सिंचनाची सोय आवश्यक आहे. कमी पाण्यात अधिक उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढलेला असल्यामुळे आता बहुतांश शेतकरी ठिबक सिंचनाद्वारेच लसणाची शेती करतात.

जगात चीन, फ्रान्स, स्पेन व इजिप्त हे चार देश मोठय़ा प्रमाणावर लसणाची निर्यात करतात. आपल्या देशात लसणाला मोठी मागणी आहे, मात्र कांद्याप्रमाणेच लसणाचे उत्पादन अधिक झाले म्हणून भाव पडतात. कधी १० रुपये किलो दराने शेतकऱ्याला लसूण विकण्याची पाळी येते, तर कधी २०० रुपये किलोचाही भाव मिळतो. या वर्षी सध्या लसणाला बाजारपेठेत अतिशय चांगला भाव आहे.

गुजरात प्रांतातील शेतकरी ज्या पद्धतीने लसणाचे उत्पादन घेतात ती उत्पादकता आपल्याकडील शेतकऱ्यांनी वाढवण्यासाठी प्रयत्न करायला हवा. राज्य सरकारच्या कृषी विभागामार्फत व पुणे येथील लसूण संशोधन केंद्राचे मार्गदर्शनही शेतकऱ्यांनी घेण्याची गरज आहे. चांगला भाव मिळाला तर तीन महिन्यांत शेतकऱ्याला खर्च वजा जाता एकरी ५० हजारांपेक्षा अधिक नफा मिळू शकतो.

 

दोन एकरांत साडेचार लाखांचे उत्पादन

औसा तालुक्यातील पोमादेवी जवळगा येथील शेतकरी नीलेश नारायणदास जाजू या शेतकऱ्याने गतवर्षी दोन एकरांवर लसणाची लागवड केली. ठिबक सिंचनाद्वारे पाणी दिले. एकरी ३ क्विंटल इतके बियाणे लागले. तीन महिन्यांत ८० ते १०५ रुपये असा लसणाला सरासरी भाव मिळाला व तब्बल ४ लाख ५० हजार रुपयांचे उत्पादन झाले. गतवर्षी अतिशय दुष्काळाच्या स्थितीत लसूण शेतीने आपल्याला चांगली साथ दिली. योग्य नियोजन केले तर कमी पाण्यात लसणाचे अधिक उत्पादन घेता येऊ शकते हा आपला अनुभव असल्याचे जाजू म्हणाले.

  • सरासरी एकरी ४ ते ६ टन उत्पादन महाराष्ट्रात मिळते.
  • हेक्टरी उत्पादकता १२ टनांच्या आसपास आहे. गुजरातची उत्पादकताही २५ टनांपेक्षा अधिक आहे.
  • एकूण देशाची उत्पादकता ही १६ टन आहे. जगभरात चीन, इजिप्त, फ्रान्स, स्पेन, अमेरिका या देशांत लसणाचे उत्पादन घेतले जाते.
  • जगाच्या तुलनेत आपल्या देशातील उत्पादकता अतिशय कमी आहे. गतवर्षी चीनमध्ये साडेआठ लाख हेक्टरवर लसणाची शेती करून २०० लाख टन उत्पादन काढण्यात आले. या तुलनेत भारतात २.०२ लाख हेक्टरवर लसणाची लागवड झाली व उत्पन्न मिळाले साडेअकरा टन.
  • जगाच्या तुलनेत गुजरात प्रांतातील शेतकरी लसणाचे उत्पादन अतिशय चांगल्या पद्धतीने घेतात.
  • लसणाच्या अत्याधुनिक प्रजातीची लागवड करून त्याद्वारे अधिकाधिक उत्पादन घेत व हे उत्पादन निर्यात करण्यावर तेथील शेतकऱ्यांचा भर आहे.

 

– प्रदीप नणंदकर

pradeepnanandkar@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2016 1:01 am

Web Title: garlic farming information guide
Next Stories
1 दुसऱ्या हरितक्रांतीसाठी..
2 कृषिपूरक व्यवसायातून प्रगतीकडे
3 भाव पडले, विपरीत घडले..
Just Now!
X